समस्यांवर ‘प्रकाश’ टाकणारा बिनपगारी ‘अधिकारी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2021
Total Views |

Prakash Adhikari_1 &
 
 
 
कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता, परिसरातील समस्या, अडचणींवर ‘प्रकाश’ टाकून नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे ७८ वर्षीय दक्ष नागरिक प्रकाश रामचंद्र अधिकारी समाजाचे खरे ‘लोकसेवक’ आहेत. त्यांच्याविषयी...
मुंबई-ठाण्यातील धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या समस्यांकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसतो, तेथे समाजाच्या मदतीला धावण्याचे दूरच. मात्र, ‘बिनपगारी फूल अधिकारी’ ही म्हण सार्थकी ठरवणारे ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक प्रकाश रामचंद्र अधिकारी या सर्वसामान्य कुटुंबातील धडपड्या व्यक्तीचे समाजकार्य खरोखर उल्लेखनीय आहे. एखादा सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी किंबहुना लोकप्रतिनिधी जो आपल्या परिसरात काम करतो, तशीच किंबहुना बहुतांश कामे प्रकाश अधिकारी हे गृहस्थ गेल्या २३ वर्षांपासून आपल्या परिसरात करीत आहेत. मनापासून समाजसेवा करण्याची इच्छा असलेल्या अधिकारी यांची परिसरातील पाणीसमस्या, रस्त्यावर साचलेला कचरा, पदपथावरील बंद पडलेले विद्युत दिवे, उद्यानात नादुरुस्त झालेली खेळणी, कचरा वाहून नेणारी घंटागाडी, पावसाळ्यात तुंबणारी गटारे आदी विविध समस्या व अडचणींवर करडी नजर असते. कुठे व कधीही काही समस्या उद्भवल्यास किंवा एखाद्याने तक्रार केल्यास त्वरित त्या संबंधित अधिकाऱ्यांशी वा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रकाश अधिकारी हा एकांडा शिलेदार आजही करीत आहे.
 
ठाणे पूर्वेकडील अष्टविनायक चौकानजीक राहणारे ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक प्रकाश अधिकारी मूळचे श्रीवर्धनचे. जेमतेम एसएससीपर्यंत शिक्षण पदरी असतानाही त्यांनी जिद्दीने उच्चशिक्षितांना लाजवेल, असे समाजकार्य करून दाखवले आहे. एसएससीनंतर श्रीवर्धनहून मुंबईत आल्यावर काही महिन्यांतच त्यांनी पुणे गाठले. चिंचवडमध्ये खासगी कंपनीत इंटर्नशीप कामगार म्हणून नोकरी पत्करली. काही महिन्यांतच ‘त्या’ नोकरीला रामराम ठोकून बाडबिस्तऱ्यासह पुन्हा मुंबईची वाट धरली. दरम्यान, ‘सिमेन्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीत सेवेची संधी मिळाली. या संधीचे अधिकारी यांनी सोने केले. ‘सिमेन्स’ कंपनीतील अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये प्रकाश अधिकारी कार्यरत होते. अनेक वर्षे या कंपनीमध्ये काम केल्याने अधिकारी काकांचा जनसंपर्कही दांडगा. अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह विभागात काम केल्यामुळे कामाचे नियोजन आणि त्याचा पाठपुरावा करण्याची त्यांना सवय होती. हे काम करत असताना ठाणे महापालिकेतील वरिष्ठांशी त्यांची ओळख होती. १९९७ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आयुष्यात पुढे करायचे तरी काय? हा प्रश्न सतत त्यांच्यासमोर उभा राहत होता. दरम्यान, कोपरी प्रभागातील तत्कालीन स्थानिक नगरसेवकाच्या सहवासात असताना प्रकाश अधिकारी यांना समाजसेवेची संधी उपलब्ध झाली आणि तेव्हापासून आजतागायत ते परिसरातील विविध समस्यांवर काम करीत असून नानाविध अडचणी त्यांनी सोडविल्या आहेत. कोपरी परिसरात तेव्हा, सर्वात जटील समस्या होती तेथील डम्पिंग ग्राऊंडची.डम्पिंग ग्राऊंडवर कुजणाऱ्या कचऱ्याला वारंवार लागणारी आग, पसरणारी दुर्गंधी या सर्व समस्येवर आपण सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे तेथील समस्या कायमच्या दूर झाल्याचे ते सांगतात. कोपरी परिसरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा ठाणे महापालिकेचा खत प्रकल्प होता. त्याचा पाठपुरावा अधिकारी यांनी करून हा प्रकल्प बंद करण्यास भाग पाडल्यामुळे येथील नागरिकांनी दुर्गंधीपासून कायमचा सुटकेचा नि:श्वास टाकला. प्रेमाने समजावल्यावर मोठी मुले, लहान मुलांच्या उद्यानात खेळायला जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
आपण करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती परिसरात राहणाऱ्यांनाही समजत असल्याने, कोणालाही मदत लागल्यास तत्पर मदतीस सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. आपण करीत असलेल्या कामाची माहिती ठाण्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांना माहिती असल्याने कुठल्याही स्वरूपाची अडवणूक होत नसून, याउलट आपला फोन त्यांना गेल्यावर ते लगेचच परिसरात असलेले काम करण्याबाबत तत्परता दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी परिसरात कचरा गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी परिसरातील हॉटेल्समधील कचरा आधी गोळी करायची, त्यामुळे परिसरात जागोजाग कचरा साठून एकच दुर्गंधी पसरायची. मात्र, अधिकारी यांनी, घंटागाडी नेणाऱ्या व्यक्तीस समजावून सांगितल्यानंतर आधी सोसायटीच्या परिसरातील कचरा गोळा करतात. सध्या तर परिसरातील कचराकुंड्याही हटविण्यात आल्याने खऱ्या अर्थाने ‘स्वच्छ ठाणे’ संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त असल्याबाबत अधिकारी यांनी समाधानी असल्याचे सांगितले. याशिवाय प्रभागातील लोकप्रतिनिधीही वेळोवेळी सहकार्य करीत असल्याची स्पष्ट कबुली देताना त्यांना जराही कमीपणाचे वाटत नसल्याचे ते सांगतात.
 
पत्नी वियोगानंतर एकाकी जीवन जगत असलेले प्रकाश अधिकारी सांगतात की, “आपले समाजाप्रति असलेले देणे या सामाजिक बांधिलकीतून आपण हे सामाजिक कार्य करीत आहोत. त्यामुळे स्वतःच्या दुःखाचा विसर पडून जनसामान्यांसाठी काहीतरी केल्याचे पुण्य लाभते.” वयोमानानुसार जेवढे झेपेल तेवढी जनसेवा करीत राहणार असल्याचा निर्धार ते बोलून दाखवितात. ठाण्यातील कोणतीही नागरी समस्या त्यांच्या नजरेतून सुटत नाही. अधिकारी काकांना समस्या दिसली की, ती समस्या सुटेपर्यंत ते त्याचा पाठपुरावा करत राहतात. त्यामुळेच ठाण्यातील पूर्वेकडील नागरिकांसाठी अधिकारी काका खरेखुरे प्रशासकीय अधिकारी भासतात. समाजालाही अशाच दक्ष नागरिकांची गरज असल्याचे सांगणाऱ्या अधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 
- दीपक शेलार
 
@@AUTHORINFO_V1@@