‘कोरोना’ लसीचे निर्बुद्ध राजकारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2021
Total Views |

narendra Modi_1 &nbs
 
 
 
कोरोना विषाणू विरोधातील लस तयार व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी ठामपणे शास्त्रज्ञांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे या लसींचे श्रेय मोदींकडेच जाईल, या भीतीने काँग्रेस, समाजवादी पक्ष व त्यांच्या नेत्यांचा थरकाप उडाला आहे. नव्हे त्यांची अस्तित्वाच्या भीतीने गाळण उडाली आहे, म्हणूनच ते लसींविरुद्ध ‘हाय तोबा’ माजवत आहेत.
 
 
राजकीय पक्ष हे राजकारण करणारच हे गृहीत धरले तरी कोणत्या प्रश्नाचे, किती राजकारण करायचे, हे जर त्या राजकीय पक्षांना कळत नसेल तर त्यांनी आपल्या दुकानदाऱ्या बंदच कराव्यात, असे म्हणण्याइतपत खालची पातळी कोरोना लस प्रकरणी काँग्रेस व समाजवादी पक्षांनी गाठलेली दिसत आहे. या पक्षांच्या मनात पंतप्रधान मोदींविषयी राग भरलेला असेल, हे एकवेळ समजून घेता येईलही. कारण त्यांनी त्यांच्या दुकानदाऱ्याच उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधला आहे. पण, भारतातील कोट्यवधी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या औषधनिर्मिती कंपन्यांनी व शास्त्रज्ञांनी या पक्षांचे काय घोडे मारले की, ज्यामुळे त्यांनी कोरोना लसीच्या विरोधात मोहीम सुरू करावी?
 
अर्थात ते अनाकलनीय मात्र नाही. कारण ही लस तयार व्हावी म्हणून पंतप्रधान मोदी ठामपणे शास्त्रज्ञांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे या लसींचे श्रेय मोदींकडेच जाईल, या भीतीने या पक्षांचा थरकाप उडाला आहे. नव्हे त्यांची अस्तित्वाच्या भीतीने गाळण उडाली आहे, म्हणूनच ते लसींविरुद्ध ‘हाय तोबा’ माजवत आहेत. अर्थात, मोदीद्वेषापोटी ते केवळ कोरोना लसीचेच राजकारण करीत नाहीत. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारच्या प्रत्येक लोकाभिमुख निर्णयाचे ते राजकारणच करीत आहेत. मग ती अर्थकारणाशी संबंधित नोटाबंदी असो, जीएसटी असो की, देशाच्या संरक्षणाशी संबंधित सर्जिकल स्ट्राईक असोत की, एअरस्ट्राईक असोत. पुलवामाचा दहशतवादी हल्ला मोदींनीच घडवून आणला, असे म्हणण्यापर्यंतची नीच पातळी या मंडळींनी आतापर्यंत गाठली आहे. त्याच भावनेने त्यांनी नागरिकत्व कायदाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच भावनेतून शेतकऱ्यांशी सुरू असलेली चर्चा विफल कशी होईल, यासाठीही ते प्रयत्न करीत आहेत. कोरोनासारख्या लाखो माणसांचे जीव घेणाऱ्या रोगाशी लढण्याबाबत तरी ते भ्रमनिर्मितीचे, दिशाभुलीचे राजकारण टाळतील, अशी अपेक्षा होती. पण, त्यातही ते आपला खरा रंग दाखवितच आहेत; अन्यथा मुलायमसिंहांचे बालबुद्धीचे चिरंजीव अखिलेश यादव यांनी लसीला मोदींचे वा भाजपचे लेबल लावून आपण ती घेणार नसल्याचे बालिश वक्तव्य केलेच नसते आणि काँग्रेस पक्षाचे जयराम रमेश व शशी थरूर यांच्यासारख्या सुशिक्षित नेत्यांनी लसीवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केलाच नसता.
 
