पितृतुल्य विष्णुदादा...

    08-Jan-2021
Total Views |

Hematai Patil_1 &nbs
 
जबतक सुरज चाँद रहेगा।
तब तक अपना नाम रहेगा॥
 
आज प्रत्येकाच्याच हृदयात दादा तुम्ही घर केलं आहे. आज फक्त देहरूपाने तुम्ही आमच्यात नाहीत, पण तुमचा सहवास, तुमचे सत्विचार, तुमचा शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव आहे आणि असेल. मी १९८७ साली इयत्ता पाचवीत तलासरी केंद्रात प्रवेश घेतल्यापासून आबा (माधवराव काणे), चिंतामणदादा वनगा, विष्णुदादा सवरा, आदरणीय अप्पा, वसुधाताई, आदरणीय कुंदाताई, अशा अनेक सत्-पुरुषांचा सहवास मला लाभला, हे मी माझे भाग्य समजते. कैलासवासी आबा, आदरणीय अप्पा, वसुधाताई या त्रिमूर्तींच्या सत्विचाराने प्रेरित झालेले चिंतामणदादा, विष्णुदादा अशा अनेक हिऱ्यांना घेऊन तलासरी केंद्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यातील हे दोन हिरे एक-एक करून आपल्यातून निघून गेले, ही आपल्यासाठी खूप मोठी दुःखद गोष्ट आहे.
 
केंद्रातील माजी विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी त्यांना ‘साहेब’, ‘मॅडम’ न म्हणता ‘दादा’ आणि ‘ताई’ म्हणणे ही या त्रिमूर्तींचीच आम्हाला शिकवण आहे. तेव्हा आम्ही आमचे विष्णुदादा कॅबिनेट मंत्री झाले असतानाही, आम्ही त्यांना ‘दादा’ अशीच हाक मारत असू आणि आमच्या दादांनाही आम्ही ‘साहेब’ असं संबोधलेलं आवडायचं नाही, हेही तितकेच सत्य आहे.
विष्णुदादा एका खेडेगावातील आणि तेही अशिक्षित वनवासी कुटुंबांतील होते. ना घरची राजकीय पार्श्वभूमी ना शैक्षणिक पार्श्वभूमी. पण, तरीही दादा एक उच्चविद्याविभूषित झाले आणि कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचले, ही आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची आणि आदर्शवत गोष्ट आहे.
 
दादांचा स्वभाव मितभाषी होता. कधीही त्यांनी कुणाला दुखावलं नाही. वादविवाद टाळून सुसंवाद कसा साधता येईल, यासाठी ते सुपरिचित होते. त्यांची भाषणं करण्याची पद्धत ही एक आदर्शवत होती. जसा समोरचा श्रोतावर्ग असेल तसे ते आपली भाषाशैली वापरायचे. त्यांचे भाषण तासन्तास ऐकत बसावे असेच असायचे. भाषणात इंग्रजी वाक्ये असायची, कधी हिंदी वाक्यं असायची, तर कधी संस्कृतही वापरायचे. खूप अभ्यासपूर्ण आणि रसपूर्ण दादांचं भाषण असायचं. दादांची अनेक संघगीतं पाठ असायची. तसेच भजन, गवळणी म्हणण्यामध्ये त्यांचा कुणी हात धरू शकत नव्हता.
 
मी दादांच्याच संस्थेच्या शाळेत १९९८ पासून कार्यरत आहे. दादा माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होत. मग माझं लग्न असेल किंवा माझ्यावर आलेलं सर्वात मोठं दुःख म्हणजे, माझ्या पतीचं निधन. माझ्या पतीच्या निधनावेळेसचा प्रसंग सांगते. माझे सर्व नातेवाईक ‘मंत्री येणार आहेत’ म्हणून सगळे माझ्या आजूबाजूला कुजबूज करत होते. पण, मी मनात म्हटलं, ‘तुमचे ते मंत्री असतील, पण माझ्यासाठी माझे ते दादा आहेत.’ खरंच माझे दादा कॅबिनेट मंत्री असूनसुद्धा माझ्या घरी जवळजवळ २० मिनिटे माझ्यासाठी बसले. जाताना माझ्या डोक्यावरुन हात फिरवला आणि मला म्हटलं, “हेमा, घाबरू नकोस. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत.” किती मोठा हा आधार होता मला त्याप्रसंगी माझ्यासाठी!
 
दादांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना आम्ही भेटायला गेलो होतो, तेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला भेटायला आल्यावर जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद दादांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसत होता. ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट होती. भेटायला गेलेले असताना माझ्याकडे त्यांनी क्षमा मागितली की, “मी पुन्हा तुला भेटायला येऊ शकलो नाही.” बाप रे! माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. मी कोण त्यांना माफ करणारी?
 
कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी दादा समोरच्या देवतेच्या प्रतिमेला, सत्पुरुषांच्या प्रतिमेला खूप अदबीने पुष्पहार घालायचे आणि नमस्कार करायचे, पण आज त्याच सत्पुरुषाला पुष्पहार घालण्याची वेळ आपल्यावर आली, ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे. आम्ही सदैव आपल्या आठवणीत राहू. त्यांचं राजकीय जीवन, सामाजिक जीवन आपल्या सर्वांना परिचित आहे, म्हणून मी त्या आठवणींना उजाळा न देता मला लाभलेला सहवास, अनुभव मी माझ्या दोन-तीन वाक्यांत शब्दबद्ध केले आहेत. अशा माझ्या पितृतुल्य विष्णुदादांना परमेश्वरचरणी चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
 
 
- हेमाताई पाटील
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.