‘तांडव’च नाही!!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2021
Total Views |
 
Tandav_1  H x W
 
 
 
हिंदू देव-देवतांचा संदर्भ घेऊन प्रतिकात्मक भाष्य करण्याचा अजेंडा इथल्या समाजाला प्रबोधित करण्यासाठी नसून जागतिक पातळीवर हिंदू धर्माच्या बाबतीत कथित नकारात्मक चर्चेला उधाण येण्यासाठीचा हा डाव आहे. उदारमतवादी म्हणवून घेतल्या जाणाऱ्या विचारधारेचा सांस्कृतिक आविष्काराआडून सुरु असलेला हा छुपा अजेंडा आहे.
 
 
 
 

In politics, being deceived is no excuse.

- Leszek Kolakowski

 
 
 
लेस्झेक कोलाकोवोस्की या मार्क्सवादी लेखकाच्या वरील वाक्याने ‘तांडव’ या वेबसीरिजची सुरुवात होते. सुरुवातीलाच सुनील ग्रोवरच्या तोंडचे, ‘सत्य आणि असत्यामध्ये जी गोष्ट येऊन उभी राहते तिला राजकारण म्हणतात आणि आम्ही राजकारणाच्या सोबत आहोत’ हे वाक्य पुढे घडणाऱ्या नाट्याचा एकप्रकारे उलगडा करते. दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाने सुरुवात झालेल्या ‘तांडव’ वेबसीरिजचा रोख दिग्दर्शक अली अब्बास जफर उलगडण्याचा प्रयत्न करतो. ‘टायगर जिंदा हैं’, ‘भारत’, ‘सुलतान’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ यांसारख्या चित्रपटांनंतर अली अब्बास जफर राजकीय भाष्य करणारी ‘तांडव’ समकालीन राजकारण आणि राजकारणाचे नाट्य दाखवणारी वेबसीरिज घेऊन आला आहे.
 
 
नुकताच येऊन गेेलेला ‘आर्टिकल १५’ हा चित्रपट ज्या पद्धतीने व्यवस्थेवर भाष्य करतो, त्याप्रमाणे ‘तांडव’ ही वेबसीरिज राजकीय डावपेचांवर पूर्वग्रहदूषित भाष्य करताना दिसते. मार्क्सवादी लेखकाचे वाक्य जरी राजकीय विश्लेषण करताना खरे ठरत असले, तरी दिग्दर्शक त्याकडे कोणत्या परिप्रेक्ष्यातून पाहतो, यावर त्या कलाकृतीचा रोख समजून येतो. समकालीन राजकारण आणि त्याचे संदर्भ हे एका विचारधारेने पुरस्कृत केल्यासारखी पटकथा पुढे पुढे जाते. गौरव सोलंकी लिखित ‘तांडव’ जरी नावामधून काहीतरी उलगडून सांगण्याचा अविर्भाव आणत असली, तरी राजकारणातील तेच तेच सामान्यांना माहिती असलेले राजकीय डावपेच नव्या संदर्भाने मांडण्यासाठी आणि एका विचारधारेचा प्रभाव पुन्हा एकदा राजकीय पटलावर ठळक करण्यासाठी केलेला अट्टाहास म्हणजे ही वेबसीरिज आहे.
 
 
जागतिक पातळीवर डाव्या विचारधारेच्या समूहांचा चित्रपट क्षेत्रावर प्रभाव राहिलेला दिसून येतो. राजकारणाच्या पटलावर जागतिक सिनेमा हा त्या-त्या देशाची व्यवस्था जगाला सांगतो. आविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार इथल्या नागरिकांना मिळाल्यानंतर कलाकारांनी कायम व्यवस्थेविरोधात आवाज उठवला आहे. पण, आज जागतिक पातळीवर डाव्या विचारधारेच्या समूहांनी चित्रपट, साहित्यातून त्यांचा त्यांचा अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘तांडव’ ही वेबसीरिज होय. शाहिनबाग आंदोलनात अग्रेसर राहणाऱ्या बिलकिस आजी आणि ‘आर्टिकल १५’ या चित्रपटासाठी अभिनेता आयुषमान खुराना यांना टाईम्सच्या प्रभावशाली १०० लोकांच्या यादीमध्ये दिलेले स्थान, यावरुन सांस्कृतिक अभिव्यक्तीतून एखाद्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी आणि भारताच्या सध्याच्या सरकारविरोधात मत तयार करण्यासाठी असे सन्मान दिले जातात, असे वाटते. चित्रपट कलेचा परिणाम हा मानवी समाजमनावर दीर्घकाळ टिकून राहतो. यामुळे या कलेचा वापर विशिष्ट अजेंडा पुढे नेण्यासाठी केला जातो.
 