खरे तर कोरोनाचा विश्वव्यापी प्रादुर्भाव झाल्यानंतर मोदी सरकारने अतिशय तातडीने पावले उचलून, विरोधी पक्षांना व विविध पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन कोरोना प्रतिबंधक पावले उचलण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वात प्रथम त्यांनी संसदेतील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तर त्यांनी अनेकदा विचारविनिमय केला. त्यांना आवश्यक ती मदतही केली. लोकांनाही प्रतिबंधक मोहिमेत सहभागी करून घेतले. सार्वजनिक जीवनामध्ये अनुशासन आणण्याचा प्रयत्न केला व लोकांनीही त्यांना कळ सोसून पूर्ण सहकार्य दिले व आजही देतच आहेत. पण, त्यांच्या त्या प्रयत्नात आपल्या पक्षाच्या सरकारांचाही वाटा आहे, याचा विचार न करता जेव्हा हे पक्ष लसविरोधी मोहिमेच्या निमित्ताने केंद्र सरकारविरोधी भूमिका घेत आहेत, तेव्हा कुणीही फक्त त्यांच्या बुद्धीची कीवच करू शकतो. पंतप्रधानांनी आपल्या कल्पक प्रयत्नातून लोकांना कोरोनाविषयी जागृत केले. कोरोना प्रतिबंधक प्रयत्नांमध्ये संपूर्ण देशाला सोबत घेतले. त्यामुळेच लागणीची संख्या असो, मृत्यूचे प्रमाण असो, वा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण असो, प्रत्येक बाबतीत भारताची भूमिका इतरांसाठी आदर्श आणि मार्गदर्शक ठरली.
 
अमेरिका, इंग्लंड, इटली आदी देशांचे कोरोनामृत्यूचे आकडे पाहिले, तर त्या तुलनेत भारताचे प्रयत्न जगासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतीय पंतप्रधानांचा गौरव झाला. प्रातिनिधिक स्वरूपात तो पंतप्रधानांचा गौरव असला तरी प्रत्यक्षात तो प्रत्येक भाारतीयाचाच गौरव आहे. वास्तविक त्या गौरवात आपल्यासहित सर्व भारतीयांचा वाटा आहे, अशी भूमिका या पक्षांना घेता आली असती. त्यामुळे त्यांचाही सन्मान झाला असता. पण, त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मोदीच दिसू लागले आहेत व त्यामुळे त्यांचे माथे भडकले आहे. त्यातूनच ते लसविरोधी भूमिका घेत आहेत, हे सामान्य माणसाला कळणारे आहे. पण, मनुष्य एक वेळ द्वेषाने, तिरस्काराने, संतापाने आंधळा झाला तर तो आपली सद्सद्विवेक बुद्धी हरवूनच बसतो. तशी अवस्था आज लसविरोधी राजकारण्यांची झाली आहे.
 
वास्तविक लसनिर्मिती व तीही इतक्या कमी वेळात करणे, हे काही येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी भारतीयच नव्हे, तर जागतिक शास्त्रज्ञ प्रारंभापासूनच संशोधन कार्याला लागले आहेत. हे सर्व प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ यांच्या देखरेखीखाली व कठोर निर्बंधांखाली होत आहेत. कुणाही राजकारण्याने त्यात नाक खुपसण्याची शक्यताच नाही. सर्व प्रकारची काळजी घेऊन, प्राण्यांवर, माणसांवर चाचण्या घेऊन तज्ज्ञांनी हिरवा कंदिल दाखविल्यानंतरच या लसी वापरासाठी खुल्या होत आहेत. विरोधी पक्षांची राज्य सरकारेही या प्रयत्नात सहभागी आहेत. तरीही लसींविरोधात मोहीम चालविण्याचा प्रयत्न करणे हा लोकद्रोह ठरू शकतो, हेही या मंडळींच्या लक्षात येऊ नये, हा प्रकार त्यांना ‘मरणाचे डोहाळे’ लागले आहेत, असेच सूचित करतो. लोकांनी त्याचा तीव्र निषेधच केला पाहिजे.
 
 
- ल. त्र्यं. जोशी
@@AUTHORINFO_V1@@