तृतीयपक्षी अग्निलेखा परीक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2021
Total Views |

Fire Incident_1 &nbs
 
 
 
विरारमधील वल्लभ कोविड केअर रुग्णालयाला आग लागण्याची घटना घडली व यात १४ जणांचा  दुर्दैवी मृत्यू झाला. अर्थात, ही घटना पहिली नाही. यापूर्वी भंडारा, नाशिक, ठाणे आणि आता पुण्यातही आगीच्या घटना घडल्या. या सर्वच घटनांच्या पार्श्वभूमीवर इमारतींचे आगीपासून संरक्षण, त्याचे लेखा परीक्षण, उपस्थितांना प्रशिक्षण आदी मुद्द्यांचा परामर्श सदर लेखातून घेतला आहे.
 
 
 
‘ऑडिटर’ अथवा ‘लेखा परीक्षक’ प्रत्येकाच्या मनात हा शब्द ऐकला की एकच विचार येतो, तो म्हणजे आपल्या कामकाजातील, यंत्रणेमधील चुका दाखवण्यासाठी आपल्या संस्थेने नेमलेली एक ‘खडूस’ व्यक्ती अथवा संस्था. परंतु, खरंच असं असतं का? खरं तर प्रत्येक संस्थेने काही कालावधीने आपल्या यंत्रणेचे, कामाच्या पद्धतीचे, विविध विभागाच्या नोंदणी पुस्तकाच्या नोंदी ठेवण्याच्या पद्धतीचे तृतीयपक्षी लेखा परीक्षण करून घेतले पाहिजे. बहुतांश बहुराष्ट्रीय संस्था आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करून अधिक उत्पादनाबरोबरच त्याची गुणवत्ता वाढण्यासाठी तृतीयपक्षी लेखा परीक्षण ठरावीक काळाने करून घेत असतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, आगीचे भाकीत करता येत नाही, ती कुठेही, कधीही लागू शकते, मग ती राहती वसाहत असो की, शैक्षणिक, व्यावसायिक, वाणिज्यिक, औद्योगिक, मालाचे गोडाऊन अथवा धोक्याची इमारत असो. आज भारतातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये उंच उंच इमारती, व्यावसायिक इमारती, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, कारखाने, हॉस्पिटलच्या इमारती, उंच शालेय इमारती, तारांकित हॉटेलच्या इमारती, भूमिगत रेल्वे-मेट्रो-मार्केट इत्यादींची संख्या दिवसेंदिवस अत्यंत वेगाने वाढत आहे. या सर्व इमारतींमध्ये चांगल्या सुख-सुविधा पुरविताना त्यामध्ये वापरलेल्या विविध ज्वलनशील वस्तूंमुळे व इमारतींमधील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वहिवाटीमुळे आगीचे धोके वाढलेले आहेत. इमारत बांधताना ‘राष्ट्रीय इमारत संहिते’ मध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे वास्तुविशारद व बांधकाम विकासक आग प्रतिबंधक व अग्निसंरक्षण यंत्रणा इमारतीमध्ये बसवत असतात व त्याच्या योग्य परीक्षणानंतरच इमारतीच्या वापराचा परवाना अग्निशमन दलातर्फे दिला जातो. परंतु, बऱ्याच वेळा या यंत्रणेच्या अज्ञानामुळे व देखभालीच्या खर्चाच्या न जुळणाऱ्या समीकरणामुळे ही यंत्रणा पुढील काळात पूर्णपणे दुर्लक्षित केली जाते व अचानक उद्भवलेल्या आगीच्या घटनेच्या वेळी ही यंत्रणा मृतावस्थेत सापडते व आपल्या नुकसानाला आपणच जबाबदार ठरतो.
 
