जीवनयज्ञाची सामग्री व आहुती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2021
Total Views |

Jivan Yadnya_1  
 
 
 
भारतीय संस्कृतीने जगाला अनेक पावन मूल्ये प्रदान केली आहेत. त्यातीलच यज्ञसंस्कृती हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. यज्ञाचा भाव हा अतिशय विस्तृत स्वरूपाचा आहे.
 
यज्ञस्य चक्षु: प्रभृति: मुखं च,
वाचा श्रोत्रेण मनसा जुहोमि।
इमं यज्ञं विततं विश्वकर्मणा,
देवा: यन्तु सुमनस्यमाना:॥
(अथर्ववेद - २/३५/५)
अन्वयार्थ
(यज्ञस्य) मानव जीवनरूपी यज्ञाच्या (प्रभृति:) भरण-पोषणाची साधने (चक्षु:) दृक् शक्ती - डोळे (मुखं च) आणि मुख आहेत, अशा या यज्ञात (वाचा श्रोत्रेण मनसा) वाणी, कान आणि मन या तिन्हींद्वारे (जुहोमि) मी आहुती प्रदान करतो. (इमं यज्ञं) हा माझा जीवनरूपी यज्ञ (विश्वकर्मणा) विश्वाची निर्मिती करणाऱ्या परमेश्वराने (विततम्) विस्तृत केला आहे, म्हणूनच या पवित्र यज्ञकार्यात (देवा:) सर्व दिव्य तत्त्वे व दिव्य भावना (सुमनस्यमाना:) अगदी प्रसन्नतेने ,आनंदाने (आ यन्तु) येवोत, प्रविष्ट होत राहोत, अशी प्रार्थना !
विवेचन
भारतीय संस्कृतीने जगाला अनेक पावन मूल्ये प्रदान केली आहेत. त्यातीलच यज्ञसंस्कृती हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. यज्ञाचा भाव हा अतिशय विस्तृत स्वरूपाचा आहे. सामान्यपणे रूढार्थाने आपण अग्निहोत्रालाच ‘यज्ञ’ असे म्हणतो. अग्निहोत्र म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी विविध सुगंधित द्रव्य आणि पदार्थांची आहुती प्रदान करणे, असा हा यज्ञाचा पारंपरिक रूढ अर्थ प्रसिद्ध झाल्याने त्याचे महत्त्व कर्मकांडाच्या पुरते मर्यादित झाले आहे. यज्ञाचा विशाल अर्थ न समजल्याने आपल्या पवित्र अशा यज्ञसंस्कृतीचा र्‍हास होत गेला. यज्ञाला आम्ही केवळ कर्मकांडाशी आणि त्यातच अनेक अनिष्ट रूढी-परंपरांशी जोडल्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचा यज्ञावरील विश्वास उडाला. यज्ञामध्ये दिल्या जाणाऱ्या पशुबळी प्रथेमुळे महात्मा गौतम बुद्धांनी यज्ञाच्या विरोधात बंड पुकारले. परिणामी, बौद्ध संप्रदाय उदयास आला. खरे तर यज्ञाची विशाल भावना व त्याचा आध्यात्मिक, यौगिक अर्थ प्रसारित झाला असता, तर बौद्ध, चार्वाक आणि इतर पंथ उदयासच आले नसते.
 
वास्तविकपणे ‘यज्ञ’ या शब्दाचा कितीतरी महान अर्थ आहे. ‘यज्’ या धातूपासून ‘यज्ञ’ शब्द उत्पन्न झाला आहे. यज्ञाचे देवपूजा, दान, संगतीकरण असे अर्थ निघतात. पूजा म्हणजे, त्या-त्या दिव्य तत्त्वांचा सन्मान, सेवा व आदर होय.शतपथ ब्राह्मण ग्रंथात म्हटले आहे - ‘यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्मम्।’ म्हणजेच या जगात जे जे पवित्र व श्रेष्ठ कर्म असते, ते ते यज्ञ होय. यजुर्वेदाच्या अठराव्या व बाविसाव्या अध्यायात थोड्याबहुत फरकाने एक मंत्र आला आहे, तो असा-
आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां
चक्षुर्यज्ञेन कल्पतां श्रोत्रं यज्ञेन कल्पतां
वाग् यज्ञेन कल्पतां
मनो यज्ञेन कल्पताम्.......।
 
