महासत्तेतील उपासमारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021   
Total Views |

America_1  H x
उपाशी जनता, उपासमार, भूकबळी, कुपोषण, अन्नपुरवठ्याची कमतरता वगैरे बातम्या या अविकसित, विकसनशील देशांमधून अधूनमधून वाचनात येत असतात. या देशांमध्ये ही परिस्थिती का उद्भवली, त्याला तेथील सरकार कसे जबाबदार आहे, आंतरराष्ट्रीय संघटना यासाठी नेमके काय प्रयत्न करीत आहेत वगैरे बर्‍याचशा बाबींची यानिमित्ताने चर्चाही होते. पण, आजच्या एकविसाव्या शतकात, माहिती-तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या अचाट प्रगतीनंतरही जेवायला अन्नाचा एक कण नाही, ही परिस्थिती कायम आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे, ही स्थिती आफ्रिकेतील एखाद्या देशातील नाही, तर चक्क अमेरिकेतील आहे. होय, ‘फिडिंग अमेरिका’ या संस्थेच्या अहवालानुसार, अमेरिकेतील लोकसंख्येच्या प्रमाणात दर सहावी व्यक्ती ही उपासमारीच्या समस्येचा सामना करताना दिसते.
 
अमेरिका... जगात महासत्ता म्हणून मिरवणारा देश. भांडवलवादाचा भोक्ता आणि श्रीमंतीचा उपभोक्ता. पण, कोरोना महामारीमुळे या देशाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, देशातील दर सहाव्या व्यक्तीला एका वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली दिसते. कोरोनाचा कहर अमेरिकत अजूनही शिगेवर आहे. कोरोना महामारीच्या लाटेत या देशातील लाखो लोकांना आपले रोजगारही गमवावे लागेल. परिणामी, परिस्थिती इतकी बिकट झाली की, खाण्याचेही वांदे झाले. ‘फिडिंग अमेरिका’च्या आकडेवारीनुसार, डिसेंबरअखेरीस अमेरिकेतील एकूण पाच कोटी नागरिक उपासमारीच्या संकटाचा सामना करीत आहेत. अमेरिकेतील बालकांची स्थिती तर इतकी बिकट आहे की, दर चौथ्या बालकालाही उपाशीपोटीच झोपावे लागते. ‘फिडिंग अमेरिका’तर्फे ५४.८ कोटी नागरिकांना अन्नधान्याची पाकिटं वाटली गेली. पण, संस्थेच्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य पाकिटांची संख्या ही महामारी सुरू होण्यापूर्वीच्या संख्येपेक्षा ५२ टक्के अधिक नोंदविण्यात आली. इतकेच नव्हे, तर या पाकिटांचे वाटप करताना अमेरिकेत मोठ्या रांगाही लागल्या. नाताळच्या काळात या रांगाही हळूहळू वाढतच गेल्या. नाताळपूर्वी संस्थेतर्फे अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये प्रत्येकी ५०० या प्रमाणे अन्नाच्या पाकिटांचे वाटप केले गेले. पण, नाताळदरम्यान हीच संख्या ८,५०० इतकी झाली.
 
खरं तर अमेरिकेसारख्या विकसित देशात असे चित्र निर्माण होईल, याची कल्पनाही करवत नाही. पण, महामारीचा या महासत्तेला इतका जबरदस्त तडाखा बसला की, लोकांवर उपासमारीची वेळ आली. अमेरिकेतील कृष्णवर्णीय, आशियाई तसेच लॅटिन अमेरिकेतील नागरिकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. आपल्याकडे ‘कम्युनिटी किचन’प्रमाणे अमेरिकेत ‘कम्युनिटी फ्रिज’ ही संकल्पना अशाच गरजूंच्या मदतीसाठी राबविली जाते. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी गरजूंसाठी ज्यांना खाद्यपदार्थांच्या रूपात मदत करायची आहे, ते अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवून देतात. अशाप्रकारे ज्यांच्याकडे जेवणासाठी अ़न्न नाही, ते अगदी फुकट या फ्रिजमधून अन्नाचा आस्वाद घेऊ शकतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अशाच प्रकारे गरजूंच्या मदतीसाठी विविध पातळीवर अभियान राबविले जात असून गरजूंना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ झालेला दिसतो.
 
दुसरीकडे अमेरिकेतील कोरोनासंकट दिवसेंदिवस अधिक तीव्र स्वरूप धारण करताना दिसते. त्यामुळे आगामी काळात अमेरिकेतील उपासमारीची समस्या अधिक भीषण रूप धारण करण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सामाजिक स्तरावर नाही, तर सरकारी पातळीवरही अमेरिकेला या उपाशी जनतेची भूक शमविण्यासाठी व्यापक पातळीवर मोहीम हाती घ्यावी लागेल. अन्यथा, ही समस्या अधिक गंभीर झाल्यास उपासमारीचे रूपांतर भूकबळींमध्ये झाल्यास अनेकांना आपले प्राण गमवावे लागतील. या घटनेतून काय धडा मिळतो? तुम्ही लाख श्रीमंत असाल; पण जोपर्यंत तुम्ही तुमच्याच देशातील जनतेची भूक भागवू शकत नाही, तोपर्यंत त्या पैशाला काही मोल नाही. त्यामुळे महासत्ता म्हणून अमेरिकेने इतर देशांमध्ये ‘बिग ब्रदर’ म्हणून लुडबूड करण्यापेक्षा प्रथम आपल्या देशातील या विदारक परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय शोधावे. युद्धमोहिमांवर अब्जावधी खर्च करून महासत्तेचा माज करण्यापेक्षा आपल्या देशातील प्रत्येक जनतेच्या पोटात अन्नाचा कण कसा जाईल, याविषयी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. तेच जनहिताचे, जनजीवाचे ठरेल.
 
@@AUTHORINFO_V1@@