रसरंग : डॉ. बाळासाहेब पुरोहित
नागपुरातील ज्येष्ठ संगीततज्ज्ञ, गायक, गुरु डॉ. बाळासाहेब पुरोहित यांचे दि. २६ डिसेंबर, २०२० रोजी हृदयविकाराने दु:खद निधन झाल्याची बातमी आली आणि मन विषण्ण झाले. सरांच्या कितीतरी आठवणी मनात फेर धरु लागल्या. माझे सर! माझे गुरु! माझे मामा! त्यांची सर्व रुपं माझ्या समोर गर्दी करु लागली.
जुन्या पिढीतील नामवंत गायक, तसेच नागपूरमधील प्रसिद्ध कॉलेज म्हणजे जुने मॉरिस कॉलेजचे निवृत्त संगीत प्राध्यापक डॉ. बाळासाहेब पुरोहित! सरांचा जन्म १९३२ चा. वय अगदी माझ्या वडिलांइतकं. जन्म चंद्रपुरातला. भास्कर बळवंत पुरोहित यांचे सुपुत्र. स्वरगंगेच्या प्रवाहात सर्वप्रथम तरंगायला शिकवणार्या गुरू व आपल्या पूज्य पिताश्रींवर सरांचे निरतिशय प्रेम होते. पुढे त्यांनी श्रीकांत बाकरे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीतप्रवीण’ होऊन त्यांनी संगीतातील सर्वोच्च पदवी प्राप्त केली. ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती : मूलतत्त्वे आणि सिद्धांत’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. उत्तम गायक असल्याने पुस्तकातील विषयांची पद्धत त्यांनी तंत्रशुद्ध ठेवली आहे. या पुस्तकात त्यांनी ‘संगीताचे मराठीकरण’ या वादग्रस्त विषयावर मत प्रदर्शित करुन वादाला पूर्णविराम देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.
संगीतशास्त्राचा आणि कलेचा त्यांचा अभ्यास चिंतनशील आणि निरीक्षणपूर्वक आहे.
कोणताही गाजावाजा न करता आपले काम करत राहणे, हा त्यांचा स्वभाव होता. अतिशय प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्त्व! सर म्हणजे एक चालतेबोलते संगीत विद्यापीठ होते. सर म्हणजे संगीताचे भावतत्त्व, संगीताचे सौंदर्यशास्त्र, संगीताचे मानसशास्त्र, संगीत आणि मन, सांगीतिक प्रतिभा, अभिरुची, मंचप्रदर्शन! कुठलाही विषय घ्या, सरांचे त्यावरील भाषण, चिंतन, मनन आणि लिखाण आहे. कुठलाही विषय सोप्पा करुन सांगण्यात त्यांची हातोटी होती. संगीतशास्त्राचे उत्तम जाणकार असण्याबरोबरच सर उत्तम गायक आणि गुरू होते. ‘नागपूर आकाशवाणी’चे ते उच्चश्रेणी कलाकार होते. त्यांच्या गायनावर उस्ताद अमिर खान साहेब यांची छाप होती. ‘कोमल ऋषभ आसावरी’ हा त्यांचा अतिशय आवडीचा राग. मला त्यांनी एखाद्या व्यक्तीने स्वतःजवळचा मौल्यवान हिरा सोपवावा, तसा मला शिकवला. ते म्हणाले, “हा जपून ठेव. कुठेही गायलीस, तरी वाहवा मिळवल्याशिवाय राहणार नाहीस.” त्याचा अनुभव मला पावलोपावली येतो. सकाळच्या मैफिलीत जेव्हा जेव्हा मी तो राग गायले, त्यावेळी ती मैफील उत्तरोत्तर रंगतच गेली आहे. सर स्वतः सर्वच राग उत्तम गात असत, पण मला त्यांचा ‘मधुवंती’ शिकवताना लागलेला ‘पंचम’ अजूनही आठवतो. ‘रसरंगत प्रित’ म्हणताना आळवलेला ‘तार षड्ज’ आठवतो. मला ते प्रेमाने ‘बच्चा’ म्हणायचे. त्यांनी शिकवलेला ‘अहिर भैरव’, ‘आभोगी कानडा’, ‘बैरागी भैरव’, ‘श्याम कल्याण’, ‘शुद्ध सारंग’ असे कितीतरी राग अजूनही नाव काढताच मनात दत्त म्हणून उभे राहतात, इतके मनात भिनले आहेत.
