समुदायाचे महत्त्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2021
Total Views |

Samarth_1  H x
 
 
 
धर्माच्या पांघरुणाखाली लोक संघटित करून त्यांना दक्ष, धूर्त, साक्षेपी आणि रामराज्यानुकूल बनवणे अत्यंत आवश्यक आहे, ही ऐतिहासिक दृष्टी इतर संतांच्या तुलनेत फक्त रामदासांनी दाखवली. महंतांनी मठात चालविलेली समुदायाची ही केंद्रे म्हणजे लोकांना सर्वतोपरी तयार करण्यासाठी शिक्षण देणारी, प्रेरणा देणारी केंद्रे होती. समुदायाला तेथे महंतांकडून शक्ती, युक्ती, बुद्धी, विवेक यांचे प्रशिक्षण दिले जाई. थोडक्यात सांगायचे म्हणजे, समर्थस्थापित मठ ही संस्कार केंद्रे आणि शक्ती केंद्रे होती.
 
 
 
 
हिंदू समाज हा मूलत: संन्यस्तवृत्तीचा आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे एकंदरीत हिंदू समाजात अथवा लोकांत समाजपराड्.मुखता दिसून येते. आपली देवाची पूजा, प्रार्थना, सामुदायिक असली पाहिजे, असे बंधन हिंदू समाजावर नाही. आपली प्रार्थना पूजाअर्चा वैयक्तिक असते. त्यामुळे धार्मिक बाबतीतही समुदायाचे एकीकरण अनुभवायला मिळत नाही. अशा वेळी समर्थांनी ही अडचण ओळखून समुदायाला एकत्रीकरणाची हाक दिली. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्रधर्म वाढवावा।’ समाजाला अशी हाक देऊन समर्थांनी समुदायाच्या एकीकरणाची संघटन करण्याची विद्या महाराष्ट्रीय समाजात रुजवली. हे त्यांचे मोठे ऐतिहासिक कार्य म्हणावे लागेल. ३५० वर्षांपूर्वी परिस्थिती अनुकूल नसताना म्लेंच्छांच्या जुलमी सत्तेची तमा न बाळगता, लोकसंग्रह समाजसंघटन एकीकरण यासाठी समर्थांनी जे प्रयत्न केले, त्याचा फायदा महाराष्ट्राला धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रात झाला असला पाहिजे. समुदाय करण्यासाठी समर्थ रामदास नेहमी विलक्षण आग्रही होते, असे दिसून येते. त्यासाठी समर्थांनी महंतांना समुदाय करण्याविषयी जे आज्ञापत्र लिहिले आहे, त्यातून समर्थांनी भूमिका स्पष्ट होते. त्या आज्ञापत्राची सुरुवातच अशी आहे.
 
 
काही समुदाय करणे।
येविशी अलस्य न करणे।
 
समर्थांची आज्ञा असे की, महंतांनी समुदाय म्हणजे लोकसंग्रह करण्याचे काम, कुठलीही सबब न सांगता अगत्याने केले पाहिजे. त्याबाबत आळस किंवा टाळाटाळ करता उपयोगाचे नाही. समुदाय करण्याचे हे काम करायचे तर ज्याप्रमाणे पोहणाऱ्या माणसाने आपल्या ताकदीने व पोहण्याच्या कौशल्याने बुडणाऱ्या माणसाला वाचविले पाहिजे. त्याला तसेच सोडून देता उपयोगाचे नाही, त्याप्रमाणे महंतांसारख्या विवेकी पुरुषाने मूर्ख लोकांना शहाणे केले पाहिजे. त्यांना तसेच मूर्ख राहू दिले तर समुदाय करण्याचा काय उपयोग?
 
पोहोणारे बुडते तारावे।
सामर्थ्ये बुडो न द्यावे।
मूर्ख ते शहाणे करावे। विवेकी पुरुषे॥
 
हे लोकसमुदाय तयार करून मूर्खांना शहाणे करावे, असा रामदासस्वामींचा उद्देश स्पष्ट होता. तथापि, लोकांना शहाणे करायचे म्हणजे नेमके काय करायचे? त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या वरच्या पातळीवर नेऊन रामभक्तीचा प्रसार करायचा आणि त्याचबरोबर त्यांना प्रपंच विज्ञानाचे महत्त्व पटवून देऊन तत्कालीन जुलमी म्लेंच्छ यवनसत्तेबद्दल लोकांच्या मनातील भीती काढून टाकून त्यांना हिंदवी स्वराज्यासाठी अनुकूल करायचे होते.
 
या संदर्भात समर्थांच्या समुदायनिर्मितीचा म्हणजे मंडळीकरणाचा उद्देश वि. का. राजवाडे यांनी पुढील शब्दांत सांगितला आहे. श्री राजवाडे लिहितात... ‘रामभक्तांचे ठाई ठाई समुदाय स्थापून त्यात धर्मराज्याची म्हणजेच रामराज्याची कल्पना पसरणे आणि ती कल्पना मूर्त व व्यवहार्य करण्यासाठी झटणे हा समुदायाचा पहिला आणि शेवटचा उद्देश असे,” या उद्देशपूर्तीसाठी समर्थांनी अनेक ठिकाणी मठस्थापना करून तेथे महंतांना पाठवले होते. अशा मठांचे त्यांनी हिंदुस्थानभर जाळे विणले होते. समर्थ शिष्य गिरीधरस्वामींनी ११०० मठांचा उल्लेख ‘श्री समर्थ प्रताप’ या ग्रंथात केला असला, तरी समर्थस्थापित मठांचा नेमका आकडा सांगता येत नाही. त्यापैकी बरेचसे मठ महाराष्ट्रात आढळतात आणि ते साहजिकच आहे, असे म्हणावे लागते. काळाच्या ओघात आणि मुसलमानी राजवटीच्या हिंसक वावटळीत अनेक मठ नष्ट झाले असतील. पण, आजही काही मठांचे अस्तित्व टिकून आहे. तथापि, त्यांच्या काळात समर्थांनी मठस्थापनेद्वारा उभा-आडवा हिंदुस्थान सांधला होता, हे नक्की. सर्वत्र मठांचे-महंताचे जाळे समर्थांनी कार्यान्वित केले होते.
 
