हॅप्पीवाली पाठशाला ; एक पाऊल शिक्षणाकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |

Schoolwali Pathshala_1&nb
 
 
बेघर, गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची भूक भागविण्याच्या दृष्टीने घणसोलीतील ‘टीम हॅप्पीवाली फिलिंग’ने ऐन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्याच दिवशी सुरू केलेला उपक्रम पाठशाळेतील लहानग्या मुलांसोबतच, बऱ्याच साऱ्या नवी मुंबईकरांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतो आहे, आज याच उपक्रमाची सविस्तर माहिती आपण पाहूयात.
 
या आधी बऱ्याचदा ‘हॅप्पीवाली फिलिंग’ या संस्थेचे अनेक उपक्रम आपण सातत्याने पाहत आलो आहोत. कधी थंडीत बेघर, गरजूंमध्ये चादर वाटप करून निःस्वार्थ मायेची ऊब पसरवताना, तर कधी ऐन उन्हाळ्यात चप्पल/टोपीवाटप करून माणुसकीची सावली होऊ पाहताना, सोबतच अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील लहान थोरांसोबत विविध खेळांतून/कार्यक्रमातून बेधुंद मज्जा लुटताना. पण, या वेळेचा उपक्रम हा इतर उपक्रमांपेक्षा अगदीच वेगळा आहे. शाळा म्हणजेच विद्येचे माहेरघर; पण या घरात सगळ्यांनाच वास्तव्य मिळवता येते असे नाही. काहींच्या नशिबात शिक्षणरूपी प्रकाश पसरतच नाही आणि निरक्षरतेच्या अंधारात आपलं लाचार जगणं जगावे लागते. अशाच काही चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाकडे वळवलेले पहिले पाऊल म्हणजेच प्रोजेक्ट ‘हॅप्पीवाली पाठशाला’. कोरोनामुळे शाळा ऑनलाईन झाल्या आणि मुलांना नवे कोरे स्मार्ट फोन मिळाले. पण, त्यांचे काय ज्यांना शिक्षण म्हणजे काय? ते का गरजेच आहे? हे अजूनही ठाऊकच नव्हते...
आपण शहरात राहताना कित्येकदा रस्त्यालगत वस्त्या पाहतो, लहान मुलं पाहतो. दोन मिनिटं त्यांच्या भविष्याचा विचारही करतो. पण, मग धावपळीच्या या जगण्यात विसरूनही जातो, तेव्हा काही डोळस माणसं सोबत येऊन या उत्तरांना प्रत्यक्षात उतरवतात. आणि ‘हॅप्पीवाली पाठशाला’ हे या साऱ्या प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर आहे. नवी मुंबई शहर जरी स्वच्छ सर्वेक्षणाच्या अव्वल क्रमांकावर विराजमान असले, तरी या शहरात वस्तीत राहणाऱ्या गरजू कुटुंबाची संख्या कमी नाही. गरीब वस्तीत राहणारे आपला उदरनिर्वाह हातावर पोट चालणाऱ्या गोष्टींमधून करत असतात, जसे की, वीटभट्टीवर काम करणे, बांधकामात मजुरी करणे, लोहारकाम इत्यादी. मुळात हे सर्व स्वतः अशिक्षित असल्याने त्यांना शिक्षणाचे काही महत्त्व वाटत नाही आणि अशी माणसं आपल्या मुलांनादेखील शिक्षणापासून अलिप्त ठेवतात. त्यामुळे त्यांची मुले साक्षरतेच्या प्रवाहापासून फार लांब राहतात, अशा मुलांना शिक्षणप्रवाहात मिसळून घेण्यासाठी ‘टीम हॅप्पीवाली फिलिंग’ने ‘हॅप्पीवाली पाठशाला’अंतर्गत अशा बेघर, गरजू मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या संमतीने आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीने घणसोली खाडीलगत मोकळ्या जागेत विनामूल्य शिकवणी चालू केली आहे.
फुले कुटुंबाचे शिक्षणासाठीचे एकंदर योगदान तर सगळ्यांनाच ज्ञात आहात. विशेष म्हणजे, सदर उपक्रम सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी सुरू झाल्याने खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना जन्मतिथी दिवशी मानवंदना देण्याचे कार्य या टीमने आणि शाळेतल्या चिमुकल्यांनी केले आहे. ऐन सहा चिमुकल्यांना सुरू झालेली शाळा आता १४ विद्यार्थ्यांच्या आकड्यावर पोहोचलेली आहे, त्यात आनंदाची बातमी म्हणजे लहान मुलांच्या शिक्षणातून प्रेरणा घेऊन नुकतेच पाठशाळेत एक प्रौढ शिक्षणासाठीही नवीन विद्यार्थिनीचा प्रवेश झाला आहे. मिना कुणारी असे यांचे नाव असून, त्यांचे वय ३३ वर्षे आहे. इमारती मधल्या घरांमध्ये धुणे-भांडी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. लहानपणापासून शिकण्याची दृढ इच्छा असून, आईवडिलांनी फक्त मुलगी असल्याने शाळेत पाठवले नाही, त्यामुळे शिकण्याची इच्छा मनातच मारावी लागली. त्यांच्यासाठी ‘हॅप्पीवाली पाठशाला’ हे इच्छापूर्तीचे कारण झाले आहे. इयत्ता दहावीपर्यंत पालिकेच्या शाळेत शिक्षण मोफत असले, तरी वस्तीतली मंडळी शिक्षणाकडे कानाडोळा करतात, त्यांची शाळेकडे पाहण्याची नजर बदलण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात या उपक्रमाने केलेली आहे. येत्या वर्षीच्या शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेत महानगरपालिकेतील शाळेत या सर्व मुलांचे प्रवेश घेण्याचा हेतू या संस्थेने स्पष्ट केलेला आहे. पण शाळा चालू होईपर्यंत शाळेत शिकवल्या जाणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ‘टीम हॅप्पीवाली फिलिंग’ चोख पार पाडत आहे. अश्विनी पाटील ‘टीम हॅप्पीवाली फिलिंग’चे प्रतिनिधी यांचा अभिप्राय खालीलप्रमाणे :
“सांगताना खूप आनंद होतो की, ‘हॅप्पीवाली पाठशाला’बरोबर मला पटकन आपले होता आले, त्याचे कारण म्हणजे, मीपण एका अशा गावातून शिकून आलीय, ज्या गावामध्ये माध्यमिक शाळेसाठी आठ-दहा किलोमीटर चालत जावे लागत असे. परंतु, माझ्या सुदैवाने माझ्या वेळी गावापासून अगदी जवळच दोन-तीन किलोमीटर अंतरावर माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आणि शिक्षकही खूप चांगले लाभले. त्यानंतरच्या त्या तीन वर्षांच्या काळात त्या शाळेमधून जे संस्कार आमच्यावर झाले ते आजही खूप ताकद देतात, जगायला आणि लढायला शिकवतात. ‘हॅप्पीवाली पाठशाला’मध्ये मला माझी शाळा दिसते, जी की अशीच खुल्या अभाळाखाली भरायची आणि तसेच काही संकल्प घेऊन उभी राहतेय. माझे शिक्षक ही त्यावेळी विनावेतन काम करायचे; पण म्हणून त्यांनी कधीच शिकवणीमध्ये कसर केली नाही. उलट खूप सारे वेगवेगळे प्रयोग करतच राहिलो. उद्याची स्वप्न पाहतच राहिलो. शाळेशी खूप घट्ट नाते निर्माण झाले होते, इतके की, कधी कधी शाळेतून घरी जाऊच वाटायचे नाही. सगळे एकत्र येऊन खूप सारे प्रयोग यशस्वी पार पाडले. तेव्हा तरी आम्हाला कुठे माहीत होते बाहेरच जग... कुठे माहीत होती स्पर्धा... फक्त एकच माहीत होते की, शिकण्याची संधी मिळालीय तर काहीतरी चांगलेच करू. काहीतरी चांगलेच करू म्हणजे नेमके काय करू माझ्यासाठी, याचे उत्तर म्हणजे ‘हॅप्पीवाली पाठशाला’ आहे!
 