 
भारतीय धोके २०१६च्या सर्वेक्षणानुसार व्यवसायातील सातत्याला जो धोका दर्शवलेला आहे, त्यामध्ये आगीपासून धोका हा तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याचप्रमाणे अपघात, मृत्यू व आत्महत्या २०१५च्या सर्वेक्षणानुसार २०१४ ते २०१५च्या कालावधीमध्ये १७ हजार ७०० जणांचा दिवसाला ४८च्या सरासरीने आगीच्या घटनांमुळे मृत्यू झाला आहे. या कालावधीमध्ये वाणिज्यिक इमारतींमधील आगीमध्ये ३०० पटीने वाढ झाली आहे. सरकारी इमारतींमध्ये २१८च्या पटीने व राहत्या इमारतींमध्ये १०० पटीने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ४२ टक्के लोकांचा मृत्यू हा राहत्या इमारतींमध्ये लागलेल्या आगीमुळे झालेला आहे. अजूनही आपण भारतीय सर्वच जण अग्निसुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतो. सहजपणे अग्निशमन कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करतो. मोठ्या आगीच्या घटनेनंतर काही काळ त्यावर चर्चा करतो व सहजपणे विसरून जातो, मग परत एकदा पुढची घटना घडेपर्यंत ‘जैसे थेच’.
 
 
माहिती अधिकार कायद्याच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुंबई अग्निशमन दलाने माहिती दिली की, मागील दहा वर्षांत मुंबईमध्ये ४८ हजार ४३४ आगीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये ६०० जण मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये लागलेल्या आगीमध्ये दहा नवजात शिशूंचा होरपळून झालेला मृत्यू ही खरंच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. परंतु, मागील काही घटनांकडे पाहिल्यास आपल्या देशातील अग्निसुरक्षेबद्दल आपल्याला कल्पना येईल. या सर्व घटनांनंतर अग्निशमन सेवेला दोष देण्यापेक्षा आपल्या मानसिकतेसच दोष देण्याची गरज आहे. भारतातील काही शहरांचा विचार केल्यास याहून काही वेगळी परिस्थिती नाही. आधुनिकीकरणाच्या वेगाबरोबर आगीच्या घटनांमध्येही फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबरीने अग्निशमन सुरक्षेबद्दल तेवढेसे ज्ञानप्रबोधन झालेले नाही व दिवसेंदिवस या प्रकारच्या घटनांमध्ये वाढच होत चालली आहे.
 
खरं म्हणजे आग लागण्याची महत्त्वाची चार कारणे
 
१) अग्निशमन कायद्याचे व नियमांचे उल्लंघन
 
२) अग्निशमन सुरक्षेबद्दलचे अज्ञान
 
३) अग्निशमन कायद्याची व नियमांची सक्षम विभागाकडून अंमलबजावणीमध्ये कसूर.
 
४) ‘काही होणार नाही, ही सर्वसामान्यांची मानसिकता.
 
सहजपणे विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की, आग ही आपल्या चुकांमुळे निर्माण झालेली एक प्रकारची मनुष्यनिर्मित आपत्तीच आहे. आगीनंतर केलेल्या बहुतांश तपासामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी नमूद केलेल्या असतात त्यावरून लक्षात येते की, इमारतीमधील अ‍ॅक्टिव्ह व पॅसिव्ह अग्निशमन यंत्रणा कार्यरत नव्हती. तिची देखभाल नीट केलेली नव्हती व ज्यामुळे आग लागल्यावर त्यावर नियंत्रण करण्यास वेळ लागला व त्याचमुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान व मनुष्यहानी झालेली आहे.
 
राष्ट्रीय इमारत संहिता २०१६
 
भारतामध्ये बांधकाम मार्गदर्शन प्रणाली म्हणून राष्ट्रीय इमारत संहितेचा वापर केला जातो. त्याच मार्गदर्शक संहितेवर राज्याने व शहराने स्वतःची विकास नियंत्रण नियमावली तयार केलेली आहे. २००५ सालच्या ‘राष्ट्रीय इमारत संहिते’मध्ये काही बदल करून २०१६ साली नवीन ‘राष्ट्रीय इमारत संहिता’ प्रकाशित करण्यात आलेली आहे. या संहितेमधील अध्याय चार हा संपूर्णपणे आग व जीवन सुरक्षिततेबद्दल आहे. यामध्ये इमारतीचे प्रकार व त्या बांधकामासाठी लागणाऱ्या अग्नी व जीवन सुरक्षेबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. हा अध्याय आपल्याला अग्निप्रतिबंध, अग्निसुरक्षा व जीवन सुरक्षा या तीन गोष्टींवर सखोल मार्गदर्शन करतो. ‘राष्ट्रीय इमारत संहिता २०१६’ मधील केलेल्या अनेक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वांमधील एक महत्त्वाचा मुद्दा ज्याकडे प्रशासनाने अजूनही डोळेझाक केलेली आहे, अथवा असे म्हणा की, लक्ष दिलेले नाही, तो मुद्दा म्हणजे ‘अग्निशमन यंत्रणा तृतीयपक्षीय लेखा परीक्षण’.
 
