मना अंतरी सार विचार राहो।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |

Manovata_1  H x
 
 
 
 
आजच्या आधुनिक युगात आपण पाहतो की, आपली आरोग्याची शारीरिक व मानसिक दोन्हींची घडी विस्कटली आहे. ऐहिक आकांक्षा व मानसिक शांतीचे गणित अजिबात जुळत नाही. मानसिक आरोग्याची कल्पना तशी पाहिली तर तुलनात्मक आहे. अमुक एखादी गोष्ट मिळाली म्हणजे एखादी व्यक्ती सुखी झाली, असे म्हणता येणार नाही. तसेच संकटाचा डोंगर कोसळला म्हणून सगळ्याच व्यक्ती आयुष्यभर दुःखाच्या गुहेत लुप्तही होत नाहीत. किंबहुना, कितीही कठीण परिस्थितीत मन शांत ठेवून यशाची शिखरे गाठणारी माणसे या जगात आहेतच. अत्यंत पोषक परिस्थिती आहे, कुठलीही कठीण समस्या नाही तरी रसातळाला जाणारी माणसेही याच पृथ्वीतलावर आहेत. एकंदरीत फ्रॉईडसारखे मानसशास्त्रज्ञ मनाची गुंतागुंत व कार्यक्षमता या सुप्त मनातील कार्यपद्धतीवरून वर्णन करतात. सुप्त मनातून येणाऱ्या जाणिवा, दबलेल्या इच्छा व त्यामुळे व्यक्त होणारे विशिष्ट आचारविचार याचा ऊहापोह मनोविश्लेषणातून बऱ्याच वेळा केला जातो. स्वप्नातील अनेक रेखाटनांमुळे मनात काय चालले आहे? किंवा मनात कुठल्या क्लिष्टता आहेत, याचे विश्लेषण केले जाते. मुळात मन कुठे आहे, हे सांगतानाच सामान्य माणसांचा गोंधळ उडतो. खरं ज्याला आपण ’मनातून’ म्हणतो, त्या ’दिल से’ किंवा ’हृदयातून’ येतात असे समजले जाते. पण, मानसिक आरोग्याविना खरे आरोग्य नाही हे खरे. मानसिक आरोग्य हे आपल्या मानसिक प्रगल्भतेचे प्रतीक आहे. आपल्या वैयक्तिक व सामाजिक सक्षमतेतून जास्तीत जास्त समाधान कसे मिळेल, स्वस्थचित्त व स्थिरचित्त मन कसे लाभेल, याचा विचार प्रत्येकजण कधी ना कधी आणि विशेषतः भावनांचा उद्रेक झाल्यावर करीत असतो.
 
काही छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा एक निर्भेळ आनंद देऊन जातात. या गोष्टी आपल्या मनातून सहज उत्पन्न होतात. कुठलेही अवडंबर त्यात नसते. त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात केल्या की, मनाला एक निखळ खुशी मिळते. पाहा ना, एखादे छोटेसे मूल, दुसऱ्या इतर लहान मुलांबरोबर खेळताना त्याला एखाद्या मुलाचा बॉल आपल्या हातात मिळाला तर किती बरे होईल असे वाटते. मग पुढची गोष्ट म्हणजे, त्या मुलांकडून तो बॉल हातात घ्यायचा. मग चेहऱ्यावर खुदकन हसू. माहीत असते त्या छकुल्याला तो बॉल त्याचा नाही, पण त्याला तो फक्त हातात घ्यायचा होता. थोडक्यात काय, काही गोष्टी आपल्याला खूप हर्षित करतात. लहान मुलांना त्या चटकन कळतात. पण, मोठ्यांना आपल्या आयुष्याच्या रहाटगाड्यासमोर त्या कळतही नाहीत. पैसे कमवायचे असतात. घरसंसार चालवायचा. त्यात सुखांना आणायचे. प्रतिष्ठा जपायची. या सगळ्यात मनातल्या कप्प्यात सहज असलेल्या व फुलांसारख्या आपसूक फुलणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहताच येत नाहीत. किंबहुना, आपण स्वतःहून पाहूच शकत नाही. कारण, आपण स्वत:च्या आयुष्याचा ‘असली’ विचार करतच नाहीत.
 
मनाचे खेळ कल्पनांच्या पलीकडचे आहेत. आपण द्वेषाच्या भोवऱ्यात का अडकतो? आंधळ्या प्रेमात घरदार का सोडतो? कळत असतानासुद्धा चुकीचे निर्णय का घेतो? भावनांचा कल्लोळ आपल्या मनात कसा उठतो? अनेक चांगल्या गोष्टींचे महत्त्व आपल्याला का पटत नाही? आपण इतके मूर्खासारखे कसे वागतो? आयुष्य एकच आहे, हे आपल्यालाही माहिती आहे. ते संपूर्ण जगले पाहिजे व तेही आनंदाने जगले पाहिजे, हेही बुद्धीला पटते. पण, आपण तरीही दुःखीकष्टी होत राहतो. मानसिक आरोग्याकडे पाहताना एखाद्या व्यक्तीचा स्वत:चा स्वतःशी आणि समाजाशी संवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद सुसंवाद आहे का विसंवाद आहे, यावर त्याचा आशावाद व दैनंदिन जीवनातील आनंद अवलंबून आहे. आपण आपल्या आयुष्यातील तणावाशी कसे झुंजणार? आपली विधायकता कशी जोपासणार? आंतरिक शांती कशी मिळविणार, या सामान्य स्वास्थ्याशी निगडित असणाऱ्या गोष्टी आहेत.
 
 
 
आयुष्यातील आनंद किंवा स्वास्थ्य हे माणसाच्या एककल्ली अस्तित्वावर अवलंबून नसते. तो कितीही यशस्वी असला किंवा त्याच्याकडे कितीही संपत्ती असली तरी त्याला एकट्याला जगणे कठीण असते. म्हणजेच त्याने जगाशी प्रगल्भ तडजोड केली आहे आणि ती कशी केली आहे, हे महत्त्वाचं आहे. अशा प्रगल्भ तडजोडी करणाऱ्या व्यक्ती पहिल्यांदा आपल्या मनाशी प्रामाणिक असतात. त्यांना आपणास काय हवे आणि काय नको, हे काही अंशी तरी कळलेले असते. त्याचवेळी या व्यक्तींची सामाजिक ‘पराणुभूती’ त्यांना समाजाप्रति संवेदनाशील बनविते. व्यक्तीच्या विचारभावना व त्या अनुषंगाने त्यांची इतरांशी वागायची पद्धत, व्यावहारिक दृष्टिकोन या गोष्टी शास्त्रीय पार्श्वभूमीवर आधारित आहेत आणि तरीही त्या मोजतामापता येत नाहीत. कारण, त्या खळखळणाऱ्या आहेत. समुद्राच्या प्रत्येक लाटेची उंची वेगळी असते. तसेच जगातील प्रत्येक व्यक्तीची एक स्वतःची अशी ओळख असते.
 
 
'In the social jungle of human existence, there is no feeling of being alive without a sense of identity.'
- Erik Erikson
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
@@AUTHORINFO_V1@@