विष्णुवियोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

DIlip Kane_1  H
 
 
 
 
जन्माला आलेला प्रत्येकजण कधीतरी जाणारच, हे जरी खरं असलं तरी विष्णु सवरा यांचा बुधवार, दि. ९ डिसेंबर, २०२० रोजी झालेला मृत्यू राजकीय क्षेत्रात वावरणार्‍यांना, पालघर जिल्ह्यातील त्यांच्या समाजबांधवांना तमाम कार्यकर्त्यांना, तलासरी केंद्रातील सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना, संघ परिवाराला व पालघर जिल्हा भाजपला जबरदस्त धक्का देणारा आहे.
विष्णुदादा... कुणासाठी ते नामदार होते, कुणी त्यांना आमदार म्हणून ओळखत होते, कुणाला ते पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेव्हापासून ज्ञात असतील. विधानसभेत सलग सहावेळा ते निवडून आले. त्यावेळी त्यांनी केलेल्या कामगिरीशी कुणी संबंधित असतील. आदिवासी विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून कुणाला ते प्रभावी वाटले असतील.
पण... पण, कुठल्याही पद आणि पदकांपेक्षा, मान आणि सन्मानापेक्षा, सत्तेच्या आसन किंवा अधिकाराच्या आभूषणांपेक्षा, त्यांना रुचणारी, शोभणारी आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांना, कार्यकर्त्यांना आवडणारी, सुखावणारी पदवी आहे ‘दादा.’
विष्णु रामा सवरा... त्यांच्या स्नेहीजनांचे, तलासरी केंद्रातील सर्वांचे ‘दादा.’
 
 
स्वार्थाचा कणमात्र हेतूही मनी न धरता, आपल्याच समाजबांधवांसाठी, मतदारसंघातील अन्य जनांसाठी आपल्या सकल शक्तीयुक्तीचा विनियोग नंदादीपासारखा शांतपणे करायचा आणि तोही जन्मभराच्या निःशब्द बोलीने वनवासी भागांत, हे कातळ खोदण्यासारखं कष्टप्रद पण अंती स्वबांधवांसाठी केलेले पुण्यशील काम. विष्णुदादांनी थोडीथोडकी नाही, तर ४० वर्षे अहोरात्र मेहनतीने मतदारसंघच बांधला नाही, तर वनवासींच्या सर्वांगीण उन्नतीसाठीही ते अहोरात्र झटले.
 
 
वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यांतील हजारो निर्धन व निरक्षर वनवासी कुटुंबातील दादाही एक होते. वाडा पंचक्रोशीतील गालतरे या खेडेगावात एका अतिशय गरीब वनवासी कुळात त्यांचा जन्म १९५० साली झाला. दादांचं प्राथमिक शिक्षण तिथे जेमतेम दुसरी इयत्तेपर्यंत झालं. तद्नंतर गोर्‍हे या गावी पुढील शिक्षण झालं. माध्यमिक शाळा तिथे नसल्यामुळे शालान्त परीक्षेपर्यंतचे म्हणजेच अकरावीपर्यंतचे शिक्षणासाठी ते मनोर येथे आले. अकरावीची परीक्षा चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते भिवंडीमध्ये आले. बी. एन. एन. कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत त्यांनी डिग्री मिळविली. याच कॉलेजमध्ये तलासरी केंद्राचे चिंतामणदादा वनगा शिकत होते. साहजिकच समविचारी व्यक्तींची मैत्री होते, तशीच यांचीही मैत्री झाली. सुरुवातीस कॉलेज आवारातील वसतिगृहात दोघे राहत होते. याचवेळी जी. जी. दांडेकर कारखान्यासमोरील हनुमान टेकडीवर दादासाहेब दांडेकर यांच्या नावाने वसतिगृह सुरू आहे. त्याची जबाबदारी संघ स्वयंसेवक घेत होते. तिथेच माधवराव काणे व विष्णुदादांची भेट झाली व दादा तिथेच राहू लागले. वरचेवर माधवराव वसतिगृहात येत असत. त्या वारंवारच्या भेटीने चिंतामणदादा व विष्णुदादांना त्यांचे विचार पटू लागले होते. अशाच तर्‍हेने चार वर्षांत कळत-नकळत त्यांच्यात एक नातं तयार झालं. राजकीय संन्यास घेऊन माधवराव वनवासीयांमध्ये झोपडी बांधून राहत होते. याचं अप्रूप दादांनाच होतं. त्यांची राजकीय कारकिर्द, गोवामुक्ती आंदोलनातील सहभाग, गोळीबारात जखमी व कारावास या सर्वांचा एकत्रित परिणाम या दोघांवर होत होता. अखेरीस दोघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. आता डिग्री हातात होती. चिंतामणदादांना वकील करायचे व त्यांनी जव्हारमध्ये राहून वनवासींचे प्रश्न सोडवावेत, तसेच झाले. विष्णुदादा स्टेट बँकेत नोकरीस लागले व काही वर्षांत अधिकारीही झाले. त्यामुळे त्यांची बदली दापचरी ब्रांचमध्ये झाली. त्यावेळी दादा तलासरीत राहत होते. या वास्तव्यात दादांना माधवरावांचा खूप सहवास लाभला.
 
