
सांगली : 'मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते...' असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची ईच्छा बोलून दाखविली आहे. इस्लामपूर येथे एका कार्यक्रमात जयंत पाटील यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतची ईच्छा व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असेही पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहात असल्याचे ते त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जास्त भावते, अशी भावनाही जयंत पाटलांनी केली व्यक्त.तसेच दीर्घकाळ राजकारणात काम करणान्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. मात्र आमच्या पक्षाकडे सध्या हे पद नाही. प्रथम पक्ष व आमदारांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यानंतर पवारसाहेब जो निर्णय देतील, तो निर्णय आम्हास मान्य असेल.