बुंद से गयी वो हौदसे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2021   
Total Views |

UT_1  H x W: 0




मुंबईतील लोकल सेवा सुरू होणार, अशी महाविकास आघाडी सरकाने घोषणा केली. ही घोषणा ऐकून शहरातील तमाम मजूर आणि कामगारांना वाटले ‘आजी सोनियाचा दिनू.’ पण छे! या लोकल धावण्याच्या वेळा ऐकून त्यांना हसावं का रडावं हेच कळेना! पहिली लोकल ते सकाळी ७, नंतर पुन्हा दुपारी १२ ते ४ आणि त्यानंतर रात्री ९ नंतर शेवटची लोकल. ‘व्वा काय वेळ आहे?’ या वेळेमध्ये मुंबईचे कोणते कार्यालय उघडते किंवा बंद होते? मुंबईतली ६० टक्के जनता नोकरी करते, मोलमजुरी करते, हे सत्य आहे. काही महिन्यांपूर्वीच मॉल, सुपर मार्केट आणि इंडस्ट्रीअल इस्टेट आदी आस्थापने सुरू झाली. त्यावेळी फक्त बस सुरू होत्या. ही ६० टक्के जनता अगदी एकमेकांचे श्वास ऐकू जातील, अशा गर्दीतून प्रवास करत होती. या बसचे मुख्य थांबे द्रुतगती मार्गावर. त्यामुळे या हातावरती पोट असलेल्या जनतेला द्रुतगती मार्गाहून एक-एक तास दूर असलेल्या कामाच्या ठिकाणी चालत जावे लागे. त्यावेळीही महाविकास आघाडी सरकारला या गरीब पिचलेल्या जनतेची दया आली नाही. कोरोनाचे कारण सांगत तेव्हाही लोकल सुरू केली नाही. आताही या सत्ताधारी सरकारने लोकलची वेळ अशी ठेवली की, ज्या वेळेत सामान्य कामगार, मजूर या लोकलचा उपयोग करूच शकत नाही. यावर बहुसंख्य मुंबईकर म्हणत आहेत की, “राज्य सरकारला बसचा तोटा भरून तिजोरीत पैशांचा छनछनाट हवा होता. त्याचवेळी ट्रेन ही केंद्र सरकारच्या अखत्यारित. त्यामुळे केंद्र सरकारचे नुकसान व्हावे, लोकांनी ट्रेन का सुरू करत नाही, म्हणून केंद्र सरकारला धारेवर धरावे, असा राज्य सरकारचा कावा आहे. त्यामुळे लोकल सुरू करत नाहीत.” काही लोक म्हणतात की, ”आमच्या ‘बेस्ट सीएम’ साहेबांनी कोरोनाशी संवाद साधला होता. (आठवा ते, कोरोनाचे दिवस जेव्हा सीएम साहेबांनी कोरोनाला धमकी दिली होती की, तू जा!) त्यामुळे कोरोनाची वेळ सत्ताधार्‍यांना माहीत आहे. कोरोना ज्या वेळेत लोकलमध्ये येणार नाही, त्याचवेळेत सर्वसामान्यांना प्रवास करण्याची मुभा सरकारने दिली आहे.” काही लोक म्हणतात की, ”कोरोना काळात आणि त्यानंतरही या राज्य सरकारचे पितळ उघडे पडले. आता कितीही सारवासारव केली तरी ‘बुंद से गयी वो हौदसे नही आती.”
 

रा. स्व. संघ आणि प्रकाशबापू

 
तरी म्हटले की, शेतकरी आंदोलनात प्रकाश आंबेडकरांनी तोंड कसे उघडले नाही. त्याचे असे झाले ‘फेक’ शेतकरी आंदोलनात राष्ट्रध्वजाचा अपमान झाला. सगळ्या देशाने ते पाहिले. शेतकर्‍यांच्या रूपात जे कोणी उन्मत्त आणि देशाशी विद्रोह करणारे लोक होते, त्यांचे हिडीस रूपही जनतेने पाहिले. त्यामुळे या आंदोलनाला अन्नदात्याचे आंदोलन म्हणत समर्थन करणार्‍या कोट्यवधी भारतीयांनी या घटनेमुळे आंदोलनाचा निषेध केला. या घटनेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दुर्दैवी घटना असे म्हटले. अर्थात राष्ट्रपतींनी जे म्हटले तेच प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि मुखात होते. पण यावर प्रकाशबापूंनी काय म्हणावे? तर त्यांनी आता म्हणे राष्ट्रपतींना प्रश्न विचारला की, १५ ऑगस्ट, १९४७ ला रा. स्व. संघाने काळा दिवस साजरा केला होता. त्याचे काय? आता घटना काय? त्यावर बोलले कोण? आणि प्रकाशबापूंनी रा. स्व. संघाची उठाठेव केली..अर्थात, रा. स्व. संघाची पुण्याई इतकी मोठी आहे की, संघाचे नाव घेऊन काही लोक स्वत:चे नेतेपद शाबूत ठेवत आहेत. त्यापैकी एक प्रकाशबापू. प्रकाशबापू यांना समाज मानतो. कारण, एकच आहे की, ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदार घरात जन्माला आले. त्यापुढे त्यांनी देशहिताचा किंवा देशकल्याणाचा कोणता वारसा चालवला, याबाबत संशोधनच करायला हवे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय’ म्हणत देशाच्या एकतेसाठी विकासासाठी अतुलनीय कार्य केले. पण दुर्दैव की, त्यांच्या पश्चात त्यांचा वारसा चालवणारे कुणीही नाही. विषयांतर झाले. प्रकाशबापू यांनी रा. स्व. संघ आणि १५ ऑगस्ट, १९४७ या दिवसाबद्दल उद्गार काढले. एकच वाटते की, देशाची फाळणी केली गेली. असंख्य हिंदूंच्या कत्तली झाल्या. स्वातंत्र्य असे रक्तबंबाळ होताना दिसले. तत्कालीन सर्वच नेत्यांच्या (सत्तालोभ असणारे नेते सोडून) मनात दु:ख होतेच. स्वतंत्र झालो, पण भारताचे तुकडे करून. त्यामुळे दु:खाने कुणाही देशभक्ताची अभिव्यक्ती अशीच असावी. असो, पण देश तुटण्याचे दु:ख सगळ्यांनाच होते असे नाही. सध्या प्रकाशबापूंना जे घेरून आहेत, त्या टोळक्याला तर देशाचे वावडेच आहे. देश अस्थिर करणार्‍या घटनेमध्ये हे टोळके लुडबूड करते. या पार्श्वभूमीवर प्रकाशबापू रा. स्व. संघावरच टीका करणार. यात नवल ते काय?


@@AUTHORINFO_V1@@