नाझेज्दा प्लेव्हित्स्काया भाग-४

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2021
Total Views |

Nazedda Plevitskaya_1&nbs
 
 
१९१८ साली पहिलं महायुद्ध संपण्यापूर्वीच, म्हणजे १९१७ साली रशियामध्ये बंद आणि राज्यक्रांती झाली. महायुद्ध संपल्यानंतर १९१९च्या ऑक्टोबरमध्ये सुप्रसिद्ध रशियन गृहयुद्ध घडून आले. मुळातच महायुद्धामुळे हादरलेल्या जगात या युद्धामुळेदेखील कित्येक उलथापालथी घडून आल्या. सगळीकडे बजबजपुरी माजली होती. कोण कोणाच्या बाजूने असेल, याचा कोणताही अंदाज बांधणं अशक्य झालं होतं. रशियातल्या पारंपरिक झार घराण्याविरुद्ध साम्यवाद्यांनी घडवून आणलेल्या या युद्धामध्ये झार राज्यकर्ते यांच्या बाजूने राष्ट्रवादी विचारांची ‘व्हाईट आर्मी’, तर साम्यवादी विचारांनी भारलेली ‘लाल सेना’ किंवा ‘रेड आर्मी’ अशा दोन बाजू होत्या. याच युद्धादरम्यान आपली आजच्या लेखाची नायिका, Kursk Nightingale म्हणून ओळखली जाणारी नाझेज्दा प्लेव्हित्स्काया प्रसिद्ध झाली. कोण होती ही नाझेज्दा प्लेव्हित्स्काया?
 
१७ जानेवारी, १८८४ या दिवशी कुर्स्कजवळच्या एका गावात नाझेज्दाचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिला गाण्याची अतिशय आवड होती. दोन वर्षे ‘रिलिजियस कोरस’मध्ये काम केल्यानंतर तिने कीव या युक्रेनच्या राजधानीमध्ये जाऊन व्यावसायिक गायिका म्हणून गायला सुरुवात केली. इथेच तिची एडमंड प्लेविकी नावाच्या एका पोलिश नर्तकाशी भेट झाली आणि काही कालावधीतच त्या दोघांनी लग्न केले. लग्न करून ते दोघेही मॉस्कोला आले. तिने तिथल्या प्रसिद्ध ‘याररेस्टॉरंट’मध्ये गायला सुरुवात केली. जिप्सी प्रकारचे संगीत आणि देखण्या गायिका हे या रेस्टॉरंटमधील बॅण्डचे प्रमुख वैशिष्ट्य होते. १९०९ मध्ये एका एका कॉन्सर्टमध्ये तिचं गाणं लेओनिड सोबिनोव्ह नावाच्या एका गायकाने ऐकले आणि त्याने तिच्यातली क्षमता ओळखून तिला पुढे यायची संधी दिली. सोबिनोव्हमुळेच नाझेज्दा रशियातली एक प्रसिद्ध गायिका बनली. तिच्या चाहत्यांमध्ये प्रत्यक्ष झार घराणे आणि तत्कालीन प्रसिद्ध ऑपेरा गायक फेडॉर शाल्यापीन यांचाही समावेश होता. तत्कालीन झार निकोलाय-खख यानेच तिला ‘कुर्स्क नाईटिंगेल’ असं नाव बहाल केलं होतं. याच दरम्यान १९१२ मध्ये तिचा आणि एडमंडचा घटस्फोट झाला. त्याचदरम्यान एका संध्याकाळी झार निकोलायची बहीण ओल्गा हिच्या राजवाड्यात गायला गेली असतानाच नाझेज्दाची ओळख व्लादिमीर शांगीन नावाच्या एका रुबाबदार आर्मी ऑफिसरशी झाली आणि ते तत्काळ एकमेकांकडे आकर्षित झाले. व्लादिमीर ओल्गाच्या नात्यातला होता. त्याने १९०४-०५च्या रशियन-जपानी युद्धात कामगिरी बजावली होती आणि त्यासाठी त्याला अतिशय प्रतिष्ठित असा ‘सेंट जॉर्जज क्रॉस’सुद्धा मिळाला होता. नाझेज्दा आणि व्लादिमीर यांनी एकमेकांशी लग्न करायचे निश्चित केले असूनही जवळजवळ दोन वर्षे म्हणजे १९१४ पर्यंत त्यांनी वाङ्निश्चय केला नव्हता. १९१४-१८ ही पहिल्या महायुद्धाची चार वर्षे तिच्यासाठी काहीशी खडतर ठरली. या युद्धाच्या पूर्वसीमेवर जर्मन्स, ऑस्ट्रियन्स आणि तुर्की सेनांशी रशियन फौजांनी सुविधा आणि शस्त्रास्त्रे यांचा तुटवडा असूनही अतिशय कणखर आणि चिवट झुंज दिली. १९१८ मध्ये युद्ध संपताना रशियाचे १.७ लाख सैनिक आणि अगणित नागरिक मारले गेले. त्या सैनिकांपैकीच एक होता व्लादिमीर शांगीन! त्यावेळी व्लादिमीर ‘७३ इन्फंट्री डिव्हिजन’मधील हिज मॅजेस्टीच्या घोडदलात लेफ्टनंट म्हणून, लेफ्टनंट जनरल जॉर्जी (युरी) लेव्हिटस्कीच्या अधिकारात कार्यरत होता. या युद्धात सुरुवातीला नाझेज्दादेखील रेड क्रॉस नर्सेसच्या ताफ्यात सामील झाली होती. पण, २८ जानेवारी, १९१५ रोजी व्लादिमीरचा मृत्यू झाल्यावर ती सेंट पीटर्सबर्गला परत आली आणि शांगीनच्या आईबरोबर राहू लागली. शांगीन आणि नाझेज्दाचा भाचा, तिच्या मोठ्या भावाचा पहिला मुलगा युद्धात मारले गेल्याच्या दु:खात तिने काही काळ काढला. मार्च १९१५ नंतर तिने पुन्हा गायला आणि काही सिनेमांतून काम करून पैसा मिळवायला सुरुवात केली. याशिवाय युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठीच्या अनेक कार्यक्रमांमधून तिने गायला सुरुवात केली. १९१७ मधल्या उठावापर्यंत हे सुरळीत चालू होते. १९१७ मधील दोन मोठे क्रांतिकारक उठाव आणि त्यानंतर रशियात घडून आलेल्या उलथा-पालथींमध्ये नाझेज्दा नेमकी कुठे होती?
 
