‘अलीबाबा’चे जॅक मा दोन महिन्यांपासून गायब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2021
Total Views |

jack ma_1  H x



बीजिंग :
चीनमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत अब्जाधीश आणि अलीबाबा समूहाचे मालक जॅक मा हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. चीनमधील टेक वर्ल्डवर राज्य करणारे जॅक मा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या वादानंतर गेल्या दोन महिन्यांपासून कुठेही दिसले नाहीत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शांघाय येथे झालेल्या भाषणात जॅक मा यांनी चीनच्या 'व्याजखोर' आर्थिक नियामक आणि सरकारी बँकांवर कडक शब्दात टीका केली होती.


उद्योग क्षेत्रात होणाऱ्या बदलांना बळ देण्यासाठी सरकारी सिस्टिममध्ये बदल घडवून आणण्याचे आवाहन जॅक मा यांनी केले होते. तसेच वैश्विक बँकिंग नियमांवरही टीका केली होती. या भाषणातून त्यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर जोरदार टीका त्यांनी. त्यानंतर जॅक मा यांच्यामागे कम्युनिस्ट सरकारने चौकशीचा ससेमिरा लावला. त्यांच्या अँट ग्रुपच्या ३७ अब्ज डॉलरचा आयपीओलाही रद्द करण्यात आले होते. एका वृत्तानुसार थेट जिनपिंग यांच्या आदेशानंतरच अँट ग्रुपचा आयपीओ रद्द करण्यात आला आहे.

पीपल्स बँक ऑफ चायनाने २४ डिसेंबर २०२० रोजी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये आर्थिक नियंत्रण संस्था अलीबाबाच्या Ant Group fintech ची चौकशी करतील. Ant Group ला संबंधित सरकारी संस्थेकडून नोटीसही मिळाली असून अलीबाबा ग्रुपकडून लवकरच अटींची पुर्तता केली जाईल, अशी माहिती मिळते आहे. असं असलं तरी अलीबाबा ग्रुपकडून अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चीनमधील सरकारी माध्यमांनी देखील सरकारच्या या कारवाईच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय. चीनमध्ये आवाज दाबला जाणारा जॅक मा पहिली व्यक्ती नाही. कम्युनिस्ट पार्टी किंवा शी जिनपिंग सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या अनेक लोकांना देशात नजरकैदेत ठेवले आहे. यापूर्वी शी जिनपिंगवर टीका करणारे उद्योगपती रेन झिकियांग बेपत्ता झाले होते. कोरोनाविरूद्ध योग्य पावलं उचलली नसल्याने त्यांनी शी जिनपिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं, यानंतर त्यांना १८ वर्षासाठी तुरूंगात टाकण्यात आले. तर आणखी एक चिनी अब्जाधीश झियान जिआन्हुआ २०१७ पासून नजरकैदेत आहे.

चीनबाहेर जाण्यास मज्जाव

त्यानंतर चीनी सरकारने नाताळच्या दिवशी जॅक मा यांना पुढील आदेश येईपर्यंत चीन सोडण्यास मज्जाव केला होता. अलिबाब समूहाची चौकशी सुरू असल्याने हा मज्जाव करण्यात आला होता. मात्र, त्याआधीपासूनच जॅक मा यांचा कुठेच ठाव ठिकाणा लागत नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.जॅक मा यांनी शेवटचं ट्विटही १० ऑक्टोबर २०१९ रोजी केलं आहे.

@@AUTHORINFO_V1@@