‘रसरंग’ या नावाने त्यांनी बंदिशी रचल्या आहेत. अनेक मोठमोठ्या कलाकारांना उदा. उल्हास कशाळकर, प्रकाश संगीत, श्याम गुंडावर, राम देशपांडे, प्रसाद गुळवणी, भूषण नागदिवे आणि अनेक कलाकरांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. या सर्वांना मॉरिस कॉलेजमधून त्यांचे मार्गदर्शन घेतले. कधी अडचण आली, तर कॉलेजमधील शिष्यांना घरी जाऊन शिकण्याची कायम परवानगी होती. गुरू म्हणून मला ते लाभले, हे माझे भाग्य! माझ्या गुरू ताराताई विलायची दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला सरांकडे शिकण्याचा सल्ला दिला. मीसुद्धा खूप श्रद्धेने सरांकडे शिकण्यासाठी जायला लागले. कॉलेजमधून मी १२ वाजता माझ्या घरी जायचे. जेवून १-१.३० वाजता सरांकडे जायचे. सर मला साधारण दोन ते पाच असे तीन तास शिकवायचे. स्वतः तबला वाजवून बंदिशी अनेक आवर्तनातून घोटून घेत असत. त्यातूनच पुढे ‘उपज’, ‘ताना’, छोटा ख्याल बंदिश उलगडत जात असे. बंदिश अशी ठोकून बसवून घेत की, मी आयुष्यात कधी विसरणार नाही. इतकं शिकवत की, काकू म्हणत, “अहो, कंटाळेल ना ती गाणं म्हणायला! किती शिकवता?” सर म्हणायचे, “हो बच्चा? कंटाळलीस?” मी नाहीच म्हणायचे. मग हसायचे. चहा करायला सांगायचे. यातूनच त्यांचं आणि माझं, ते माझ्या आईचे वर्गबंधू असल्याने ‘मामा-भाची’ हे नातं फुललं, ते शेवटपर्यंत त्यांनी निभावलं. अगदी आई जाईपर्यंत! माझ्या लग्नात माझ्यामागे मामा म्हणून उभे राहिले. मला छोटा संसार पण बक्षीस दिला .
सरांनी देशभरात अनेक महत्त्वाच्या संगीत संमेलनातून आपले गायन सादर केले. पुण्यातील ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त तसेच कुंदगोळच्या ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त त्यांना बोलवण्यात आले होते. पं. भीमसेन जोशी त्यांना ‘तान कप्तान’ म्हणायचे. सर म्हणजे मूर्तिमंत संगीतच होते. ते वृत्तीने कलाकार होते! कलंदर होते. ते कायम गातच असायचे. माझ्या घरी मुंबईला राहायला आले, तेव्हा कायम तानपुरा लागलेलाच असायचा. सतत चिंतन, मनन, श्रवण चालूच! एक ‘मल्हार’ प्रकार घेतला की, ‘मल्हार’चे सर्व प्रकार एकामागे एक सुरु व्हायचे. ‘अनवट’ रागसुद्धा सर उत्तमप्रकारे वेगळे करुन दाखवायचे. एखादा राग कसा लक्षात ठेवायचा, याच्या युक्त्या सांगायचे. विविध घराण्यांच्या गायनशैलीवर त्यांनी खूप अभ्यास केला होता. ज्या घराण्याचा जो राग तो त्याच घराण्याप्रमाणे ते शिकवत असत. कितीतरी गोष्टी ते सहजपणे सांगत. जे साध्य करायला बर्याच कलाकारांना अनेक वर्षं लागतील. साधारण ८५ वर्षांचे असताना सर माझ्याकडे राहायला आले होते. पण त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती आणि सुरेलपणा, आवाजाची लवचिकता कायम होती. तानेतील विविधता, स्वरांचे आश्चर्यचकीत करणारे बंध सरगम टाकण्याची अमिरखानी ढंग ही त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्ये होती.
‘रियाज’ हा त्यांचा धर्म होता. कोरोना मुंबईत फैलावला आहे, हे त्यांना समजले तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, “तू रोज सकाळी उठून रियाज कर! अर्धा तास तरी खर्ज लाव! तुला कधीच कोरोना होणार नाही.” असा हा दर्दी कलाकार वयाच्या ९० व्या वर्षी अनंतात विलीन झाला. आम्हा विद्यार्थ्यांच्या रुपाने ते कायम आपल्यातच गात राहतील. सरांचे व्यक्तिमत्त्व कायमच प्रेरणादायी होते. त्यांनी दिलेले प्रेम, आदरयुक्त दरारा नेहमीच लक्षात राहील. आज ‘सप्तक’ ५५ वसंतनगर, नागपूरमध्ये सरांचे वास्तव्य नसले तरी त्यांच्या सुरांचा दरवळ तेथे कायम वास्तव्य करीत राहील.
- वीणा शुक्ल