‘राष्ट्रीय इमारत संहिता २०१६’च्या अध्याय चारमधील जोडपत्र ‘ई,’ परिच्छेद ७ मध्ये तृतीयपक्षी लेखापरीक्षणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे, त्यानुसार-
 
अ) अग्नी व जीवन सुरक्षेबाबतचे ‘ऑडिट’ हे १५ मीटरहून उंच असलेल्या इमारतीने करून घेतले पाहिजे.
 
ब) या प्रकारचे ‘ऑडिट’ हे तृतीयपक्षी लेखा परीक्षणाद्वारे करण्यात यावे. ज्याच्याकडे योग्य प्रकारचा अग्नी व जीवन सुरक्षेबाबतच्या तपासणीचा अनुभव असेल.
 
क) अशा प्रकारच्या ‘ऑडिट’च्या पुनरावृत्तीचा वेग हा दोन वर्षांचा असावा.
 
‘राष्ट्रीय इमारत संहिता २०१६’च्या मार्गदर्शनानुसार अग्निशमन सल्लागार, भारत सरकार यांनी वारंवार सर्व राज्यांना याबाबत अनेक परिपत्रकाद्वारे माहिती देऊनही यावर ठोस अशी कार्यवाही सर्व राज्ये व शहरांमधून अमलात आणलेली दिसून येत नाही. ही योजना राज्याने अमलात आणल्यास व अशा तृतीयपक्षी लेखा परीक्षणावर योग्य ती कार्यवाही केल्यास नक्कीच आगीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण व नुकसानीवर नियंत्रण येऊ शकेल. अग्निशमन दलाकडे अधिकारी वर्गाचा तुटवडा व अग्निशमन ‘ऑडिट’ करण्याकरिता लागणारा वेळ याचा विचार केल्यास अग्निशमन यंत्रणेचे तृतीयपक्षी लेखा परीक्षण ही एक अत्यंत बहुमोलाची सूचना ‘राष्ट्रीय इमारत संहिता २०१६’मध्ये केलेली आहे व यावर अग्निशमन कायद्यांतर्गत बदल करून प्रत्येक राज्याने काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
 
अग्निसुरक्षा लेखा परीक्षण
 
तृतीयपक्षी अग्निसुरक्षा लेखापरीक्षण म्हणजे बाह्य तज्ज्ञाकडून इमारतीच्या ‘अ‍ॅक्टिव्ह’ व ‘पॅसिव्ह’ प्रकारच्या अग्निसुरक्षेबाबत, तसेच वेळोवेळी करीत असलेल्या नोंदीबाबत योग्य ती तपासणी करून, अहवाल प्राप्त करून घेणे होय, अथवा याचाच अर्थ राष्ट्रीय इमारत संहिता, भारतीय अग्निसुरक्षा मानके व राज्य सरकारने अस्तित्वात आणलेले अग्निसुरक्षिततेबाबतचे कायदे व नियम यांच्या पूर्ततेचे बाह्य तज्ज्ञाकडून लेखा परीक्षण करून घेणे होय.
 
अग्निसुरक्षा लेखा परीक्षणाचा उद्देश
 
या परीक्षणाचा महत्त्वाचा उद्देश आहे की, योग्य प्रकारे, गंभीर मूल्यांकनाद्वारे इमारतीतील रहिवासी अथवा कामगार, यंत्रणा व कार्यपद्धती याबाबतचे संभाव्य धोके, अग्निशमन यंत्रणेच्या निगराणीबाबतचे धोके यांची माहिती करून घेणे व त्यावर योग्य ती कार्यवाही तत्काळ करून घेणे. जेणेकरून संपूर्णपणे अग्निशमन कायद्यांची व नियमांची पूर्तता होईल.
 
