आम्ही पुत्र अमृताचे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2021
Total Views |

Arya_1  H x W:
 
 
 
आर्यांचे आक्रमण अथवा स्थलांतर, या विषयाचा तपशीलवार ऊहापोह आतापर्यंत आपण केला. यामध्ये विविध ज्ञानशाखांच्या आधारे केली जाणारी उलटसुलट मांडणी आणि त्या भूलभुलैयात गांगरून जाणारी सामान्य माणसाची बुद्धी.... अशा परिस्थितीत या क्लिष्ट विषयाचे आकलन कसे काय बरे व्हावे? यावर करायच्या उपायांचा छोटासा; परंतु मूलगामी प्रयत्न म्हणून या लेखमालेचे आयोजन होते.
विविध भौतिक पुरावे, शास्त्रीय कसोट्या, सबळ तर्क इत्यादी सामग्रीच्या आधारे तपशीलवार तपासणी केल्यावर आर्यांच्या स्थलांतराचा अथवा आक्रमणाचा हा सिद्धांत कसा लंगडा आहे, याची खात्री आपल्याला अगदी सहजपणे पटते. सोबतच या सिद्धांताची पायाभरणी करणारे युरोपीय विद्वान हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जितके अभ्यासू होते, तितकेच राजकारणात आणि समाजकारणात बिलंदरसुद्धा होते, याचीही खूणगाठ मनात पक्की होत जाते. त्यांनी विविध काल्पनिक कथांना ‘पुरावे’ म्हणून ज्या पद्धतीने उभे केले, ते पाहता शून्यातून एक मोठी आभासी गाथा उभी करण्याचे आणि त्यातून समाजात दुफळी माजवून अशांतता निर्माण करण्याचे त्यांचे कसबही तितक्याच खात्रीलायकपणे लक्षात येते.
 
‘कुणाचा वंश जास्त श्रेष्ठ आणि जास्त प्राचीन’ या स्पर्धेतून साधारणत: सतराव्या शतकाच्या अखेरीस युरोपात ‘वंशश्रेष्ठत्ववाद’ जन्माला आला. जगभरात आपल्या वसाहती बनविण्याचे खूळसुद्धा त्या दरम्यान युरोपात सुरू झालेले होते. त्यातूनच मग ‘आमचाच वंश तेवढा श्रेष्ठ आणि जगातले बाकीचे सर्व लोक तुच्छ’, अशी एक श्रेष्ठत्वगंडाची भावना त्यांच्या मनात रुजली. साहजिकच आहे, जगभरात आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकेल असे काहीही ज्यांच्याकडे नाही, त्यांनी ते करायचे तरी कसे? अर्थात दुसऱ्यांना तुच्छ लेखूनच! दरम्यान, भारतात वसाहती करण्यासाठी आलेल्या काही युरोपीय मंडळींनी भारतीय संस्कृती अत्यंत प्राचीन असल्याचे पाहिले आणि मग ‘वंशाच्या श्रेष्ठत्वाच्या स्पर्धेत आपले काय होणार’, या चिंतेने ग्रस्त होऊन भारतीय संस्कृतीला मिळेल त्या मार्गाने तुच्छ लेखण्याचा उपक्रम सुरू झाला. भाषाशास्त्राच्या आधारे त्यांनी असे दाखवून देण्याचा प्रयत्नही केला की, भारतीयांचे पूर्वज मूळचे मध्य आशियातल्या गवताळ प्रदेशातले होते. तिथून ते भटकत भटकत भारतात आले. याद्वारे त्यांनी ‘आर्य स्थलांतराचा सिद्धांत’ नामक विषवल्लीचे बी पेरले. हा सगळा भाग आपण या लेखमालेत तपशीलवार पाहिलेला आहे. पुढे भारतात वसाहत करण्यासाठी आलेल्या ब्रिटिशांनी इथे राज्य करण्यासाठी ‘फोडा आणि राज्य करा’ अशी पद्धतच अवलंबिली. भारतीय समाजात फोडा-फोडी कोणकोणत्या मार्गांनी करता येईल, याचे प्रयोग आजमावून बघताना, त्यांच्या हातात ‘आर्य स्थलांतराचा सिद्धांत’ हे एक हुकमी शस्त्र होतेच. पुढे त्यांनी त्याला ‘आर्य आक्रमणाचा सिद्धांत’ असे वळण दिले आणि भारतीय समाजात एकाच वेळी अनेक प्रकारचे भेद उत्पन्न करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न केला. ‘भारतीय’ म्हणून ओळख असणाऱ्या इथल्या बहुसंख्य हिंदू समाजाच्या काही अंगभूत दोषांमुळे ब्रिटिशांचा हा प्रयत्न यशस्वीसुद्धा झाला. त्या विषवल्लीची विषारी फळे आज आपण भोगत आहोत.
 
