'वडापाव' तिखट ! अन् 'फाफडा' गोड

    06-Jan-2021
Total Views |

udhav_1  H x W:

२०२२मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. मात्र यात खरी लढत रंगणार ती शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये. अशातच शिवसेनेने 'मुंबई मा ना जिलेबी ना फापडा उद्धव ठाकरे आपडा' अशी घोषणा देत गुजराती मतदारांना आकर्षित करण्याची मोहीम छेडलीय. शिवसेनेला गुजराती मतदारांसाठी अभियान सुरू करण्याची आवश्यकता का भासली? गुजराती मतदारांनी शिवसेनेला साथ दिली नाही तर शिवसेनेच्या हातातून मुंबई महानगरपालिका जाईल का? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.


मुंबईत जवळपास ३० लाख गुजराती मतदार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी ५०-५५ प्रभागांमध्ये गुजराती मतदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ‘मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी’ लढणार्‍या शिवसेनेनं हिंदुत्वाचा ध्वज खांद्यावर घेत ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ अशी गर्जना करत राष्ट्रद्रोह्यांच्या हृदयात धडकी भरवली असली, तरी त्याच शिवसेनेला आता अस्तित्वासाठी धडपड करावी लागत आहे. राज्यात सत्तारूढ होताच प्रथम मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यासाठी ‘अजान स्पर्धा’ भरविण्याची घोषणा करणार्‍या शिवसेनेकडून आता मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. येत्या १० तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल १०० गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील असंही सांगण्यात आलंय. त्यामुळे आता शिवसेनेची भाजपच्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्याची ही खेळी कितपत यशस्वी ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.



शिवसेनेनं यापूर्वीही विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना वरळीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बॅनर लावण्यात आले होते. वरळीत लावण्यात आलेल्या या बॅनरमधून मराठीसोबतच इतर भाषेतील मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये 'केम छो वरळी' असं पोस्टरही लावण्यात आलं होतं.मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी गुजराती मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेने विशेष मोहीम हाती घेण्यामागचं महत्त्वाचे कारण म्हणजे भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेला संघर्ष. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं अनेक मतदारसंघात गुजराती, हिंदी, तमिळ भाषेत प्रचार केला होता. दक्षिण भारतीयांना मुंबई बाहेर जा असं एकेकाळी म्हणणारी शिवसेना विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघात मात्र प्रचार करताना दिसली. केवळ भाजपच नाही तर या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेसमोर काँग्रेसचं देखील तगडं आव्हान असणार आहे. कारण मुंबईतला उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसची वोट बँक आहे. त्यामुळे गुजराती मतदारांप्रमाणेच शिवसेना उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार करणार का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेच्या या बदलत्या अजेंड्यावर कडाडून टीका केली असून, ‘हिंदुत्वा’प्रमाणे शिवसेनेचे आता ‘मराठी’पणही कालबाह्य होणार असा प्रश्न विरोधी पक्ष भाजपनं उपस्थित केलाय.