वैदिक सणांचे योग रहस्य भाग - १०

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2021
Total Views |

Tripur Pournima_1 &n
 
 
त्रिपुरी पौर्णिमा
त्रिपुरी पौर्णिमा पौर्णिमेला येते. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला. हा त्रिपुरासुर कोण व कोठे राहत होता? त्याला शिवाने कसे मारले? तीन परकोटांच्या आत लपून बसून तेथून देवांना त्रास देणारा असा हा त्रिपुर होता. वाईट कर्म करत असे म्हणून तो असुर होता. हे सुर-असुर वा देव-दानव कोण? ‘मुद्रा’ प्रकरणात मुद्रेची महती सांगताना वर्णन केले आहे, ‘मुदं ददाति देवानां द्रापयति असुरानपि’ म्हणजे साधकाच्या दैवी शक्तींना आनंद देणारी आणि असुर शक्तीनिर्मूलन करणारी ती मुद्रा, तेव्हा सुर किंवा असुर या साधकातील योग्य किंवा अयोग्य साधनावस्था होत. असा हा प्रबल त्रिपुरासुर साधकाच्या दैवी शक्तींना त्रास द्यायचा आणि त्रास देऊन तो आपल्या तीन परकोटांनी सुरक्षित असलेल्या पुरात लपून बसायचा. हे तीन परकोट कशाचे होते? तर बाहेरील परकोट चांदीचा, त्या आंतील सुवर्णाचा आणि सर्वात आतील लोहाचा होता. थोडा विचार केल्यास असे दिसून येईल की, कितीही श्रीमंत माणूस असला तरी आपल्या नगरीचे बाहेरील परकोट तो चांदी सोन्याचे करणार नाही. ते परकोट शत्रू तर परस्पर लुटतीलच; पण ते मजबूतपण नसतात. त्रिपुरासुराने असे उलट का केले असावे? लोखंडाचा मजबूत परकोट सर्वात बाहेरचा असावयास पाहिजे होता आणि फार फार तर आपल्या शौकाखातर आतील कोट सोन्याचा असावयास पाहिजे होता. पण, त्रिपुरासुराचे सारे उलटच. त्याचा सोन्याचा परकोट बाहेर, तर लोहाचा आत होता. या कथा अशाच लिहिल्या आहेत की, त्यात काही रहस्य आहे? पंचतत्त्वांच्या साधनानुभवांना धरून ही कथा लिहिली आहे. पृथ्वीतत्त्वाच्या वर आप तत्त्व अनुभवायला मिळते. आपतत्त्वाचा वर्ण शुभ्र म्हणजे चांदीचा. महादेव आपतत्त्वाचे स्वामी. हिमालय पांढरा, नंदी पांढरा, चंद्र पांढरा, गंगा शुभ्र, गौरी शुभ्र. सर्वत्र शुभ्र वस्तूंचे राज्य. कुंडलिनी जागृत झाल्यावर साधक आप तत्त्वात प्रवेश करतो. याला ‘जल’ तत्त्वसुद्धा म्हटले जाते. साधक आप तत्त्वात मुरला की, त्याचा परकोट शुभ्र वर्णाच्या चांदीचा असणारच.
 
त्रिपुरासुराच्या एका पुराचा परकोट अशा तर्‍हेने चांदीचा होता. पण, तो एक सुर नव्हता, तर त्रिपुरासुर होता. त्याची तीन पुरे कोणती? एक पुर आप तत्त्वाचे म्हणजे चांदीच्या परकोटात असलेले आपल्याला गवसते. दुसरे आप तत्त्वाच्या वर तेजस तत्त्व येते. आप तत्त्वात स्थिर झालेला साधक पुढील तेजस तत्त्वाकरिता धडपड करतो. तेजस तत्त्वाचा वर्ण सुवर्णाचा आहे. तेजस तत्त्वात स्थिर झालेला साधक द्विपुरासुर बनून त्याचा दुसरा आतील परकोट सुवर्णाचा बनणारच! परंतु, त्रिपुरासुर तर लोहाच्या परकोटा आत दडला होता. हा लोह परकोट कशाचा? तेजस तत्त्वानंतर वायू तत्त्व येते. वायू तत्त्वाचा वर्ण धूम्र म्हणजे लोहाचा आहे. असा हा महाबलाढ्य त्रिपुरासुर तत्त्वांचा आश्रय घेऊन तेथून देवांना त्रास देत असे, यावरून साधकाला सदैव किती सावध राहावे लागते याची कल्पना येईल. वायू तत्त्वाची साधना म्हणजे महाकठीण कर्म! परंतु, एवढी प्रकांड साधना करणार्‍या साधकातही असुर शक्ती असू शकतात. त्या आपल्यातील असुर वृत्तींचा जागृत साधकाने वध केला म्हणून आज त्रिपुरी पौर्णिमा साजरी करतात. साधकातील असुर वृत्ती म्हणजे त्रिपुरासुर आणि कल्याणकारक जागृत वृत्ती म्हणजे भगवान शिव होय. शिव म्हणजे कल्याण!
 
भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध कसा केला? तर धनुष्य बाणाने! भगवान शिवाने धनुष्य केले मेरुदंडाचे, प्रत्यंचा म्हणजे दोरी वापरली शेषाची आणि बाण बनलेत प्रत्यक्ष भगवान विष्णू! भगवान विष्णू कसे काय बाण बनले? भगवान श्रीविष्णू म्हणजे आकाश तत्त्वातील देवता. आकाश तत्त्वाची साधना केल्याशिवाय साधक वायू तत्त्वाच्या लोहवर्णी परकोटाचा भेद करू शकणार नाही. वायू तत्त्वाच्या पलीकडे आकाश तत्त्व आहे. म्हणून आकाश तत्त्वातील भगवान श्रीविष्णू स्वतःच बाण बनले. भगवान शिव आप तत्त्वाचे स्वामी, आप तत्त्वातील स्वामीनेच आकाश तत्त्वाचा बाण घेऊन मधील तिन्ही तत्त्वांचा परकोट करून दडणार्‍या साधकाच्या त्या परकोटांचा विध्वंस करून त्या वृत्ती बंदिस्त असुर साधकाला त्याच्या सिद्धिशक्तीतून आणि वृत्ती परकोटातून बाहेर काढून त्याला मुक्त केले आणि भगवान श्रीविष्णू स्वरूप बनविले. मधील तीन तत्त्वांच्या मायेत सापडू नये म्हणून साधकाला आप तत्त्वाची साधना करतानाच अतिसावध असावे लागते. सत्त्व, रज, तम हे गुणसुद्धा तीन मानले गेले आहेत. सर्व वृत्ती शून्य झाल्यावरच खरे ज्ञान प्राप्त होत असते. उपनिषदे सांगतात, ‘प्रणवो धनुः, शरो ह्यात्मा, ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते।’ म्हणजे प्रणवसाधना (ध्यान) धनुष्य तर आत्मरूप विष्णू हा शर आणि तो शर परब्रह्मावर मारून मुक्त व्हायचे असते. पौणिमेला पूर्ण चंद्र आपल्या शुभ्र धवल कांतीने भगवान शिवाचे आप तत्त्व पूर्ण विकसित करतो. कोजागिरीचा अमृतवर्षाव याही दिवशी होतो. त्यामुळे आजच्या पौर्णिमेच्या शुभ्र दिवशी शुभ साधना करणार्‍या साधकरूपी शिवाने आकाश तत्त्वातील देवतारूपी बाणांचे साहाय्य घेऊन आपल्या असुर वृत्तींचा म्हणजे त्रिपुरासुराचा वध केला.
 
आपल्यातील प्रबल अशा असुरवृत्तीरूप त्रिपुराला मारल्यावर ज्ञानप्राप्ती होत असते. ज्ञान म्हणजे प्रकाश, म्हणून रात्री दिवे लावून किंवा मोठे-मोठे काकडे लावून प्रचंड प्रकाश करतात. नदीत दीप सोडून शोभा आणतात, ज्ञानप्राप्तीचा तो उल्हास होय. त्रिपुर पौर्णिमेचा उत्सव मंदिरामंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा करतात, नदीकाठच्या गावी तर आकाशातील चांदण्या जणूकाय नदीत उतरून विहार करत आहेत, अशी ही त्रिपुरी पौर्णिमा नदीत अवतरल्याचे दृश्य बघून निरक्षर अशा अ-कवीलाही काव्य करण्याची प्रेरणा होते. नदीत चमकणार्‍या या काजव्यांना पाहून पूर्ण चंद्रालाही आपल्या वैभवाची लाज वाटते म्हणूनच की काय, तो दुसर्‍या दिवसापासून त्या मनःस्तापाने कमी-कमी व्हायला लागतो आणि 15 दिवसांनी पूर्ण रुसून बसतो. चंद्र हा तारकांचा अधिपती! पण, त्याच्या देखतसुद्धा त्याच्या प्रेयसी तारका त्याला न जुमानता, पृथ्वीवरील सर्व नद्यात हुंदडतात, मिचकावतात आणि तेही मर्त्य जनांसमोर! मग का नाही त्याला राग येणार? तो रुसतो अमावस्येला आणि हळूहळू त्याची कळी खुलते कार्तिक वद्य द्वितीयेपासून! (क्रमशः)
 
- योगिराज हरकरे
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@