'बर्ड फ्ल्यू'मुळे पाच राज्यात लाखभर पक्ष्यांचा मृत्यू; महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |
bird _1  H x W:


स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी '
एव्हीयन इन्फ्लूएन्झा फ्ल्यू'ने संक्रमित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - हिमाचल प्रदेशातील पाॅंग डॅम तलाव क्षेत्रात मृतावस्थेत सापडलेल्या स्थलांतरित पक्ष्यांचे नमुने 'एव्हीयन इन्फ्लूएन्झा' म्हणजेच 'बर्ड फ्ल्यू'ने संक्रमित असल्याचे समोर आले आहे. देशातील पाच राज्यांमध्ये स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे काही नमुने या फ्ल्यूने संक्रमित आहेत. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पत्रक काढून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत असल्यामुळे वन विभागानेही प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशातील पाॅंग डॅम तलाव क्षेत्रात साधारण १,८०० स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळले. त्यामधील बरेच पक्षी बार हेडड गिज म्हणजेच पट्टकादंब प्रजातीचे होते. या पक्ष्यांचे नमुने H5N1 इन्फ्लूएन्झा व्हायरसने संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वीच केरळ, राज्यस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश राज्यात या व्हायसरने प्रवेश केला आहे. हरियाणामध्ये कुक्कुटपालनातील एक लाख पक्ष्यांच्या बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. तर राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये मृताअवस्थेत आढळलेल्या कावळ्यांमध्ये आणि केरळमध्ये काही बदक बर्ड फ्ल्यूमुळे संक्रमित असल्याचे उघड झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, H5N1 इन्फ्लूएन्झा व्हायरस हा पक्ष्यांमधून माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन्यजीव कक्षाने यासंदर्भात परिपत्रक काढून राज्याच्या वन विभागाला सर्तक राहण्याचे आदेश दिला आहे. 
 
 
स्थलांतरित पक्ष्यांमध्ये H5N1 इन्फ्लूएन्झा व्हायरस आढळल्याने व्हायरस पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. राज्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला मोठ्या संख्येने सुरुवात झाली आहे. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण विभागाच्या पत्रकानुसार आम्ही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होणाऱ्या वनक्षेत्रांच्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. राज्यातून अजूनही पक्ष्यांच्या मृत्यूची घटना उघडकीस न आल्याने चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय बर्ड फ्ल्यूचा वाढता प्रभाव बघता 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने देखील त्यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या बर्ड रिंगिंग प्रकल्पाला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्राच्या पत्रकामध्ये संरक्षित वनक्षेत्रांबरोबरच स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असणाऱ्या पाणथळ क्षेत्रावरही लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 
 
राज्यांनी घ्यायची दक्षता
१) राज्यस्तरीय समितीची नेमणूक करणे
२)स्थलांतरित पक्ष्यांच्या देखरेखीसाठी आणि उद्भवणार्‍या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कृती आराखडा तयार करणे.
३) स्थलांतरित पक्ष्यांच्या नमुने संग्रहित करण्यासाठी आणि योग्य दक्षता ठेवण्यासाठी राज्य पशुवैद्यकीय विभागाचे सहर्काय घेणे. मृत पक्ष्यांना अत्यंत सावधगिरीने आणि वैज्ञानिक पर्यवेक्षणाने हाताळणे.
४) संरक्षित वनक्षेत्रांबरोबरच पाणथळ जागा आणि मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होणाऱ्या जागांवर लक्ष ठेवणे
५) संक्रमणाच्या भितीने लोकांकडून पक्ष्यांची शिकार न होऊ देणे
 
@@AUTHORINFO_V1@@