आजचा बांगलादेश उद्याचा पाकिस्तान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2021
Total Views |

Bangladesh_1  H


साधारण ५० वर्षांपासून बांगलादेशाची वाटचाल भाषिक अस्मितेकडून इस्लामी मूलतत्त्ववादाकडेच किंवा आजच्या बांगलादेशचे मार्गक्रमण उद्याच्या पाकिस्तानकडे वेगाने होत असल्याचे दिसून येते. त्याला कारण बांगलादेशात सातत्याने वर्षानुवर्षांपासून अल्पसंख्याक हिंदू धर्मीयांवर होणारे भयंकर-जीवघेणे हल्ले व पोलिसी-प्रशासकीय-सरकारी पातळीवरील दुर्लक्ष होय.
 
 
 
पाकिस्तानी सत्ताधारी आणि लष्कराच्या अन्यायी-अत्याचारी मगरमिठीतून सुटका करून भारताने बांगलादेशी जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिले. इस्लामी एकतेपेक्षा बंगाली अस्मितेच्या आधारावर बांगलादेशी जनतेने तत्पूर्वी पाकिस्तानचा जोरदार विरोध केला. पाकिस्ताननेदेखील पंजाबी मुस्लिमांच्या राजकीय वर्चस्वासाठी इस्लामला फेकून देत बांगलादेशी जनतेकडे बंगाली भाषिकांच्या दृष्टीनेच पाहिले. त्यातूनच निदान बांगलादेश तरी स्वातंत्र्यानंतर इस्लामी कट्टरतेऐवजी लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्यादी मूल्यांचे पालन करेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत होता. पण, तो भ्रमच ठरल्याचे आणि मागील साधारण ५० वर्षांपासून बांगलादेशाची वाटचाल भाषिक अस्मितेकडून इस्लामी मूलतत्त्ववादाकडेच किंवा आजच्या बांगलादेशचे मार्गक्रमण उद्याच्या पाकिस्तानकडे वेगाने होत असल्याचे दिसून येते. त्याला कारण बांगलादेशात सातत्याने वर्षानुवर्षांपासून अल्पसंख्याक हिंदू धर्मीयांवर होणारे भयंकर-जीवघेणे हल्ले व पोलिसी-प्रशासकीय-सरकारी पातळीवरील दुर्लक्ष होय. परिणामी, हिंदूंवर २०१९ सालच्या ३१ हजार ५०५ हल्ल्यांत वाढ होऊन त्यांची संख्या २०२० साली ४० हजार ७०३ हल्ल्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसते.
 
 
नुकतीच ‘जटिया हिंदू महाजोत’ या बांगलादेशातील संघटनेने पत्रकार परिषद घेत २०२० साली देशभरातील हिंदूंवर झालेल्या अन्याय-अत्याचाराची आकडेवारी दिली आणि बांगलादेशात हिंदू पूर्वीपेक्षा अधिकच असुरक्षित होत असल्याचे स्पष्ट झाले. संघटनेचे महासचिव गोबिंद प्रमाणिक यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बांगलादेशात २०२० साली निरनिराळ्या घटनांमध्ये किमान १४९ हिंदूंचा मुस्लीम धर्मांधांनी बळी घेतला, तर सात हजार ३६ हिंदू गंभीर जखमी झाले. धक्कादायक म्हणजे, २०१९ सालच्या आकडेवारीपेक्षा २०२० साली झालेल्या हिंदूंवरील हल्ल्यांची संख्या कित्येक पटीने अधिक आहे. त्या वर्षी एकूण १०८ हिंदूंची बांगलादेशात हत्या करण्यात आली होती, तर ४८४ हिंदू जखमी झाले होते. अर्थात, हिंदूंवरील अन्याय-अत्याचाराची दखल न घेतल्याने, धर्मांध मुस्लीम गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई न केल्याने कट्टरपंथीयांची हिंमत वाढली, त्यांना हिंदूंवर हल्ले करण्यासाठी मोकळे रान मिळाले नि त्यांनी आधीपेक्षाही अधिकाधिक हिंदूंना लक्ष्य केले, असेच दिसते. तथापि, ही फक्त कट्टरपंथीयांच्या हल्ल्याला बळी पडलेल्या व जखमी झालेल्या हिंदूंची संख्या आहे. पण, अन्याय-अत्याचार इथवरच थांबलेला नाही, त्याहीपुढे सुरूच आहे.
 
