राज्याचे गृहखाते राष्ट्रीय सुरक्षेचे ‘वाली’!

    20-Jan-2021
Total Views |
Arnab Goswami 1 1  _1&nbs



सुग्रीव रामाला कधी बोलावणार?

मुंबई (सोमेश कोलगे) : कथित ‘टीआरपी’ घोटाळ्यात गेले सहा महिने मोठ्या हिरिरीने तपास सुरू असूनही म्हणावे तसे काही हाताशी लागत नव्हते. परंतु, त्या तपासकामातून मिळालेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’वरून राज्याचे गृहखाते आता थेट राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न हाताळणार असल्याचे समजते.
 
 
मंत्रीमहोदयांच्या आदेशाने कामाला लागलेला खाकी फौजफाटा दमला होता. ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णव यांना अटक करण्याइतपतही पुरावे हाती लागले नाहीत आणि नाटक करण्यासारखे माध्यमांनादेखील काही मिळत नव्हते. या सगळ्यातून सरकार व सरकारप्रेमी पत्रकारांमध्ये वैफल्यग्रस्तता दाटल्याच्या बातम्या होत्या. इतक्यात अर्णव गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी सीईओ पारथो दासगुप्ता यांच्यातील ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’ समोर आले आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यादिवशी पत्रकारांना दिल्या जाणार्‍या चहाची गोडी नेहमीपेक्षा जास्त असून बिस्किटांचा रुचकरपणाही वाढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 
 
व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले जाणारे सर्व मेसेजेस स्वतः व्हॉट्सअ‍ॅपदेखील पाहू शकत नाही, असे व्हॉट्सअ‍ॅपचेच म्हणणे आहे. मग अर्णव व दासगुप्ता यांच्यातील संभाषण बाहेर कसे आले? असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारला गेला नाही. या संभाषणात बालाकोट ‘एअर स्ट्राईक’बद्दल माहिती आहे व त्याचा आम्ही शोध घेऊ, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘बालाकोटपूर्वी केंद्र सरकार काहीतरी करणार आहे,’ असे अंदाजसदृश्य मेसेज कोणालातरी पाठविणे म्हणजे खुद्द बालाकोट ‘एअर स्ट्राईक’ची माहिती होती, असा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात, हा प्रश्नदेखील गृहमंत्र्यांना विचारण्यात आला नाही.
 
 
तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या नावात ‘भारत’ किंवा ‘इंडिया’ शब्द नसल्याने ते यावेळी पाकिस्तानी राष्ट्रवाद्यांना भावनिक हाक देताना दिसतात. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नावात कोणत्याही देशाचा उल्लेख न केल्यामुळे त्यांच्या द्रष्टेपणाचे पुन्हा एकदा लेखक, बुद्धिवंत पत्रकारांमध्ये कौतुक सुरू होते. विशेष म्हणजे, या संभाषणाचा दाखला एका संपादक महोदयांनी अग्रलेखात दिला. परंतु, त्यांच्या ’तेल’बुद्धीला एकही तर्कशुद्ध प्रश्न पडला नाही. योगायोगाने इतरांनीही अग्रलेख लिहिले.
 
पत्रकारितेच्या नव्या परंपरेनुसार ते मागे घेतले जाणार का, हा प्रश्न लोक विचारीत आहेत. तसेच अर्णव व दासगुप्ता यांच्यातील कथित संभाषण म्हणजे एक सर्वसामान्य ‘टाईप’ केलेली ‘टेक्स्ट फाईल’ आहे. ते अर्णव व दासगुप्ता याच दोघांचे संभाषण आहे. याचा कोणताही खात्रीदायक पुरावा समोर आलेला नाही. त्याविषयीसुद्धा प्रश्न विचारला गेला नसल्याने गृहमंत्र्यांनी उत्तर देण्याचे टाळल नाही. कदाचित तो खात्रीदायक पुरावा नाही म्हणूनच ते संभाषण अनधिकृत सूत्रांकडून बाहेर आले असावे, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
 
परंतु, सध्या सर्वच वृत्तकारांनी याविषयी तार्किक प्रश्न उपस्थित केले नाहीत. अत्यंत लोकप्रिय ठरलेला अर्णव गोस्वामी व त्याचवेळी उद्भवलेली आपली पोटदुखी या दोनपैकी कोणता प्रश्न आधी निकालात काढावा, या संभ्रमात ते सापडल्याचे समजते. महाराष्ट्राचे गृहमंत्री तोपर्यंत राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बालकोटची चौकशी करणार आहेत, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यातून काय समोर येईल, याकडे इंटरपोल, सीआयए, केजीबी व इस्रायलची मोसाद लक्ष लावून आहेत.