उद्याच्या नागरिकांसाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2021   
Total Views |

Ganesh Bata_1  
आजचे विद्यार्थी हे उद्याचे आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायला हवेत, त्यांच्यात राष्ट्रनिष्ठा आणि समाजभान निर्माण व्हायलाच हवे, यासाठी कार्य करणारे गणेश बटा.
 
 
"शिक्षण आनंददायी असावे. विद्यार्थ्यांना शिकताना आनंद आणि आत्मीयता वाटेल, तेव्हाच तो मनापासून शिकेल. धाक आणि दबावाने विद्यार्थी केवळ परीक्षार्थी होतात. आजचे विद्यार्थी उद्याचे आपल्या भारताचे नागरिक आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार व्हायलाच हवेत. शाळा हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर आहे. शाळेचीही जबाबदारी वाढते.” ‘बॅरिस्टर नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळा’चे सचिव गणेश बटा सांगत होते. ईशान्य मुंबईमध्ये संस्कार आणि आधुनिकता यांचा ताळमेळ साधत शिक्षणसेवा देणार्‍या शैक्षणिक संस्थांमध्ये ‘विक्रोळी विद्यालय’ या शाळेचे नाव अग्रक्रमी आहे. ‘विक्रोळी विद्यालय’ ही पूर्वी अगदी छोटेखानी शाळा. पण, रोपाचा वटवृक्ष व्हावा, तसे या शिक्षण संस्थेचे झाले. त्यात गणेश बटा यांचे योगदान मोठे आहे. गणेश बटा यांच्या वडिलांनी दशरथ बटा यांनी ७०च्या दशकात ‘बॅरिस्टर नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळा’ची निर्मिती केली. त्यावेळी शाळा म्हणजे, चाळीची वास्तू होती. आता शाळा म्हणजे देखणी इमारतच आहे. संस्थेचे ‘ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल’ही सुरू झाले आहे. या दोन्ही शाळा विक्रोळी आणि ईशान्य मुंबईच्या पालकांसाठी एक शिक्षण संस्कार करणार्‍या संस्थाच आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या देशाची संस्कृती माहिती असावी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग करणार्‍या स्वातंत्र्यवीरांबद्दल आदर असावा, यासाठी गणेश बटा यांनी या शाळांमध्ये पाठ्यपुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त अनेक उपक्रम सुरू केले. कारण, विक्रोळी आणि परिसरातील वंचित परिवारातील बालके हेच उद्याच्या भारताचे प्रेरणादायी नागरिक.
 
 
 
 
गणेश बटा ‘मराठी क्षत्रिय विद्यावर्धक मंडळा’चे मुंबईचे कार्याध्यक्षही आहेत. ‘गाबित’ किंवा ‘गोमंतक क्षत्रिय मराठा’ किंवा ‘खारवी’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या समाजाचे गणेश बटा. या समाजाचे मंडळ आहे ‘मराठी क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ.’ साधारण १०० वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली. मुंबई परिसरात शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, शैक्षणिक सुविधा पुरवणे, हे कार्य संस्था करते. गणेश बटा जेव्हा या संस्थेचे कार्याध्यक्ष झाले, तेव्हा संस्थेची भांडुप येथे एकमजली इमारत होती. पण, निधीअभावी सामाजिक उत्कर्ष करण्यासाठी संस्थेला अडचण येई. गणेश बटांनी सर्वांच्या संमतीने या इमारतीमध्ये बँकेची शाखा उघडायला जागा दिली. हेतू हा की, बँकेकडून नियमित जागेचे भाडे येईल, त्यातून संस्था समाजासाठी कार्य करेल. गणेश बटा आणि सहकार्‍यांचा उद्देश सफल झाला. आज २०१२ ते २०२१ या काळात संस्थेकडे भरपूर रक्कम जमा झाली. त्या पैशातून संस्था या इमारतीमध्ये आणखी दोन मजले वाढविणार आहे. शिक्षणासाठी दुरुन समाजाचे विद्यार्थी मुंबईत येतात. मुंबईत नातेवाईक असतात. पण, कितीही जवळचे नातेवाईक असले तरी त्यांच्या घरी शिक्षणासाठी वर्षानुवर्ष कसे राहणार? तसेच मुंबईत भाड्याने राहणेही परवडणारे नाही. त्यामुळे संस्थेच्या या इमारतीमध्ये समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारले जाणार आहे. तसेच ‘एमपीएसी’ परीक्षा देऊन ती उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी समाजात निर्माण व्हावेत, अशीही गणेश बटा यांची इच्छा आहे. त्यामुळे या समाजाच्या वास्तूमध्ये समाजबांधवांसाठी ‘एमपीएसी’चे क्लासेसही सुरू होणार आहेत. सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी कार्य करणारे गणेश बटा यांच्या कार्याचा मागोवा घेतला तेव्हा कळले की, कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य घडताना त्यांच्या वरील संस्काराचे योगदान महत्त्वाचे असते.
 
