एजंट सोन्या : उर्सुला कुझेन्स्की

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2021
Total Views |

Ursula Kuzhensky_1 &
 
 
 
‘एमआय ५’ नेमकं काय करत होती? त्यांना एकदाही उर्सुलाचा संशय का आला नाही? तिच्या आणि फॉक्सच्या वारंवार होणाऱ्या भेटी त्यांच्या नजरेतून कशा सुटल्या? ‘एमआय ५’ उर्सुलावर नजर ठेवण्यात इतकी अयशस्वी का झाली? यामागची कारणं अनाकलनीय आहेत. १९४१ पासून १९५०च्या सुरुवातीला, फॉक्सला अटक होईपर्यंत सुमारे नऊ वर्षे उर्सुला इंग्लंडमध्ये राहून हेरगिरी करत राहिली. यादरम्यान १९४७च्या सुमारास दोन वेळा तिची चौकशीही केली गेली. मात्र, तीन मुलांची आई आणि एक सुखी गृहिणी असल्याचं तिचं नाटक इतकं उत्तम वठत होतं की, केवळ संशय घेण्यापलीकडे तिला अटक करण्याजोगा एकही पुरावा ‘एमआय ५’ला मिळवता आला नाही.
 
 
१९४१च्या सुरुवातीला जेव्हा मिसेस उर्सुला बेअरटन आपल्या दोन मुलांसह, स्पेनमधून आलेल्या बोटीने ब्रिटनमधल्या लिव्हरपूल बंदरावर उतरली, तेव्हापासूनच ‘एमआय ५’ने तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती, आणि त्याला कारणही तसंच होतं! उर्सुलाचे आई-वडील आणि भावंडे यांनी जर्मनीतून पळून ब्रिटनमध्ये आश्रय घेतला होता. मात्र, त्यांच्या खुल्या आणि जहाल डाव्या मतांमुळे तेथील गुप्तचर संस्थांचे लक्ष त्यांनी वेधून घेतलेलेच होते. शिवाय उर्सुलाचा नवरा लेन बेअरटन स्पॅनिश सिव्हिल वॉरमध्ये लढलेला होता आणि तोही काहीसा डाव्या बाजूचा असल्याचा संशय ब्रिटिश एजन्सींना होता. साहजिकच ती उतरल्या उतरल्या बंदरावरच मेजर टायलरने तिला थांबवले. तिकडे दोन तास तिची कसून चौकशी केली गेली. विविध वेडे-वाकडे प्रश्न विचारले गेले. पण, उर्सुला मॉस्कोमध्ये प्रशिक्षित होती. अतिशय ठाम आणि नम्र उत्तरे देत तिने टायलरच्या हाती कसलीही माहिती लागू दिली नाही, अखेर दोन तासांनी तिला कुठेही जाण्यासाठी मोकळं केलं गेलं.. मात्र, तिच्यावर करडी नजर ठेवली पाहिजे या शेऱ्यासह!
 
 
वास्तविक तिच्यावर नजर ठेवली जावी, असा तातडीचा निरोप टायलरने देऊनही ‘एमआय ५’ या ब्रिटिश गुप्तचर संस्थेने त्याकडे दुर्लक्ष केले. यामागचे नेमके कारण काय होते? ‘एमआय ५’ मध्येच उर्सुलाच्या आणि एका अर्थी रशियाच्या बाजूने फितूर असणारा कोणी होता का? ज्यामुळे उर्सुला आणि तिच्या ब्रिटनच्या आण्विक कार्यक्रमाची माहिती रशियाला देण्यासंबंधातल्या गुप्त हालचाली, जवळ जवळ दहा वर्षे ‘एमआय ५’ला कळू शकल्या नाहीत? कारणं काहीही असोत. पण, या बेफिकिरीची मोठी किंमत ब्रिटनला मोजावी लागणार होती..!!
 
