किनारा तुला पामराला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2021   
Total Views |

Dr Sunita Dharmarav_1&nbs
 
 
 
डॉ. सुनिता धर्मराव, या लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक आणि तितक्याच मेहनती संशोधक. लोकसाहित्याचे संकलन-संशोधन करण्यासाठी त्यांनी अवघे आयुष्य वेचले. त्यांच्या कार्याचा मागोवा...
डॉ. सुनिता धर्मराव यांनी लोककथा आणि लोकसाहित्यासाठी अवघे जीवन वेचले. त्यांचा परिचय पाहू. ‘मराठवाड्याच्या लोककथांमधील स्त्रीचित्रण’ हा विषय घेऊन त्यांनी ‘डॉक्टरेट’ पूर्ण केली. ‘बंजारा जमात - सांस्कृतिक शोध’ आणि ‘गोठला जमात’ असे दोन शोधप्रबंध त्यांनी मोठ्या मेहनतीने पूर्ण केले. तसेच ‘कोल्हाटी स्त्रियांचा सामाजिक व सांस्कृतिक अभ्यास’ यावरही त्यांनी शोधप्रबंध लिहिला आहे. सध्या त्या ‘भारतीय लोककथांमधील स्त्रीचित्रण’ या शोधप्रकल्पामध्ये कार्यरत आहेत. शोधक आणि संशोधक वृत्तीमुळे त्यांनी लोककथेच्या ओव्यांच्या शोधात अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आतापर्यंत त्यांनी दहा हजार लोककथा आणि २५ हजार ओव्या संग्रहित केल्या आहेत. खेडोपाडी जाऊन आयाबायांशी संपर्क करून ही लोकसाहित्याची संपत्ती त्यांनी गोळा केली. त्यांचे शिक्षण आहे एमए (मराठी), एमएड ‘राज्यशास्त्र’, पीएचडी, सेट, साहित्य सुधारक (पदवी-हिंदी). आतापर्यंत त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या पेशाने प्राध्यापिका असून, १२ वर्षे त्या ‘भारतीय सामाजिक विज्ञान व लोकसाहित्य संशोधन संस्था’मध्ये संशोधक म्हणून कार्यरत होत्या, तसेच १४ वर्षे ‘सामाजिक विज्ञान व लोकसाहित्य संशोधन संस्थे’च्या त्या संचालिका होत्या.‘राजमुद्रा प्रा. लि.’ आणि ‘लोकविद्या प्रकाशन’ या दोन संस्थांच्या त्या प्रकाशक आहेत. ‘फोकलोर अ‍ॅण्ड कल्चरल हेरिटेज फाऊंडेशन’ या संस्थेच्या संस्थापक आहेत.
डॉ. सुनिता धर्मराव यांचे वडील कुलभूषण हे मूळचे कर्नाटकचे, जैन समाजाचे. पण, वेदांचा त्यांचा अभ्यास होता. कामानिमित्त ते हिंगोलीला आले. तिथे ‘आर्य समाज’शी संपर्क आला. कुलभूषण हे संस्कृतचे गाढे अभ्यासक, तसेच इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व. ते ‘आर्य समाज’च्या शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांची पत्नी शांताबाई. उभयंताना सहा मुली. त्यापैकी एक सुनिता. ७०च्या दशकातही कुलभूषण यांच्या घरी मुलं संस्कृत आणि इंग्रजी शिकायला येत. गरीब मुलांना विद्या आणि अन्न दोन्हीही धर्मराव यांच्या घरी मिळे. तसे पाहायला गेले तर कुलभूषण यांची परिस्थितीही बेताची. पण, या बेताच्या परिस्थितीमध्ये संस्काराची आणि समाजशीलतेची श्रीमंती होती. कुलभूषण गावात सन्माननीय होते. ते मुलींना सांगत की, “मुलगी म्हणून तुम्ही कधीही स्वतःला अबला समजू नका. मात्र, असे कोणतेही कृत्य करू नका, जे कृत्य तुम्हाला लपवावे लागेल किंवा त्यामुळे तुम्हाला खाली पाहावे लागेल.” या अशा संस्कारांत सुनिता वाढल्या. त्यांना लोकसाहित्याची आवड निर्माण झाली. त्याचेही एक कारण आहे. हिंगोलीमध्ये दसरा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ‘रामलीला’ होते. लहानपणी या रामलीलेमध्ये सुनिता सीतेची भूमिका करत, तर ‘गोपाळकाल्या’ला श्रीकृष्णाची भूमिका करत. त्यावेळी आयाबाया श्रीरामाच्या, श्रीकृष्णाच्या अनेक कथा-ओव्या म्हणत, ज्या कोणत्याही पुस्तकात नसत. या कथांची, या ओव्यांची सुनिता यांना गोडी लागली. तसेच सुनिता यांचे आजोबा शंकरराव हेही लोककथांचे चाहते होते. त्यांचा तर शिरस्ताच होता की, कथा सांगितल्याशिवाय जेवायचे नाही. त्यामुळे सुनिता या अंगाईऐवजी लोककथा ऐकतच झोपी जात. लहानपणापासून अशाप्रकारे लोककथा, लोकसाहित्याची गोडी सुनिता यांच्या मनात निर्माण झाली. बघता बघता सुनिता बारावीला विज्ञान शाखेत शिकू लागल्या. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते.
 