अग्निसुरक्षा तृतीयपक्षीलेखा परीक्षणाचे फायदे
 
१) इमारतीमध्ये बसविलेल्या अग्निशमनाच्या ‘अ‍ॅक्टिव्ह’ व ‘पॅसिव्ह’ प्रकारच्या सर्व यंत्रणेबद्दल योग्य माहिती करून घेणे.
 
२) इमारतीमधील महत्त्वाचे आगीबद्दलचे धोके माहिती करून घेणे.
 
३) इमारतीमधील आगीसंबंधीच्या धोक्यापासून रहिवासी/कर्मचारी यांना असलेले धोके माहिती करून घेणे.
 
४) सद्यःस्थितीतील यंत्रणा कुठल्या मर्यादेपर्यंत योग्य आहे, याबाबत माहिती करून घेणे.
 
५) आवश्यक असल्यास अद्ययावत अग्निशमन यंत्रणेबद्दल माहिती करून घेणे.
 
६) इमारतीधील सुरक्षितपणे निकासन करण्याच्या मार्गाबद्दल माहिती करून घेणे.
 
७) इमारतीकरिता आपत्कालीन योजनेबद्दल माहिती करून घेणे व योजना आखणे.
 
८) इमारतीकरिता निकासन कवायतीबद्दल माहिती करून घेणे व अमलात आणणे.
 
९) इमारतीमधील रहिवासी/कर्मचारी यांच्याकरिता प्रशिक्षण, माहिती व सूचना देऊन त्यांना सुशिक्षित करणे.
 
१०) इमारतीमधील यंत्रणेची तपासणी करून पुढील काळात योग्यप्रकारे देखभाल करण्याकरिता योजना आखणे.
 
अग्निसुरक्षा तृतीयपक्षी लेखापरीक्षकाच्या कामाची व्याप्ती
 
१) इमारतीतील आगीचे धोके शोधणे.
 
२) इमारतीतील संभाव्य आगीच्या धोक्याबद्दल योग्य त्या सूचना करणे.
 
३) प्रत्येक भागातील आगीच्या धोक्यांचे मूल्यमापन करणे.
 
४) प्रत्येक यंत्रणेची व वापराच्या पद्धतीमध्ये आगीचे धोके असल्यास त्याबद्दल विस्तृत माहिती करून देणे.
 
५) संपूर्ण अग्निशमन यंत्रणा, अग्निशोध यंत्रणा, अग्निगजर यंत्रणा, अग्नी दडपून विझविण्यासाठीची यंत्रणा, अग्निरोधक (एक्स्टिंग्विशर) आणि अग्नीला विरोध करणारी यंत्रणा (पॅसिव्ह सिस्टीम) इत्यादीची योग्य तपासणी करणे.
 
६) अग्निशमन पंपाची जागा, विविध पंप व पाण्याचा साठा यांचे योग्य ते मूल्यमापन करून इमारतीतील धोक्यांना ही यंत्रणा योग्य आहे का नाही, याची तपासणी करून कायदा व नियमाची पूर्तता करत आहेत का याची माहिती करून देणे.
 
७) हायड्रंट व स्प्रिंकलर यंत्रणा यांची व्याप्ती बघून योग्य प्रकारचे अग्निशमन पंप यंत्रणा आहे किंवा नाही याची तपासणी करणे.
 
८) हायड्रंट व स्प्रिंकलर यंत्रणा, अग्निशोध यंत्रणा (डिटेक्शन सिस्टीम), अग्निरोधक (एक्स्टिंग्विशर) इमारतीच्या व्याप्ती, परिसर व धोके यांना पुरेशी आहे किंवा नाही याची तपासणी करणे.
 
९) योग्य त्या प्रकारची डिटेक्टिव्ह यंत्रणा व अग्निशमन यंत्रणा बसविली आहे किंवा नाही हे ज्ञात करून देणे.
 
१०) अग्निशमन व डिटेक्शन यंत्रणेला पर्यायी दुसरा विद्युत पुरवठा देण्यात आलेला आहे किंवा नाही, याची तपासणी करणे.
 
११) विद्युत पुरवठा, विद्युत यंत्रणा व विद्युत उपकरणे यामध्ये त्रुटी असल्यास ज्ञात करून देणे.
 
