‘इंडस्ट्री-४’ लघु उद्योगांपुढील आव्हान आणि महान संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2021
Total Views |

44  _1  H x W:
 
 
‘एमएसएमई’ क्षेत्रातही ‘इंडस्ट्री-४’चे स्वरूप आणि अंमलबजावणीची चर्चा सुरू असून ही बाब नक्कीच उत्साहवर्धक ठरते. या पार्श्वभूमीवर ‘इंडस्ट्री-४’च्या प्रमुख मापदंडांच्या अंमलबजावणीसाठी सहा मुद्दे महत्त्वाचे ठरतात.
 
 
बदलत्या आर्थिक-औद्योगिक संदर्भात उद्योग उत्पादन क्षेत्रात विकसित झालेली ‘इंडस्ट्री-४’ ही एक प्रगत औद्योगिक-व्यवस्थापन संकल्पना म्हणून आता सर्वमान्य झाली आहे. संक्षिप्त तपाशिलासह सांगायचे म्हणजे मुळात ‘इंडस्ट्री-४’ ही संकल्पना सुरुवातीला २०११ मध्ये जर्मन सरकारद्वारा स्थापन करण्यात आलेल्या एका विशेष तंत्रज्ञानविषयक कृती-गटातर्फे मांडण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये जर्मनीच्याच हॅनोवर येथील उद्योग-संमेलनात जर्मनीतील याच कृती गटाने ‘इंडस्ट्री-४’च्या संदर्भात आपल्या शिफारसी सादर केल्या.
 
 
याच्याच पुढील टप्प्यात या शिफारसींवर साधक-बाधक विचार करून ८ एप्रिल, २०१३ रोजी हॅनोवर येथेच आयोजित उद्योग संमेलनात जर्मनीच्या कृती गटाने बदलते उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सद्यःस्थिती, सध्याचे व संभाव्य बदल आणि त्यानुरूप उद्योगक्षेत्राने काय करायला हवे, याचे विवेचन प्रस्तुत केले व त्यातूनच जागतिक स्तरावर ‘इंडस्ट्री-४’चे प्रारूप औपचारिक व अधिकृत स्वरूपात स्पष्ट होऊन त्याचा बदलती स्थिती आणि औद्योगिक व्यवस्थापन प्रारूप म्हणून स्वीकार करण्यात आला, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
 
 
गेली सुमारे पाच वर्षे आपल्याकडे मोठ्या प्रक्रिया उद्योगांमध्ये व त्यांच्या कार्यशैली आणि कार्यपद्धतीच्या संदर्भात ‘इंडस्ट्री-४’ वर विविध स्वरूपात आणि संदर्भात चर्चा आणि कृतिशील अंमलबजावणीसाठी कारवाईस सुरुवात झाली आहे व त्याचे प्राथमिक परिणामही दिसून येत आहेत. याच प्राथमिक परिणामांच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या म्हणजेच ‘एमएसएमई’ क्षेत्रातही ‘इंडस्ट्री-४’चे स्वरूप आणि अंमलबजावणीची चर्चा सुरू असून ही बाब नक्कीच उत्साहवर्धक ठरते. या पार्श्वभूमीवर ‘इंडस्ट्री-४’च्या प्रमुख मापदंडांची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील सहा मुद्दे महत्त्वाचे ठरतात.
 
 
१. संस्थात्मक ध्येय धोरण : ‘इंडस्ट्री-४’च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने अद्ययावत ज्ञान आणि माहितीचा अभ्यास करणे. कामकाजाचा अभ्यास करून त्याला अधिक परिणामकारक बनविणे. ‘इंडस्ट्री-४’च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक आर्थिक गुंतवणूक, प्रक्रियाविषयक तंत्रज्ञानाला नाविन्य व कल्पकतेची जोड देणे व संशोधन आणि विकास प्रक्रियेला अद्ययावत करणे.
 
 
२. स्मार्ट फॅक्टरी : प्रचलित कार्यपद्धतीला डिजिटल व अद्ययावत कार्यप्रणाली, मूलभूत व तंत्रज्ञानाचे पाठबळ, उपलब्ध माहिती व संख्याशास्त्राचा उपयोग करणे व त्याला संगणकीय पाठबळ देणे.
 
 
३. स्मार्ट ऑपरेशन्स : अधिक ‘स्मार्ट’ म्हणजेच कार्यक्षम कामकाजासाठी माहितीचे आदान-प्रदान, संगणकीय व स्वयंशासित पद्धतीचा अवलंब करणे.
 
 
४. स्मार्ट प्रॉडक्ट्स : उत्पादन व सेवा यांना अधिक उपयुक्त व प्रभावी करण्यासाठी ग्राहकांशी पुरेसा संवाद, संवादातील अद्ययावतपणा, परस्पर विचारांची देवाण-घेवाण, उत्पादन व सेवेला अधिक उपयुक्त करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देणे.
 
