नवी दिल्ली : सर्वोच्च अशा अशोकचक्र पुरस्कार सन्मानित मोहित शर्मा यांची गौरव गाथा आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्यांच्या शौर्यगाथेचे स्मरण या निमित्त पुन्हा एकदा देशवासीयांना होणार आहे. मेजर मोहित शर्मा २००४ मध्ये एका कामगिरीदरम्यान 'हिजबूल मुजहिद्दीन' या दहशतवादी संघटनेत 'इफ्तिखार खान' या नावाने घुसतात. त्यांच्या याच नावावरुन या सिनेमाचे शीर्षक प्रेरीत आहे.
मेजर मोहित शर्मा ११ डिसेंबर १९९९ या दिवशी 'इंडियन मिलिटरी अकॅडमी'तून उत्तीर्ण झाले. कर्तव्यावर हजर झाल्यावर पहिल्यांदाच त्यांची नेमणूक हैदराबाद येथे झाली. तिथून ते काश्मीर ३८ राष्ट्रीय रायफल्समध्ये दाखल झाले. २००१ मध्ये 'पॅरा स्पेशल फोर्स' सेवेत असताना एका विशेष मोहिमेवर असताना शर्मा यांनी आपली खरी ओळख लपवली. एक दहशतवादी म्हणून दहशतवाद्यांशी मैत्री केली. भारतीय सुरक्षादलाने आपल्या भावाचा खात्मा करण्यात केल्याचे सांगत ते या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर घुसले.
स्वतःचे नाव इफ्तिखार भट असल्याचं त्यांनी दहशतवाद्यांना सांगितले. हिजबूल मुजाहिद्दीनच्या अबू तोरारा आणि अबू सबजार यांच्याशी मोहित यांनी जवळीक वाढवत विश्वास संपादन केला. जोखमीच्या या कामात त्यांनी आपल्या मोहिमेचा पत्ता कुणालाही लागू दिला नाही. शोपियामध्ये ते या दहशतवाद्यांसोबतच राहत होते. संधी मिळताच मोहित शर्मा यांनी या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.
२१ मार्च २००९ या दिवशी कुपवाडामध्ये एका मोहिमेवर असताना 'ब्राव्हो असॉल्ट' या पथकाचे नेतृत्व करताना मेजर मोहित शर्मा हुतात्मा झाले. २६ जानेवारी २०२० रोजी त्यांना देशाचा मरणोत्तर दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार अशोकचक्र प्रदान करण्यात आला. त्यांची हीच गौरवगाथा आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.