१२) अग्निशमनासाठी दडपून विझविण्याकरिता बसविलेल्या यंत्रणेची तपासणी करून ती योग्य आहे की नाही, याबद्दल अहवाल देणे.
 
१३) अग्निशमनासाठी बसविलेल्या ‘एक्स्टिंग्विशर’चा पुरेसा साठा नियमानुसार ठेवण्यात आला आहे का नाही हे तपासणे.
 
१४) ‘एक्स्टिंग्विशर’चे वय, कालावधी व निगराणी योग्य नियमाला धरून करण्यात आली किंवा नाही ते पाहणे.
 
१५) इमारतीमध्ये योग्य प्रकारे व योग्य प्रकारच्या कॉरिडॉर, पार्टिशन्स, दरवाजे, खिडक्या इत्यादी पुरविण्यात आलेल्या आहेत का, याची पाहणी करून याकरिता अग्निविरोधक साहित्य वापरले आहे किंवा नाही, याची तपासणी करणे.
 
१६) इमारतीमध्ये वर अथवा समांतर बाजूला आग पसरणार नाही, याची काळजी घेऊन विद्युत वायरिंग/केबल वाहिनीकरिता वापरलेले मार्ग सिलबंद केलेले आहेत किंवा नाही, याची तपासणी करणे.
 
१७) इमारतीमधील वहिवाटदारांचा भार इमारतीच्या प्रकाराप्रमाणे तपासणे.
 
१८) इमारतीमधील अग्निप्रवण वस्तूंचा भार इमारतीच्या प्रकाराप्रमाणे तपासणे.
 
१९) इमारतीमध्ये आगीच्या घटनेच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या विद्युत यंत्रणेची माहिती करून देणे.
 
२०) आगीच्या घटनेच्या वेळी दळण-वळण/संवादासाठी पुरविण्यात आलेल्या यंत्रणेबद्दलची तपासणी करणे.
 
२१) आगीच्या घटनेच्या वेळी निकासनाकरिता असलेल्या इमारतीतील मार्गिका योग्य आहेत का? याची तपासणी करणे.
 
२२) इमारतीसाठी असलेल्या रस्ते, मार्गिका तसेच इमारतीभोवतालची मोकळी जागा कायदे व नियमाप्रमाणे योग्य आहे का याची पाहणी करणे.
 
२३) योग्य प्रकारचे माहिती फलक योग्य ठिकाणी लावले आहेत का, याची तपासणी करणे.
 
२४) ‘अ‍ॅक्टिव्ह’ व ‘पॅसिव्ह’ प्रकारच्या सर्व यंत्रणा योग्य आहेत का व त्यांचे संरक्षण व देखभाल योग्य प्रकारे केली जाते का हे तपासणे.
 
२५) अग्निशमन यंत्रणा, डिटेक्टर यंत्रणा यांची तपासणी, आणीबाणीच्या वेळेसाठी आखण्यात आलेल्या योजना व त्याचा सराव, अग्निशमन यंत्रणेबाबतचे प्रशिक्षण इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी योग्य प्रकारे नोंदणी पुस्तकात नोंदविल्या आहेत का ते तपासणे व याबद्दल मार्गदर्शन करणे.
 
२६) आपत्कालीन योजना, निकासन योजना, ‘मॉक-अप-ड्रिल’ इत्यादीची माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन करणे.
 
२७) इमारतीकरिता लागणाऱ्या अग्निसुरक्षेबाबतच्या शासकीय परवानगीबाबतचे दस्तावेज तपासणे व त्रुटी असल्यास ज्ञात करून देणे.
 

अग्निसुरक्षा तृतीयपक्षी लेखा परीक्षणाची कार्यपद्धती
 
१) लेखा परीक्षकाने सर्वप्रथम इमारत व परिसराची प्राथमिक पाहणी करावी.
 
२) इमारत व परिसराचे नकाशे तपासावेत.
 
३) सर्व सरकारी/निम-सरकारी विविध मान्यतेची कागदपत्रे तपासावीत.
 
४) विविध अग्निशमन यंत्रणा व त्यासंबंधीच्या देखरेखीची नोंदणी पुस्तिका तपासाव्यात.
 
