मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मेगाभरती सुरु झाली आहे. मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची झुंबड उडल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांचेनिवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर गर्दी झाली आहे. पक्षप्रवेशासाठी कृष्णकुंजबाहेर अनेकांनी गर्दी केली आहे.
मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. मराठीसाठी आग्रह असलेल्या मनसेने अॅमेझॉनविरुद्ध मोहीम उघडली. त्यानंतर मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवून मराठीचा आग्रह धरला. राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपचा गड असलेल्या नागपूर जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. गाव पातळीवरुन संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मनसेच्या एन्ट्रीमुळे नेमका कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, याचा फैसला 18 जानेवारीलाच होईल.