टोचलेली ‘भाजपची लस’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2021
Total Views |

Akhilesh Yadav_1 &nb
 
 
नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या कठोर परिश्रमाने योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते समाजवादी पक्ष आणि काँग्रेसी नेतृत्वाला २०१७ साली ‘भाजपची लस’ अशी काही टोचली गेली की, या पक्ष-नेत्यांचा ठिकठिकाणी पसरलेला भ्रष्टाचाराचा, गुंडगिरीचा, अराजकाचा पाया ढासळला-कोसळला आणि येत्या २०२२ मध्येही सपा, काँग्रेसला भाजपची ही लस टोचेलच, त्यासाठी त्यांनी फक्त सज्ज राहावे.
 
 
 
अवघ्या जगात हाहाकार माजवून भारतातही फैलावलेल्या कोरोना विषाणूवर लवकरात लवकर लस येण्याची सर्वचजण प्रतीक्षा करत असताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी त्यावरुन राजकीय नौटंकीला सुरुवात केली. “मी सध्या तरी कोरोनावरील लस टोचवून घेणार नाही. मी भाजपच्या लसीवर कसा विश्वास ठेवू शकतो? ज्यावेळी आमचे सरकार सत्तेवर येईल, त्यावेळी सर्वांना मोफत कोरोनारोधी लस मिळेल,” असे अतिशय खुजे विधान ‘ऑस्ट्रेलिया रिटर्न’ उच्चविद्याविभूषित असलेल्या अखिलेश यांनी केले. आपल्या मालकाने लसीला विरोध केला म्हटल्यावर गुलामांनीही वरच्या मजल्याचा वापर सोडून देऊन चार पावले पुढे टाकायलाच हवीत, या न्यायाने समाजवादी पक्षाचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी तर आणखी कहर केला. “भाजपवाले नंतर म्हणतील की आम्ही लोकसंख्या नियंत्रणासाठी व लोकांना नपुंसक करण्यासाठी लस टोचली. सपा नेतृत्वाने तथ्यांच्या आधारानेच विधान केले असेल, आम्हाला वाटते की, त्या लसीमध्ये अशी एखादी वस्तू असेल, ज्याने नुकसान व्हावे,” असे ते म्हणाले.
 
 
अर्थात, मागील नऊ महिन्यांपासून कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लस तयार करणार्‍या शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या मेहनतीवर आपल्या हलकट राजकारणासाठी पाणी फेरण्याचे काम अखिलेश यादव आणि आशुतोष सिन्हा यांनी करुन दाखवले. हास्यास्पद बाब म्हणजे अखिलेश यादव यांच्या बरळण्याची पाठराखण केली ती उत्तर प्रदेशची सत्ता हस्तगत करण्यासाठी एकत्र येऊन नंतर काडीमोड घेतलेल्या काँग्रेसने! काँग्रेस नेते राशिद अल्वी म्हणाले की, “केंद्र सरकार ‘सीबीआय’, ‘ईडी’, ‘आयबी’, ‘आयकर विभागा’चा वापर विरोधी पक्षांविरोधात करु शकते. अशावेळी अखिलेश यादव यांच्या लसीविषयीच्या विधानाकडे आम्ही कानाडोळा कसा करणार!” एकूणच कोरोनासारख्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी एका विदेशी आणि दोन स्वदेशी लसींच्या वापराची परवानगी मिळालेली असताना त्यावरुन भारतीय राजनेते मात्र अतिशय क्षुद्र दर्जाचे राजकारण करण्यातच मश्गुल असल्याचे दिसते. मात्र, यातून राजनेत्यांचे राजकारण होत असले तरी सर्वसामान्य जनतेमध्ये अफवा आणि अस्थिरता, भीती पसरायला वेळ लागणार नाही व त्यानंतर निर्माण होणार्‍या परिस्थितीचे गुन्हेगार अखिलेश यादव यांच्यासारखे स्वार्थांध आणि मोदीद्वेष्टे लोकच असतील.
 
