'व्यवस्थापनशास्त्र' विषयातील अभ्यासक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून विद्यार्थ्यांना अस्थिर वा अनिश्चित व्यावसायिक स्थितीची जाणीव व्याख्यान-चर्चा वा कृतिगटाच्या माध्यमातून करून दिली जाते. या शैक्षणिक अभ्यास प्रयत्नांमध्ये कोरोनामुळे व त्यानंतर मूलभूत व मोठे परिवर्तन झालेले दिसून येते.
गेल्या दशकात जागतिक स्तरावरील व्यवस्थापन शैली व कार्यपद्धतीमध्ये 'VUCA' म्हणजे ' Volatile, Uncertain, Complex & Ambiguous' व्यवसाय स्थितीवर बरीच चर्चा झाली आहे. या चर्चेचा मुख्य रोख हा व्यावसायिक स्तरावरील स्पर्धा-आव्हानपर परिस्थितीप्रसंगी अनपेक्षित संकटस्थिती व त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी कशी आणि कशाप्रकारची व्यवस्थापन आणि व्यवस्थापकीय धोरण राबविले जाणे आवश्यक असू शकते, यावर आहे. कोरोनाकाळाने उद्योग-व्यवसाय क्षेत्रात खऱ्या अर्थाने गंभीर स्वरूपातील अकल्पित, अस्थिर, गंभीर व अनाकलनीय स्थिती कशाप्रकारे उद्भवू शकते, याचा वस्तुपाठच जगभरातील व्यवस्थापकांना घालून दिला आहे. या अस्थिर व आव्हानपर स्थितीवर शासन-प्रशासन, वैद्यकशास्त्र व सेवाक्षेत्रापासून व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांनी मोठ्या निर्धाराने मात केली. यातही भारताने घेतलेली आघाडी व प्रसंगी इतर देशांना केलेली मदत-मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. आरोग्यासह आर्थिक-औद्योगिक क्षेत्राने आपले यशस्वी कर्तृत्वही यानिमित्ताने सिद्ध केले. हे करण्यासाठी प्रशासनिक अधिकाऱ्यांप्रमाणेच व्यवस्थापकांचाही कस लागला व हे साध्य करताना आपल्या व्यवस्थापकांनी व्यवस्थापन शिक्षण संस्था आणि या संस्थांमधील आजचे विद्यार्थी व उद्याच्या व्यवस्थापकांपुढे यशस्वी व्यवस्थापननीतीचे जे उदाहरण प्रस्तुत केले आहे. ते निश्चितच दीर्घकालीन स्वरूपात मार्गदर्शक ठरणारे असे म्हणावे लागेल.
कोरोनामुळे संपूर्ण जनजीवनासह उद्योगविश्वावर व्यापक परिणाम झाले. त्यामध्ये आर्थिक नुकसान, व्यावसायिक हतबलता, व्यवसायातील मोठे बदल, कर्मचाऱ्यांची बेकारी, स्थलांतर व त्यानिमित्त झालेले आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक बदल या दूरगामी परिणामांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यासंदर्भातील एक समान, शैक्षणिक सूत्र म्हणजे व्यक्ती असो, अथवा व्यावसायिक संस्था, अकल्पित व व्यापक प्रकारची आर्थिक संकटे, ही बाब व्यक्ती व व्यावसायिक या उभयतांसाठी अपरिहार्य ठरणार आहे. हा मुद्दा व्यवस्थापन क्षेत्रासाठी केवळ जिव्हाळ्याचाच नव्हे, तर विशेषप्रसंगी जीवन-मरणाचा पण ठरू शकतो व त्यादृष्टीने त्यांनी आपली पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. यानुसार व्यवस्थापक आणि व्यवस्थापनाने आपली व्यवस्थापननीती ठरविणे यापुढे अपरिहार्य ठरणार आहे. याची सुरुवात व्यवस्थापन शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांपासून केल्यास ते नजीकच्या काळात व दीर्घकालीन स्वरूपात फायदेशीर ठरू शकते, हे विशेष.
'व्यवस्थापनशास्त्र' विषयाचा अभ्यासक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून त्यांना अस्थिर वा अनिश्चित व्यावसायिक स्थितीची जाणीव व्याख्यान-चर्चा वा कृतिगटाच्या माध्यमातून करून दिली जाते. या शैक्षणिक अभ्यास प्रयत्नांमध्ये कोरोनामुळे व त्यानंतर मूलभूत व मोठे परिवर्तन झालेले दिसून येते. यासंदर्भात अनुभवावर आधारित मतप्रदर्शन करताना दिल्लीच्या 'फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज'चे मार्गदर्शक प्रो. व्यंकटरमण यांनी नमूद केल्यानुसार 'कोविड-१९' नंतरच्या पडझडीपासून प्रयत्नांपर्यंतच्या सर्व बाबींनी सर्वांनाच धडा मिळाला. त्यांच्या मते, यातून व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रही सुटलेले नाही. प्रो. व्यंकटरमण तर पुढे असेही नमूद करतात की, या धड्यातून 'व्यवस्थापन' विषयातील मार्गदर्शक यांनी वेळेत निरीक्षण-आकलन करून कोरोनावर नियंत्रण वा मात देण्यासाठी शासन-प्रशासन, व्यवस्थापन, सेवाक्षेत्र, यामध्ये केले गेलेले नियोजन-नियंत्रण, दिशादर्शन-मार्गदर्शन, नेतृत्व-प्रशिक्षण इत्यादीचा अल्पावधीत व नेमका अभ्यास करून, त्याचा अंतर्भाव आपल्या आभासी स्वरूपातील मार्गदर्शक सत्रांमध्ये केला व त्याचे अपेक्षित व सकारात्मक परिणामही दिसून यायला लागले आहेत.