विविध ज्ञानशाखांच्या आधारे या भ्रामक सिद्धांताचे विविध संशोधक, अभ्यासक, विद्वानांनी खंडन केलेले आपण आतापर्यंत या लेखमालेत तपशीलवार पाहिले. पण, अशा खंडनाने हा विषय संपत नाही. याच सिद्धांताच्या आधारावर ‘रचलेला’ भारताचा इतिहास भारतातल्या बहुधा सर्वच शाळा-कॉलेजांत आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमांत गेल्या किमान चार-पाच पिढ्यांना शिकविण्यात आलेला आहे. त्यामुळेच आजचा विद्यार्थी हे शिकताना काही वावगे शिकत आहे, असे त्याच्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना किंवा शिक्षकांनादेखील अजिबात वाटत नाही. कारण, तेही त्याच अभ्यासक्रमात शिकलेले असतात. त्यामुळे समाजात दुफळी माजवून त्यावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या समाजकंटकांचे काम अजूनच सोपे होते. एकीकडे काळजीची एक गोष्ट म्हणजे, अनेक सामान्य लोकांना अशा खंडनात स्वारस्यसुद्धा राहिलेले नसते. त्यांच्या दृष्टीने हा सगळा ऊहापोह म्हणजे ‘जुनी मढी उकरून काढण्याचे काम’ असते. याच विषारी सिद्धांतावर आधारलेल्या आणि सध्या समाजात सर्वत्र दिसणाऱ्या फुटीरतावादी चळवळी आणि आंदोलने अशा भोळ्या सज्जनांना केवळ राजकीय स्वरूपाची वाटतात, तर दुसरीकडे काळजीची अजून एक गोष्ट म्हणजे, हा सिद्धांत जरी शास्त्रशुद्धपणे खोडून काढायला सुरुवात झालेली असली, तरी अशी संशोधने जगात सर्व विद्वान मान्य करत नाहीत. कारण, मग त्याने त्यांचा अहंकार दुखावतो. शिवाय, काहींचे ‘गुंतलेले हितसंबंध’(Vested interests)देखील दुखावतात. त्यामुळे एक 'unsettled issue’ म्हणूनच जग याकडे बघते. थोडक्यात काय, तर जसे या सिद्धांताच्या अभ्यासक्रमात निदान चार-पाच तरी पिढ्या शिकून गेल्याने यात कुणाला काही वावगे वाटत नाही, तसेच याचे खंडन करीत ऐतिहासिक तथ्ये सांगणाऱ्या अभ्यासक्रमात निदान चार-पाच तरी पिढ्या शिकून जायला हव्यात. त्यानंतरच मग हे ‘मढी उकरण्याचे’ काम थांबवलेले चालेल.
 
आर्य म्हणजे सज्जन/थोर चारित्र्याचा माणूस, तर अनार्य म्हणजे दुर्जन/त्रासदायक माणूस - इतकाच साधा अर्थ भारतातली कुठलीही भाषा बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मनात पक्का ठसवून घेतला पाहिजे. त्यानेच मग ‘आर्य मूळचे कुठले हो?’ अशासारख्या वरकरणी भाबड्या दिसणाऱ्या प्रश्नांच्या सापळ्यात कुणी निष्पाप नागरिक अडकणार नाही. भारतीय लोकांचे प्राचीन पूर्वज गेल्या किमान २४ हजार वर्षांपासून भारतातच राहत होते. हा काळ काही संशोधनांनी तर गेल्या निदान ६० हजार वर्षांपर्यंत मागे जातो. हेसुद्धा आपण या लेखमालेत पाहिले आहेच. हे तथ्य बुद्धीने एकदा स्वीकारले की, सरस्वती नदी आपोआप सापडते. सरस्वती-सिंधू नागरीकरणात लोक वैदिक परंपरा पाळत होते, हे लक्षात येते. या प्राचीन संस्कृतीची संपूर्ण जगाला पावन करण्याची क्षमता असलेली धारा मध्य आशियातून येऊन स्थायिक झालेली नाही, तर याच देशाच्या भूमीत जन्माला येऊन गेल्या ६० सहस्रकांत क्रमाने विकसित होत गेलेली आहे, हे समजते. इ.स. पूर्व १८०० नंतर ‘सिंधू संस्कृती’ नष्ट वगैरे झालेली नाही, तर ग्रामीण संस्कृतीच्या रूपाने परिवर्तित होऊन ती भारतात सर्वत्र पसरलेली आणि पुढच्या काळात अजूनच उत्क्रांत झालेली लक्षात येते, अशी समज पक्की होत गेल्यानेच इथला सुपुत्र हा आर्यांच्या स्थलांतराचा सिद्धांत नाकारतो आणि स्वत:ला या प्राचीन संस्कृतीशी जोडून घेण्यात धन्यता मानतो. हा सिद्धांत उराशी कवटाळून बसणारा हटवादी मनुष्य मात्र आधुनिक विज्ञान, शास्त्रीय पद्धतीने केलेले संशोधन आणि मूलभूत तर्कशास्त्र या सगळ्या गोष्टी एकाच वेळी डावलत असतो. त्याला स्वत:च्या भ्रामक कल्पनांच्या मनोराज्यातच राहणे जास्त पसंत असते. सदर लेखमालेचा समारोप करताना ही गोष्ट प्रत्येक भोळ्या सज्जनाने, आडमुठ्या बिलंदर विद्वानाने आणि नाठाळ समाजकंटकाने पक्की लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्यातले ‘आर्यत्व’ जपत भोवतालच्या अशा ‘अनार्यांच्या’ कारवाया वेळीच ओळखून त्या जागीच ठेचणे आवश्यक आहे.
 
