रक्तपिपासूंचा मेळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2021   
Total Views |

Andolan_1  H x
 
 
 
योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासारख्या ‘प्रोफेशनल अराजकतावाद्यां’ची कार्यपद्धती समजून घेणे गरजेचे आहे. अतिशय थंड डोक्याने आणि आक्रमक भाषा न वापरता अराजकाची, रक्तपाताची योजना आखण्याचे काम योगेंद्र यादव सध्या करीत असतात. आताही दिल्लीत एवढी मोठी दंगल घडवूनही त्याचे निर्लज्ज समर्थन यादव करत आहेत.
 
"दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली अगदी यशस्वीपणे पार पडली आहे. जर त्यात कोणती घटना घडली असेल, तर त्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. लाल किल्ल्यावर कोणी पोहोचते आणि पोलीस एक गोळीही चालवत नाहीत. शेतकरी संघटनांना बदनाम करण्याची ही चाल होती.” ‘भारतीय किसान युनियन’चे सर्वेसर्वा राकेश टिकैत यांचे हे वक्तव्य आहे. विशेष म्हणजे, हे वक्तव्य करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक खिन्नता होती. आता जनतेला वाटू शकेल की, प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये जी दंगल उसळली, त्यामुळे पश्चाताप होऊन त्यांच्या चेहऱ्यावर खिन्नता आली असावी. मात्र, पोलिसांनी गोळी चालवली नाही, त्यामुळे एकही आंदोलक जखमी झाला नाही किंवा ठार झाला नाही. त्यामुळे कथित शेतकरी आंदोलनाला आणखी विकृत स्वरूप देऊन देशाच्या राजधानीत हिंसेचा आगडोंब उसळविण्याचा आमचा मनसुबा फसला, यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर खिन्नता होती.
 
संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करीत होता, राजपथावरील शानदार संचलनामध्ये देशाचा सांस्कृतिक आणि शौर्याचा वारसा बघत होता. त्याच वेळी देशाची राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या नावाखाली एकत्र आलेले अराजकतावादी रक्तपात घडविण्यासाठी सज्ज झाले होते. विशेष म्हणजे, प्रजासत्ताक दिनी रक्तपात घडविण्यासाठीच गेले ६२ दिवस ही मंडळी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाचे नाटक करीत बसली होती, असादेखील संशय आता व्यक्त करण्यात येत आहे, तर केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी या मंडळींनी २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्याचे ठरविले. त्याला पोलीस प्रशासनाने व्यवस्थित परवानगी दिली. मात्र, त्यासाठीचा मार्ग ठरवून दिला आणि काही अटी-शर्तीही सांगितल्या. मात्र, २६ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजल्यापासूनच ट्रॅक्टर दिल्लीच्या दिशेने घुसविण्यास सुरुवात करण्यात आली. म्हणजे एकीकडे राजपथावर भारतीय प्रजासत्ताकाचा गौरवदिन साजरा होत होता आणि दुसरीकडे अराजकतावादी हिंसाचारासाठी सज्ज होत होते. दुपारी १२ वाजेपर्यंत ही मंडळी आयटीओ, प्रगती मैदान, इंडिया गेट या परिसरामध्ये धडकली. आयटीओ परिसरात ट्रॅक्टरचे स्टंट करण्यात आले. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न झाला, पोलिसांवर तलवारींनी हल्ला करण्यात आला, महिला पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. एवढे करूनही अराजकतावाद्यांचे समाधान झाले नाही, त्यामुळे ते लाल किल्ल्यावर चालून गेले. लाल किल्ल्यावर तोडफोड, पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणे, हे प्रकार झाले. धक्कादायक म्हणजे तेथे राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आला आणि खालसा पंथाचा केशरी, तसेच खलिस्तानसदृश पिवळा ध्वज फडकविण्यात आला.
 
मात्र, एवढे सर्व होत असताना पोलिसांनी गोळीबार तर दूरच, पण अगदीच सौम्य लाठीमार केल्याचेही दिसले नाही. त्यामुळे खरे तर देशातील बहुसंख्य नागरिकांची केंद्र सरकारविषयी नाराजी आहे. काही प्रमाणात ती नाराजी रास्तही आहे. कारण, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे खमके नेते आहेत. ‘कलम ३७०’ संपुष्टात आणणे, ‘तिहेरी तलाकबंदी’चा कायदा करणे, ‘सुधारित नागरिकत्व कायदा’ करणे, असे महत्त्वाचे विषय त्यांनी अगदी लीलया हाताळले. मात्र, तरीदेखील सलग दुसऱ्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या वेळी देशाच्या राजधानीत दंगल व्हावी, हे नक्कीच संतापजनक आहे. कारण, प्रजासत्ताक दिनी दंगल घडविली जाणार हे सर्वसामान्य नागरिकालाही समजत होते, ते देशाच्या नेतृत्वाला आणि गुप्तचर यंत्रणांना कळणार नाही, असे समजणे हास्यास्पद आहे. त्यामुळे अनेकांचा त्याविषयी राग असणे, तक्रार असणे, काही चुकीचे नाही. त्याविषयी जनतेला कसे उत्तर द्यायचे, हे सरकार ठरवेलच. कारण, अशा दंगली घडून गेल्यानंतर कारवाई करणे हे निश्चितच पश्चातबुद्धीचे असते. कारण, त्यामुळे दरवर्षी असे एक हिंसक आंदोलन आणि मग वर्षभर त्याचे गुर्‍हाळ मांडणे, असा पायंडा पडण्याची भीती आहे.
 