'मानव संसाधन विकास व मानवी आरोग्यशास्त्र' या विषयातील विशेष अभ्यासक म्हणून नावाजलेल्या प्रा. व्यंकटरमण यांच्या अभ्यासपूर्ण अनुभवांनुसार, कोरोनाकाळात व्यवस्थापन आणि व्यवस्थापक या उभयतांची निर्णय, निर्णयक्षमता व त्यांची वेळेत व यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात मोठीच कसोटी लागली. यामध्ये प्रामुख्याने व व्यावसायिक संदर्भातील निगडित व महत्त्वाच्या अशा व्यवसायात निर्माण झालेली अस्मिता, अकल्पित निर्माण झालेले प्रश्नचिन्ह, ठप्प झालेली आर्थिक उलाढाल, चौफेर असणारी व्यावसायिक जोखीम, व्यवसाय म्हणून व्यवस्थापनाचा प्रतिसाद इ.चा प्रामुख्याने समावेश होता. मात्र, गेली काही वर्षे व्यवस्थापन शिक्षण अभ्यासक्रमात व्यावसायिक आव्हाने-अस्थिरता, त्यातील जोखीम व त्यावर यशस्वीपणे मात करण्याचा सराव-अभ्यास इ.चा समावेश करण्यात आल्याने, त्या प्रात्यक्षिक ज्ञानाचा उपयोग यावेळी नेमका झाला, हे विशेष. बदलत्या व्यवसाय स्थितीनुसार आज प्रत्येक व्यवस्थापकाजवळ बदल आणि बदलाचे नियोजन-व्यवस्थापन, स्थितीचे अवलोकन-आकलन करणे व त्यावर साधक-बाधक विचार करून त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते गुण असणे आवश्यक झाले आहे. व्यवस्थापन क्षेत्रात नव्याने आलेल्या वा येऊ इच्छिणाऱ्यांसाठी बहु-कौशल्यधारक असणे, आता अधिक आवश्यक झाले आहे.
एमआयटी गुडगावच्या व्यवस्थापन विकास विभागाचे प्रमुख प्रा. पी. सी. बिस्वल यांच्यानुसार आता आणि यापुढे पुस्तकी स्वरूपातील व व्याख्यानावर आधारित व्यवस्थापनशास्त्र पुरेसे ठरणार नाही. त्यांच्या मते विशेषतः 'कोविड-19'नंतर तर बदलत्या परिस्थितीनुरूप व्यावसायिक व वैयक्तिक स्तरावर आलेले अनुभव मोठी शिकवण देऊन गेले. ही नवी शिकवण व त्याच्याशी निगडित मुद्दे व्यवस्थापन शिक्षण अभ्यासक्रमात अंतर्भूत करणे व त्याची शिकवण नव्या व्यवस्थापकांना निश्चितपणे व दूरगामी स्वरूपात मार्गदर्शक व लाभदायी ठरेल.परंपरागत स्वरूपात व्यवस्थापन संस्थेतून एमबीए वा तत्सम पात्रताधारक उमेदवारांची व्यवस्थापक म्हणून निवड करताना, त्यांच्यातील व्यवस्थापनविषयक ज्ञान, नेतृत्व गुण, परिवर्तनशीलता, आकलन क्षमता, सर्जनशीलता, निर्णयक्षमता, प्रभावी संवादकला इत्यादीची पडताळणी केली जाते. या आणि अशा विषयांचा व्यवस्थापन शिक्षणक्रमातही समावेश केलेला असतो. या शिक्षणाचा उपयोग व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्यासाठी होत असतो.
बदलत्या उद्योग-व्यवसायाच्या गरजा अणि परिस्थितीनुरूप नवे बदल करून स्वरूप देण्याची गरज आहे. यामध्ये प्रस्थापित वा प्रचलित अभ्यासक्रमाला अनपेक्षित आव्हानपर स्थितीचे अध्ययन-आकलन करून त्यानुसार जबाबदारीसह निर्णय घेऊन त्यांची यशस्वी अंमजबजावणी करण्यासाठी त्यांना सक्षम करणे ही काळची गरज आहे. कोरोनाच्या निमित्ताने वैयक्तिक जीवनापासून व्यावसायिक क्षेत्रासाठी ही क्षमता आता अपरिहार्य ठरणार आहे. व्यवस्थापन विषयतज्ज्ञांसह हे शिक्षण-अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या बदलत्या परिस्थितीची जाणीव झालेली दिसून येते. यावर्षी व्यवस्थापन विद्यार्थ्यांना कोरोनाकाळामुळे व्यावसायिक अनिश्चिततेच्या गर्तेतील यशस्वी व्यवस्थापनतंत्राचा अनुभवासह अभ्यास करता आला व त्याचा त्यांनी लाभही घेतला. 'ऑॅनलाईन' सत्रांपासून ऑनलाईन व्यवसाय- व्यवस्थापनापर्यंतचे मुद्दे त्यांना त्यामुळे शिकता आले. या प्रत्यक्षावर आधारित प्रशिक्षणाचा उपयोग या विद्यार्थ्यांना यापुढे निश्चितच होणार आहे. आता गरज आहे अशाच प्रकारच्या वस्तुस्थितीवर आधारित शिक्षणाला कायमस्वरूपी स्वरुप प्राप्त करुन देण्याची. हे निश्चितच विद्यार्थी-व्यवस्थापन या उभयतांना लाभदायी ठरणार आहे. अखेर यातूनच अस्थिर व्यवसाय वातावरणातील व्यवस्थापनशैली साकारणार आहे.
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापनसल्लागार आहेत.)