 
वस्तुतः देश-विदेशातील मनुष्यरक्षणासाठी व स्वदेशी कोरोनारोधी लस प्रत्यक्षात येण्यासाठी कित्येक महिन्यांपासून भारतीय शास्त्रज्ञ, संशोधक प्रयत्नरत होते व परदेशातील अनेक तज्ज्ञ त्यांच्या संपर्कात होते. तसेच अनेक औषध कंपन्या भारतीय कंपन्यांच्या संपर्कात होत्या आणि त्या सर्वांच्या एकत्रित प्रयासाने भारताची लस तयार झाली. भारत सरकारनेदेखील आरोग्यविषयक उच्चस्तरीय अधिकारी, समितीशी विचार-विनिमय, चर्चा करुनच या लसींच्या वापराला मंजुरी दिली. अशात अखिलेश यादव यांनी त्या लसीचा संबंध भाजपशी जोडण्यातून त्यांना विशिष्ट समुदाय-अल्पसंख्याक समाज किंवा थेट मुस्लिमांनाच खुश करायचे आहे का? हा प्रश्न उभा राहतो. कारण, लसीला ‘भाजप’चे नाव देण्यामागे आणि आपले सरकार सत्तेवर आणण्याची आशा दाखवण्यामागे तुष्टीकरणाशिवाय दुसरा कोणता मुद्दा असू शकेल? मात्र, याचा दुष्परिणाम कोरोनाप्रसार आणि रुग्णसंख्या वाढीवरही होऊ शकतो, याचा विचार अखिलेश यादव यांनी केला पाहिजे.
 
 
उल्लेखनीय म्हणजे, अशाच प्रकारे पोलिओच्या दोन थेंबांबाबतही देशातील अल्पसंख्याक समुदायात नपुंसकतेचा भ्रम पसरवण्यात आला होता. त्यामुळेच भारताला पोलिओमुक्त होण्यासाठी अन्य देशांहून अधिक वेळ लागला, ही बाब लक्षात घेण्यासारखी. अखिलेश यादव, आशुतोष सिन्हा, राशिद अल्वी या समाजवादी आणि काँग्रेसी नेत्यांच्या विधानांतून तसाच प्रकार पुन्हा एकदा सुरु झाल्याचे दिसून येते. खरे म्हणजे संकटप्रसंगी राजकारण बाजूला ठेवून, आपल्यातील मतभेद विसरुन आपत्तीचा सामना करण्याचा बाणा विरोधी पक्षीयांनीही दाखवायला हवा होता. पण ते त्यांना या जन्मात तरी शक्य नाही, असे दिसते. मात्र, कोरोनारोधी लसीच्या लसीकरण कार्यक्रमाआधीच तिच्यावर प्रश्नचिन्ह लावून, विरोधाचे सूर आळवून, तिला भाजपची लस म्हणून अखिलेश यादव, समाजवादी पक्ष किंवा काँग्रेस नेते नेमके काय साध्य करु इच्छितात, हा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो. तसेच भारतीय जनता कोरोनामुक्त होऊ नये, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढावी, त्यातून अनेकांचा मृत्यू व्हावा, जेणेकरुन देशाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला म्हणजे भाजप नेत्यांना अपयशी ठरवता येईल, असा सपा आणि काँग्रेसींचा मनसुबा आहे का, असेही विचारावेसे वाटते.
 
 
दरम्यान, अखिलेश यादव यांनी दिलेले ‘भाजपची लस’ हे नाव योग्यच आहे, फक्त ती त्यांना २०१७ सालीच टोचली गेली नि येत्या २०२२ सालीही त्यांना ‘भाजपची लस’ टोचली जाणारच! उत्तर प्रदेशची जनता समजूतदार आहे, म्हणूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव, राहुल गांधी यांच्यासारख्या कर्तृत्वशून्य नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम तिने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विद्यमान गृहमंत्री अमित शाह यांच्या कठोर परिश्रमाने आणि योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते समाजवादी पक्ष आणि काँग्रेसी नेतृत्वाला ‘भाजपची लस’ अशी काही टोचली गेली की, या पक्ष-नेत्यांचा ठिकठिकाणी पसरलेला भ्रष्टाचाराचा, गुंडगिरीचा, अराजकाचा पाया ढासळला-कोसळला. त्या लस टोचणीतून सावरण्याचे भानही त्या पक्षांना राहिले नाही नि आपल्या पडझडीच्या दुःखावेगाने बेभान, बेफाट, बेछुट झालेल्यांना आताची कोरोना लसही ‘भाजपची लस’ वाटते. तरीही अखिलेश यादव यांनी काळजी करु नये, 2017 साली जशी त्यांना ‘भाजपची लस’ टोचली, तशीच येत्या दोन वर्षांतही पुन्हा एकदा टोचली जाईलच, तेव्हा त्यांनी पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच घ्यावा नि त्यांच्या मागे-पुढे हांजी हांजी करणार्‍यांनी या लसीमुळे कशा कशावर ‘नियंत्रण’ आले, याची यादी तयार करावी. पण, भाजपची ही लस टोचून घेण्यासाठी अखिलेश यादव व त्यांच्या पाठीराख्यांनीही आधी कोरोनारोधी अस्सल स्वदेशी लस टोचून घेऊन निरोगी, स्वस्थ राहिले पाहिजे, इतकेच.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@