आम्ही कोण आहोत? असा प्रश्न उपस्थित करणारे आणि त्याला या विषारी सिद्धांताच्या आधारे उत्तर देणारे डावे आणि समाजघातक विचारवंत आपल्या या प्राचीन परंपरेचे, समाजाचे आणि पर्यायाने देशाचेही केवढे नुकसान करत आहेत! खरे तर या प्रश्नाचे शाश्वत उत्तर आपल्या प्राचीन पूर्वजांनीच सांगून ठेवलेले आहे, तिकडे लक्ष दिले पाहिजे. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा आ ये धामानि दिव्यानि तस्थुः॥ ऋग्वेद १०.१३.१॥ अर्थ : दिव्य, अर्थात स्वर्गीय ठिकाणी राहणाऱ्या आणि ‘अमृत’, म्हणजेच अमर असलेल्या प्रजापतीच्या पुत्रांनो, ऐका! असे म्हणून या मंत्राचा ऋषी साक्षात ‘विवस्वान् आदित्य’ म्हणजेच लौकिक अर्थाने ‘सूर्य’ सर्व देवांना आपली प्रार्थना ऐकण्याची विनंती करत आहेत. विश्वकल्याणाच्या या प्राचीन काव्यमय प्रार्थना ज्यांना स्फुरल्या ते सर्व ऋषी, ज्यांना उद्देशून हे मंत्र निर्माण झाले, त्या सर्व देवता आणि ज्यांनी या प्रार्थना म्हटल्या ते सगळे मनुष्यप्राणी, असे सगळेच त्या स्वयंभू आणि अमर अशा प्रजापतीचेच प्रजाजन आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून विकसित होत गेलेली ही संस्कृतीसुद्धा तशीच ‘अमृतत्व’ घेऊन जन्माला आली नसेल, तरच नवल! त्या सर्व प्राचीन प्रजेने जिथे वास केला, ती ही संपूर्ण भारतभू ‘दिव्य’ म्हणजे स्वर्गीय भूमीच ठरते. त्याच प्रजेचे आम्ही वंशज आहोत. हा दिव्यत्वाचा आणि अमृतत्वाचा वारसा आम्हाला लाभला आहे. म्हणूनच आम्ही ‘अमृताचे पुत्र’ आहोत. आमची ही प्राचीन संस्कृतीची धारा अशा भ्रामक सिद्धांतांनी लुप्त होण्याजोगी नाही, कारण ती ‘ऋत’ अर्थात सृष्टीच्या चलनवलनाचे व व्यवहाराचे शाश्वत नियम आणि ‘सत्य’ यांवर आधारलेली आहे, कुठल्या काल्पनिक सिद्धांतावर नाही. भारताबाहेरच्या जगात ठळकपणे दिसणाऱ्या इतर संस्कृती त्यांच्या अनुयायांच्या उत्कर्षाची काळजी घेताना अवश्य दिसतीलही. पण, आमच्या या संस्कृतीचा प्रत्येक अनुयायी मात्र समस्त मानवमात्र, प्राणीमात्र आणि संपूर्ण सृष्टीच्याच कल्याणाची काळजी घेतो. खळाळत वाहणारा गंगेचा प्रवाह आम्हाला जणू हेच सांगत असतो की, विश्वकल्याणाचा हा सांस्कृतिक प्रवाह कुठून बाहेरून एखाद्या आगंतुकासारखा येऊन इथे स्थायिक झालेला नाही, तर युगानुयुगे म्हणजेच निदान गेली ६० सहस्रके तरी असाच वाहत आलेला आहे, पुढेही असाच वाहत राहील.
 
 
 
यह कलकल छलछल बहती,
क्या कहती गंगा धारा?
युगयुग से बहता आया,
यह पुण्यप्रवाह हमारा।
 
- वासुदेव बिडवे

(लेखक भारताचा प्राचीन इतिहास,
संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology)
विषयाचे अभ्यासक आहेत.)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@