वीर खाज्या नाईक भाग-४

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2021
Total Views |

Veer Khajya Naik_1 &
आपला भारत देश म्हणजे महापुरुषांची खाण! ‘सूर्य वंश’, ‘चंद्र वंश’, ‘नाग वंश’ अशा अनेक पराक्रमी वंशांची परंपरा सांगणारे वीर जसे या देशात जन्माला आले, तसेच सर्वसामान्य घरात जन्माला येऊन प्रेरक जीवन जगणारे असंख्य स्त्री-पुरुषदेखील आले. त्यांच्या जीवनकथा आपल्या समोर आणत आहोत ‘आमचा देश, आमच्या प्रेरणा’ या कथामालिकेच्या माध्यमातून. प्रत्येक रविवारी एकेक कथा आपल्या समोर सादर करीत आहेत नरेंद्र पेंडसे. भगवान बिरसा मुंडा, वीरेंद्र सायसारखे अपरिचित जनजाती वीर, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, लाचित बडफुकन अशा वीरांचे जीवन कथाकथनातून मांडणे हा त्यांचा छंद आहे आणि त्यातूनच या कथामालिकेची निर्मिती झाली आहे. २६ डिसेंबर या दिवशी जनजाती समाजात कार्य करणाऱ्या आपल्या ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेचा वर्धापन दिन संपन्न झाला. या निमित्ताने चार रविवारी जनजाती समाजातील प्रेरक महापुरुषांच्या कथा आपल्यासमोर सादर करीत आहोत. त्याच मालिकेतील हा शेवटचा चौथा भाग...
 
 
भारतातील जनजाती समाजातील मोठी जनसंख्या असणारी आणि अत्यंत लढाऊ जनजाती म्हणजे भिल्ल! राजस्थान, गुजरात, सिंध, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा विविध राज्यांत ती ‘तडवी’, ‘भिलाला’, ‘ढोली’, ‘डुंगरी’, ‘गरासिया’ अशा विविध नावांनी ओळखली जाते. मुळात शंकराचे भक्त असणारे भिल्ल सर्प, श्वान, वाघ अशा विविध देवांना आणि कुलदेव, जातिदेव, ग्रामदेव यांना पूजतात. रामायण आणि महाभारत काळापासून इतिहासाचा भाग असणाऱ्या भिल्लांना कोणी अहिंदू समजले, तर तो एक कारस्थानाचा भागच म्हणावा लागेल. असा भिल्ल समाज पूर्वीपासूनच सत्तेच्या परिघात राहिला. वनक्षेत्रात तो स्वतः राजा होता आणि नगरीय राजांशी त्यांची मैत्री होती. राणा पुंजा हा तर महाराणा प्रतापाचा भाऊच मानला गेला. अशा भिल्ल समाजात शिरपूर सेंधवा परिसरात १८३० साली खाज्या नाईकचा जन्म झाला. वडिलांचा मृत्यू लवकर झाल्याने तो लवकर जाणता झाला. अंगात शौर्य होतेच, त्याच्या जीवावर घर चालविण्यासाठी इंग्रज पोलिसांत भरती झाला. शिरपूर सेंधवा घाटातून जाणाऱ्या गाड्यांच्या संरक्षणासाठी त्याची नेमणूक होती आणि तो मनापासून हे काम करीत होता. याचवेळी त्या परिसरात एक लुटीची घटना घडली आणि खात्याचा काही संबंध नसताना त्याला हत्येच्या आरोपाखाली अटक करून ४० वर्षांची शिक्षा ठोठावून तुरुंगात बंद करण्यात आले. या अन्यायाने तो प्रचंड चिडला, इंग्रजांचे राज्य भारतासाठी अपमानकारक आहे हे त्याच्या लक्षात आले. परंतु, त्याला काही करता येत नव्हते. याचवेळी त्याची पत्नी तुलसी हिचे निधन झाले आणि छोटा मुलगा दौलतसिंह पोरका झाला.
 