 
५. माहितीवर आधारित सेवा : प्रत्यक्ष ग्राहकाद्वारे त्यांच्या गरजांनुरूप व वेळेत उपयोग करण्याच्या दृष्टीने व उत्पादन आणि सेवेशी संबंधित माहिती व तंत्रज्ञानाचे पाठबळ उपलब्ध करून देणे.
 
 
६. कार्यक्षम कर्मचारी: उद्योग-व्यवसायाला खर्‍या अर्थाने कार्यक्षम बनविण्यासाठी कुशल व कार्यक्षम कर्मचार्‍यांची जोड देण्यासाठी त्यांच्या प्रचलित कौशल्याचा पडताळा घेऊन कर्मचार्‍यांना अद्ययावत कौशल्यपूर्ण बनविणे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान-कार्यपद्धतीमधील बदलांचे थेट व मोठे परिणाम हे कर्मचार्‍यांवर प्रामुख्याने व सातत्याने होत असल्याने कर्मचार्‍यांना हे बदल आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षित-प्रोत्साहित करणे.
 
 
वरील मूलभूत व महत्त्वाच्या बाबी लक्षात घेता ‘इंडस्ट्री-४’कडे मार्गक्रमण करताना मूलभूत व मोठ्या उद्योगांच्या वाढत्या आणि बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यानुरूप ‘एमएसएमई’ क्षेत्रातील लघु व मध्यम उद्योगांत परस्पर सहकार्य आणि समन्वयाची नितांत गरज असते व हे साध्य करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे असतात ः
 
 
 
कुठल्याही व्यवस्थापन पद्धतीतील बदलाच्या संदर्भात ज्याप्रमाणे बदलाच्याविरोधात उत्सुकता वा भीतीपोटी जी भावना-मानसिकता असते, त्याचप्रमाणे ‘इंडस्ट्री-४’च्या पूर्वतयारीच्या टप्प्यात विरोध आढळून येऊ शकतो. त्यातही या संदर्भातील बदल हे व्यापक, संस्थात्मक व व्यक्तिगत स्तरावर आवश्यक असल्याचे लक्षात घेणे आवश्यक असते. ‘एमएसएमई’तील काम करणार्‍यांनी हे बदल कार्यपद्धतीपासून कार्यसंस्कृतीपर्यंत व विविध प्रकारे, लवचिक पद्धतीने अमलात आणल्यास ते मुख्य उद्योग व्यवसायाला पूरकच नव्हे, तर उपयुक्त ठरू शकतात.
 
 
उद्योग स्तरावरील हे बदल घडवून आणण्यासाठी व त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी ‘एमएसएमई’ उद्योजकांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. लघु उद्योजकांचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप लक्षात घेता, संबंधित उद्योजक-संचालकांनी स्वत: ‘इंडस्ट्री-४’च्या संदर्भात केवळ प्रशिक्षित नव्हे, तर सक्षम असणे आवश्यक असते.
 
 
यादृष्टीने संबंधित लघु उद्योगाने आपल्या स्तरावर व नेमके काय करायचे आहे व ते कसे करायचे आहे, या संदर्भात स्पष्ट धारणा आणि भूमिका घेणे, या व्यावसायिक भूमिकेची अंमलबजावणी करण्यासंंबंधी मार्गदर्शन व अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे, कालबद्ध प्रयत्न करण्यासाठी लघु उद्योगस्तरावर आखणी करणे व त्यानुरूप आपल्या आणि सहकार्‍यांच्या कामाची आखणी करणे व याची खातरजमा करण्यासाठी उपलब्ध ज्ञान-तंत्रज्ञान, मशिनरी-उपकरणे, मार्गदर्शन-प्रशिक्षण इ.ची व्यवस्था करणे संबंधित लघु उद्योग आणि उद्योजकांसाठी आवश्यक व फायदेशीर असते.
 
याशिवाय मुख्य उद्योगांच्या वाढत्या गरजा आणि बदलत्या अपेक्षांनुरूप काम करण्यासाठी नेमक्या वा प्रसंगी मर्यादित संख्येतील कर्मचार्‍यांना प्रवृत्त व प्रोत्साहित करण्यासाठी लघु-उद्योजकांनी आपल्या कर्मचार्‍यांना मार्गदर्शनपर प्रोत्साहन देणे, आपापल्या उद्योगातील सर्वांचा सहभाग साधणे, ‘इंडस्ट्री-४’ च्या अनुषंगाने आवश्यक व होणार्‍या बदलांना पूरक अशी स्थिती व मानसिकता तयार करणे, कामकाज व कार्यपद्धतीतील बदल समजावून देऊन ते आत्मसात करणे, दर्जा- गुणवत्ता, कर्मचार्‍यांचे कौशल्य, प्रशिक्षण यांच्या जोडीलाच प्रत्येक कर्मचार्‍याकडून कालबद्ध स्वरूपाच्या अपेक्षा स्पष्ट करून त्यांची पूर्तता करणे आवश्यक असते.
 
