देशहिताचाच विसर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2021   
Total Views |

Tractor Rally_1 &nbs
 
 
 
दिल्लीतील सिंगू सीमेवरील ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या तथाकथित नेत्यांना देशहिताशी काही देणे-घेणे आहे का, असा प्रश्न आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर साहजिकच उपस्थित होतो. कारण, देशहिताची जर या मंडळींना इतकीच चिंता असती, तर या आंदोलकांच्या टोळक्याने प्रजासत्ताक दिनीच ट्रॅक्टर रॅलीचा घाट घातला नसता. पण, मुद्दाम सरकारला नाकीनऊ आणण्यासाठीच खलिस्तानी संघटनांच्या पाठबळावर हे शेतकरी आंदोलन सध्या पूर्णत: भरकटलेले दिसते.
 
 
 
 
प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरातच कडक सुरक्षेचा बंदोबस्त केला जातो. या दिवशी घातपाताची शक्यता लक्षात घेता, केंद्र आणि राज्य सरकारने खबरदारी घेणे हे क्रमप्राप्तच. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या उपस्थित पार पडणाऱ्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा तामजाम पाहता, सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर असते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलकांनी मुद्दाम शेतकऱ्यांचे हक्क म्हणजेच प्रजेचे हक्क सरकारकडून धुडकावले जात असल्याचे अनाठायी चित्र निर्माण केले आणि राजधानीला आज त्याच आंदोलकांकडून वेठीस धरले जाईल.
 
 
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ने घातपाताचा कटही आखल्याचा सुगावा गुप्तचर यंत्रणांना लागला आहे. तसेच या आंदोलनाच्या काळात पाकिस्तानातील जवळपास ३०० ट्विटर अकाऊंट्स या ट्रॅक्टर रॅलीत अनागोंदी माजविण्यासाठी उघडल्याचेही निष्पन्न झाले असून, पाकिस्तानचे मनसुबे यावरून स्पष्ट होतातच. पण, तरीही आंदोलक ट्रॅक्टर रॅलीवर ठाम असून आपण शांततेच्या मार्गाने हा विरोध करण्यावर अडून बसले आहेत. तसेच या आंदोलनात देशविघातक कोणत्याही शक्तींचा सहभाग नसल्याचेही आंदोलक म्हणतात. त्यामुळे सरकारबरोबर चर्चेच्या ११ फेऱ्या, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली तज्ज्ञांची समिती आणि सरकारची दीड वर्षे कायदे स्थगित करण्याची तयारी असूनही आंदोलकांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे, या आंदोलकांना देशहिताची काडीमात्रही चिंता नसल्याचेच स्पष्ट होते. पण, या ट्रॅक्टर रॅलीत कुठलाही अनुचित प्रकार दुर्दैवाने घडलाच, तर त्याची जबाबदारी हे आंदोलक स्वीकारणार का?
 
 

राहुलची तामिळी फजिती

 
 
राहुल गांधी आणि फजिती हे दोन शब्द अगदी समानार्थीच. काँग्रेसचे हे युवराज जिथे जातील तिथे स्वत:ची आणि काँग्रेसची फजिती केल्याशिवाय जणू त्यांना चैनच पडत नसावी. त्याचीच प्रचिती राहुल गांधी यांच्या तामिळनाडू दौऱ्यादरम्यानही आली.
 
राहुल गांधी हे दक्षिणेतील केरळच्या वायनाडचे खासदार. पण, जो माणूस आपला अर्धाहून अधिक काळ परदेशातच घालवतो, तो आपल्या मतदारसंघात काय बरं लक्ष देणार? म्हणा, दिल्लीहून अमेठी तुलनेने जवळ असतानाही युवराजांनी काय दिवे लावले ते वेगळे सांगायला नको.
 
आगामी तामिळनाडूमधील निवडणुका लक्षात घेता, राहुल गांधींनी आपला मोर्चा तामिळनाडूकडे वळवला. पण, या तामिळ भाषक राज्यात प्रचार करायचा म्हणजे त्यांना दुभाषकाशिवाय पर्याय नाहीच. पण, बिच्चारे ते दुभाषक, राहुल गांधींची गोलगोल इंग्रजीतील वाक्ये त्यांना चटकन तामिळमध्ये समजवताही येत नाहीत. म्हणजे, राहुल गांधी खूप काही बौद्धिक, वैचारिक चर्चा करतात असे नव्हे, पण ‘इंडिया इज तामिळनाडू, तामिळनाडू इज इंडिया’ वगैरे बालिश विधानांनी आपण तामिळी जनतेचे मन जिंकू शकत नाहीत, हे राहुलला कुणी समजावे?
 
असो, तर नेहमीप्रमाणे राहुल गांधी घसरले ते संघ आणि भाजपवर. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, “संघ-भाजपने कितीही परेड केल्या तरी ते तामिळनाडूचे भविष्य ठरवू शकत नाहीत, ते येथील लोकच ठरवतील.” या विधानावरूनच राहुल गांधी तामिळनाडूतील संघ-भाजपच्या प्रभावाने आधीच किती भयभीत आहेत, याची कल्पना यावी. खरंतर गांधी परिवार आणि तामिळनाडूचे अगदी गहिरे संबंध. इतके की केवळ राजकीय हव्यासापोटी याच गांधी घराण्याने माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा कशी होईल, याचीच तजवीज केली आणि सहानुभूतीचा मुखवटा चढवून ठेवला. पण, त्यानंतरही काँग्रेसचा आजवर तामिळनाडूमध्ये जम बसलेला नसून द्रमुकच्या जीवावरच राहुल गांधी उड्या मारताना दिसतात. निवडणुकीच्या रंगात ते इतके बुडाले आहेत की, चक्क तामिळ शिकण्याची इच्छाच त्यांनी प्रकट केली. त्यांनी जरूर तामिळ शिकावे, त्यात गैर काही नव्हेच. पण, त्याआधी एकदा सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे नाव तेवढे स्पष्ट उच्चारून दाखवावे, एवढीच किमान अपेक्षा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@