जनसामान्यांच्या हृदयावर राज्य करणारा नेता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Babaji Kathole_1 &nb
 
 
प्रचंड जनसंपर्क, सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची विष्णु सवरा यांची वृत्ती त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवते. तसेच सामान्य जनतेशी थेट नाळ जोडून काम करण्याच्या कार्यपद्धतीमुळे ते आजवर आपलं राजकीय यश टिकविण्यातही यशस्वी ठरले. सलग ३० वर्षं जनमानसावर अधिराज्य गाजवणं, हे बदलत्या राजकीय संस्कृतीत सवरांनी टिकवलं, हे त्यांच्यातील असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारं आहे.
आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर विष्णु सवरा हे आपुलकीने व आदरभावाने संवाद साधून त्यांचं म्हणणं ऐकत असत. त्यांच्याकडे प्रचंड स्मरणशक्ती असल्याने एकदा संवाद साधलेल्या व्याक्तीला दुसऱ्या भेटीवेळी ते नावाने हाक मारत असत. एवढा मोठा माणूस आपल्या नावानिशी ओळखत असल्याचा त्या व्यक्तीस सवरा यांचा अभिमान वाटत असे. प्रत्येकालाच सवरा हे आपल्याच घरातले आहेत, असे वाटायचे. त्यामुळेच सवरा हे जनसामान्यांच्या हृदयावर राज्य करणारे नेते ठरले आहेत. विष्णु सवरा हे दै. 'मुंबई तरुण भारत'चे नियमित वाचक होते. अनेकदा त्यांनी कार्यक्रमांतून कार्यकर्त्यांना दै. 'मुंबई तरुण भारत' हे दैनिक नियमित वाचन करण्याचे केलेले आवाहन मी पाहिले आणि ऐकले आहे.
 
कमालीचे दारिद्य्र असलेल्या पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील गालतरे गावातील एका वनवासी कुटुंबात जन्मलेले असताना, आपल्या स्वकर्तृत्वाने विष्णु सवरा हे राज्याच्या आदिवासी विकास मंत्रिपदापर्यंत पोहोचलेले असामान्य व्यक्तिमत्त्व. आपल्या गरिबीचे भांडवल न करता प्रचंड संघर्ष करत त्यांनी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरु केली. ज्या काळात मिळालेली बँकेची नोकरी करून सुरक्षित जीवन जगता आलं असतं, त्या काळात म्हणजे ७०च्या दशकात समाजसेवक माधवराव काणेंनी 'ज्या समाजातून आला आहेस, त्या समाजाच्या भल्यासाठी तुझं शिक्षण उपयोगाला आण' अशी सूचना करत 'समाजाकार्यात तुला जायला हवं,' असं सांगितलं. हा आदेश मानून नोकरीला लाथ मारत सवरांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय होण्याचा घेतलेला निर्णय आश्चर्यकारक होता.
 
 
खरंतर विष्णु सवरा हे वनवासी समाजातील शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी होते. नोकरी अगदी सहजच मिळण्याचा तो काळ होता. प्रचंड दारिद्य्रातून आलेल्या कोणाही व्यक्तीला आपण सुरक्षित जीवन जगण्याची संधी सोडाविशी वाटणार नाही. परंतु, सवरांनी त्या काळात हे धाडस केलं. आपल्या कुटुंबाची अजिबात पर्वा केली नाही. अनेक संकटं झेलत ते समाजकारण-राजकारणात सक्रिय राहिले. भारतीय जनसंघाचं काम करत असताना जनता पार्टीच्या विसर्जनानंतर १९८० साली स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षात ते सक्रिय काम करू लागले. त्याचवेळी केंद्रात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने राज्यातील पुलोद सरकार बरखास्त केल्याने राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यावेळी वनवासी समाजाकरिता आरक्षित असलेल्या वाडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने सवरांना पहिल्यांदा उमेदवारी दिली. त्या काळात पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव होता. त्यामुळे सवरांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर झालेल्या १९८५च्या निवडणुकीतही त्यांना पराभव पत्करावा लागला.
 
सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने सवरांसाठी हा काळ अत्यंत कठीण होता. एकीकडे बँकेची नोकरी सोडलेली आणि दुसरीकडे निवडणुकांमध्ये होणारा पराभव, यामुळे राजकारणात टिकून राहण्याचं सवरांपुढे मोठं आव्हान होतं. अत्यंत कठीण परिस्थितीत संकटांचा सामना करत ते निष्ठेने पक्षकार्यात सक्रिय राहिले. त्याचं फळ त्यांना १९९०च्या निवडणुकीत मिळालं. ते मोठ्या मताधिक्याने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. 'पराभव' हा शब्द त्यांना कधी स्पर्श करू शकला नाही. सलग सहा निवडणुका त्यांनी जिंकल्या. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर निर्माण झालेल्या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातूनही ते विजयी झाले, तर २०१४च्या निवडणुकीत मतदारसंघ बदलून विक्रमगड विधानसभेत निवडणूक लढण्याचा पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानत शिवसेना व भाजपची युती नसल्याने स्वबळावर लढतानाही त्यांनी मिळविलेला विजय हा त्यांची जनमानसावर असलेली पकड दर्शवणारा ठरला. अत्यंत मितभाषी, सतत सकारात्मक राजकारण करण्याची त्यांची भूमिका, निवडणुकीनंतर पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपल्याकडे आलेल्या विरोधकाचेही काम करण्याची त्यांची वृत्ती, आपल्या राजकीय कारकिर्दीत कधीही सुडाचे राजकारण त्यांनी केलं नाही. प्रचंड जनसंपर्क, सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवते. तसेच सामान्य जनतेशी थेट नाळ जोडून काम करण्याच्या कार्यपद्धतीमुळे ते आजवर आपलं राजकीय यश टिकविण्यातही यशस्वी ठरले. सलग ३० वर्षं जनमानसावर अधिराज्य गाजवणं, हे बदलत्या राजकीय संस्कृतीत सवरांनी टिकवलं, हे त्यांच्यातील असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारं आहे.
 