काही गोष्टी प्रत्यक्षात अनुभवल्यावर अजून जवळच्या वाटतात... या प्रोजेक्टच्या पहिल्याच दिवशी जेव्हा चिमुकल्यांच्या डोळ्यात जी शिक्षणाविषयची ओढ आणि कुतूहल पाहिले, ते पाहून प्रोजेक्टविषयी अजून नवे दृष्टिकोन मिळाले. विजयदादा आणि ‘हॅप्पीवाली फिलिंग’च्या या अनमोल कार्यात मी नेहमी सोबत असेन. आपण या प्रोजेक्टमध्येही नवनवे प्रयोग करत राहू. ‘जगू आणि जगायला शिकवू, लढू आणि हक्कांसाठी लढायला शिकवू.” कोणतीही गोष्ट एकट्याने होत नसते. एकत्र येऊन बरेच विषय सोपे होतात आणि आनंदही मिळतो. आम्हालाही तुमच्या सोबतीची गरज आहे. या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवसातून एक तास देणारी काही वेडी माणसं शोधतोय... ज्यांना शक्य आहे त्यांनी तसं कळविल्यास खूप आनंद होईल. साधारण वेळ रोज सकाळी ९ ते १० अशी आहे. पण, ज्यांना ज्या दिवशी आणि जसं शक्य आहे, त्याच्या अगोदरच्या दिवशी कळवावे म्हणजे नियोजन करणे सोपे जाईल. बाकी पुन्हा एकदा शाळा जगायला मजा येतेय!
 
 
- विजय माने
@@AUTHORINFO_V1@@