 
उर्सुला मारिया कुझेन्स्कीचा जन्म १५ मे, १९०७ रोजी श्योनबर्ग-बर्लिन, जर्मनी येथे झाला. रॉबर्ट आणि बेर्टा कुझेन्स्कीच्या सहा अपत्यांपैकी उर्सुला दुसरी मुलगी. रॉबर्ट हा त्यावेळी नावाजलेला अर्थशास्त्रज्ञ होता. तर बेर्टा ही एक अव्वल दर्जाची चित्रकार होती. घरात आर्थिक स्थैर्य होते, सर्व मुले बुद्धिमान होती. एकूणच ते घर सुखी होते. वयाच्या १६-१७व्या वर्षापासूनच उर्सुला कम्युनिस्ट चळवळीत सहभागी होऊ लागली होती. १९२४ साली ती ‘यंग कम्युनिस्ट’ किंवा ‘जर्मनीज रेडएड’सारख्या संघटनांमध्ये सहभागी झाली. १९२६ साली, १९व्या वर्षी ती ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ जर्मनी’ची सदस्य झाली आणि १९२८ मध्ये याच पक्षाचा सदस्य असणाऱ्या रुडॉल्फ हॅम्बर्गरशी विवाहबद्ध झाली. रुडॉल्फ व्यवसायाने वास्तुविशारद होता. साहजिकच त्यावेळी चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असणाऱ्या बांधकामांमध्ये संधी शोधण्याच्या इच्छेने ते दोघेही १९३० साली शांघाय येथे राहायला आले. इथेच त्यांचा पहिला मुलगा माईक जन्माला आला. चीनला आल्यावर चारच महिन्यांच्या आत उर्सुलाची ओळख रिचर्ड सोर्ज नावाच्या एका पत्रकाराशी झाली. रिचर्ड मुळात ‘रामसे’ नावाने ज्ञात असणारा रशियन हेर होता (ॠठण साठी काम करत होता) चीनमध्ये येण्याआधी रुडॉल्फ रशियासाठी काम करत होता का, हे कळायला मार्ग नाही. मात्र, उर्सुला १९३० साली रामसेला भेटल्यानंतर लगेचच ‘एजंट सोन्या’चा जन्म झाला आणि तिचं काम धडाक्यात सुरू झालं! १९३४ मध्ये चीनमध्येच उर्सुला अर्नेस्टला भेटली. अर्नेस्टदेखील चीनमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत होता. अर्नेस्ट आणि उर्सुलाचे एकमेकांशी प्रेमप्रकरण सुरू झाले आणि तिच्या दुसऱ्या मुलीचा, यानीनाचा जन्म झाला. इकडे या प्रकरणामुळे दोन्ही हेरांचं नाव उघडकीस येऊ शकेल या भीतीने मॉस्कोने उर्सुला आणि रुडॉल्फला मॉस्कोत बोलावून घेतले आणि काही दिवसांनी तिला तिच्या कुटुंबासह स्वित्झर्लंडमध्ये पुढील कामगिरीसाठी पाठवले. १९३५-१९३८-३९ पर्यंत उर्सुला स्वित्झर्लंडमध्ये काम करत होती. तिथेच तिचा आणि रुडॉल्फचा घटस्फोट झाला आणि १९४०च्या शेवटी शेवटी तिने लेन बेअरटनशी विवाह केला. लेनदेखील तिच्यासारखाच ‘जीआरयू’साठी काम करणारा एक एजंट होता. शिवाय, त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्यामुळे, साहजिकच ‘एजंट सोन्या’लादेखील ब्रिटिश पासपोर्ट मिळणं सोपं झालं होतं. त्यानंतर मॉस्कोने त्या दोघांना इंग्लंडमध्ये पाठवले. काही कारणाने लेन मात्र युरोपमध्येच अडकला आणि उर्सुला लिव्हरपूलला उतरली!
 
