चीनची असलियत दाखविणारे पुस्तक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2021   
Total Views |

achapal chin_1  




मागील वर्षानुवर्षे चीनच्या कथित अजस्रपणाच्या ओझ्याखाली निरनिराळी सरकारे वागत आली, तसे मोदींनी केले नाही. कारण, आपण चीनला लगाम लावू शकतो, तशी क्षमता, तशी इच्छाशक्ती भारतात आहे, याची जाणीव नरेंद्र मोदी यांना होती आणि हीच जाणीव सर्वसामान्य जनमानसात करून देण्याचे, चीनच्या भल्या मोठ्या डोलार्‍याचे एक एक इमले कसे तगलादू पायावर आधारलेले आहेत, हे सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे काम स्वाती तोरसेकर यांचे ‘अचपळ चीन’ हे पुस्तक करते.



गेल्या वर्षी अवघ्या जगावर वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूचे संकट कोसळलेले असतानाच चीनने भारतीय सीमेवर दंडेलीचा प्रयत्न केला. भारताच्या लडाख भागातील गलवान खोरे आणि परिसर बळकाविण्याच्या उद्देशाने चिनी सैनिकांनी स्वतःहून आगळीक केली. भारतीय सैनिकांवर धारदार हत्यारे, शस्त्रांनी हल्ला चढवला. मात्र, भारतीय सैनिकांनीही चिनी सैनिकांनी जशास तसे उत्तर दिले. भारतीय सैनिकांनी चीनच्या ४० पेक्षा अधिक सैनिकांना यमसदनी धाडले व दरम्यानच्या संघर्षकाळात भारताच्याही २० पेक्षा अधिक सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. मात्र, तेव्हापासून देशाचे राजकीय नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनची चहूबाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी २०१७ मधील डोकलाम या भारत, भूतान व चीन सीमेवरील तिठ्यामुळे उद्भवलेल्या वादाची पार्श्वभूमी लक्षात घेता, यावेळी चीनला चांगलीच अद्दल घडवायची, असेच भारतीय नेतृत्वाने जणू काही ठरवले होते. त्यानुसारच मोदी सरकारने पावले उचलली व भारतीय लष्कराला आवश्यक त्या प्रत्येक कारवाईसाठी प्रोत्साहन दिले, तसेच चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. चिनी मोबाईल अ‍ॅप्सवरील बंदी, चिनी कंपन्यांना सरकारी कामाचे कंत्राट न देणे, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष चिनी गुंतवणुकीपूर्वी सरकारची परवानगी आणि अन्यही अनेक मार्गांनी भारताने चीनला वेसण घालण्यासाठी हालचाली केल्या. सोबतच जागतिक स्तरावर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या ‘क्वॉड’ गटांतील देशांशी राजकीय, लष्करी, आर्थिक सहकार्य वाढवत, लष्करी कवायती करत चीनसमोर आव्हान उभे केले. महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनतेनेही या सगळ्यात सरकारमागे उभे राहत चीनचा विरोध केला, चिनी मालावर बहिष्कार टाकला व चीनला धडा शिकविण्याच्या विविध प्रकारांत आपलाही सहभाग नोंदविला. ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे, २०२० सालीच मार्च महिन्यात प्रकाशित झालेले आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक ज्येष्ठ लेखिका स्वाती तोरसेकर यांचे ‘अचपळ चीन’ हे पुस्तक.