 
१९१७ मधल्या उठावादरम्यान नाझेज्दा नेमक्या कुठल्या बाजूने होती किंवा तिचे राजकीय मत नेमके कोणत्या बाजूला झुकत होते, याची कोणतीही विश्वासार्ह माहिती अद्याप मिळू शकत नाही. मात्र, या दरम्यान जगण्यासाठी ‘रेड’ आणि ‘व्हाईट’ दोन्ही आर्मींसाठी गाऊन पैसा मिळविणे, हे तिला अधिक महत्त्वाचे वाटत होते. चेकांनी (उकएघअ) तिची पैशाची गरज ओळखून ‘रेड आर्मी’मधील सैनिकांसाठी गाण्याची संधी तिला दिली. सैनिकांसाठी गाण्याचे कॉन्सर्ट करत असतानाच ‘व्हाईट आर्मी’च्या ताब्यातील भागातही ती जात असे आणि गाण्याच्या निमित्ताने त्यांच्यातील ‘कुर्स्क नाईटिंगेल’च्या कित्येक जुन्या चाहत्यांना भेटत असे. त्यांच्याशी सलगी वाढवून त्यांच्याकडून माहिती मिळविण्याची तिला चटकच लागली. एका रात्रीच्या बदल्यात कित्येक सैनिकांकडून बरीच माहिती तिने मिळवली. या गोष्टीचा सुगावा कधी न कधी ‘व्हाईट आर्मी’ला लागणार होताच आणि तसा तो लागताच १९१९ मध्ये ‘व्हाईट आर्मी’ने तिला अटक केली आणि गोळ्या घालून मारून टाकण्याची आज्ञा दिली. पण, तिचं दैव बलवत्तर असल्यामुळे इथे तिची गाठ निकोलाय स्कॉबलिन नावाच्या तरुण ऑफिसरशी पडली. गोळ्या घालायला नेण्यापूर्वी आपले डोळे बांधायला नाझेज्दाने नकार दिला. तिचं धैर्य आणि सौंदर्य याने मोहून गेलेल्या स्कॉबलिनने तिच्यावर गोळ्या न झाडण्याचा हुकूम दिला. इतकंच नव्हे तर तिला निसटून पळून जायला मदत केली. तिथून निसटून ते दोघेही तुर्कस्तानच्या आश्रयाला गेले आणि तिथेच त्या दोघांनी लग्न केलं असं म्हटलं जातं. यानंतर नाझेज्दाच्या आग्रहावरून आणि पूर्वीचा संपन्न रशिया पुन्हा उभारायच्या कल्पनेने झपाटलेला स्कॉबलिन ‘रेड आर्मी’मध्ये सामील झाला आणि अतिशय यशस्वी गुप्तहेर म्हणून मानला गेला.
 