 
इंग्लंडला आल्यावर तिने आपल्या पालकांच्या जवळ ऑक्सफर्डशायर येथे घर घेऊन राहायला सुरुवात केली आणि मॉस्कोहून येणाऱ्या सूचनांचे पालन करू लागली. तिने आपल्या खबऱ्यांचे (informants) जाळे विणायला सुरुवात केली आणि सर्वप्रथम आपले वडील आणि आपला मोठा भाऊ युर्गन यांना सामील करून घेतले. १९३३ पासून तिथे राहत असल्याने त्या दोघांची कित्येक बुद्धिजीवी, कट्टर अशा लोकांच्या वर्तुळामध्ये, पार्ट्यांमध्ये ऊठबस होती. अशा पार्ट्यांमधून राजकीय, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक, सैनिकी अशा अनेक विषयांवर मुक्तपणे चर्चा केल्या जात असत. साहजिकच अशा ठिकाणी पुष्कळ माहिती मिळण्याची शक्यता होतीच. अशाच कुठल्या तरी पार्टीमध्ये युर्गनची ओळख क्लाऊस फॉक्सशी झाली. क्लाऊस अतिशय बुद्धिमान, आत्मकेंद्रित, आणि काहीसा विक्षिप्त होता. तो चेन स्मोकर होता, स्वत:च प्रयत्नपूर्वक गिटार वाजवायला शिकत होता. अतिशय वक्तशीर होता. फॉक्सदेखील १९३३ मध्येच इंग्लंडच्या आश्रयाला आला होता.  याच सुमारास इंग्लंडने आपल्या आण्विक अस्त्रांच्या संशोधन कार्यक्रमाला सुरुवात केली होती आणि फॉक्सला त्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले गेले. तो ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ जर्मनी’चा कार्यरत सदस्य होता हे माहीत असूनही त्याला या कार्यक्रमात घ्यावे याला ‘एमआय ५’ने पुष्कळ विरोध केला. मात्र, शेवटी ही ‘जोखीम’ घेतली जावी यावर एकमत होऊन ब्रिटनच्या आण्विक कार्यक्रमात फॉक्सला प्रवेश मिळाला. ही ब्रिटनची पहिली चूक ठरली. कारण वरवर जरी हुशार आणि समर्पित शास्त्रज्ञ वाटला, तरी शेवटी फॉक्स कम्युनिझमशी एकनिष्ठ होताच. नंतर एके ठिकाणी फॉक्सने म्हटले आहे की, “मला हेरगिरी करण्यात रस नव्हता. मात्र, इतकी मोठी गोष्ट मॉस्कोपासून लपवून ठेवण्याची इंग्लंडला काय गरज होती हे मला समजत नव्हते.”
 
 
फॉक्सने आण्विक गुपिते तत्कालीन रशियाचा राजदूत कर्नल सेम्यॉन क्रेमर याला पाठवायला सुरुवात केली. जवळजवळ सहा महिने ‘ओट्टो’ या नावाने फॉक्स कर्नल क्रेमरला ही माहिती पुरवत राहिला. मात्र, नंतर अचानक कर्नल क्रेमरला मॉस्कोला परत बोलावले गेले आणि फॉक्सची साखळी तुटली. हे गुपित फॉक्सने आपला मित्र युर्गनला सांगितले आणि युर्गनने तत्काळ उर्सुलाला त्याच्याशी जोडून दिले. उर्सुलाची कम्युनिस्ट मैत्रीण आणि या प्रोजेक्टमधली सेक्रेटरी, मेलिता नॉरवूड तिला या ‘ट्यूब अलाय प्रोजेक्ट’ मधली गुपिते पाठवत होतीच. मात्र, उर्सुलाने आता फॉक्सकडील अधिक तपशिलात असणाऱ्या माहितीला प्राधान्य दिले. १९४२च्या उन्हाळ्यामध्ये स्नो हिल रेल्वे स्टेशन, ब्रीमिंगहॅमच्या समोर असणाऱ्या एका कॅफेमध्ये ते भेटले. त्यांनतर प्रणयी जोडप्याचे नाटक करत ती दोघं भेटत राहिली आणि फॉक्स उर्सुलाला माहिती पुरवत राहिला. १९४१-१९४३ या दोन वर्षांच्या काळात फॉक्सने विविध अहवाल, गणिते, आकृत्या, सूत्रे, अशा स्वरूपातली, अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती जवळजवळ ५७० पानांच्या रूपाने उर्सुलाला आणि पर्यायाने रशियाला दिली. त्यामुळेच १९४३ नंतर रशियाने आपले आण्विक अस्त्रांचे प्रयोग सुरू केले आणि १९४९ रोजी यशस्वी अणुचाचणी केली.
 
