हाडाचा खलनायक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2021
Total Views |
rajshekhar_1  H




ओठांवर तलवार कट मिश्या, हातात पेटती सिगारेट, नजरेमध्ये जग जिंकण्याचा उन्माद, ओठांवर मधुर वाणी पण वृत्ती कटकारस्थानी! अशा आवेशात दमदार खलनायकी भूमिका साकारणारे कलावंत म्हणजेच राजशेखर...
 
एका कलाकाराच्या मुलीचा अपघात झाला होता, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्या वेळेस त्या कलाकाराच्या ‘भक्त पुंडलिक’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शूटिंगदरम्यान त्या कलाकाराला ही बातमी समजली. त्यांचे मन गहिवरून आले, आतला बाप अस्वस्थ झाला. आपल्या मुलीचा अपघात झालाय, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, ही बातमी कोणालाही न कळू देता त्यांनी शूटिंग संपविले. शूटिंग संपवून ते थेट मुलीला भेटायला गेले. ही घटना त्यांच्या कामाबद्दलच्या श्रद्धेची ग्वाही देते. या कलाकाराने कायम समाजकारणाचा मार्ग स्वीकारला आणि कोल्हापूरमध्ये ‘वृद्धाश्रम’ स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. इथूनच उभे राहिले ते म्हणजे ‘मातोश्री वृद्धाश्रम.’ चित्रपटात खलनायक साकारणारे हे कलावंत खर्‍या जीवनात मात्र कमालीचे हजरजबाबी आणि उत्तम ‘सेन्स ऑफ ह्युमर’ असणारे व्यक्तिमत्त्व होते. तसेच ‘राजकारण हा आपला पिंड नाही’ असे ते नेहमी म्हणत. हे कलावंत नेहमी त्यांच्या धाकट्या मुलाला म्हणत, “तू जीवनात मोठा डॉक्टर होशील, व्यावसायिक होशील किंवा माझ्यासारखा कलाकारही होशील. पण, त्याआधी एक चांगला माणूस बन! चांगला माणूस होणे फार महत्त्वाचे आहे.” त्यांच्या या वाक्यांमधून रूपेरी पडद्यावरील या खलनायकामध्ये एक ‘साधा माणूस’ वास्तव्य करतोय याची जाणीव होते. ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘जोतिबाचा नवस’, ‘दरोडेखोर’, ‘सत्त्वपरीक्षा’, ‘साधी माणसं’ अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या कलाकारीचे रंग दाखविणारा हा खलनायक म्हणजेच अभिनेते राजशेखर...
‘गडहिंग्लज’च्या ‘गणपतराव गोविंदराव भुतकरांच्या’ घरी ८ नोव्हेंबर, १९३६ रोजी राजशेखर यांचा जन्म झाला. राजशेखर यांचे खरे नाव जनार्दन भूतकर. कुटुंबात राजशेखरजी हे शेंडेफळ! त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमधील रात्र महाविद्यालयात झाले. वडिलांचा पेशा हा ‘टेलरिंगचा’ होता आणि आवड ‘कलाकारीची’! अभिनयाचे बाळकडू वडिलांकडूनच त्यांना मिळाले. वडिलांना नाटकांमध्ये काम करताना पाहून, आपणही ‘अभिनेता’ बनायचं, असं त्यांनी ठरवलं. १९५० साली गडहिंग्लजहून कोल्हापूरला ते निघून आले. कोल्हापूरला आल्यावर ‘नाना जोशी’ यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. आपणही केव्हातरी हा रंगमंच गाजवू, ही आस उराशी बाळगत, नाना जोशींच्या नाटकांमधून ते ‘प्राँप्टरची’ भूमिका बजावू लागले. हा सिलसिला काही वर्षे चालला आणि अखेर ‘गणपत पाटील’ दिग्दर्शित ‘ऐका हो ऐका’ या नाटकामधून राजशेखरजी रंगभूमीवर अवतरले. ऐन विशीत असताना राजशेखरजी यांनी ६० वर्षांच्या म्हातार्‍याची व्यक्तिरेखा साकारली. राजशेखर यांच्याकडे असणारे टॅलेंट पाहून गणपत पाटील त्यांना, ‘मराठी सिनेसृष्टीचे चित्रतपस्वी’ समजल्या जाणार्‍या भालजी पेंढारकरांकडे घेऊन गेले आणि हाच राजशेखरजी यांच्या जीवनाचा टर्निंग पॅाईंट ठरला.