५) विविध नोंदणी पुस्तिकेच्या आधारे इमारतीतील विविध भागातील कर्मचाऱ्यांशी वार्तालाप करावा व वेगवेगळ्या नोंदणी पुस्तिकेनुरूप कार्यपद्धतीचे अनुसरून केले जाते की नाही, याचा अंदाज घ्यावा.
 
६) इमारत व परिसराच्या नकाशाच्या आधारे व अग्निशमन यंत्रणेच्या कायदा/नियमावलीला अनुसरून अग्निसुरक्षेबाबत पूर्णपणे परत एकदा इमारतीतील योग्य व्यक्तीबरोबर सखोल पाहणी करावी व अग्निशमन यंत्रणेतील उणिवांची चर्चा करून त्या निदर्शनास आणून द्याव्यात.
 
७) अग्निशमन ‘अ‍ॅक्टिव्ह’ व ‘पॅसिव्ह’ दोन्ही प्रकारांतील यंत्रणेचे अग्निशमन कायदा व नियमानुसार योग्य ते मूल्यमापन करावे व त्रुटी असल्यास निदर्शनास आणून द्याव्यात.
 
८) अग्निशमन यंत्रणा अग्निशमन प्रशिक्षण व कर्मचाऱ्यांचे ज्ञान याबाबत रहिवासी व कर्मचारी यांच्याशी वार्तालाप करून त्रुटी जाणून घ्याव्यात व निदर्शनात आणून द्याव्यात.
 
९) अग्निशमन यंत्रणेबाबत सुधारात्मक शिफारसी असल्यास त्या निदर्शनात आणून द्याव्यात.
 
१०) कायदा व नियमामध्ये पूर्तता करण्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात.
 
११) आपत्कालीन निकासन योजना, ‘मॉक-ऑफ-ड्रिल’, आपत्कालीन प्रतिसाद कार्यसंघ यांच्याबद्दल माहिती घेऊन जरुरी असल्यास योग्य ते मार्गदर्शन करावे.
 
१२) अग्निसुरक्षा जोखीम व्यवस्थापन पद्धतीमध्ये जरुरी असल्यास बदल सुचविणे.
 
१३) अग्निसुरक्षा लेखा परीक्षणाचा विस्तृत अहवाल सादर करून त्या संस्थेला जरुरी असल्या पाठपुरावा करून मार्गदर्शन करावे.
 

अग्निसुरक्षा तृतीयपक्षी लेखा परीक्षकाचा अनुभव
 
अग्निसुरक्षेबाबत लेखा परीक्षण करणाऱ्या परीक्षकाला या क्षेत्रातील अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अशा प्रकारचे अग्निसुरक्षा परीक्षण फक्त पडताळणी सूचीवरून योग्य प्रकारे होऊ शकत नाही, यासाठी या क्षेत्रातला दीर्घ अनुभव, अग्निसुरक्षा यंत्रणेबाबतचे सखोल ज्ञान, अग्निशमन यंत्रणेच्या वापराची पद्धतीची सखोल माहिती, इमारतीमधील धोके ओळखण्यासाठीचे ज्ञान व चौफेर चौकस नजर, अग्निशमनाबाबतच्या कायदा व नियमाबाबतचे सखोल ज्ञान, प्रत्येक राज्य व शहराला लागू असणारे विविध कायदा व नियम, राष्ट्रीय इमारत संहितेबद्दलचा सखोल अभ्यास इत्यादींची माहिती व अनुभव असणे आवश्यक आहे.
 
तृतीयपक्षी लेखा परीक्षण हे इमारत व त्याच्या परिसरातील धोके व अग्निसुरक्षा यंत्रणा याचे मूल्यांकन करण्याचे एक प्रभावी साधन आहे. ज्या जोगे आगीचे धोके ओळखून व सद्यःस्थितीतील अग्निसुरक्षिततेची माहिती प्राप्त करून योग्य ती उपाययोजना करणे शक्य आहे. ज्या जोगे धोक्याची तीव्रता कमी अथवा नाहीशी करता येते, तसेच आपल्या इमारतीतील रहिवासी आणि कर्मचारी यांना योग्य प्रशिक्षण देऊन कुठल्याही आगीच्या घटनेच्या वेळी योग्य अग्निशमन उपकरणे वापरून आगीवर तत्काळ नियंत्रण प्राप्त करता येऊ शकते. तसेच योग्य प्रकारे निकासनही करून सर्वांचे जीव वाचविणे शक्य होते.
 


महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन संरक्षक नियम २००९


अग्निसुरक्षा ही राज्य शासनाची जबाबदारी असून, हा विभाग राज्य शासनाच्या अखत्यारित येतो. त्याला अनुसरून महाराष्ट्र शासनाने २००६ साली अग्निशमन कायदा अस्तित्वात आणला असून, त्याबाबतचे नियम २००९ पासून लागू करण्यात आलेले आहेत. या कायदा व नियमानुसार ‘राष्ट्रीय इमारत संहिता’ व काही शहराने प्रकाशित केलेले विकास नियंत्रण नियमावलीचे पालन करणे त्यामध्ये निदर्शलेल्या वसाहतींना/इमारतींना बंधनकारक आहे. या कायदा व नियमाच्या प्रकाशनानंतर त्याची अंमलबजावणी करताना अग्निशमन दलाला तसेच या कायद्याचे पालन करताना अनेक वसाहतींना/इमारतींना काही अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यामध्ये काही बदल करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केलेली आहे.
 

उदाहरणच द्यायचे झाले, तर हा कायदा २००६ साली अस्तित्वात आला. परंतु, यामध्ये अग्निसुरक्षा तृतीयपक्षी लेखा परीक्षणाबाबत उल्लेख नाही. याचे कारण ‘राष्ट्रीय इमारत संहिता २००५’ची सुधारित श्रेणी २०१६ला प्रसिद्ध झाली व त्यामध्ये या अग्निसुरक्षा तृतीयपक्षी लेखा परीक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. संचालक-महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांनी विविध परिपत्रकाद्वारे ही अग्निसुरक्षा तृतीयपक्षी लेखा परीक्षणाचे अधिकार लायसन्स प्राप्त अभिकरणांना, तसेच अग्निशमन दलातील अनुभवी अधिकाऱ्यांना व स्थानिक प्राधिकरणे व नियोजन प्राधिकरणे यांच्या वर्गवारीवर देण्यात आलेले आहेत. परंतु, लायसन्स प्राप्त अभिकरणांना देण्यात आलेल्या या अधिकाराबद्दल मतभिन्नता आढळून येते किंवा असे म्हणता येईल की, अग्निशमन कायद्यातील लायसन्स प्राप्त अभिकरण म्हणून मान्यता मिळविण्याच्या पद्धतीलाच बऱ्याच जणांचा आक्षेप आहे.
 
 
लायसन्स प्राप्त अभिकरण म्हणजे इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा स्थापित करणारी संस्था. कायद्यामध्ये लायसन्स प्राप्त अभिकरणाची तीन प्रकारांत विभागणी केलेली आहे. हायड्रट्स, स्पिंकलर्स इत्यादी अग्निशमन यंत्रणा बसविणारी संस्था, आगनिरोध आणि विभक्तीकरण यंत्रणा बसविणारी संस्था व स्थायी संरक्षण जसे केबल संरक्षक, अग्निशमन दरवाजे इत्यादी बसविणारी संस्था याचा अर्थ या तिन्ही संस्थांचा कामाचा अनुभव वेगवेगळा आहे. परंतु, तृतीयपक्षी अग्निलेखा परीक्षण करणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला या सर्व तिन्ही क्षेत्रातील अनुभव व माहिती असणे, तसेच अग्निशमनाबाबतचे इतर कायदे व नियम, राष्ट्रीय इमारती संहितेबद्दल सखोल ज्ञान इत्यादी असणे आवश्यक असते. त्यामुळे या लायसन्स प्राप्त अभिकरणाद्वारे सखोल अग्निलेखा परीक्षण होईल किंवा नाही, ही शंका बऱ्याच जणांच्या मनात आहे.
 
