सुंदर हसतमुख अभिनेत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2021
Total Views |

Durga Khote_1  
 
 
 
 
हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या ठसठशीत अभिनयाने रजत पडदा गाजवून अनन्यसाधारण स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजेच दुर्गा खोटे...
 
 
या अभिनेत्री चित्रपटात आल्या, तो काळ स्टुडिओ सिस्टीमचा होता. त्या काळात कलाकारांना व तंत्रज्ञानाला महत्त्व नव्हते. चित्रपटाचा गौरव आणि बोलबाला व्हायचा तो ज्या फिल्म कंपनीने तो निर्मिला त्या कंपनीचाच. कारण सारे कलाकार, तंत्रज्ञ चित्रपट कंपन्यांमध्ये पगारदार नोकर असत. ही पद्धत सर्वप्रथम मोडून काढली या अभिनेत्रीने. त्यांनी १९३३ साली देवकी बोस यांच्या दिग्दर्शनाखाली ‘राजरानी मीरा’ या चित्रपटामध्ये कोलकाता येथे काम केले व त्यानंतर १९३४ साली ‘सीता’, १९३५ साली ‘जीवन नाटक’ या दोन चित्रपटांत नायिकांच्या भूमिका करून त्यांनी केवळ बंगालमध्येच नव्हे, तर साऱ्या भारतभर लोकप्रियता मिळवली. त्यांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की, ‘प्रभात’ फिल्म कंपनीने या अभिनेत्रीला पुनश्च ‘अमरज्योती’ या हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी मुद्दाम बोलावून घेतले. स्त्रियांवर झालेले अत्याचार तेवढ्याच तडफेने परतवून लावून पुरुषांना आपल्या कह्यात ठेवणारी तेजस्विनी त्यांनी ‘अमरज्योती’मध्ये अत्यंत परिणामकारकरीत्या उभी केली होती. या चित्रपटामुळे या अभिनेत्रीचा लौकिक आणखीच वाढला. तरीही ‘प्रभात’मध्ये न राहता त्यांनी इतरत्र काम करणे अधिक पसंत केले. त्यामुळेच १९३७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शालिनी सिनेटोन’च्या कलामहर्षी बाबूराव पेंटर दिग्दर्शित ‘प्रतिभा’ या हिंदी-मराठी चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा आपले अभिनयसामर्थ्य दाखवून दिले. अशा हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या ठसठशीत अभिनयाने रजत पडदा गाजवून अनन्यसाधारण स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजेच दुर्गा खोटे.....
 
 
मराठी रंगभूमीवरील आणि चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी, १९०५ रोजी मुंबई इथे झाला. त्यांचे वडील पांडुरंग लाड हे व्यवसायाने बॅरिस्टर होते. त्यांच्या आईचे नाव मंजुळाबाई. त्यांचे पाळण्यातील नाव होते विठा. लहानपणी त्यांना कौतुकाने बेबी या नावाने संबोधत असत. नंतर त्यांना सर्व जण बानू म्हणू लागले. दुर्गाबाईंचे शालेय शिक्षण कॅथिड्रल हायस्कूलमध्ये झाले. त्यांना शालेय वयापासून अभिनयात रस होता. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. १९२३ साली विश्वनाथ खोटे यांच्याशी त्यांचा विवाह झाला व लग्नानंतर त्यांचे नाव दुर्गा खोटे असे झाले. मात्र, त्याच वेळी विवाह झाल्याने त्या ते शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व होते. विवाहानंतर काही कालावधीत दुर्गाबाईंनी घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे चित्रपटांत काम करण्याचा निर्णय घेतला. मोहन भवनानींच्या ‘फरेबी जाल’ या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा छोटीशी भूमिका मिळाली. या चित्रपटातील काही भाग बोलका होता. पण, हा चित्रपट चालला नाही. त्यावेळी चित्रपटांमध्ये सहसा स्त्रिया काम करीत नसत. अशावेळी एका कुलीन घरातल्या स्त्रीने चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे त्यांना समाजातील काही लोकांची टीकाही सहन करावी लागली. पुढे ‘प्रभात’ फिल्म कंपनीच्या व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्याच बोलपटात त्यांना तारामतीची भूमिका मिळाली. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटांतील गाणी त्यांनी स्वत: गायली होती. त्यांनी गायिलेली ‘बाळा का झोप येईना’, ‘आनंद दे अजी सुमन लीला’, ‘बाळ रवि गेला’ ही गाणी त्या वेळी अतिशय लोकप्रिय झाली. पुढच्या ‘मायामच्छिंद्र’ या चित्रपटात त्यांनी एका योद्धा स्त्रीची भूमिका केली होती. हे दोन्ही चित्रपट खूप गाजले. या चित्रपटांमुळे दुर्गाबाईंना प्रसिद्धी मिळाली.
 
