नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना रातोरात मिळाली अडीचशे जात प्रमाणपत्र
नाशिक : जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने अभाविपतर्फे समाज कल्याण उपायुक्त, नाशिक यांच्या कार्यालयात बुधवारी रात्रभर ठिय्या मांडण्यात आला. अभाविपच्या दणक्यानंतर मध्यरात्री १ वाजता उपस्थित विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप सुरू होऊन सकाळपर्यंत २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले.
नाशिक येथे समाज कल्याण कार्यालयात जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने तेथे ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत उभे होते. यावेळी अभाविप नाशिक तर्फे सदर विद्यार्थ्यांना घेऊन दिनांक १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता ठिय्या आंदोलन सूरु करण्यात आले. यावेळी समाजकल्याण उपायुक्त माधव वाघ यांना अभाविपच्या वतीने घेराव घालण्यात आला. या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावयाचा असून त्यासाठी त्यांना तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र लागणार होते. मात्र, हे सरकारी काम कृमगतीने सुरू होते.
पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आत्ताच उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अभाविपच्या वतीने समाज कल्याण उपायुक्त माधव वाघ यांना करण्यात आली. 'शिक्षण आमच्या हक्काचं! नाही कुणाच्या बापाचं!!' , 'कोण म्हणत देणार नाही! घेतल्याशिवाय राहणार नाही!!', 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंदाबाद!!', अशी घोषणा देत विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालय दणाणून सोडले.
सायंकाळी सात ते रात्री एक वाजेपर्यंत सदर संघर्ष सुरू होता. आंदोलनाच्या या सगळ्या अभाविपच्या तीव्र भूमिकेनंतर सर्व विद्यार्थ्यांना एक वाजेपासून जात वैधता प्रमाणपत्र वितरण रात्री सुरू झाले. सदर वितरण सकाळपर्यंत सुरू होते. या आंदोलनाने अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वरुपात जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले. अभाविपच्या आंदोलनाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जात वैधता प्रमाणपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.