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्निशमन यंत्रणा बसविणाऱ्या संस्था या पूर्णपणे व्यावसायिक असतात, त्यामुळे स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी या अग्निलेखा परीक्षणाचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता जास्त असून, अचूक अग्निलेखा परीक्षण हे अशा संस्थांकडून होईल का नाही, हीसुद्धा शंका चर्चिली जाते. त्याप्रमाणे वर उल्लेखलेल्या अग्निशमन कायदा व नियमामध्ये लायसन्स प्राप्त अभिकरणाची परवानगी मिळविण्यासाठी जे नियम आखून देण्यात आलेले आहेत, त्यात सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मागील तीन वर्षांत केलेल्या कामाचा वार्षिक खर्च जो वेगवेगळ्या लायसन्स प्राप्त अभिकरणासाठी वेगवेगळ्या प्राधिकरणानुसार असून २५ लाखांपासून पाच कोटींपर्यंत आहे. याचा अर्थ असा आहे की, कुठलाही अनुभवी, अग्निशमन क्षेत्राशी निगडित व्यक्ती महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत तीन वर्षांच्या कामाचा वार्षिक खर्च वरीलप्रमाणे दाखवित नाही, त्याला लायसन्स प्राप्त अभिकरणाचे अधिकार मिळत नाहीत.
 
नव्या व्यावसायिकाची मुख्य अडचण तर अशा प्रकारचे अग्निशमन यंत्रणा बसविण्याचे काम प्राप्त करणे. एखाद्या नवीन अग्निशमन क्षेत्राशी निगडित व्यक्तीला या क्षेत्रात यायचे असेल, तर लायसन्स प्राप्त अभिकरणाची परवानगी नसल्यामुळे अग्निशमन यंत्रणा बसविण्याचे काम मिळणे कठीण होते. त्याचप्रमाणे अग्निशमन यंत्रणेच्या देखभालीचेसुद्धा काम मिळत नाही. कारण कायद्याप्रमाणे वर्षातून दोनदा अग्निशमन यंत्रणा योग्य आहे याचा दाखला (बी फॉर्म) देण्याचे अधिकारसुद्धा लायसन्स प्राप्त अभिकरणालाच आहेत. ज्यामुळे एखादा नवखा व्यावसायिक या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित असेल, तर त्याला ओळखीनेच याप्रकारचे काम घ्यावे लागते व चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याचा दाखला वापरून लायसन्स प्राप्त अभिकरणासाठी लागणारा तीन वर्षांचा खर्चाचा अनुभव जमा करावा लागतो. या सर्वांचा विचार करून राज्य शासनाने तृतीयपक्षीय अग्निपरीक्षणासाठी ठरावीक अग्निशमन क्षेत्रातील अनुभव तसेच शिक्षण निश्चित करून अथवा प्राथमिक परीक्षा घेऊन असे अधिकार दिले पाहिजेत, जेणेकरून योग्य प्रकारे इमारतीचे तृतीयपक्षी अग्निपरीक्षण होईल, अथवा राज्य शासनाने छोटा अभ्यासक्रम तृतीयपक्षीय अग्निसुरक्षा परीक्षण या विषयाला धरून आयएसओ ९००१, आयएसओ ४५००१, आयएसओ १४००१च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र अग्निशमन प्रशिक्षण’ संस्थेमध्ये चालू केला पाहिजे व त्याचप्रमाणे अग्निशमन कायदा व नियमामध्ये योग्य ते बदल केले पाहिजेत.
 
अग्निशमन दलाच्या वाढत्या कामाचा बोजा व अधिकारी वर्गाची फार मोठ्या प्रमाणात कमतरता याचा विचार करून, तसेच आगीच्या घटना व मृत्यूची संख्या यांचा वाढता क्रम पाहून तृतीयपक्षी अग्निपरीक्षण ही राष्ट्रीय इमारत संहितेमधील सूचना कठोरपणे राबविण्याची गरज आहे. तसेच नुसतीच तृतीयपक्षी अग्निपरीक्षण करून चालणार नसून, या अग्निपरीक्षणामध्ये दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याचे बंधन अग्निशमन कायद्यामार्फत इमारतींना व संस्थांना करणे आवश्यक आहे, तेव्हाच अग्निसुरक्षित महाराष्ट्र म्हणून आपण अभिमानाने सर्वांना सांगू शकू व इतर राज्यांसाठी हा एक आदर्श निर्माण करू शकू.
 
- सुभाष राणे
(लेखक मुंबईतील अग्निशमन विभागातील
निवृत्त अग्निशमन अधिकारी आहेत.)
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@