सवरा हे केवळ आमदार म्हणून यशस्वी झाले नाहीत, तर राज्य सरकारमध्ये आदिवासी विकासमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. खरंतर १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात पहिल्यांदा त्यांना आदिवासी विकासमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र, ही कारकिर्द अल्पजीवी ठरली. अवघे आठच महिने त्यांना मंत्रिपदावर काम करता आलं. मात्र, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर शपथ घेणाऱ्या पहिल्या सात मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होणं, हे त्यांची राजकीय उंची दर्शविणारं ठरलं. पक्षात निष्ठेने कोणतीही अभिलाषा न बाळगता काम केलं, तर योग्यवेळी कसा सन्मान होतो, याचे उत्तम उदाहरण सवरांच्या रूपाने पाहावयास मिळते.
 
एका सामान्य वनवासी कुटुंबात जन्मलेल्या माणसाने कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदापर्यंत झेप घेणे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. केवळ मंत्रिपद मिळणं महत्त्वाचं नाही, तर तेवढ्याच क्षमतेने ही जबाबदारी सांभाळून त्या पदाला न्याय देणं महत्त्वाचं असतं. मंत्री म्हणून सवरांनी ज्या पद्धतीने काम केलं, ते पाहता त्यांनी हे मंत्रिपद समर्थपणे सांभाळले. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात पारदर्शक कारभाराचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. आजवर आदिवासी विकास खाते म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण बनलं होतं. यापूर्वीच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोपही झालेले आपण पाहिले. मात्र, सवरा त्याला अपवाद ठरले. अनेक योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याने या योजनांचे चांगले परिणाम पाहावयास मिळाले. आदिवासी विकासमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय हे लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श नमुनाच ठरला. योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात निधी दिल्याने खऱ्याअर्थाने योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यात त्यांना यश आलं, तर 'पेसा' कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून अनुसूचित क्षेत्रांत ग्रामसभांना अधिक अधिकार दिले. 'ट्रायबल बजेट'च्या पाच टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देत विकासाच्या प्रवाहात जनतेला सामावून घेण्याचा त्यांचा निर्णय क्रांतिकारी ठरला. या निर्णयामुळे हजारो गावांमध्ये विकासाची कामे उभी राहिली, तर कुपोषण, बालमृत्यू रोखण्यासाठी त्यांनी राबविलेल्या योजनांमुळे चांगले परिणाम दिसून येत आहेत. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी त्यांनी आदिवासी विकास खात्यावर ठसा उमटवत, चांगला कारभार करून सिद्ध केली. एक कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा समाजमनात कायम राहील, यात शंका नाही.
 
सवरा गेली काही वर्षं प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणापासून दूर होते. सामान्य माणसाशी नाळ जुळलेला त्यांच्यासारखा नेता हा विरळाच! अत्यंत निगर्वी, मितभाषी आणि साधेपणा ही त्यांची स्वभाववैशिष्ट्येच त्यांच्या यशाचे गमक होते. त्याच बळावर ते राजकारणात अखेरपर्यंत टिकून राहिले. यशाच्या शिखरावर असतानाही कधीही आपल्यात अहंभाव येणार नाही, याची काळजी घेत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांशी त्यांनी नातं टिकवून ठेवलं, हा त्यांचा मोठेपणा! प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेली काही वर्षं सक्रिय राजकारणापासून ते दूर होते तरी जिल्ह्यातील राजकारणावर त्यांचं बारीक लक्ष होतं. जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांची तेस रीतसर माहिती ठेवून असत. ते शरीरानं राजकारणापासून दूर गेले असले, तरी त्यांचा राजकीय पिंड असल्यानं ते मनानं अखेरपर्यंत राजकारणातच होते. त्यांचं दीर्घ आजाराने (बुधवार, दि. ९ डिसेंबर २०२०) निधन झाले. त्यांच्यासारखा लोकनेता हरपल्याचं दु:ख अधिक आहे.
 
- बाबाजी काठोळे
(लेखक ठाणे ग्रामीण जिल्हा
भाजपचे प्रभारी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@