कुलभूषण यांना मधुमेह झाला आणि पायाला गँगरीन झाले. आजारामुळे नऊ महिने ते कामाला जाऊ शकले नाहीत. सगळी सोंग आणता येतात; पण पैशाचे नाही. त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती खूप खालावली. कुलभूषण यांना मधुमेह म्हणून दहा पैशांची मेथीची जुडी विकत घेऊन मीठ आणि पाणी टाकून शिजवून सगळ्यांनी खायची, असे दिवस आले. मग सुनिता यांनी बारावीनंतर ‘डीएड’ला प्रवेश घेतला. त्याचसोबत खासगी शिकवणी घ्यायला सुरुवात केली. ‘डीएड’ संपले आणि नोकरी लागली. घरची परिस्थिती जरा नियंत्रणात आली. नोकरी करता करता त्यांनी ‘एमए’ केले. पुढे विवाह झाला. पती साहेबरावही लोकसाहित्याचे अभ्यास करणारेच. त्यामुळे सुनिता यांच्या आवडीला नव्याने धुमारे फुटले. त्यांनी ‘सेट’ परीक्षा दिली. त्यावेळी मराठवाड्यातून त्या एकट्या ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पतीसोबत लोकसाहित्यात संशोधन सुरू केले. याच काळात गावातील महिलांची स्थितीही त्या पाहत होत्या. नोकरी आणि घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य यंत्रवत झालेले त्यांनी अनुभवले. मग त्यांनी परभणीला ‘पॉझिटिव्ह क्लब’ काढला. त्याद्वारे महिलांना सकारात्मक आत्मविश्वास देण्याचे उपक्रम राबविले, समुपदेशन केले. याच काळात त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला. त्यावर यशस्वी मात केली. काही काळाने २०१८ साली त्यांना ब्रेन ट्युमर झाला. पूर्ण उपचारांती डॉक्टरांनी निदान केले की, ब्रेन ट्युमरच्या शेवटच्या स्टेपच्याही पलीकडची स्टेप असून उपचार करणे अशक्य आहे. सुनिता सहा महिने जगू शकतील. त्यावेळी सुनितांनी ठरवले की, जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत सकारात्मक विचार ठेवायचा. सहा महिने त्यांनी मनाला समजावले की, मृत्यू येईल तेव्हा येईलच. पण, त्यासाठी आताच का रडायचे? ब्रेन ट्युमर असो का आणखी काही. त्याने शरीरात राहायचे की नाही, हे मी ठरवणार. सुनिता म्हणतात की, “आज २०२१ साल आहे. मी ठीक आहे, आजही संशोधनात्मक कार्यात मग्न आहे. लोकसाहित्य आणि लोककथांचा खजिना भला मोठा आहे. त्यातले काही मोती गवसलेत; पण तो अथांग सागर कधी वेचणार? त्यासाठी मी प्रत्येक क्षण कार्यमग्न राहणार आहे. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती किनारा तुला पामराला.’ त्यामुळे मी माझ्या ध्येयासाठी जगत आहे. डॉ. सुनिता यांच्यासारख्या ध्येयनिष्ठांपुढे सगळेच शब्द निःशब्द होतात.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@