भालजी पेंढारकरांनी त्यांच्या ‘आकाश गंगा’ या चित्रपटात पोलिसाचा रोल त्यांना देऊ केला. या चित्रपटामध्ये राजशेखरजी यांनी दुहेरी व्यक्तिरेखा साकारली. पुढे ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटांमधून ते खलनायक म्हणून पडद्यावर झळकले. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटामध्ये तब्बल पाच भूमिका त्यांनी साकारल्या! पण, राजशेखरजी यांना खलनायक म्हणून ओळख मिळवून दिली, ती भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘साधी माणसं’ या चित्रपटाने. राजशेखर यांचे हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे ते भालजींकडे पटकथा लिहिण्याचे काम करत होते. ओठांवर तलवार कट मिश्या, हातात पेटती सिगरेट, नजरेमध्ये जग जिंकण्याचा उन्माद, ओठांवर मधुर वाणी; पण वृत्ती कटकारस्थानी! अशी ही ‘छक्कडरावाची’ भूमिका अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावून गेली आणि मराठी सिनेसृष्टीला एक हाडाचा खलनायक मिळाला. उंच बांधा, देखणा चेहरा, बोलके डोळे आणि धारदार नाक अशा या देखण्या खलनायकाची प्रत्येक भूमिका ही वेगळी असायची. त्यांना पडद्यावर खलनायक म्हणून स्वतःचे अस्तित्व दाखविण्याकरिता कधी गेटअप किंवा ‘स्पायसी डायलॉग्स’ची गरज भासली नाही. त्यांची नजर, त्यांचे चेहर्‍यावरील भाव आणि डायलॉग बोलण्याची अदा या गोष्टीच त्यांची दमदार खलनायकी सिद्ध करण्यास पुरेशा होत्या.
‘साधी माणसं’ १९६५ मध्ये प्रकाशित झाला. ‘साधी माणसं’ ही साध्या माणसांची साध्या माणसांनी सांगितलेली कहाणी. हा चित्रपट रंगीत नाही. वेशभूषा, छायाचित्रण, संगीत, नेपथ्य, संवाद यांतही वास्तवतेचं हे भान भालजींनी ठेवलं होतं. त्यातील राजशेखर यांची ‘निगेटिव्ह’ भूमिका विशेष गाजली. शंकर आणि पार्वती हे लोहार दाम्पत्य हणबरवाडीत दिवसरात्र काबाडकष्ट करून मिळतील त्या चार पैशांत आनंदानं संसार करीत असतात. पण, या साध्या माणसांच्या जीवनातही अनपेक्षित वळणं येतात. गाडीचा कमानपाटा तुटला म्हणून ट्रक-ड्रायव्हर छक्कडराव शंकर लोहाराकडे जातो. शंकर तो दुरुस्त करून देतो. शंकरच्या कामावर छक्कडराव खूश होऊन शंकरला शहरात चांगली नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्याला कोल्हापूरला घेऊन येतो. आपल्या ओळखीनं एका फौंड्रीत नोकरीही मिळवून देतो. पण, शहरातलं जीवन साधं नसतं. छक्कडरावचा बेत वेगळाच असतो. छक्कडरावच्या मनात पारूला गटवायचं असतं. छक्कडराव फसवणुकीच्या एका खोट्या केसमध्ये शंकरला गोवतो आणि त्याला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होते. मग एकाकी पारूला अनेक आमिषं दाखवूनही ती वश होत नाही, तेव्हा छक्कडराव तिच्यावर हात टाकतो. पारू साधी असली, तरी पातिव्रत्य जपणारी, करारी आणि तडफदार आहे. प्रसंगी ती वाघीण होते. ती छक्कडरावच्या डोक्यात लाकूड घालून त्याला ठार मारते. पोलीस तिला पकडून नेतात. कोर्टात रीतसर खटला सुरू होतो, अशी संसाराच्या उंबरठ्यावर उभी असलेली स्त्री जीव द्यायच्या तयारीनं एखाद्याचा जीव घेते याचा अर्थ काय? ही कथा खेड्यातून शहरात येणार्‍या, तिथल्या कपटी, स्वार्थी, विश्वासघाती, क्रूर, लांड्यालबाडांना तोंड देणार्‍या, तरीही आपलं स्वत्त्व प्राणपणानं जपू पाहणार्‍या माणसांची होते. देशातच काय, पण परदेशातही ती घडू शकते. ‘साधी माणसं’ हा मॉरिशसला जाणारा पहिला मराठी चित्रपट. ‘साधी माणसं’ पाहून प्रभावित झालेल्या पोलंडच्या टोपालिस या चित्रपटतज्ज्ञाने ‘साधी माणसं’ इंग्रजीमध्ये सबटायटलिंग करून संपूर्ण युरोपमध्ये टेलिव्हिजनद्वारे दाखविण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण, या चित्रपटात भारतातल्या ग्रामीण जीवनाचं जे अस्सल रूप दिसतं ते इतरत्र क्वचितच पाहायला मिळतं. या चित्रपटामधून छक्कडरावची भूमिका करणारे राजशेखर खलनायक म्हणून नावारूपाला आले. त्यांनी साकारलेली ही भूमिका वाखणण्याजोगी होती. ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली आणि भालजींनी जनार्दन भूतकर यांचे नाव ‘राजशेखर’ ठेवले आणि राजशेखर यांचा खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला. ‘मल्हारी मार्तंड’, ‘बारा वर्ष सहा महिने तीन दिवस’, ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ‘धर्मकन्या’, ‘लाखात अशी देखणी’ (१९८२), ‘जोतिबाचा नवस’ (१९७५), ‘वारणेचा वाघ’ (१९८४) अशा अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून स्वतंत्र ठसा उमटवला. याच दरम्यान ‘संगोळी रायण्णा’ या कन्नड चित्रपटातही त्यांनी अभिनय केला, तसेच ‘दो ठग’, ‘नेत्रहीन साक्षी’, ‘दो छोकरी’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. पाच दशके मराठी चित्रपटांतून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते म्हणजे राजशेखर. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असतानाच अनेक नाटकांतही त्यांनी काम केले. ‘आज इथं तर उद्या तिथं’, ‘बेबंदशाही’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘चोर सोडून संन्यासी’ या नाटकात त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या आणि ‘रिश्ते-नाते’, ‘छोटे बाबू’, ‘युगांतर’ या दूरदर्शन मालिकांतूनही काम केले. त्यांनी जवळपास १०० हून अधिक चित्रपटात खलनायक साकारला. रंगभूमीवर, छोट्या पडद्यावरही ते अभिनय करत राहिले. कामावरच्या त्यांच्या निष्ठेला या सगळ्या यशाचे श्रेय जाते. प्रेक्षकांनी घातलेल्या शिव्या हाच माझा पुरस्कार आहे, असे स्वत:चे वैशिष्ट्य सांगणार्‍या राजशेखर यांच्या खलनायकी भूमिकांमुळे ग्रामीण भागातील स्त्रिया त्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहात. हेच त्यांच्या खलनायकी भूमिकांचे वैशिष्ट्य होते. दम्याच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असताना, ‘आयसीयू’मध्ये विविध ‘नर्स’ त्यांच्या तपासणीसाठी येत. एके दिवशी एक वृद्ध नर्स त्यांच्या तपासणी करता आल्या, त्यांना पाहून हा कलावंत बोलला, “ही तर ‘न’रस आहे.” आयसीयूमध्ये, हातात सलाईन टोचलेल्या अवस्थेत उत्तम ‘सेन्स ऑफ ह्युमर’ असल्याशिवाय असा विनोद करणे निव्वळ अशक्यच! ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘जोतिबाचा नवस’, ‘दरोडेखोर’, ’सत्त्वपरीक्षा’, ‘साधी माणसं’ अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या कलाकारीचे रंग दाखविणारा हा खलनायक, चित्रपट रसिकांच्या मनावर अनंतकाळापर्यंत अधिराज्य गाजवत राहील, यात काहीच शंका नाही. अभिनेते राजशेखर यांचे २५ डिसेंबर, २००५ रोजी निधन झाले. त्यांचे चिरंजीव स्वप्निल राजशेखरदेखील अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत. अशा दमदार खलनायकी भूमिका साकारणार्‍या ‘राजशेखर’ या दिग्गज कलावंताला मानाचा मुजरा.... 
- आशिष निनगुरकर



@@AUTHORINFO_V1@@