मात्र, एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. आयटीओ परिसरात ट्रॅक्टरचा स्टंट करताना एका कथित शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याचा मृत्यू हा ‘पोलिसांच्या गोळीबारात’, ‘डोक्यात गोळी लागून’ झाल्याची अफवा काही सेकंदात पसरली. एका नामवंत ज्येष्ठ पत्रकाराने तर ऑनकॅमेरा डोक्यातच गोळी लागली, असे खात्रीपूर्वक सांगितले. त्यानंतर मग आयटीओ परिसरात त्या कथित शेतकऱ्याचा मृतदेह मांडीवर घेऊन दंगलखोरांनी ठाण मांडले. केंद्र सरकारने माफी मागितल्याशिवाय आम्ही हलणार नाही, असा त्यांचा पवित्रा होता. मात्र, काही तासांतच दिल्ली पोलिसांनी त्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले आणि आंदोलकांच्या दाव्यातली हवाच निघाली. आता कल्पना करा की, पोलिसांनी जर लाठीमार अथवा हवेत गोळीबार केला असता, तर आंदोलकांनी काही मिनिटांतच दिल्ली पेटवली असती. मग देशी आणि परदेशी वर्तमानपत्रांनी भारतात अराजकता, मोदी सरकारची फॅसिस्टशाही, बळीराजाचे रक्त पिणारे सरकार, भारतात हिटलरशाही, अशा मथळ्यांनी रकानेच्या रकाने भरून बातम्या दिल्या असत्या. त्याचा परिणाम किती भयानक झाला असता, याची कल्पनाच करता येऊ शकते. मात्र, सरकारने असे काहीही केले नाही आणि त्यामुळे अराजकतावाद्यांचा डाव फसला आणि त्याची खंत राकेश टिकैत यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाली आहेच. त्यामुळे ३०३ जागांचे भक्कम बहुमत असलेल्या सरकारने काहीच केले नाही, असा आरोप करताना या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.
 
आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासारख्या ‘प्रोफेशनल अराजकतावाद्यां’चा. योगेंद्र यादव तर या संपूर्ण कथित शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व पहिल्या दिवसापासून करीत आहेत. सरकारसोबत चर्चेतही आंदोलकांचे नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, सरकारने त्यांना त्यापासून दूरच ठेवले. एक महत्त्वाची बाब म्हणजे, गतवर्षी जो शाहीनबागेचा तमाशा उभा करण्यात आला होता, त्यातही योगेंद्र यादव यांची प्रमुख भूमिका होती, त्यापूर्वी ‘जेएनयु’ प्रकरणातही योगेंद्र यादव यांची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे अतिशय थंड डोक्याने आणि आक्रमक भाषा न वापरता अराजकाची, रक्तपाताची योजना आखण्याचे काम योगेंद्र यादव सध्या करीत असतात. त्यासाठी घटनातज्ज्ञ, निवडणूकतज्ज्ञ, राजकीय विश्लेषक, अभ्यासक असे मुखवटे ते वेळोवेळी घालत असतात. आताही दिल्लीत एवढी मोठी दंगल घडवूनही त्याचे निर्लज्ज समर्थन यादव करत आहेत. मेधा पाटकरांचेही तसेच. देशात काहीही झाले की, पळत पळत यायचे आणि आंदोलनाला बसायचे, ही त्यांची सवय. त्यातच देशात मोदी सरकार आल्यापासून आणि त्या सरकारने परदेशी निधीला चाप लावल्यापासून मेधा पाटकर आणि समविचारी मंडळी अगदीच सैरभैर झाली आहेत. त्यामुळे दिल्लीत जे काही घडले ती जबाबदारी मेधा पाटकर, योगेंद्र यादव, राकेश टिकैत, दर्शनपाल, हनन मुल्ला यांसह ४० कथित शेतकरी नेत्यांचीच आहे.
 
अर्थात, यादव-पाटकर मंडळींवर आता पोलीस काय ती कारवाई करतीलच. मात्र, या रक्तपिपासू मंडळींची कार्यपद्धती समजून घेणे गरजेचे आहे. कारण, हिंसा करण्यासाठी दरवेळी हातात तलवारीच घेतल्या पाहिजे, असे नसते, तर प्रत्येक कृतीतूनही हिंसा भडकविता येते. त्यासाठी ही मंडळी काय लिहितात, एखादा विशिष्ट मुद्दा कशा पद्धतीने मांडतात, यांची अफवा पसरविण्याची शैली कशी असते, यांचा सखोल अभ्यास ज्याप्रमाणे सुरक्षा यंत्रणा करतात, त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनी करण्याची गरज आहे. कारण, ही मंडळी अगदी शांत, संयतपणे बोलतात आणि त्याचे फार कौतुक सर्वसामान्यांना असते आणि त्यामुळे या रक्तपिपासू टोळीचे फावते. त्याचप्रमाणे आता पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात पुन्हा एखादी दंगल होऊ नये, यासाठी सरकारनेही योग्य ती कारवाई वेळीच करावी. कारण, आता सलग दोन वर्षी झालेल्या दंगलींमुळे या अराजकतावाद्यांची कार्यशैली आता सरकारला व्यवस्थित समजली आहे. त्यामुळे या मंडळींचा खरा चेहरा समजण्यासाठीच सरकार शांत बसले, हा युक्तिवाद जनताही यापुढे स्वीकारणार नाही.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@