 
बद्रिकेदार काशीपासून तर दक्षिणेत मन्नारगुडी तजांवर तसेच रामेश्वरपर्यंत मठ स्थापून तेथे मठाधिपती नेमले होते. त्याचप्रमाणे सोमनाथ द्वारकेपासून गंगासागरपर्यंत पूर्व-पश्चिम पट्ट्यात स्थापन केलेल्या मठांची नोंद आढळते. सर्व मठांचे मुख्य केंद्रबिंदू चाफळला होते. जेथे-तेथे मुसलमानी राजवटीचे, सुफींच्या इस्लाम प्रसाराचे स्तोम माजले होते, त्या-त्या ठिकाणी निःस्पृह महंतांना पाठवून स्वामींनी मठ स्थापन केले होते. एखाद्या निष्णात लष्करी अधिकाऱ्याने शत्रूंना धडा शिकविण्यासाठी व बचावासाठी महत्त्वाची ठाणी हेरून लष्करी छावण्या उभाराव्यात, त्याचप्रमाणे स्वामींनी हिंदू समाजाला जेथे धार्मिक स्वातंत्र्य मिळण्यात अडचणी येत होत्या, त्या-त्या ठिकाणी मठ स्थापना करून व महंतांच्या नेमणुका करून लोकांना दिलासा दिला होता. या मठांकडे केवळ धर्माच्या दृष्टीने पाहणाऱ्यांना या मठांचे महत्त्व कळणार नाही. रामोपासना आणि पूजाअर्चा यासाठीच फक्त मठ उभारणीची समर्थांना हौस नव्हती. मठ स्थापन करणे, हा काही त्यांचा छंद नव्हता. मठ स्थापून आणि त्यावर महंतांच्या नेमणुका करून समर्थांना काही मोठेपणा मिळवायचा नव्हता. आजकालच्या नेत्यांप्रमाणे रामदासांना स्वतःचे काही सत्कार करून घ्यायचे नव्हते किंवा एखादा पुरस्कार पदरात पाडून घ्यायचा नव्हता. हे सर्व राजकारण स्वामी निःस्वार्थ बुद्धीने करत होते. ती त्या काळाची गरज होती. एकंदरीत सर्वदृष्ट्या बिघडलेल्या परिस्थितीने समर्थांना तसे करण्यास भाग पाडले होते. ती त्यांची अंतरीची तळमळ होती.
 
बुडाला औरंग्या पापी।
म्लेंच्छ संहार जाहला।
उदंड जाहले पाणी।
स्नानसंध्या करावया॥
 
हे त्यांचे अखिल हिंदुस्थानासाठी स्वप्न होते. अखिल हिंदुस्थानाला त्यांनी रामराज्याची प्रेरणा दिली. आजही आम्ही त्या रामराज्याच्या प्रतीक्षेत आहोत. समर्थ सारे राजकारण गुप्तता बाळगून करीत होते. समर्थांनी सांगितले आहे, ‘राजकारण बहुत करावे। परी गुप्तरूपे॥’ यवनांच्या उर्मट, हिंसक, अत्याचारी व अडाणी राज्यव्यवस्थेत सावधगिरीने काम करणे आवश्यक होते. लोकांच्या एकीकरणाचा व उद्देशाचा सुगावा कोणाला लागणार नाही, ही दक्षता बाळगावी लागे. धर्माच्या पांघरुणाखाली लोक संघटित करून त्यांना दक्ष, धूर्त, साक्षेपी आणि रामराज्यानुकूल बनवणे अत्यंत आवश्यक आहे, ही ऐतिहासिक दृष्टी इतर संतांच्या तुलनेत फक्त रामदासांनी दाखवली. महंतांनी मठात चालविलेली समुदायाची ही केंद्रे म्हणजे लोकांना सर्वतोपरी तयार करण्यासाठी शिक्षण देणारी, प्रेरणा देणारी केंद्रे होती. समुदायाला तेथे महंतांकडून शक्ती, युक्ती, बुद्धी, विवेक यांचे प्रशिक्षण दिले जाई. थोडक्यात सांगायचे म्हणजे, समर्थस्थापित मठ ही संस्कार केंद्रे आणि शक्ती केंद्रे होती. समाजसंघटनेने क्रांतिकार्य स्वामींनी आरंभले होते. मठस्थापनेप्रमाणे जमेल तसे लोकांनी निःस्पृहपणे ‘मंडळ्या’ स्थापन कराव्या, अशी स्वामींची अपेक्षा होती. स्वामी सांगतात-
 
ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या।
भक्तमंडळ्या मानाव्या।
संत मंडळ्या शोधाव्या। भूमंडळी॥
 
समाजाला दक्ष, शहाणे करण्यासाठी स्वामींनी मंडळीकरणावर भर दिला आहे. मग त्यात ‘ब्राह्मणमंडळ्या’ असा उल्लेख आला, तर उगीच आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्याचा सूक्ष्मतेने विचार करायला हवा. त्यातून स्वामींना ‘समुदायाचे महत्त्व’ पटवून द्यायचे आहे.
 
 
- सुरेश जाखडी
 
@@AUTHORINFO_V1@@