शिक्षक जेव्हा ‘हॉटेलियर’ होतो तेव्हा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2021   
Total Views |
patil  _1  H x
 
 
‘आपण भलं, आपलं काम भलं’ अशाप्रकारचा ‘अ‍ॅटिट्यूड’ अनेकांचा असतो. आपल्या कामाव्यतिरिक्त कोणतेच काम आपल्याला जमणार नाही, असा काहीसा त्यांचा समज असतो. पण, काही माणसे खूप वेगळी असतात. प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, काहीतरी नवीन करुन दाखवण्याची ऊर्मी हे सारे गुण एकत्र आले की, ते असं काही करुन जातात की ते इतरांसाठी निव्वळ कल्पनातीत असतं. हे सर्व वर्णन पाटील कुटुंबीयांसाठी चपखल बसतं.
 
 
विशेषत: शिक्षकीपेशा असणारे पाटील हॉटेल सुरू करतील, असं स्वत: त्यांनासुद्धा वाटलं नव्हतं. मात्र, ते या पेशात आले आणि त्यांनी चित्रच बदलून टाकलं. ‘पावभाजी खावी तर हॉटेल नंदा’ची एवढी खवय्यांची दाद त्यांनी मिळवली. १९८५ मध्ये सुरू झालेला त्यांचा हा प्रवास अव्याहतपणे सुरु आहे. शिक्षक ते हॉटेलचालक हा प्रवास आहे, ‘हॉटेल नंदा’चे मालक दिनकर शंकर पाटील यांचा.
 
 
साधारणत: साठच्या दशकात पाटील गुरुजी मुंबईत आले. मूळचे पोयनाड, अलिबागचे हे दिनकर शंकर पाटील. पोहणे हा त्यांचा आवडता छंद. धरमतर खाडी ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर त्यांनी लीलया पोहून पार केले होते, असे त्यांचे चिरंजीव अजय पाटील सांगतात. त्या काळच्या प्रथेनुसार ‘इंटर’पर्यंत शिक्षण झालं. पुढे शारीरिक शिक्षण शिकवणारे शिक्षक म्हणून ते काळाचौकीच्या शिवाजी विद्यालयात रुजू झाले.
 
 
१९६९च्या दरम्यान ते मुंबई महानगपालिकेच्या शाळेत ‘पीटी पर्यवेक्षक’ म्हणून रुजू झाले. मात्र, शिवाजी विद्यालयात ते अर्धवेळ नोकरी करतच होते. त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी त्यांना संसारात खंबीर साथ दिली. महात्मा फुलेंनी सावित्रीमाईला शिकवले आणि भारतीय स्त्री शिकू लागली. हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पाटील सरांनी सुनंदाबाईंना हस्तकलेचे प्रशिक्षण दिले. त्या हस्तकलेच्या शिक्षिका म्हणून शिकवू लागल्या.
 
या शिक्षक दाम्पत्यास एकूण तीन अपत्ये. दोन मुलगे आणि एक मुलगी. मोठा अजय, मधली अमिता आणि सर्वांत धाकटा अभय. सुरुवातीला हे कुटुंब माहिमच्या चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहत असे. प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी असा ‘टर्निंग पॉईंट’ येतो की, पूर्ण आयुष्यच बदलून जाते. पाटील सर ज्या शिवाजी विद्यालयात शिकवत असत, त्या विद्यालयाचे लोकेगावकर गुरुजी मुख्याध्यापक होते.
 
कडक शिस्त आणि प्रशासनावर जरब या गुणांमुळे शाळेत त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांमध्येच नव्हे, तर शिक्षक आणि पालकांमध्येसुद्धा एक आदरयुक्त दरारा होता. या शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी छोटेसे कॅन्टीन होते. ते कॅन्टीन कोणा शेट्टीला वा बाहेरच्या माणसाला देण्याऐवजी ते त्यांनी पाटील सरांना चालवायला दिले. त्यासाठी लोकेगावकर गुरुजींनी पाटील सरांना प्रोत्साहन दिले. लोकेगावकरसारखे मास्तर आपल्यावर एवढा प्रचंड विश्वास टाकत आहेत, ही बाब पाटील सरांसाठी मोठी ठरली. त्यांनी कॅन्टीन चालविण्यास सुरुवात केली.
 
 
याच शाळेत दोन-तीन सभागृहे होती. तिथे विवाह समारंभ व्हायचे. पूर्वीच्या काळी विवाह समारंभात शीतपेये वाटली जात. कालांतराने त्याची जागा आईस्क्रिमने घेतली. ९०च्या दशकानंतर तर ‘बुफे’सारखी पाश्चात्य भोजनाची पद्धत आली. पाटील सरांना या विवाह सोहळ्यासाठी शीतपेये देण्याच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. लहानगा अजय शीतपेये देण्यात बाबांना मदत करायचा. मग हळूहळू आईस्क्रिमचा काळ आला. काही दिवसांनी भोजनाची व्यवस्थादेखील पाटील सर पाहू लागले. त्यासाठी त्यांनी ‘केटरिंग’चा व्यवसाय सुरु केला. लग्न असो वा मुंज किंवा घरगुती वा आणखी कोणती मेजवानी ‘पाटील केटरिंग’ हे नाव विश्वासार्ह मानले जाऊ लागले.
 
