२०२० हे भारतातील आठवे सर्वात उष्ण वर्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |

temperature _1  


नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो लोकांचा मृत्यू


भारतामध्ये जागतिक तापमान वाढीचा परिणाम दिसत असल्याचा निर्वाळा खुद्द 'भारतीय हवामान विभागा'च्या (आयएमडी) अहवालातून समोर आला आहे. 'आयएमडी'च्या वार्षिक अहवालामधून २०२० हे वर्ष १९०१ पासूनचे आठवे सर्वात उष्ण वर्ष असल्याचे उघड झाले आहे. यावर्षात देशातील भूगर्भावरील वार्षिक सरासरीचे तापमान +०.२९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. यापूर्वी २०१६ (+०.७१ अं.से), २००९ (+०.५५ अं.से), २०१७ (+०.५४१ अं.से), २०१० (+०.५३९ अं.से) आणि २०१५ (+०.४२ अं.से) ही सर्वात उष्ण वर्ष ठरली होती. अलीकडच्या पंधरा वर्षामधील २००६ ते २०२० ही १२ वर्ष उष्ण असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर २०११ ते २०२० हे दशक सर्वात उष्ण दशक ठरले आहे. १९०१ ते २०२० दरम्यान कमाल तापमान वाढीचा कल ०.६२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान वाढीचा कल ०.२४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला आहे. गेल्या वर्षी मार्च आणि जून वगळता सर्व महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा मासिक तापमान उष्ण असल्याचे म्हटले होते. सप्टेंबरमध्ये ०.७१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात जे १९०१ पासून नोंदवलेले सर्वात उष्ण तापमान होते. २०२० वर्षात अम्फान, निवार, गती, निसर्ग आणि बुरेवी या पाच चक्रीवादळांचा तडाखा भारतीय किनारपट्टीला बसला. यामुळे १०० हून अधिक माणसांचा आणि १५ हजाराहून अधिक पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला. याशिवाय पूर, अतिवृष्टी, दरड कोसळणे, थंडी आणि वीज पडल्याने हजारो मृत्यूंची नोंद भारतामधून झाली. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांना बसला. या राज्यांमध्ये थंडी, वादळ आणि वीजपडल्यामुळे ३५० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मान्सून संबधित असलेल्या तीन महत्त्वपूर्ण घटनांमुळे देशात एकूण ६०० हून अधिक लोक मरण पावले. वादळजन्य परिस्थितीमुळे ८१५ लोकांचा जीव गेला. तर थंडीच्या लाटेमुळे देशात १५० हून अधिक लोक दगावले. या सगळ्या घटनांचा आढावा घेतल्यास वातावरण बदलाचा हा परिणाम असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. त्यामुळे आता या बदलांना गांभीर्याने घेऊन पर्यावरणीय धोरण ठरवण्याची वेळ देशासमोर उभी राहिले आहे.

असे का झाले ?

२०२० सालच्या तापमानाच्या या परिस्थितीला पूर्व पॅसिफिकमधील (प्रशांत महासागर) 'ला निना' ही वातावरणीय परिस्थिती कारणीभूत आहे. जेव्हा प्रशांत महासागर आणि त्यावरील वातावरण याच्या सामान्य स्थितीत बदल होतो, तेव्हा या घटना घडत असतात. 'एल निनो' ही घटना प्रशांत महासागराच्या तापमान वाढीशी संबंधित आहे, तर 'ला निना' ही घटना अगदी त्याच्या विरुध्द म्हणजेच या भागातील तापमानात घट होते. दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय पश्चिम किनार्‍यावरील महासागरी प्रदेशातील वातावरण दर काही वर्षांनी उष्ण होते. या असंगत आविष्काराला महासागर विज्ञान आणि हवामानशास्त्रात 'एल निनो' म्हणून ओळखले जाते. पृथ्वीचे वातावरण आणि प्रशांत महासागराच्या उष्णकटिबंधीय भागातील पाणी यांच्यामधील आंतरक्रिया हा एक वातारणीय आविष्कार 'एल निनो'च्या रूपाने घडत असतो. सर्वसाधारणपणे याची सुरुवात एका वर्षाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभी होते व पुढील वर्षातील वसंत ऋतूपर्यंत तो असतो. 'एल निनो'चा परिणाम जगभरातील जलवायुमानावर (हवामानावर) होतो.१९८२-८३ पासून हा आविष्कार अधिक वेळा व अधिक प्रखर होत गेलेला आहे. एल निनोचा हा वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव सुमारे १८ महिने राहतो आणि पुष्कळदा त्याच्यानंतर विरुद्ध प्रकारचाला निना’ (La Nina) हा प्रभाव दिसून येतो. 'ला निना'चा प्रभाव सामान्यपणे डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. विसाव्या शतकात एल निनो २३ वेळा व ला निना १५ वेळा घडून आला होता. जागतिक तापमानामधील 'ला निना'चा प्रभाव हा तापमानात घट होऊन दिसण्यात येतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ग्रीन हाऊसमधील ग्रॅसच्या उत्सर्जनामुळे ग्लोबल वाॅर्मिंग वाढले आहे. याचा परिणाम म्हणजे, भूतकाळातील 'एल निनो' वर्षांच्या तुलनेत 'ला नीना' वर्षे ही खूपच उष्ण तापमानाची ठरत आहेत. देशात मान्सून नंतरच्या काळात तापमानात वाढ होत आहे. २०२० मध्ये मान्सूननंतर तापमानात झालेली वाढ हे प्रतिबिंबित करते.

 
@@AUTHORINFO_V1@@