 
वाढती लोकप्रियता आणि धोरणी तसेच संवेदनशील दिग्दर्शक व्ही. शांताराम, देवकी बोस यांच्या दिग्दर्शनाचा सहवास लाभल्यामुळे दुर्गा खोटे यांनी आत्मविश्वासाने चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे ठरवले. ‘नटराज फिल्म’ या नावाची चित्रपटसंस्था स्थापन करून ‘सवंगडी’ (मराठी) व त्याची हिंदी आवृत्ती ‘साथी’ हा चित्रपट काढायला घेतला. त्यासाठी दादा साळवी, मुबारक, नायमपल्ली यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार निवडले. दिग्दर्शनासाठी पार्श्वनाथ अळतेकर या ज्येष्ठ दिग्दर्शकाची निवड केली. निष्णात संगीतकार गोविंदराव टेंब्ये यांच्याकडे संगीताचा भार सोपवला. नायिकेची भूमिका दुर्गाबाई स्वतःच करणार होत्या. सर्व गोष्टी योग्यरीत्या जमून आल्या होत्या. पण, दुर्गाबाईंनी चित्रपटाच्या नायकाची भूमिका अनुभवी कलाकाराला न देता अप्पा पेंडसे नावाच्या पत्रकाराला दिली. त्यांना अभिनयाचा बिलकूल सराव नव्हता; त्यामुळे १९३८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांची पसंतीची पावती न मिळाल्याने ‘साथी’ व ‘सवंगडी’ हे दोन्हीही चित्रपट पडले, त्यामुळे दुर्गाबाईंना खूप कर्ज झाले. त्यांनी चित्रपटनिर्मिती बंद करून पुन्हा एकदा केवळ अभिनयावर लक्ष केंद्रित केले.
 
 
या काळातल्या ‘सिर्को प्रॉडक्शन’चा ‘गीता’, ‘प्रकाश पिक्चर्स’चे ‘नरसी भगत’ व ‘भरत भेट’, ‘पांचोली आर्टस्’ (लाहोर)चे ‘खानदान’ व ‘जमीनदार’, सोहराब मोदी यांच्या ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’निर्मित ‘पृथ्वीवल्लभ’, भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘महारथी कर्ण’, के. असीफ यांचा पहिला चित्रपट ‘फूल’ वगैरे चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले. १९४१ साली अत्रे पिक्चर्सचा ‘पायाची दासी’ व त्याची हिंदी आवृत्ती ‘चरणों की दासी’ प्रदर्शित झाले. नायिका म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही दुर्गाबाईंनी या चित्रपटात खाष्ट सासूची भूमिका अत्यंत ठसकेबाजपणे केली होती. त्या चित्रपटामुळे त्यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी स्वागत केले खरे. पण, या चित्रपटामुळेच त्यांच्यावर चरित्र अभिनेत्री असा शिक्का बसला गेला व त्यानंतर त्यांना नायिकेच्या भूमिका मिळणेच बंद झाले. तरीही दुर्गाबाईंनी बदलत्या काळात चरित्र अभिनेत्रीच्या अनेक भूमिका आपल्या अभिनयाने सजीव केल्या. त्यामध्ये ‘प्रभात’ फिल्म कंपनीचा ‘हम एक हैं’, ‘नर्गिस आर्ट’ कंपनीचा ‘अंजुमन’, ‘मायाबाजार’, ‘सीता स्वयंवर’, ‘मगरूर’, ‘आराम’, ‘हम लोग’, ‘चाचा चौधरी’, ‘शिकस्त’, ‘परिवार’, ‘भाभी’, ‘मुसाफिर’, ‘परख’, ‘अनुपमा’, ‘देवर’, ‘दादी माँ’ अशा अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटातील महाराणी जोधाबाईच्या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले होते.
 
