संघ संस्कारांचा शिलेदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Gopinath Ambhire_1 &
सुमारे १९८४-८५ ची घटना असेल. चिंचणी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता विष्णु सवरा येणार आहेत, असे समजले. मला ना सेनेचे देणे होते, ना भाजपचे, ना त्यांच्या कार्यकर्त्यांचे. मी संघात आलो ते १९७८ साली आणि १९८१ ला संघ शिक्षा वर्गात गेलो. तेव्हापूसन माझे ‘संघ एके संघ’ आणि ‘संघ दुणे संघ’च. परंतु, कोणीतरी हिंदुत्वाची बाजू घेऊन राजकारणात उतरत आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता आपल्या तलासरी वसतिगृहातील माजी विद्यार्थी येणार आहेत, म्हणून मी दादांची माहिती काढून कुतूहलाने त्या कार्यक्रमास गेलो होतो. भाजप-सेना युती असल्याने शिवसैनिकही बऱ्यापैकी होते. वनवासी समाजातील एक व्यक्ती अस्खलित मराठीत, अधूनमधून काव्यपंक्ती पेरत मार्गदर्शन करतो, याबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ गायनाने झाली. पहिल्या चरणानंतर ‘वंदे मातरम्’ पुटपुटणारे ओठ बंद झाले. दुसऱ्या कडव्याच्या वेळी सर्वांची नजर ध्वनिक्षेपकारवर गाणाऱ्या व्यक्तीवर स्थिरावली, तोच तिसरे कडवे सुरू झाले आणि सर्व कार्यकर्त्यांची आश्चर्ययुक्त नजर विष्णुदादांवर स्थिर झाली. विष्णुदादा संपूर्ण ‘वंदे मातरम्’ लयीत गात होते. मला शांताराम बारी (शिवसेनेचे कार्यकर्ते) यांनी विष्णुदादांबद्दल विचारले, जेव्हा मी त्यांना विष्णुदादांच्या घरची परिस्थिती, वसतिगृहातील शिक्षण, नोकरी सोडून समाजबांधवांच्या हिताकरिता किंबहुना हिंदुत्वाच्या रक्षणाकरिता राजकारणात असा प्रवास सांगितला, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसणे स्वाभाविक होते.
 
अधूनमधून ‘वनवासी कल्याण केंद्र’ (तलासरी), ‘हिंदू सेवा संघ’ (आंबाण), संघाचे ‘हेमंत शिबीर’ अशा निमित्ताने विष्णुदादांशी परिचय वाढत गेला, पण अगदी जवळून परिचय होण्याकरिता १९९० उजाडावे लागले. निमित्त होते कारसेवेचे. झांशी रेल्वे स्थानकात आम्हाला अटक झाली. त्या बंदिवानांमध्ये रामभाऊ कापसे आणि विष्णु सवरा यांना बघून मी उडालोच. राजकीय व्यक्ती कारसेवेला येतात. आम्हा सर्वांकरिता हे अप्रूपच होते. मुलायमसिंह यादव यांच्या कारकिर्दीत सर्व तुरुंग कारसेवकांनी आधीच भरल्यामुळे आमची रवानगी ललितपूर येथे एका शाळेत केली गेली. पहिल्या दिवशी कारसेवक कसेबसे जेवले. पण, तेथील जेवण महाराष्ट्रीय मंडळींना पचण्यासारखे नव्हते. म्हणून या दोन भाऊ-दादांनी पुढाकार घेतला. जो कोणी जेलर होता, त्याच्याशी चर्चा केली आणि “तुम्ही शिधा द्या, आम्ही आमचे जेवण बनवू,” अशी तडजोड झाली. रामभाऊंनी लहानशी सभा घेऊन भोजन बनवणारे, वाटप करणारे, अशी व्यवस्था लावली. विष्णुदादांनी माझ्याकडे शिट्टी दिली आणि एकप्रकारे मी या ललितपूरच्या शिबिराचा मुख्य शिक्षक झालो. दुपारी जेवणाची शिट्टी फुंकली, तसे सर्वजण ताट-वाटी घेऊन रांगेत उभे राहिले. मी जरा ऐटीतच रांग व्यवस्थित करण्याकरिता एका टोकापासून सुरुवात केली. २०-२५ पावले गेल्यानंतर मला सुखद धक्का बसला, तो दोघाही विद्यमान आमदारद्वयींना रांगेत बघून...
संध्याकाळी विष्णुदादा आणि रामभाऊ शाखा लागण्याच्याआधी मैदानावर हजर राहत. माझ्याकडे कार्यक्रमासंबंधी विचारणा करत. एखादा विषय मांडण्याकरिता परवानगी मागत. त्यावेळी मला कसंसच वाटे. विष्णुदादा संघाची पद्यं लयबद्ध चालीत म्हणत असत. त्यांची अनेक संघगीते मुखोद्गत होती. त्यांचा सर्वसामान्याप्रमाणे वागण्याचा व्यवहार सर्व कारसेवकांना भावला होता.