 
यादरम्यान ‘एमआय ५’ नेमकं काय करत होती? त्यांना एकदाही उर्सुलाचा संशय का आला नाही? तिच्या आणि फॉक्सच्या वारंवार होणाऱ्या भेटी त्यांच्या नजरेतून कशा सुटल्या? ‘एमआय ५’ उर्सुलावर नजर ठेवण्यात इतकी अयशस्वी का झाली? यामागची कारणं अनाकलनीय आहेत. १९४१ पासून १९५०च्या सुरुवातीला, फॉक्सला अटक होईपर्यंत सुमारे नऊ वर्षे उर्सुला इंग्लंडमध्ये राहून हेरगिरी करत राहिली. यादरम्यान १९४७च्या सुमारास दोन वेळा तिची चौकशीही केली गेली. मात्र, तीन मुलांची आई आणि एक सुखी गृहिणी असल्याचं तिचं नाटक इतकं उत्तम वठत होतं की, केवळ संशय घेण्यापलीकडे तिला अटक करण्याजोगा एकही पुरावा ‘एमआय ५’ला मिळवता आला नाही. तिने घरात बसवलेली रेडिओ अ‍ॅन्टेनासुद्धा त्यांना कळली नाही. कदाचित, हे ‘एमआय ५’चं सगळ्यात मोठं आणि गंभीर अपयश मानावं लागेल. १९४९च्या शेवटी फॉक्सला अटक झाल्यानंतर लगेचच, आपली ओळख आता उघड होऊ शकेल हे ओळखून उर्सुलाने तातडीने इंग्लंड सोडले आणि ती पुन्हा एकदा जर्मनीला, बर्लिनजवळ आपल्या जन्मगावापासून काही अंतरावर स्थायिक झाली. जर्मनीत परत गेल्यावर तिने ‘जीआरयू’मधून राजीनामा दिला आणि Sozialistische Einheitspartei Deutschland(SED) ‘सोशलिस्ट युनिटी पार्टी ऑफ जर्मनी’मध्ये प्रवेश केला. ७ जुलै, २००० मध्ये तिचा मृत्यू झाला.
 
 
वास्तविक रूढार्थाने उर्सुलाला ‘हनी ट्रॅप’ म्हणता येणार नाही, कारण माहिती मिळविण्यासाठी तिला कोणालाही फसवून जाळ्यात ओढण्याची गरज भासली नाही. फॉक्स स्वत:च ती माहिती देण्यास उत्सुक होता. मात्र, त्याच्याकडून मिळालेली माहिती रेडिओ ट्रान्समिट करून मॉस्कोला पाठवणे हे मोठे जोखमीचे काम होते. याशिवाय या सगळ्या धामधुमीत १९४३ साली तिला तिसरा मुलगादेखील झाला होता. तिन्ही मुले आणि घराचे काम सांभाळत, हेरगिरी करणे सोपे नव्हते. तिची प्रचंड दमछाक होत असे. याव्यतिरिक्त एक देश म्हणून तिला इंग्लंड प्रचंड आवडत असे. असं असूनही इंग्लंडविरुद्ध हेरगिरी करण्यासाठी ती कटिबद्ध होती. हे मानसिक द्वंद्वदेखील सोपे नव्हते, अशा तणावात मानसिक संतुलन राखून, आपली मुलं, घर सांभाळत हे कसरत करण्यासाठी असामान्य धैर्याची गरज असणार होतीच.. म्हणूनच उर्सुलाचा या लेखमालेत खास सामावेश करणं अपरिहार्य होतं!
 
 
- मैत्रेयी जोशी
 
 
@@AUTHORINFO_V1@@