 
बांगलादेशात हिंदूंच्या अपहरणाच्या, जबरदस्ती धर्मांतराच्या, मुली-महिलांवरील बलात्काराच्या, मंदिरांवरील हल्ल्यांच्या, मूर्तिभंजनाच्या घटना कुठे ना कुठे दररोज होतच असतात. दोन वर्षांतली तुलनात्मक आकडेवारी पाहता, या प्रत्येक गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे व बांगलादेशाची त्याकडे गांभीर्याने पाहण्याची मानसिकताच नसल्याचे दिसून येते. २०२० साली ९४ हिंदूंचे अपहरण केले गेले, तर दोन हजार ६२३ हिंदूंचे सक्तीने धर्मांतर; २०१९ मध्ये हीच संख्या क्रमाने ७६ व १८ इतकी होती. इथे हिंदूंच्या बळजोरीने धर्मांतराच्या घटनांत तब्बल १५० पट वाढ झाल्याचे स्पष्ट होते, तरीही कोणत्याही धर्मनिरपेक्षतेची पोपटपंची करणाऱ्या पुरोगामी, उदारमतवादी, मानवाधिकारवाल्यांनी यावरून तोंडही उघडलेले नाही, सारेच चिडिचूप! २०२० साली ५३ हिंदू मुली-महिलांवर धर्मांधांनी बलात्कार केला, तर ३७० हिंदू मंदिरांतील मूर्तींची तोडफोड केली; २०१९ मध्ये हीच संख्या क्रमाने ४२ व २४६ इतकी होती. हिंदू धर्मस्थळांवरील हल्ल्यांतही वाढच झालेली असून २०२० साली १६३, तर २०१९ मध्ये १५३ धर्मस्थळांवर इस्लामी कट्टरपंथीयांनी हल्ले केले होते.
 
 
दरम्यान, भारत सरकारने गेल्यावर्षी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला व पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या मुस्लीमबहुल देशातील हिंदू अल्पसंख्यकांसह इतर धार्मिक अत्याचारग्रस्तांना नागरिकत्व देण्याचे निश्चित केले. ते किती योग्य होते व आहे, याचा दाखला बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारातून तर मिळतोच, तसेच त्यांना देश सोडावा लागण्याच्या अगतिकतेतूनही मिळतो. २०२० साली बांगलादेशातील दोन हजार १२५ हिंदूंवर जीवाच्या आणि धर्माच्या बचावासाठी हतबलतेने देश सोडण्याची वेळ आली, तर २०१९ मध्ये हीच संख्या ३७९ इतकी होती, म्हणजेच पुन्हा एकदा हिंदूंना पळवून लावण्याच्या प्रकारातही सुमारे सहापटीने वाढ झाली. अशा परिस्थितीत कोणी ‘सीएए’ कायद्याला विरोध करत असेल, तर त्यांच्या मानवी संवेदना मेल्याचेच म्हणावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तान व अफगाणिस्तानातही हिंदूंबाबत असाच प्रकार होतो आणि ९०च्या दशकात काश्मीर खोऱ्यातील हिंदूंबाबतही असाच प्रकार करण्यात आला होता. त्यामुळे आता हिंदूंनी आपल्या धर्मबांधवांच्या सुरक्षेसाठी एक होण्याची, ‘सीएए’ कायद्याचे समर्थन करण्याची, तसेच सरकारला बांगलादेशासमोर तिथल्या हिंदूंच्या दमनाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी बाध्य करण्याची आवश्यकता आहे.
 
 
भारतातील विद्यमान मोदी सरकार त्या दिशेने नक्कीच पावले उचलेल; पण जगात मुस्लीम वा ख्रिश्चनांवर ओरखडा जरी उमटला तरी बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करणारे संयुक्त राष्ट्र, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग, अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोग, अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल व तत्सम संस्था हिंदूंवरील अत्याचाराच्या वेळी कुठल्या बिळात लपून बसलेल्या असतात? या सगळ्यांच्याच मनात मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मावलंबीयांवर हल्ले झाल्यास भावना दाटून येतात, ते कळवळतात. पण, हिंदूंवर हल्ले झाल्यास कोणी बांगलादेश, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानला झापल्याचे दिसत नाही. आंतरराष्ट्रीय माध्यमांचीही याहून निराळी स्थिती नाही, त्यांनादेखील मुस्लीम आणि ख्रिश्चनांवरील अन्यायावेळी कंठ फुटतो नि हिंदूंवरील अत्याचारावेळी त्यांची दातखीळ बसते. इथे मुस्लीम व ख्रिश्चनांवरील हल्ल्यांवेळी अशा सर्वांनी आवाज उठवू नये, असे म्हणणे नाहीच; पण मग हिंदूंच्या वेळेसच या लोकांचा आवाज का बसतो, हा मुद्दा आहे. अशावेळी, तोंडाने सर्वच माणसे समान आहेत, असा धोशा लावायचा; पण प्रत्यक्षात काही माणसे अधिक समान असतात, असे जॉर्ज ऑरवेल यांच्या शब्दांत म्हणावे लागते. ते तसे आहेच आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी हिंदूंना, हिंदुत्ववादी पक्ष-संस्था-संघटनांनाच अन्य देशांतील हिंदूंच्या पाठीशी उभे राहावे लागेल, त्यानंतर निर्माण झालेल्या एकीच्या वज्रमुठीसमोर धर्मांधांचे काही चालणार नाही, तसेच जगही हिंदूंकडे दुर्लक्ष करू शकणार नाही.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@