कोरोना लसींच्या पुरवठा करण्यासाठी भारत सक्षम
मुंबई - भारतात कोरोना लसीच्या लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत आता आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारतमध्ये तयार केलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींना जगभरातून मागणी वाढत आहे. त्यामुळे लस उत्पादनानंतर भारत आता लस पुरवठा करणारा प्रमुख देश म्हणून समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर जगातील ९२ देशांनी भारताकडे या लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
ऑक्सफोर्डच्या कोविशिल्ड लसीच्या सीरम संस्थेव्दारे देशी लस तयार केली जात आहे. तर कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन इंडिया बायोटेक कंपनी करत आहे. भारतात १६ जानेवारीपासून या दोन्ही लसींच्या लसीकरणाची महामोहिम सुरू आहे. या लसींचा दुष्परिणाम झालेली फार तुरळक घटना समोर आल्या आहेत. अलीकडे असे अहवाल प्राप्त झाले आहेत की, चीनी लस ही फार प्रभावी नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताने तयार केलेल्या लसीची जागतिक मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे काही देशांनी भारत सरकारकडे याची मागणी केली आहे. तर काही देश थेट लस विकसक कंपन्यांना आपले आॅर्डर पाठवत आहे. वृत्तानुसार, डोमिनिकन रिपब्लिक भारताच्या लसीमध्ये मोठी रस दाखवत आहे. पंतप्रधान रुझवेल्ट स्कर्ट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी या लसी आपल्या देशात पाठवण्याची विनंती केली आहे.त्यांनी पत्रात म्हटले आहे की, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की मला लस पाठवा जेणेकरुन आम्ही आपल्या लोकांना साथीच्या आजारापासून वाचवू शकू.
डोमिनिकन रिपब्लीकच्या अगोदर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सनारो यांनी पंतप्रधान मोदींना या लसी संदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रानंतर ब्राझीलचे विमानही कोरोना लस घेण्यासाठी भारतात पोहोचले आहे. याव्यतिरिक्त, बोलिव्हिया सरकारने ५ लाख डोस कोरोना लसींसाठी सीरम संस्थेशी करार केला आहे. या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, जपान, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि थायलंड या देशांकडूनही भारताकडे मागणी झाली आहे.
शेजारील देशांना प्रथम प्राधान्य
भारत सरकार प्रथम नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारसह शेजारील देशांना लसींचा पुरवठा करणार आहे. याबाबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विट केले होते की, नेपाळला प्रथम भारतीय लस मिळाली. आम्ही प्रथम शेजारी देशांना मदत करणार आहोत. लवकरच ही लस शेजारील देश भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशल्सना पुरविली जाईल. भारताने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निर्मित कोव्हिशिल्ड लसींचे 1,50,000 डोस भूतानला पाठवले आहेत. मालदीवमध्ये 1,00,000 डोस पाठविण्यात आहेत. याशिवाय शुक्रवारी कोव्हशिल्डच्या सव्वा दशलक्ष डोस म्यानमारला पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.