 
‘बेंगॉल फिल्म जर्नालिस्ट’ असोसिएशनतर्फे त्यांना ‘पायाची दासी’, ‘प्रकाश पिक्चर्स’चा ‘भरत मिलाप’ या चित्रपटांतील भूमिकांबद्दल पारितोषिक देऊन गौरवले होते. तसेच १९७० साली महाराष्ट्र राज्य चित्रपट पारितोषिक समारंभातसर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून ‘धरतीची लेकरं’ या चित्रपटासाठी सन्मानित केले होते. दुर्गा खोटे यांनी काही मोजक्या भूमिकांनी मराठी रंगमंचही गाजवला. नटवर्य नानासाहेब फाटक यांच्याबरोबर त्यांनी शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ या जगप्रसिद्ध नाटकाचा मराठी अवतार ‘राजमुकुट’मध्ये काम केले होते. त्याची खूपच प्रशंसा झाली. ‘मुंबई मराठी नाट्यसंघ’ आणि ‘इप्टा’ या अग्रगण्य नाट्यसंस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. दुर्गा खोटे यांनी ‘आर्ट फिल्म’ आणि ‘दुर्गा खोटे प्रॉडक्शन’ या दोन संस्था स्थापन करून त्याद्वारे शेकडो लघुपट, माहितीपट व जाहिरातपट सादर केले. त्यातले काही कृष्णधवल होते, तर काही सप्तरंगात. १९८८ साली त्यांनी ‘वागळे की दुनिया’ ही दूरदर्शन मालिकाही तयार केली व ती खूप लोकप्रिय झाली. दुर्गाबाईंचे वैयक्तिक आयुष्य फारसे सुखावह नव्हते. त्यांनी दोन विवाह केले. पहिले लग्नायुष्य फारच अल्पकाळ टिकले. दुसरे तर प्रेमलग्नच होते. त्यासाठी त्यांनी मुसलमान धर्मही स्वीकारला आणि आपले नाव बदलले. पण, चित्रपटक्षेत्रात मात्र त्यांनी दुर्गा खोटे हेच आपले नाव कायम ठेवले. दुर्गा खोटे यांनी १९८९ साली लिहिलेल्या ‘मी-दुर्गा खोटे’ या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा अत्यंत कुशलतेने परिपूर्ण आढावा घेतला आहे. त्यांचे आत्मचरित्र आणि त्यांनी अभिनय केलेले काही चित्रपट अजूनही दुर्गा खोटे यांच्या कलापूर्ण जीवनाची ओळख करून देतात. ‘गीता’, ‘विदूर’, ‘जशास तसे’, ‘मोरूची मावशी’, ‘सीता स्वयंवर’, ‘मायाबाजार’ यांसारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. २०० पेक्षा अधिक चित्रपटांत त्यांनी नायिकेच्या व चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका केल्या. ‘मुगल-ए-आझम’, ‘नरसी भगत’, ‘बावर्ची’, ‘खिलौना’, ‘बॉबी’ या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या चरित्र भूमिका खूप गाजल्या.
 
 
दुर्गाबाईंचा मराठी रंगभूमीशीही निकटचा संबंध होता. ‘बेचाळीसचे आंदोलन’, ‘कीचकवध’, ‘भाऊबंदकी’, ‘शोभेचा पंखा’, ‘वैजयंती’, ‘खडाष्टक’, ‘पतंगाची दोरी’, ‘कौंतेय’, ‘संशयकल्लोळ’ इ. नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या; तर ‘वैजयंती’, ‘कौंतेय’, ‘पतंगाची दोरी’, ‘द्रौपदी’ इ. नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. अखिल भारतीय नाट्यस्पर्धेत ‘भाऊबंदकी’ हे नाटक सर्व भाषांतील नाटकांत सर्वोत्तम ठरले होते. दुर्गाबाईंनी त्यात आनंदीबाईंची प्रभावी भूमिका केली होती. मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांतून त्यांनी काम केले. दुर्गाबाईंची चित्रपटातील व नाट्यसृष्टीतील कामगिरी लक्षात घेऊन संगीत नाटक अकादमीने १९५८ साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला, तर १९६८ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले. दिल्लीमध्ये भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. मराठी नाट्यपरिषदेतर्फे विष्णुदास भावे सन्मानपदक त्यांना देण्यात आले होते. अलाहाबाद येथील महाराष्ट्र मित्रमंडळ व साहित्य संमेलन या मान्यवर संस्थांच्या विद्यमाने त्यांचा ३१ जानेवारी, १९७० रोजी भव्य सत्कार झाला होता. १९७४च्या ‘बिदाई’ चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार देण्यात आला. १९८३ साली त्यांना दादासाहेब ‘फाळके पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. १९३१ मध्ये सुरू झालेला त्यांचा चित्रपट प्रवास अनेक दशकं प्रेक्षकांना सुखावत राहिला. या अप्रतिम अभिनेत्रीने २२ सप्टेंबर, १९९१ रोजी जगाचा निरोप घेतला. पण, त्यांनी आपल्या विलोभनीय अभिनयाने गाजवलेल्या नाटक आणि चित्रपटांमुळे त्या अजूनही रसिकांच्या हृदयात मानाच्या स्थानावर विराजमान आहेत. आपल्या नाट्य-चित्रपट सृष्टीच्या प्रवासात महिला कलाकारांना मानाचा दर्जा प्राप्त करून देणाऱ्या या सुंदर हसतमुख अभिनेत्रीला मानाचा मुजरा.....
 
 
- आशिष निनगुरकर
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@