 
८०च्या दशकात दिनकर पाटील यांनी दादरमध्ये रानडे रोडवर एक जागा घेतली. रानडे रोड म्हणजे गजबजलेल्या दादरचा सर्वाधिक गजबजलेला रस्ता. साडी असो वा सोने खरेदीची उत्तम दुकाने याच रस्त्यावर उपलब्ध आहेत. त्यामुळे सणासुदीला तर या रस्त्यावर पाऊल ठेवायलासुद्धा जागा नसते एवढी गर्दी येथे पाहायला मिळते. अशा मोक्याच्या जागेवर पाटील सरांना जागा मिळाली. तिथे त्यांनी एक हॉटेल सुरू केले, ‘हॉटेल नंदा.’
 
 
शाकाहारी असूनसुद्धा सुरुवातीपासूनच चवीला प्राधान्य दिल्यामुळे अल्पावधीत हे हॉटेल नावारुपास आले. कोणत्याही गायकाचे एखादे गाणे त्याला एका रात्रीत ‘सुपरस्टार’ बनवते किंवा एखाद्या खेळाडूला एखादा सामना लोकप्रिय करतो. तसंच काहीसं या हॉटेलविषयी घडलं. येथे मराठमोळे सगळे खाद्यपदार्थ मिळतातच, तसेच पंजाबी आणि चायनीज पदार्थदेखील. मात्र, खरी ‘सुपरस्टार’ आहे ती इथली पावभाजी. आजसुद्धा अगदी दूरदूरचे खवय्ये ही पावभाजी खाण्यास खास येतात. इथली मिसळ आणि कुल्फीदेखील तेवढीच प्रसिद्ध आहे.
 
 
दरम्यान, पाटील सरांची मुले शिकून मोठी झाली. अजयने एमएस्सी केले आणि गोव्यात आपला व्यवसाय सुरु केला. अमिताने एम.कॉम पूर्ण केले आणि ती अभ्युदय बँकेत अधिकारी झाली. अभयने हॉटेल व्यवस्थापनाची पदविका प्राप्त केली आणि तो पाटील सरांना व्यवसायात मदत करु लागला. पाटील सरांना दोन्ही सुना लाभल्या त्यासुद्धा शिक्षिकाच. अजय पाटील यांच्या पत्नी अंधेरीच्या ‘भवन्स महाविद्यालया’मध्ये प्राध्यापिका आहेत, तर अभय यांच्या पत्नी माहिमच्या ‘सरस्वती विद्यालया’त शिक्षिका आहेत.
 
‘हॉटेल नंदा’ला उत्तम प्रतिसाद मिळत होता. ते पाहून पाटील सरांनी १९९२ मध्ये अजून एक हॉटेल परळ विभागात सुरू केले ‘नंदा हॉटेल.’ त्या हॉटेलनेदेखील अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. हॉटेल व्यवसायाव्यतिरिक्त ‘केटरिंग’चा व्यवसायसुद्धा जोमाने सुरूच होता. अगदी लोकसभा निवडणुकांसाठी भोजनाची सोयदेखील पाटील यांच्या ‘केटरिंग सर्व्हिस’ने केली आहे. २०२० मध्ये कोरोनाचा फटका एकूणच हॉटेल उद्योगाला बसला. ‘हॉटेल नंदा’सुद्धा यातून गेले. मात्र, पाटील कुटुंब डगमगले नाही. सरकारने नियम शिथील केल्यानंतर त्यांनी ‘फूड काऊंटर’ सुरु केले.
 
 
लोक येथून ‘पार्सल’ घेऊन जात. कोरोनाचे हे दुष्टचक्र संपेल असे काही दिसत नाही. कदाचित हे नियम अजून काही काळ पाळावेच लागणार. भविष्यात आणखी काही असेच दुर्दैव ओढविल्यास सामान्य लोक हॉटेलमध्ये बसून खाण्यापेक्षा पार्सल नेण्यावर भर देतील, हे अभय पाटील यांनी हेरले. त्यांनी आता एक नावीन्यपूर्ण ‘स्नॅक स्टॉल’ सुरु केला आहे. ‘ड्रॅगन रोल’, ‘पावभाजी रोल’, ‘कांडी कबाब’, ‘क्रिस्पी पाव’, ‘व्हेज लॉलीपॉप’ ‘पिंकी पॅटी’, ‘गनपावडर इडली’ अशा गंमतीदार नावांचे खाद्यपदार्थ या स्टॉलवर उपलब्ध आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, अशा दराला ते मिळतात, हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्यं.
 
 
सध्या पाटील कुटुंबाची तिसरी पिढी या व्यवसायात सक्रिय आहे. अभय पाटील यांचे चिरंजीव मानस पाटील यांनी हॉटेल व्यवस्थापनाची पदवी मिळवली आहे. तेसुद्धा हॉटेलकडे लक्ष देतात. “नवीन पिढीही नवीन काहीतरी करु पाहते आहे. ते नवीन प्रयोग करतात. खाद्यपदार्थांच्या बाबतीत तर असे अनेक प्रयोग आपल्याला सर्रास दिसतात. एखादी डिश घ्या आणि तिला आपला ब्रॅण्ड बनवा. त्या ब्रॅण्डमुळे तुम्ही आणि तुमचे हॉटेल आपोआप लोकप्रिय होईल,” हॉटेल उद्योगात येऊ पाहणार्‍या तरुणांना हा मोलाचा सल्ला अभय पाटील देतात. जानेवारी २०१९ मध्ये वयाच्या ८३व्या वर्षी दिनकर पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. पण, त्यांनी निर्माण केलेली चव आणि हॉटेलचा वारसा पाटील कुटुंब जपते आहे, हे विशेष.

@@AUTHORINFO_V1@@