 
 
त्याचप्रमाणे ‘तांडव’ या कथेची भाषा आणि कथेचा रोख इथल्या व्यवस्थेचा चेहरा जागतिक पातळीवर या वेबसीरिजमधून दाखविण्यासाठी लेखक, दिग्दर्शकाने खुबीने केलेला आहे. भारतीय लोकसंख्येच्या अल्प प्रमाणात इथला समाज हा त्या कलाकृतीला प्रश्न विचारतो. सांस्कृतिक दहशतवाद किंवा सांस्कृतिक वर्चस्वाच्या मुद्द्यावरुन ज्या समूह-संघटनांवर डाव्या संघटनांकडून टीका केली जाते, त्यांच्याकडून हिंदू किंवा राष्ट्रवादी विचारांना थोपविण्यासाठी सुरू केलेला हा नव वर्चस्ववाद नव्हे काय? असा प्रश्न पडतो.
 
 
‘तांडव’च्या निर्मितीमागील कथा जरी डाव्या विचारधारेने प्रभावित असेल, तरीही कलाकृतीची समीक्षा किंवा त्याचे परीक्षण हे कलेच्या परिप्रेक्ष्यापेक्षा तिच्या छुप्या अजेंड्यावर होणे गरजेचे आहे. ‘तांडव’मध्ये एका नाटकाच्या प्रयोगामध्ये हिंदू देव-देवतांचा संदर्भ देऊन भाष्य करणाऱ्या संवादाने इथल्या हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्या. परंतु, हिंदू देव-देवतांचा संदर्भ घेऊन प्रतिकात्मक भाष्य करण्याचा अजेंडा इथल्या समाजाला प्रबोधित करण्यासाठी नसून जागतिक पातळीवर हिंदू धर्माच्या बाबतीत कथित नकारात्मक चर्चेला उधाण येण्यासाठीचा हा डाव आहे.
 
 
उदारमतवादी म्हणवून घेतल्या जाणाऱ्या विचारधारेचा सांस्कृतिक आविष्काराआडून सुरु असलेला हा छुपा अजेंडा आहे. राजकारणाला प्रभावित करण्यासाठी आझादी आणि स्वांतत्र्यावरून ‘भारत तेरे तुकडे होंगें’ असा नारा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून दिला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार करणाऱ्यांना उदारमतवादी चळवळीने पाठिंबा देणे म्हणजे स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या व्याख्येचा वेगळा अर्थ घेतल्यासारखे आहे.
 
 
आदर्शवादी विद्यार्थी चळवळ आणि भारतीय राजकारण यामधला फरक दिग्दर्शक ‘तांडव’मध्ये प्रकर्षाने दाखवितो. पण, त्याच्या ठायी असणाऱ्या संदर्भांचा एकांगी विचार केलेला दिसून येतो. वस्तुतः ‘तांडव’ म्हणजे भगवान शंकराने क्रोधित होऊन विश्वविनाशाच्या विचाराने केलेले नृत्य, पण या वेबसीरिजला ‘तांडव’ नाव दिलेले असले तरी त्या नावाला साजेसे काही होत नाही. केवळ नेत्या-नेत्यांतील अंतर्गत राजकारण आणि सुरू असणारे शीतयुद्ध यांचे अतिशय धिमे दर्शन ‘तांडव’सारख्या राजकीय नाट्य असणाऱ्या मालिकेतून पुढे येते.
 
 
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये घडलेला प्रकार लेखक, दिग्दर्शकाने विवेकानंद विद्यापीठ नावाच्या एका भारतीय शैक्षणिक संस्थेमध्ये घडतो, असे जगाला दाखवण्याचा प्रयत्न या वेबसीरिजमधून केला आहे. या वेबसीरिजमधील राजकारणातील पदांची महत्त्वाकांक्षा नात्यांना दुय्यम स्थान देऊन सत्तेसाठी नाती, देशाचे हित विसरणारी पात्र विचार करायला भाग पाडतात. राजकारणामध्ये आदर्शवाद हा सत्तेची खुर्ची मिळवून देत नसून, काटशहांच्या राजकारणाने देशाच्या सर्वोच्चपदाची स्वप्ने बघणारा नायक पुढे त्या राजकारणाचा आनंद घेऊ लागतो आणि आदर्शवादी राजकारणाचा झेंडा घेऊन पुढे जाणाऱ्या नात्यांमध्ये जात, धर्म आणि वर्ग यांनी विभागलेले समूह लेखक प्रत्येक भागातून सांगण्याचा प्रयत्न करतो.
 
 
सत्तेच्या पदाआड येणारी नाती संपवून सत्ता हस्तगत करणारे राजकारण हाच ‘तांडव’च्या मध्यवर्ती कथेचा विषय आहे. येत्या काळात डाव्या विचारधारेच्या पुरस्कृत या वेबसीरिजच्या कोणत्याही कलाकाराचा प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश केला जाऊन त्यांना सन्मानित केले, तर त्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही.
 
 
 
- स्वप्निल करळे
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@