 
 
‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ सुरू झाले आणि इंग्रजांना खाज्याची आठवण झाली. त्याला मुक्त करून सैन्यात भरती होण्याचा आदेश दिला गेला. हा आदेश झुगारून देऊन तो भूमिगत झाला आणि त्याने सशस्त्र उठावाची तयारी सुरू केली. सर्व भिल्ल समाज इंग्रजांविरुद्ध धुमसत होता, त्याला हे उमदे नेतृत्व मिळाले. काळूबाबा, मेवास्था नाईक, आनंद नाईक, भाऊसिंह रावल अशा अनेक टोळ्या येऊन खाज्याला मिळाल्या, रुमालिया भिल्ल, मकरानिया भिल्ल येऊन मिळाले आणि खाज्या नाईक हे त्या सर्वांचे प्रमुख झाले. त्यांनी निजामाकडूनसुद्धा दारुगोळा मिळविण्याचा प्रयत्न केला. शेवटी बदवानीमधून दारुगोळा मिळाला. त्यांनी सागरखेडा लुटून संपत्ती मिळविली, सैन्य मजबूत केले आणि मोठ्या संधीचा शोध सुरू केला. इंदूरहून मुंबईला जाणाऱ्या सात लाखांच्या खजिन्याची माहिती त्यांना मिळाली. हे १८५७ मधील सात लाख म्हणजे प्रचंड रक्कम होती. पूर्ण नियोजन करून त्यांनी खजिना नेणाऱ्या इंग्रज टोळीवर हल्ला केला आणि हा प्रचंड खजिना हस्तगत केला. याच घाटातून इंग्रजांच्या संरक्षणात जाणाऱ्या अफूच्या ६० गाड्या लुटल्या. यामुळे इंग्रज सरकार हादरले आणि प्रचंड चिडले. त्यांनी खाज्याला संपविण्यासाठी मोठी तयारी सुरू केली. याचवेळी खाज्याच्या पथकांनी सेंधवा आणि पळसनेर ही पोस्ट ऑफिस लुटली, शिरपूरचा बाजार लुटला. अंबापाणी येथे खाज्या आणि त्याचे १,५०० साथीदार असताना इंग्रजांनी त्यांना गाठले आणि घनघोर युद्ध सुरू झाले. इंग्रज सैन्याच्या आधुनिक हत्यारांसमोर भारतीय योद्धे आणि त्यांची हत्यारे कमी पडू लागली. खाज्याचा मुलगा दौलतसिंह याला गोळी लागली आणि तो रणभूमीवर अमर झाला. पराभव समोर दिसू लागल्यावर लढून मरण्याऐवजी जीव वाचवू आणि पुन्हा तयारी करू, असा विचार करून खाज्या बाहेर पडला. त्याने पुन्हा तयारी सुरू केली. इंग्रज जेम्स आऊट्रम याने त्याला चर्चेसाठी बोलावले. पुन्हा उठावासाठी तयारी करायची आहे, चर्चा करून थोडी उसंत मिळेल, अशा उद्देशाने खाज्या तयार झाला. मात्र, इंग्रजांनी विश्वासघात करून भेटीला आलेल्या खाज्याला अटक केली आणि लिंबाच्या झाडावर त्याला फाशी देऊन दहा दिवस देह तसाच लटकवून ठेवला. भिल्ल समाजात यामुळे भीती पसरेल आणि समाज गप्प राहील, अशी इंग्रजांची समजूत होती. मुळातच स्वातंत्र्यप्रिय आणि लढाऊ असणाऱ्या भिल्ल समाजाने हा समज खोटा ठरवला. खाज्या नाईकांच्या बलिदानाने समाजाला लढण्याची प्रेरणा दिली आणि समाज लढतच राहिला. आज आपल्या समोरील शत्रू बदलला आहे, लढाईचे स्वरूप बदलले आहे. परंतु, आवश्यकता आणि प्रेरणा मात्र तशीच आहे.
 
- नरेंद्र पेंडसे
@@AUTHORINFO_V1@@