म्हणजेच आमचे आयुष्य (जीवन)यज्ञ कर्माने सफल व समर्थ होवो. त्याचबरोबर प्राणशक्ती, डोळे, कान, वाणी, मन, आत्मा इत्यादी सर्व गोष्टी या यज्ञकर्मानेच सामर्थ्यवान ठरोत. हा व्यापक अर्थ ग्रहण केला तर पवित्र व मांगलिक कार्यांनाच तर ‘यज्ञ’ असे म्हणतात. परोपकार, दया, समाजसेवा, राष्ट्रभक्ती मातृ-पितृसेवा व आज्ञापालन, दीन-दु:खी जनांची सेवा, गरजूंना मदत, अन्न-धन-वस्त्र-विद्या यांचे दान आणि इतर सामाजिक कार्ये ही सर्व यज्ञाची तर रूपे आहेत. साधुसंतांनी याच यज्ञाची महती गायली आणि जीवनभर लोकोपयोगी व समाजकल्याणाची कामे केली. याच पवित्र यज्ञभावनेला अंगी बाळगून ते अखंडितपणे जनसेवेच्या कार्यात सतत तल्लीन राहिले. असंख्य शूरवीरांनी राष्ट्र रक्षणाच्या व सेवेच्या यज्ञात आपल्या बलिदानाच्या आहुत्या प्रदान केल्या होत्या. ही सर्व ईश्वरीय कामे म्हणूनच वेदांमध्ये परमेश्वरालाही ‘यज्ञ’ म्हटले आहे. त्या भगवंताने निर्मिलेले हे संपूर्ण विश्वदेखील यज्ञरूपच होय. या विस्तीर्ण अशा जगात आपले जीवनरूपी यज्ञसुद्धा त्यानेच रचले आहे, जे की १०० वर्षांपर्यंत चालते. आम्ही मानवांनी मात्र या जीवनयज्ञाला अतिशय उत्कृष्टरीत्या संपादित केले पाहिजे. या जीवनयज्ञाचा अग्नी सद्गुण व सन्मार्गाने सदैव प्रज्वलित राहावयास हवा.
 
सदरील मंत्रात प्रामुख्याने तीन गोष्टींचे प्रतिपादन केले आहे. पहिली म्हणजे यज्ञाची साधनसामग्री, दुसरी या यज्ञाचा निर्माता आणि तिसरी गोष्ट म्हणजे या यज्ञातील उपस्थिती! या यज्ञाचे भरण-पोषण कसे होते व त्यात कोणती सामग्री हवी? याचे सुंदर विवेचन येथे करण्यात आले आहे. जगाला पाहण्याचे सर्वात जवळचे साधन म्हणजे डोळे होय. यालाच ‘दर्शनशक्ती’ असेही म्हणतात. ज्याद्वारे संपूर्ण जगाला पाहण्याचे कार्य घडते, ते नेत्ररूप ज्ञानेंद्रिय होय. याच नेत्रांनी रंगीबेरंगी विश्वाची विविध दृश्ये पाहून मानवाला सृष्टीतत्त्वांचे ज्ञान होते, ते डोळे अतिशय महत्त्वाचे आहेत. माणूस जेव्हा डोळ्यांनी वस्तूंचे दर्शन करतो, तेव्हा मनाने त्या संदर्भात विचारही करू लागतो. माणसाला पाहता आले नसते, तर त्याची प्रगती खुंटली असती. त्याचबरोबर मुख हे भक्षण करण्याचे मूलभूत साधन होय. आम्ही या मुखाद्वारे जे काही खातो, त्याद्वारे आमचे मन, शरीर व बुद्धी बनते. काहीही खात राहणे व तेही कशाही पद्धतीने हे मात्र योग्य नव्हे? आयुर्वेदात आहारविधीचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. आहारानेच तर शरीर, मन व बुद्धी बनते - आहारशुद्धौ सत्त्वशुद्धि:, सत्त्वशुद्धौ ध्रुवास्मृति:....! संतांनीही म्हटले आहे - ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!’ यासाठी आमचे खानपान सुयोग्य असावे.
 