‘इंडस्ट्री-४’ची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योग-लघु उद्योगाशी संबंधित प्रक्रियेशी संबंधित शिक्षण-प्रशिक्षणाची मोठी गरज असते. यामागचे मुख्य कारण म्हणजे, ही प्रक्रिया परंपरागत स्वरूपातील नसून ती नव्याने विकसित झाल्याने सर्वच स्तरांवरील प्रशिक्षित कर्मचार्‍यांची वानवा असणे, अपरिहार्य आहे. त्यामुळे प्रचलित व अंतर्गत अनुभवी कर्मचार्‍यांना विशेष प्रयत्न आणि मार्गदर्शनाद्वारे प्रशिक्षित करणे अपरिहार्य ठरते.
 
या प्रशिक्षण पद्धतीचे ‘एमएसएमई’ क्षेत्राच्या संदर्भात काही विशेष फायदेही आहेत. उदाहरणार्थ विशेष उद्योगाच्या गरजांनुरूप प्रशिक्षण द्यायचे असल्याने या प्रशिक्षणाला अर्थातच व्यवहार्य शिक्षण आणि प्रयोगशील उपयोगाची जोड मिळू शकते. या प्रशिक्षण प्रयत्नात सर्वांचा सहभाग सहजशक्य असतो. अर्थात, याकामी जाणकारांकरवी प्रशिक्षण दिले जाणे व ते सर्व स्तरांवरील कर्मचार्‍यांना दिले जाणेही तेवढेच आवश्यक व महत्त्वाचे असते, ही बाबही लघु उद्योजकांनी लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचे असते.
 
उहारणासह सांगायचे म्हणजे लघु उद्योगातील प्रत्यक्ष मालक-संचालकांना ‘इंडस्ट्री-४’ची संकल्पना, व्यवहार आणि उपयोग, मुख्य उद्योग व ग्राहकांच्या व्यावसायिक गरजा आणि अपेक्षांची पूर्तता करून उद्योग व ग्राहकांच्या व्यावसायिक गरजा आणि अपेक्षांची पूर्तता करून त्याद्वारे संबंधित लघु उद्योगांचा विकास साधणे, ही बाब मूलभूत स्वरूपात महत्त्वाची ठरेल. त्यानंतर इतर इंजिनिअर्स वा व्यवस्थापक अधिकार्‍यांसाठी त्यांच्या उत्पादन सेवा विषयक कामकाजाचा दाखला घेऊन मागोवा घेणे व त्याद्वारा त्यांनी काय केले व काय करायला हवे, याची चचार्र् करून जाणीव निर्माण करून चालना देणे व प्रत्यक्ष काम करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रगत तंत्रज्ञान व कार्यपद्धतीचा अवलंब करून त्याद्वारे त्यांच्या कामकाज आणि कार्यपद्धतीमध्ये ‘इंडस्ट्री-४’चे उद्दिष्ट आणि उद्देश साध्य करण्यासाठी काय काय करणे आवश्यक आहे, त्याचे सादरीकरण-प्रशिक्षण देणे, म्हणूनच आवश्यक असते.
 
मुख्य व मोठ्या उद्योगांनी आता आधीच्या तुलनेत ‘इंडस्ट्री-४’ची अंमलबजावणी करण्यावर अधिक भर देत असल्याने लघु उद्योजकांनी आपला व्यवसाय विकास साधण्यासाठी प्रचलित व पारंपरिक विचार आणि कार्यपद्धतीला ‘इंडस्ट्री-४’ची जोड देणे आवश्यक आहे. या कार्यपद्धतीसाठी व त्यासाठी आवश्यक बदलांच्या अंमलबजावणीसाठी मोठा निधी व मोठी गुंतवणूक आवश्यक नसते, ही बाब लघु उद्योजकांनी मुळातून लक्षात घेणे आवश्यक आहे.


त्यामुळेच मोठ्या उद्योगांच्या या व्यावसायिक परिवर्तन पुढाकाराला प्रतिसाद देऊन या आव्हानाला संधीत परिवर्तित करण्याची ही संधी लघु उद्योजकांना उपलब्ध झालेली आहे. या संधीचा वेळेत उपयोग करून ‘एमएसएमई’ क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनी ‘इंडस्ट्री-४’ची कार्यपद्धती आपापल्या स्तरावर अमलात आणल्यास ‘एमएसएमई’ क्षेत्रातील लघु व मध्यम उद्योगांना आपल्या कामकाज आणि कार्यप्रणालीत अद्ययावत आणि प्रगत स्वरूपाचे बदल घडवून आपला देश आणि अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण असणारे लघु उद्योग औद्योगिक प्रक्रिया व मोठ्या उद्योगांना अधिक सक्षम बनविण्याचे मोठे व महनीय काम होणार आहे व ही बाब आव्हानपर शक्य आहे हे निश्चित.
- दत्तात्रय आंबुलकर 
@@AUTHORINFO_V1@@