राजकीय क्षेत्रात पूर्णवेळ (प्रचारक) निघालेला समर्पित कार्यकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Appa Joshi_1  H
 
 
अनेकांनी विष्णुदादांविषयी आपले अनुभव लिहावे यासाठी फोनवर बोलणे केले, पण त्यानंतर मीच थोडा अंतर्मुख झालो. विष्णुदादांच्या घडणीमध्ये माझा वाटा खारीचासुद्धा नसला तरी १९७० ते २०२० या सुमारे ५० वर्षांच्या त्यांच्या प्रवासाचा मी निश्चितच साक्षीदार आहे. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. लिखाणाची फार मोठी सवय नसली तरी विष्णुदादांविषयीच्या आठवणी लिहिण्याचा शब्दबद्ध केलेला हा प्रयत्न...
 
 
सर्वप्रथम मी दै. ‘मुंबई तरुण भारत’ व सा. ‘विवेक’चे आभार मानून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. कारण, विष्णु सवरांसारख्या एका राष्ट्रसमर्पित कार्यकर्त्याचे जीवन आपल्या विशेषांकाच्या माध्यमातून ते जनतेसमोर मांडत आहेत. खरंतर आमच्या विभागातून सर्वप्रथम राजकीय क्षेत्रात काळाची गरज व गुरु आशेने विष्णुदादा पूर्णवेळ प्रचारक निघाले, ही आम्हा सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाची, आदराची व प्रेरणादायी घटना होती व यापुढेही ती भावना कायम राहणार आहे. देवाला फुले वाहताना ती ताजी, टवटवीत व सुगंधित असावीत, असा आपला नेहमी आग्रह असतो. राष्ट्रकार्य करताना तोच आग्रह सदैव संघाने डोळ्यासमोर ठेवला.
 
 
संघ स्वयंसेवक, पदवीधर, भजनगायक, पद्यगायक, कबड्डी, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ या सर्व क्षेत्रांत विष्णु सवरा अगदी अग्रेसर. प्रेमळ स्वभाव, चांगली स्मरणशक्ती आणि स्टेट बँकेत नोकरी. पण, एवढं सगळं असताना दामुअण्णा टोकेकर, माधवराव काणे, वसंतराव पटवर्धन, अरविंद पेंडसे आदी अनेकांचा परिसस्पर्श व मार्गदर्शन लाभल्यामुळे, सतत ४० वर्षे राजकीय क्षेत्रात चढत्या क्रमाने, प्रगतीचा विष्णुदादांचा प्रवास राहिला. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला व घरची परिस्थितीही यथातथा. भावंडांची शिक्षणे चालू असूनही स्टेट बँकेतील चांगली नोकरी सोडून त्यांनी सागरात उडी मारली, ती परत मागे न फिरण्याचे ठरवूनच! धन्य ते आई-वडील व गुरुजन...
 
 
त्यांच्या ७० वर्षांच्या जीवनात खूप विविधता आहे. सर्वांना या विविधतेचा अनुभव असणे शक्य नाही, म्हणून अगदी थोडक्यात लिहीत आहे.
 
 
१) जन्म १९५० - गालतरे (ता. वाडा), प्राथमिक शिक्षण - ओवेगावी, माध्यमिक शिक्षण- मनोर.
 
 
२) महाविद्यालयीन शिक्षण - भिवंडी. १९७० साली माधवरावांशी विष्णुदादांचा संपर्क वत तिथूनच पुढे तलासरी केंद्राशी त्यांचे नाते जोडले गेले. पुढील शिक्षण काही काळ. दापचरी येथे नोकरी केली. नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रथम तारापूर नंतर तलासरी.
 
 
३) १९८० साली नोकरी सोडून विष्णुदादांनी पूर्णवेळ राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर १९८० आणि १९८५ साली दोन वेळा निवडणुकीत त्यांना अपयश आले. तरीही पक्षवाढीसाठी त्यांनी काम केले.
 
 
४) १९९० पासून सहावेळा आमदार व मंत्री. महाराष्ट्रभर प्रवास. खरं म्हटलं तर चिंतामणदादा व विष्णुदादा ही रामलक्ष्मणाची जोडी माधवरावांनी राजकीय क्षेत्रात पाठविली. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात पक्षवाढीसाठी खूप प्रयत्न केले. दुर्दैवाने थोड्याशा अंतराने अस्मानातील दोन्ही तारे निखळून पडले. त्यामुळे या परिसराचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.
 
 
काही उदाहरणे देऊन विष्णुदादांचा जीवनपट उलगडण्याचा छोटासा प्रयत्न करतो. माझे लग्न होण्यापूर्वी वसुधा व त्यांचे पालक डॉ. मुळे तलासरी व केंद्र पाहण्यासाठी रात्री उंबरगावमार्गे तलासरीस पोहोचले. सुट्टी सुरु झाल्याने विष्णुदादा वसतिगृहात होते. त्यांनी खिचडी बनवून त्यांना जेऊ घातले. दोन वर्षांपूर्वी दि. ३० ऑक्टोबरला माझ्या तिन्ही मुली व जावई केंद्रात आले होते. वाड्याला जाताना त्या सर्वांना आपल्या घरी घेऊन गेले. घरात सर्वांशी परिचय करुन दिला आणि अशी शेकडो घरे विष्णुदादांनी जोडली आहेत.
 