गणेश बटा यांचे वडील दशरथ हे मूळचे गोवा येथील फोंड्याचे. कामानिमित्त ते मुंबईत आले. मुंबईत सांताक्रुझला, पुढे विक्रोळीला राहू लागले. ते ‘ड्राफ्टमन’ म्हणून एका खासगी कंपनीत काम करायचे. त्यांची पत्नी प्रतिभा या पापभिरू आणि अतिशय शिस्तप्रिय संस्कारी. गणेश तिसरीला असताना त्यांनी आईकडे सायकल मागितली. प्रतिभा म्हणाल्या, “तुला सायकलची गरज आहे का? हौस म्हणून जर सायकल हवी असेल तर शिक, मोठा हो आणि मग सायकल घे. स्वाभिमानाने जगावे, कुणाची नक्कल करून आयुष्यात काहीही करू नये,” असे त्या गणेश यांना समजावत. दशरथ हे ‘राष्ट्र सेवा दला’चे कार्यकर्ते. ते जनता पक्षाचेही काम करायचे. सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ते निधी गोळा करत. अत्यंत पारदर्शक पद्धतीने त्याचा सर्व जमाखर्च मांडत. निधीसाठी ते घरोघरी जात. एकदा गणेश यांना त्यांचे शाळेतले सवंगडी ‘भिकारी’ म्हणून चिडवू लागले. ते असे का म्हणतात? हे गणेश यांना कळाले नाही. माहिती काढली तर कळले की, त्यांचे वडील दशरथ हे समाजकार्यासाठी निधी गोळा करतात. हे कार्य करतानाच ते गणेश यांच्या सोबतच्या मुलाच्या घरी गेले. त्यामुळे तो मुलगा असे चिडवत होता. दशरथ तर पहाटे घरातून निघून रात्रीच घरी येत. त्यामुळे गणेश यांनी प्रतिभांना सांगितले. तर त्यावेळी त्या म्हणाल्या, “समाजासाठी काम करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी काम हे सबल नाही करणार तर कोण करणार? तू लक्ष देऊ नकोस.” हे वाक्य गणेश यांच्या लक्षात राहिले. पुढे महाविद्यालयात ‘एनएसएस’मुळे त्यांच्या विचारप्रेरणेला जागृती मिळाली. समाजकार्याचा वारसा होताच. मात्र, दशरथ यांना वाटायचे की, मुलाने ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ व्हावे. त्यावेळी पहिल्यांदा गणेश वडिलांना उत्तर देत म्हणाले की, “मी, असा काही तरी होईन की, चार्टर्ड अकाऊंटंट’ना पगार देऊ शकेन.” पुढे अनेक उद्योग-व्यवसाय करत ते गुंतवणूक सल्लागार बनले. आज एक प्रतिष्ठित व्यावसायिक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक आहे. गणेश बटा म्हणतात, “माझे आईबाबा माझे प्रेरणास्थान आहेत. कारण, त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. यापुढेही मला शिक्षणक्षेत्रात विविध उपक्रम राबवायचे आहेत. आजचे विद्यार्थी उद्याचे भारताचे नागरिक आहेत.”
 
@@AUTHORINFO_V1@@