 
जीवन समृद्ध करायला अनेक छोट्या-छोट्या गोष्टी हातभार लावत असतात. समोरच्याच्या मतांचा आदर करणे, कोणत्याही बाबतीत आग्रही, दुराग्रही नसणे, नव्या, वेगळ्या विचारांना खुलेपणाने सामोरे जाणे या माधवरावांच्या स्वभावविशेषांचा दादांना वेळोवेळी अनुभव येत गेला. माधवरावांनी दादांवर कोणताही निर्णय लादला नाही, निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दादांना होते.
एक दिवस माधवरावांनी एक महिन्याची नोटीस देऊन बँकेत राजीनामा द्यायला सांगितले. कोणताही विचार न करता, दादांनी स्टेट बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला. आता पुढे काय? ते वर्ष होतं १९८०. दादांना माधवरावांनी वाड्याला जायला सांगितले. तिथे राहून भाजपचे काम सुरू करायचे. त्याप्रमाणे दादा वाड्याला येऊन राहिले व भाजपचे पूर्ण वेळ काम करू लागले.
 
 
त्याच सुमारास विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यासाठी दादांना उमेदवारी मिळाली. त्या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. त्या पराभवाने खचून न जाता, ‘पुनश्च हरिओम’ म्हणून दादा कामाला लागले. १९८५ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण, दादांनी काम मात्र चालूच ठेवले. खूप कार्यकर्ते जोडले. त्यानंतर मात्र सलग १९९०,१९९५, १९९९,२००४,२००९ व २०१४ अशी सहा वर्षे विष्णुदादांनी मागे वळून पाहिले नाही.
 
 
१९९० साली विजयी झाल्यावर वाड्यात जल्लोष सुरु झाला. विजयी मिरवणुकीची तयारी सुरु झाली. मिरवणूक सुरु करा, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण, विष्णुदादांनी जोपर्यंत माधवराव (सर) इथे येत नाहीत, तोपर्यंत मिरवणूक सुरु होणार नाही आणि झालेही तसेच. माधवरावांना दादा निवडून आल्याचे कळताच एका दुचाकीवरुन ते तलासरीहून निघाले व तडक वाड्यात आले. ‘न भूतो न भविष्यति’ असा जनसमुदाय लोटला होता. माधवरावांचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं.
 
 
राजकारणातील सर्वांनाच डोळे आहेत, असतातही. आंधळेपणानं राजकारण करता येत नसतेच. पण, निवडणुकांपलीकडे पाहता येण्यासाठी नुसते डोळे असून भागत नाही. दृष्टी असावी लागते. ती दृष्टी दादांपाशी होती. दृष्टी, करुणा, चिकाटी आणि समर्पितता या विष्णुदादांच्या ठाई असलेल्या चार गुणांचा संस्कार त्यांच्यावर वनवासी विकास प्रकल्प, तलासरीतून झाला होता.
 
 
जीवन समृद्ध करायला अनेक छोट्या छोट्या गोष्टी हातभार लावत असतात. फक्त त्याच्यातील सामर्थ्य जाणण्याची ताकद आपल्यात हवी. ही ताकद माधवरावांच्या सहवासाने दादांना मिळाली. याचप्रमाणे आपलं संवेदनशील मन आणि ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ दापचरी शाखेतील अनुभव यातून दादांचं जीवन अधिक फुललं, बहरलं.
 