 
अपयश कसे पचवायचे असते, याचा मोठा अनुभव मला त्यांच्याकडून पाहावयास मिळाला. १९८० मध्ये निवडणुकीत अपयश आल्यानंतर वाडा येथून एसटीने आम्ही दोघे घरी आलो. आईने काळा चहा दिला. त्यानंंतर नदीवर जाऊन स्नान करुन आलो. रात्री भोजन व विश्रांती. दुसऱ्या दिवशीपासून ते पुन्हा पक्षकार्याला जुंपून गेले.
 
 
अशा एका व्रतरथ कार्यकर्त्याच्या जीवनात जयश्री वहिनींनी अर्धांगिनी म्हणून प्रवेश केला. शिक्षिकेची नोकरी करुन संसाराला हातभार लावला. विष्णुदादांची पुढची पिढीपण सामाजिक बांधिलकी ठेवून कार्यरत आहे. निशाताई व संदेशदादा पदवीधर आहेत. निशाताई बचतगटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे काम करीत आहेत. हेमंतदादा हे ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत. त्यांच्या पत्नी ‘इएनटी’ स्पेशालिस्ट आहेत. डॉ. हेमंत सवरा हे ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ‘हिंदू सेवा संघ’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. दिघाशी येथे कार्यरत असलेल्या ‘इतिहास भारती’ या संस्थेचे कार्याध्यक्ष व पालक आहेत.
 
 
२०१८ साली सा. ‘विवेक’ने ‘वनजन गाथा’ हा ग्रंथ करावयाचे ठरविले. त्यासाठी विष्णुदादांची मुलाखत घ्यावयाची ठरली. त्यांच्याशी बोलून आम्ही त्यांच्या मुंबई येथील बंगल्यावर सायंकाळी ७ वाजता पोहोचलो. त्यावेळी ते महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकासमंत्री होते. पनवेल येथून डोळ्यांवरील उपचार घेऊन ते डॉ. हेमंत यांच्याबरोबर बंगल्यावर पोहोचले. अनेक मंडळी तेथे भेटीसाठी थांबली होती. त्यांनी ‘मुलाखतीचा कार्यक्रम आधी सुरु करुया,’ असे सांगितले. डोळ्यांवर गॉगल होता. अधूनमधून डोळ्यांतून पाणीही येते होते. पण, थोडीही विश्रांती न घेता, रवींद्र गोळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देण्यास सुरुवात केली. मुलाखत सुमारे दीड तास सुरु होती. कुठेही त्यांनी ‘शॉर्ट कट’ घेण्याचा प्रयत्न केला नाही. थोडक्यात, बालपणापासूनचा जीवनपट उलगडून सांगितला. नंतर महाराष्ट्रातील जनजाती, त्यांची सांख्यिक माहिती, शासनाच्या त्यांच्यासाठीच्या योजना, त्याची कार्यवाही कशी चालू आहे, त्याची सविस्तर माहितीही दिली. त्यामध्ये वनहक्क, पाणी, आरोग्य, उद्योग व महत्त्वाचे म्हणजे आश्रमशाळा व शाळा यांच्या माध्यमातून नवीन पिढी शिक्षण घेऊन मोठी व्हावी, यासाठी रस घेऊन केलेले प्रयत्न यासंबंधी कोणताही कागद न घेता, अगदी आकडेवारीसह त्यांचे माहिती देणे सुरुच होते. त्यांच्या बोलण्यातून अनेक वर्षांचा जनजाती प्रदेशांचा अभ्यास व तळमळ प्रकर्षाने जाणवत होती. खरं म्हटलं, तर त्यांनी असंच बोलत राहावं व आपण ऐकत राहावं, असं वाटत होतं. त्यांनी शेवटी “जेवण करून जा,” असा आग्रहपण केला.
 
‘इतिहास भारती’ ही संस्था पालघर जिल्ह्यात कार्यरत आहे. जनजातींचे संशोधन-संवर्धन व प्रशिक्षण असा तिचा उद्देश आहे. दि. २९ फेब्रुवारी, २०२० रोजी झालेल्या कार्यक्रमांत १५-१६ वरील विषयांत संशोधन करू इच्छिणार्‍यांचे सत्कार करण्यात आले. विष्णुदादांची प्रकृती ठीक नसतानाही खूप वेळ उभं राहून त्यांनी त्या सर्वांचा सत्कार केला. जवळ जवळ प्रत्येकाशी त्यांनी त्यावेळी संवादही साधला. ज्यांचा सत्कार केला, त्या सर्वांच्याच चेहऱ्यावरील आनंद टिपण्यासारखा होता. शरीराने एक आधारवड पंचतत्त्वात विलीन झाला असला तरी कार्यरूपाने तो समाजमनात जीवंत आहे. गेली ५०-६० वर्षे अनेकांच्या मेहनतीतून जनजातींमध्ये खूप मोठी सकारात्मक स्थित्यंतरे झाली आहेत. चिंतामणदादा, विष्णुदादा यांसारख्या अनेकांनी उखळ वेर करून ते पथदर्शक व दीपस्तंभ झाले आहेत. शासनाच्याही अनेक योजना कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गावर चालत राहून जनजाती समाज स्वयंसिद्ध बनवून भारतीय मूळ धारेशी एकरूप करूया...
 
 
- म. ज. (अप्पा) जोशी
 
 
@@AUTHORINFO_V1@@