 
मिलर अपहरण
 
 
येव्हगेनी मिलर या नावाने ज्ञात असणारा ऑयगन लुडविग म्युलर हा बाल्टिक जर्मन घरात जन्माला आलेला एक रशियन ऑफिसर होता. जनरल स्टाफ अ‍ॅकॅडमीमधून पदवी घेतल्यानंतर ‘रशियन इम्पिरियल गार्ड’ म्हणून काम केले. १८९८ ते १९०७ या कालावधीत रशियन मिलिटरी अ‍ॅटॅचे म्हणूनही अनेक युरोपीय देशांमध्ये काम केले. १९१७ मधल्या उठावामध्ये कम्युनिस्टांच्या विरोधातील ‘व्हाईट आर्मी’चा नेता होता. १९१७ मध्ये ‘व्हाईट आर्मी’चा पाडाव झाल्यानंतर मिलरने आधी नॉर्वे आणि नंतर पॅरीस, फ्रान्समध्ये आश्रय घेतला होता. अशा या मिलरचे अपहरण करून त्याला रशियामध्ये आणण्याचा डाव ‘रशियन इंटेलिजन्स सर्व्हिस’ने आखला. दि. २२ सप्टेंबर, १९३७ रोजी रशियन हेर निकोलाय स्कॉबलिन याने बनावट नाव धारण करून दोन जर्मन एजंट्सना भेटण्याचे निमित्त करून मिलरला पॅरीसमधील त्यांच्या गुप्त ठिकाणी नेले. जर्मन हेर म्हणून आलेली दोन्ही माणसं वास्तविक रशियनच होती. तिथे त्याला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले गेले आणि चक्क एका ट्रंकेत कोंबून लेहाव्रे या बंदरावर असणार्‍या एका रशियन बोटीतून रशियात आणले गेले. मात्र, मिलरने आपल्या ऑफिसमध्ये ठेवलेल्या एका चिठ्ठीद्वारे सत्य समोर आले आणि सर्व रशियन हेरांचा शोध जोरात सुरू झाला. इकडे आपली कामगिरी झाल्या झाल्या स्कॉबलिन तत्काळ रशियन दूतावासात पोहोचला आणि तिथून बार्सिलोनामध्ये गेले. बार्सिलोना सरकारने त्याला फ्रेंचांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. मात्र, या सगळ्या गदारोळात फ्रान्सच्या आजूबाजूला घिरट्या घालत असलेल्या नाझेज्दाला मात्र फ्रेंचांनी तत्काळ पकडले आणि स्कॉबलिनची बायको म्हणून तिच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला गेला. जरी तिने तो नाकारला, तरी वस्तुत: स्कॉबलिनच्या सगळ्या कारवायांविषयीची माहिती तिला होतीच. जरी मिलर अपहरणात तिचा नेमका कसा सहभाग होता हे समजू शकले नव्हते, तरीही तिला दोषी ठरवून २० वर्षांची कारावासाची शिक्षा दिली गेली. १९४० मध्ये रेनेसच्या तुरुंगातच तिचा मृत्यू झाला आणि नाईटिंगेलचा मधुर आवाज कायमचा शांत झाला.
- मैत्रेयी जोशी
@@AUTHORINFO_V1@@