 
‘अपराजित जिद्द’ हे विष्णुदादांचे एक वैशिष्ट्य म्हटले तर वावगे ठरणार नाही. देवगावसारख्या वाड्याजवळील एका गावात उजाड माळरानावर उभी केलेली माधवराव काणे आश्रमशाळा व त्या जागेवर उभी केलेली वनराई ही दादांच्या अपराजित वृत्तीची ग्वाही देत आज ताठ मानेने उभी आहे.
 
 
४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यातला ‘विष्णु सवरा’ म्हणून असलेल्या त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेहून दादा काहीसा वेगळा... अत्यंत मृदू मनाचा, धार्मिक, श्रद्धाळू गृहस्थ, कठोर देशाभिमानी होता. त्यांच्याकडे एखाद्या विषयावर सल्ला मागितला तर ते पटकन काही सांगायचे नाहीत. त्यावेळी ते फक्त ऐकून घ्यायचे, पण तुमचा प्रश्न ते नेमका लक्षात ठेवायचे. त्यावर विचार करायचे आणि मग त्यावर काही सल्लावजा तोडगाही सुचवायचे, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. विचारपूर्वक अभ्यास करून मगच बोलणं, ही त्यांची सवय त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही हमखास अनुभवायला मिळते.
 
 
मार्गात येणार्‍या वळणवाटा, खाचखळगे, चढ-उतार माणसाच्या एकूण जगण्याचाच अविभाज्य भाग असतात. राजकीय प्रवास तरी त्याला अपवाद कसा असेल? पण, हे सारं निभावून विष्णुदादा महाराष्ट्र शासनात आदिवासी विभागाचे कॅबिनेट मंत्री झाले. मंत्रिमंडळाच्या शपथविधीप्रसंगी त्या दिवशी ज्या सात मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यात विष्णुदादांचा समावेश होता.
 
 
राजकीय व्यक्तिमत्त्वांमध्ये कमी प्रमाणात आढळणारा एक गुण विष्णुदादांमध्ये प्रकर्षाने जाणवायचा तो म्हणजे, ते एक उत्तम कर्तृत्त्ववान प्रशासक होते. तशी त्यांनी बँकेमध्ये तीन-चार वर्षे अधिकारी म्हणून नोकरीही केली. परंतु, त्यांची प्रशासकीय कार्यक्षमता जनतेसमोर आली ते महाराष्ट्र शासनात आदिवासी विभागाचे कॅबिनेट मंत्री झाल्यावर.
 
 
आमदार म्हणून दादांना ३० वर्षांचा कालावधी मिळाला. त्यात काही काळ विरोधी आमदार म्हणून, तर काही काळ सत्तेत राहून. त्या कालावधीत लोकप्रतिनिधींच्या हाती असलेल्या सर्व आयुधांचा दादांनी योग्य वापर केला. विरोधात असताना त्यांनी तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अर्धा तास चर्चा, विविध प्रस्ताव-ठराव, अर्थसंकल्प, राज्यपालांच्या भाषणावरील चर्चा, प्रदीर्घ व सातत्यपूर्ण मतदारसंघातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील वनवासी परिसरात प्रवास तर केलाच, पण पत्रव्यवहाराच्या माध्यमातूनही अनेकांची कामे यशस्वी केली.
 
 
कार्यकर्त्यांची जपणूक, कार्यकर्त्यांची विचारपूस, कार्यकर्त्यांची सर्वार्थाने पालक या नात्याने काळजी घेणे, हा विष्णुदादांचा गुण मला विशेष भावला. आमदार असताना, मंत्री असतानासुद्धा कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्ता म्हणून वावरणे, त्यांच्यासमवेत नांदणे ही गोष्ट आजचे सभोवतालचे वातावरण पाहता सामान्य नक्कीच नाही. विष्णुदादांचा हा आदर्श निश्चितच दुर्मीळ आहे आणि तो कार्यकर्त्यांसाठी नक्कीच मार्गदर्शकही आहे.
 