आठवड्याभरानंतर काही कारसेवक मुलायमसिंहांच्या जुलमी कारभाराने जास्तच अस्वस्थ झाले. त्यांनी शाळेतील बाकांना आग लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेळीच प्रकार लक्षात आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी भोजनापूर्वी सर्वांना एकत्र बसविण्यात आले आणि विष्णुदादांनी जे सांगितले, ते आजही एका राष्ट्रीय विचारधारेचे सोपे मार्गदर्शन होते. ते म्हणाले होते, “घरात भांडण झाले तर आपण काय घराला आग लावतो? ही शाळा विद्येचे मंदिर आहे, सरकारच्या सर्व सार्वजनिक सुविधा या आपल्याकरिता असतात, त्या आपल्याच असतात. हा देश, या देशातील सर्व मालमत्ता आपल्याच आहेत, या राज्य सरकारबद्दल राग असणे स्वाभाविक आहे, पण हा मार्ग योग्य नव्हे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, आताच नव्हे, तर केव्हाही अन्यायाविरुद्ध लढताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी आपण घेऊ. बोला, भारतमाता की जय.”
आजकाल होणाऱ्या आंदोलनात तथाकथित राष्ट्रवादी, पुरोगामी, लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणविणारे राजकीय नेतृत्व, तोडफोड, विध्वंसक, देशद्रोही कारवाया आपल्या हस्तकांकडून करवून घेतात. त्या पार्श्वभूमीवर तलासरी, भिवंडीसारख्या विध्वंसक, विद्रोही विचारधारेच्या क्षेत्रात राहून शिक्षण घेतलेल्या विष्णुदादांनी आपल्या तलासरी वसतिगृहातील संस्काराचा वसा कायम ठेवला होता आणि सर्वोतोपरी ही तत्त्वनिष्ठा असणाऱ्या पक्षात त्यांनी काम केले. ते आयुष्याच्या अंतापर्यंत...
२००४ साली मी विष्णुदादांना त्यांच्या घरी, वाडा येथे भेटायला गेलो, तेव्हा मठाचे महंत बालकनाथ बाबा तेथे आले होते. विष्णुदादा शुभ्र कपडे परिधान करून नामस्मरण करत बाहेर आले. बालकनाथ बाबांना पाहताच त्यांनी शिरसाष्टांग दंडवत घातला व आम्हालाही रामराम केला. बालकनाथ बाबांनी दिलेला प्रसाद श्रद्धाभावाने ग्रहण केला. मोठ्या जटा, एक लंगोटी, काखेत झोळी असलेले ठेंगणेठुसके बालकनाथ बाबा मला अवलियाच वाटले. मठाकरिता काही मागण्यासाठी आले असतील, असे वाटले. त्यांनी विष्णुदादांची अगत्याने चौकशी केली. नंतर आपले गार्‍हाणे मांडले. ते याप्रमाणे-
“विष्णु, हल्ली आपल्या परिसरात पांढरे बगळे जास्तच फिरायला लागले आहेत. त्याबद्दल काही कायदेशीर उपाय करता येतो का, ते बघ. त्या कंचाड गावापासून आत १०-१२ किमींवर तो साकव मोडकडीस आला आहे. या पावसाळ्याच्या आधी बांधून झाला नाहीस तर त्यांचे वाड्याकडे येण्याचे मार्ग बंद होतील. हाल होतील. बघा, कसे जमते ते.”
विष्णुदादांनी त्यांचे म्हणणे पूर्ण ऐकून मान डोलावली आणि बालकनाथ बाबांनी समाधानाने त्यांचा निरोप घेतला. स्वत:करिता काही न मागता समाजाची समस्या योग्य त्या व्यक्तीकडे विश्वासाने प्रकट करणारी महंत बालकनाथ बाबांसारखी व्यक्ती विरळीच! तसेच त्यांना मूकपणे मान हलवून आश्वस्त करणारे विष्णुदादाही विरळेच!
डिसेंबर २०१९ मध्ये मी आणि बिपीन वाडेकर (वाडा तालुका कार्यवाह) त्यांना भेटायला गेलो. शरीर, प्रकृती बरीच खालावलेली होती. परंतु, चेहऱ्यावर नेहमीचा टवटवीतपणा होता. त्यांच्या दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. “डॉक्टर आणि देवाच्या कृपेने जगतोय,” असे ते हसतच म्हणाले. बोलताना थकवा जाणवत होता, तरीसुद्धा आमच्याबरोबर तासभर गप्पा झाल्या. आम्हा दोघांच्या घरच्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. पालघर जिल्ह्यातील संघाची माहिती घेतली. बराच वेळ कारसेवेत रमले. “श्रीराम मंदिर बघण्याचा योग येतो का बघू,” असे म्हणाले. पूर्ण संभाषणात त्यांनी राजकारणासंबंधी अवाक्षरही काढले नाही. निरोप घेताना मी नमस्कारासाठी वाकलो, तर हात वरच्या वर पकडले.
विष्णुजी सवरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
 
 
- गोपीनाथ अंभिरे
(लेखक पालघरचे जिल्हा संघचालक आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@