वर्षा राऊत यांना ईडीकडून पुन्हा समन्स

    06-Jan-2021
Total Views |


varsha raut_1  



मुंबई :
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)ने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ११ जानेवारी रोजी त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. याआधी ४ जानेवारी रोजी वर्षा राऊत या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांची तब्बल ४ तास चौकशी करण्यात आली.पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.



४ जानेवारीला वर्षा राऊत यांची साडेतीन-चास तास चौकशी ईडीने वर्षा राऊत यांना ११ डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती. त्यावेळी त्या हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने दिले होते. परंतु वर्षा राऊत २८ डिसेंबरला ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना ५ जानेवारीला हजर राहायचं होतं. परंतु त्या एक दिवस आधीच म्हणजेच ४ जानेवारीला दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या.


पीएमसी बँक घोटाळा काय आहे?
पीएमसी बँकेत बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला शेकडो कोटी रुपये कर्ज दिल्याची बाब २०१९मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊ नये यासाठी आरबीआयने सप्टेंबर २०१९मध्ये निर्बंध घातले होते. हे निर्बंध मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. पीएमसी बँकला बुडवण्यात जी ४४ मुख्य खाती होती, त्यापैकी १० खाती एचडीआयएलची होती.


प्रताप सरनाईकांनाही ईडीकडून समन्स


दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. त्यांना चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तब्येतीच्या कारणात्सव प्रताप सरनाईक आज चौकशीला हजर राहिले नाहीत. वकिलाच्या मार्फत आपण आज गैरहजर राहणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी ईडीला कळवलं.