
गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई - भारतात प्रथमच कारागृह-पर्यटन सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. याविषयी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. पुण्यातील येरवडा तरुंगामध्ये येत्या २६ जानेवारीपासून पर्यटनाचा हा अनोखा प्रकार सुरू होणार आहे.
राज्यातील पर्यटनाला एक वेगळा आयाम मिळणार आहे. कारण, तुरुंगामध्ये बंदिवान असेलल्या कैद्यांचे आयुष्य आणि तिथले वातावरण अनुभवण्याची संधी सामान्य माणसांना मिळणार आहे. पर्यटनाच्या विविध प्रकारांबरोबरच राज्यात कारागृह पर्यटनाला सुरुवात होणार आहे. भारतात अशा प्रकारचे पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहामधून या पर्यटनाला सुरुवात होईल. येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पर्यटनाला सुरुवात होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
पुण्याच्या येरवडा कारागृहाला स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास लाभला आहे. महात्मा गाधी, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांसारख्या थोर स्वातंत्र्यसैनानींना याच कारागृहात बंदिवान करण्यात आले होते. अशा थोर नेत्यांना बंदिवान केलेले तुुरुंग पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. शिवाय याच कारागृहाच्या आवारातील एका झाडाखाली महात्मा गांधी आणि डाॅ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यामध्ये १९३२ साली पुणे करार झाला होता. हा परिसर देखील पर्यटानासाठी खुला करण्यात येणार आहे. यासाठी शालेल विद्यार्थ्यांकडून ५ रुपये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून १० रुपये आणि सामान्यांकडून ५० रुपये आकारण्यात येतील.