अश्वेतवर्णीय आणि माओवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2021   
Total Views |
USA _1  H x W:
 
काळ्या कपड्यातल्या २०० कम्युनिस्टांनी अमेरिकेतील पोर्टलॉड येथील डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयावर नुकताच हल्ला चढवला. पक्षाच्या वास्तूची तोडफोड केली, नुकसान केले, अशी बातमी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने प्रकाशित केली.
 
 
या घटनेमध्ये पक्षाच्या कार्यालयाचे नुकसान झाले. या लोकांनी घोषणा दिल्या, “बायडन नाही, बदला हवा” इतकेच नव्हे, तर यांनी काही मागण्याही केल्या आहेत. जसे की, अमेरिकेत सीमा शुल्क बंद करावे, अमेरिकन राज्यातील सीमा नष्ट कराव्यात, पोलीस यंत्रणा नको, अमेरिकेत तुरुंगही नकोत, तसे राष्ट्राध्यक्षही नकोत, अशा मागण्या करत काळ्या कपड्यातल्या २०० अश्वेतवर्णीय लोकांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला.
 
 
अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर खदखदत असलेला श्वेत-अश्वेतवर्णीय वाद आता उफाळून आला. अर्थात, त्याला चीनच्या कारवायांची फूस आहे हे नक्कीच. कारण, ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी चीन आणि त्याच्या मांडलिक राष्ट्रांना चांगलेच आवाहन उभे केले होते. चीनच्या अतिक्रमणवादी वृत्तीवर ट्रम्प प्रशासनाने संसदेत अनेकदा टीका केली होती. तिबेट, तैवान आणि हाँगकाँग यांना आपलेच म्हणणारा चीन कायम त्रास देतो.
 
 
अमेरिकेने याबाबत चीनला विरोध केला, तसेच भारत-चीन आणि पाकिस्तान या संबंधामध्ये अनेकदा भारताचे समर्थन केले होते. ट्रम्प यांचा नरेंद्र मोदी यांच्याशी चांगला स्नेहही होता. या आणि इतर अनेक बाबींमुळे चीन नेहमीच आडून आडून अमेरिकेच्या कुरापती काढत असतो. आताही अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात अश्वेतवर्णीयांना कम्युनिस्ट विचारसरणीचे पाईक बनवून त्यांना अमेरिकन प्रशासनाशी लढण्याचे बळ चीनच देत असावा, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
 
 
असो. अमेरिकेमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी अश्वेतवर्णीय आणि श्वेतवर्णीय यांच्या पद्धतशीर दंगली सुरू झाल्या. तसे पाहिले तर ही घटना अमेरिकेतली होती. उद्दामपणे आणि अतिशय दुष्टपणे एका अश्वेतवर्णीयाला मारहाण झाली. हा हा म्हणता ही बातमी वणव्यासारखी पसरली. लगेचच रातोरात हजारो अश्वेतवर्णीय बॅनर्स-पोस्टर्स वगैरे घेऊन रस्त्यावर उतरले. दंगली उसळल्या. दुकाने फोडली गेली, लुटली गेली. ट्रम्प प्रशासन कसे अश्वेतवर्णींयावर अत्याचार करते, इतकेच नाही तर ट्रम्प अमेरिकेला सुरक्षित ठेवू शकत नाहीत, याबाबतच्या बातम्यांचा पाऊस पडला.
 
 
अर्थात, तेव्हाच अमेरिकन निवडणुकीचा निकाल जगाला माहिती झाला होता. ट्रम्प हरणार, असे वातावरण तयार झाले. ट्रम्पला हरवल्यामुळे येणारे नवे सरकार आपल्याला समर्थन देईल, आपल्या वाटेला जाणार नाही, असे कदाचित अमेरिकेत यादवी माजविणार्‍यांना वाटले. आपल्या इथेही तथाकथित पुरोगाम्यांना हर्षवायू झाला. त्यांनाही ट्रम्प नकोसेच होते.
 
 
का? तर त्यांचा नरेंद्र मोदींशी चांगला स्नेह जुळला होता. आता अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष भारताला पूर्वीसारखे सहकार्य करणार नाहीत. चीन आणि पाकिस्तानशी सलोखा ठेवतील. त्यामुळे भारताला तोडण्याचे आपले मनसुबे थोडे का होईना पूर्ण होतील, अशा दिवास्वप्नातही अनेक विद्रोही, दहशतवादी आणि नक्षली विचारवंत होते. पण, ट्रम्प गेले आणि बायडन आले. पण, अमेरिकन प्रशासनाची भूमिका कायम राहिली. ट्रम्पप्रमाणे बायडन यांनीही चीन, पाकिस्तानविरोधातच भूमिका घेतली. तसेच भारताबद्दलही सौहार्दतेची भूमिका घेतली. थोडक्यात, ट्रम्प गेले. पण, त्यांची भूमिका घेऊन बायडन राष्ट्राध्यक्ष झाले.
 
 
ट्रम्पना हटविण्यामध्ये इतके नियोजन, खर्च मेहनत केली होती. पण, चीनपुरस्कृत कम्युनिस्टांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे या सगळ्यांनी आता बायडन यांच्याविरोधातही आंदोलन सुरू केली आहेत. बरं, मागण्या तरी काय? तर राष्ट्राध्यक्ष नको, पोलीस नको आणि तुरुंगही नको. याचाच अर्थ या कम्युनिस्टांना अमेरिकेत प्रशासन आणि कायद्याचे राज्य नकोच. हवी आहे फक्त अराजकता.
 
 
जी अराजकता ते भारतात माजविण्याचा प्रयत्न करतात, कधी ‘सीएए’ तर कधी दिल्लीच्या खोट्या शेतकरी आंदोलनातून, तर कधी कोरेगाव-भीमा प्रकरणातून. पण, भारत या सगळ्या माओवाद्यांना पुरून उरतो. अमेरिकेनेही वर्णभेदाच्या जाळ्यात न फसता, हे आंदोलन कायदेशीररीत्या मोडून टाकावे. अमेरिकन म्हणून श्वेत आणि अश्वेत नागरिकांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सर्वचस्तरातील नुसती समानता नव्हे, तर समरसता आणावी, हाच उपाय आहे.



@@AUTHORINFO_V1@@