त्याचबरोबर मुख हे बोलण्याचेही कार्य करते. वाणीने माणूस आपल्या भावना अभिव्यक्त करतो. आपल्या अंतर्मनातील विचार प्रकट करून तो जगाशी नाते जोडतो. पण, याच मुखासोबत कानाचा संबंध आहे. कारण जो माणूस ऐकू शकतो, तोच बोलू शकतो. ज्याला ऐकता येत नाही, त्याला बोलतापण येत नाही. जशी की मूकबधीर माणसे आपल्या जीवनात काहीच करू शकत नाहीत, प्रत्येक बाबतीत ती हतबल ठरतात. यासाठीच तर या जीवनयज्ञाला सफल करण्याकरिता डोळे व मुख हे (प्रभृति:) भरण-पोषणाचे मूलभूत साधन म्हणजेच सामग्री होय. यांच्याविना जीवनयज्ञ यशस्वी होणे शक्यच नाही.
 
त्याचबरोबर वाणी, कान आणि मन या तीन इंद्रियांची आहुती या जीवनयज्ञात पडणे आवश्यक आहे, म्हणूनच या यज्ञाचा होता म्हणतो - वाणी, कान व मनाच्या आहुत्या मी श्रद्धेने प्रदान करतो. पण, हा यज्ञ कोणामुळे निर्मिला गेला आहे. आम्ही म्हणतो प्रत्येक कार्य माझ्यामुळेच घडले. हा दर्प आणि अभिमान काहीच कामाचा नाही. हे विश्व निर्माण करणारा तो महान परमेश्वर अगदी अनादी काळापासून या कार्यात संलग्न आहे. म्हणूनच त्याला ‘विश्वकर्मा’ असे म्हणतात. आधुनिक भाषेत विश्वकर्मा म्हणजेच अभियंता होय. या सर्वान्तर्यामी, सर्वविद्, स्वयंपूर्ण व स्वयंभू अशा महानतम अभियंत्याने समग्र विश्वाचा महायज्ञ रचला आहे. त्याबरोबरच मानवाचा जीवनयज्ञ अतिशय सुंदररीत्या घडविला आहे. सर्वांना अतिशय सुव्यवस्थितरीत्या निर्मिले आहे. शरीराचे एकही अवयव यथास्थान व तितकेच ते उपयुक्त! अंतर्बाह्य सर्वांची एकसारखीच! कुठेच कमतरता नाही, म्हणूनच याचे सर्व श्रेय प्रभू परमेश्वराकडे जाते.
 
शेवटी म्हटले आहे - या यज्ञामध्ये दिव्य तत्त्वांनी येऊन विराजमान व्हावे. जोपर्यंत सत्पुरुष आणि देवगण प्रसन्नचित्ताने भगवंताने रचलेल्या या पावन जीवनयज्ञात सहभागी होणार नाहीत, तोपर्यंत हा यज्ञ कसा काय प्रज्वलित होणार? कोणतेही सामुदायिक किंवा सामूहिक कार्य सफल व सार्थक ठरते, ते तिथे उपस्थिती दर्शविणाऱ्या जनसमुदायामुळे! लोकांची संख्याच जर नसेल तर कार्यक्रम फोल ठरतो. पण, ही जनसंख्या म्हणजे घाऊक गर्दी नव्हे! तर यात सहभागी होणारे विद्वान, ज्ञानी, विवेकी व धर्मात्मा असावेत. मूर्ख व अज्ञानी लोकांची गर्दी काय कामाची? संत ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगावयाचे झाले तर वर्षात सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी। अनवरत भूमंडळी, सोयरे होतु॥ ईश्वरनिष्ठ अशा आध्यात्मिक सज्जनांमुळेच समाजयज्ञाची सांगता अतिशय उत्कृष्टरीत्या संपन्न होते. याचसाठी मानवी जीवनरूप यज्ञामध्ये श्रेष्ठ पुरुषांनी व सद्गुणसंपन्न अशा दिव्य लोकांनी सहभागी व्हावे आणि हा जीवनयज्ञ पूर्ण करावा, अशी कामना मनुष्यरूप यजमान व्यक्त करतो आहे. आता हा जीवनयज्ञ किती प्रमाणात व कशाप्रकारे यशस्वी करावयाचा? हे मात्र या यजमानाच्या हाती आहे.
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@