 
तत्त्वांशी निष्ठा, सामान्य जनतेविषयी तळमळ, संघटन कौशल्य, जनतेची कामे करीत असताना प्रामाणिक पारदर्शीपणा, सहकार्‍यांशी आणि अधिकार्‍यांशी मैत्रीचे संबंध, कार्यकर्त्यांना अनुभवसिद्ध मार्गदर्शन, सर्व व्यवहारात एक कठोर शिस्त आणि केलेल्या कामात यश मिळवल्यावर ते जसेच्या तसे जनतेसमोर आणणे, हे खर्‍या राजकीय कार्यकर्त्याचे, नेत्याचे गुण आहेत. विष्णुदादांनी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवले होते. त्यामुळेच ते आदर्श कार्यकर्ता/नेता मानले गेले. अगदी रस्त्यावरील सामान्य फेरीवाल्यापासून ते विद्वद्जनांपर्यंत, जनसामान्यांपासून अभिजनांपर्यंत ते लोकप्रिय झाले होते. याबाबतीत दादांचे स्थान पालघर जिल्ह्यातच नव्हे, तर सर्व महाराष्ट्रात ‘या सम हा’ असेच होते.
 
 
स्व. रामभाऊ कापसे, भगवानराव जोशी, नारायणराव मराठे, रामभाऊ नाईक, माधवराव काणे व इतर राजकारणात धुतल्या तांदळासारखे स्वच्छ चारित्र्याचे नेते दादांचे आदर्श होते. अशा या चारित्र्यवान नेत्यांचे आदर्श स्वीकारले की माणसाला समाजबांधवांसाठी तसू तसू झिजावं लागतं नि हाताची दहाही बोटं स्वच्छ ठेवावी लागतात. ती एक प्रकारची सत्वपरीक्षा असते. गेल्या ४० वर्षांतलं विष्णुदादांचं सार्वजनिक व राजकीय जीवन ग्वाही देतं की, या कठोरतम परीक्षेत दादा उत्तीर्ण झाले.
 
 
वाढत्या वयाबरोबरच शारीरिक शक्तीचं बळ आटत चालल्याची जाणीव दादा प्रथमच हॉस्पिटलमध्ये ‘अ‍ॅडमिट’ झाले, त्याचवेळी झाली होती. त्यावेळी भेटायला गेलो तेव्हा दादाच्या चेहर्‍यावर हताशपणाची एक लकेर दिसत होती. पण... पण दादांचं मन बधिर झालेलं नव्हतं, याचा आम्हा सर्वांनाच दिलासाही वाटला अन् त्याचवेळी त्यांचे मित्र म्हणविणारे काहीजण बुरखा पांघरुन त्यांच्यावर वार करण्यात समाधान मानताना दिसत होते. तेव्हा खूपच उदास वाटायचं. इतकं असूनही दादांनी सर्वांना क्षमाच केली होती. दादांनी वयानं ज्येष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना, बरोबरीच्यांना कायमच अखेरपर्यंत सन्मानानं वागवलं, सर्वांना निरपेक्ष आधार दिला, आयुष्यात कधीही नाहक स्पर्धा त्यांनी कधी केली नाही. मत्सर-द्वेषही कोणाचा केला नाही. कारण, दादाला माहीत होतं की, प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या हिशोबानेच यश मिळत असतं. म्हणून दादांनी प्रयत्नांची कास कधीच सोडली नाही.
 
 
जन्माला आलेला प्रत्येकजण कधीतरी जाणारच, हे जरी खरं असलं तरी विष्णु सवरा यांचा बुधवार, दि. ९ डिसेंबर, २०२० रोजी झालेला मृत्यू राजकीय क्षेत्रात वावरणार्‍यांना, पालघर जिल्ह्यातील त्यांच्या समाजबांधवांना तमाम कार्यकर्त्यांना, तलासरी केंद्रातील सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना, संघ परिवाराला व पालघर जिल्हा भाजपला जबरदस्त धक्का देणारा आहे. ७० वर्षाचं वय म्हणजे फारसं दीर्घायुष्य म्हणता येणार नाही. पण, त्याचं जीवन रुढ अर्थानं परिपूर्ण आणि कृतार्थच होतं.
 
दे निरोप मज हसून
आले हे माझे स्थळ
ओसरल्या कैफाची शपथ!
जाऊ दे...
 
असे म्हणत हे विलक्षण व्यक्तिमत्त्व आठवणींचा गंध मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती आमच्या जयश्री वाहिनी, डॉ. हेमंत, निशा व संदेश यांना परमेश्वर देवो.
 
- दिलीप काणे
@@AUTHORINFO_V1@@