चीन महाबलाढ्य आहे, चीन ड्रॅगनइतका शक्तिशाली आहे, भारत चीनचा मुकाबला करू शकत नाही, असे अनेकानेक गैरसमज गेली कित्येक वर्षे देशातील डावे पक्ष-नेते-बुद्धिजीवी-विचारवंत आणि प्रसारमाध्यमांनी जनतेवर बिंबविण्याचे काम केले. त्यासाठी १९६२ सालच्या चीनबरोबरील युद्धात झालेल्या भारताच्या मानहानीचा वापरही त्यांनी पुरेपूर करून घेतला. नक्षलवाद, माओवाद आणि फुटीरतावादाला चीन प्रोत्साहन देतो. पण, भारत त्याचा समर्थपणे विरोध करू शकत नाही, असे चित्रही या मंडळींनी रेखाटले. तथापि, नरेंद्र मोदी यांनी देशाचा कारभार आपल्या हाती घेतला व ‘न आँखे झुकाकर न आँखे उठाकर, बल्कि आँखों से आँखे मिलाकर भारत की विदेशनीती चलेगी,’ असे म्हटले. अर्थात, ‘आम्हीही समोरच्या देशाशी बरोबरीनेच वागणार,’ हा त्यांच्या म्हणण्याचा मथितार्थ होता व त्याप्रमाणे त्यांच्या सरकारचे वर्तनही राहिले. मागील वर्षानुवर्षे चीनच्या कथित अजस्रपणाच्या ओझ्याखाली निरनिराळी सरकारे वागत आली, तसे मोदींनी केले नाही. कारण, आपण चीनला लगाम लावू शकतो, तशी क्षमता, तशी इच्छाशक्ती भारतात आहे, याची जाणीव नरेंद्र मोदी यांना होती आणि हीच जाणीव सर्वसामान्य जनमानसात करून देण्याचे, चीनच्या भल्या मोठ्या डोलार्‍याचे एक एक इमले कसे तगलादू पायावर आधारलेले आहेत, हे सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे काम स्वाती तोरसेकर यांचे ‘अचपळ चीन’ हे पुस्तक करते.

‘अचपळ चीन’ पुस्तकात एकूण १९ प्रकरणे आहेत आणि त्यात चीनने भारतीय भूप्रदेशावर अवैध कब्जा करण्यापासून १९६२ च्या आक्रमणापासून सुरुवात केलेली आहे. पुढे आर्थिक शक्तीत वाढ करण्यासाठी कम्युनिझम गुंडाळून नियंत्रित भांडवलशाही स्वीकारलेला चीन, आदी मुद्दे येतात. साधारणतः १६०० वर्षांपूर्वीच्या सुन-त्सू या चिनी तत्त्ववेत्त्याच्या ‘आर्टी ऑफ वॉर’ ग्रंथाची, त्यातल्या युद्धविषयक, समोरच्याला नामोहरम करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तत्त्वांची व त्यानुसार वागणार्‍या चीनची, त्याच्या स्वभावाची माहिती पुढे दिली आहे. नंतर आधुनिक काळात माओ-त्से-तुंग यांनी चिनी सत्ता मिळविण्यापासून ते चिनी साम्राज्यविस्तार, शेजारी देशांशी युद्धे व सीमाविवाद यांची माहिती आहे. तसेच अमेरिकेशी मैत्री करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा मुद्दाही आलेला आहे. कम्युनिझम ते रिव्हिजनिझम, आर्थिक, औद्योगिक प्रगतीसाठी साम्यवादाच्या तत्त्वाला मुरड घालणारा चीन, ही माहिती पुढच्या प्रकरणांत येते. पुढे चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांची सुरुवातीपासूनची माहिती, त्यांची जडणघडण, विचारसरणी, त्यांनी सत्तेवर येताच उघडलेली भ्रष्टाचारविरोधी मोहीम, त्यामुळे नाराज झालेले कम्युनिस्ट पक्षातील लोक यांची माहिती आहे, तर त्यापुढे लष्कराची पुनर्रचना आणि आधुनिकीकरण हे प्रकरण आहे. ‘फॅसिस्ट चीन’ प्रकरणात, चीनमध्ये जगाला सांगण्यासाठी कम्युनिस्ट शासनप्रणाली असली, तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेसाठी तिथे ‘फॅसिझम’पेक्षा वेगळी परिस्थिती नाही, असे सांगणारे एक प्रकरण आहे. नंतरच्या प्रकरणांत भूराजकीय वर्चस्वाकडे पावले टाकणार्‍या चीनच्या मनसुब्यांची चर्चा केलेली आहे. सोबतच वरून संपन्न-समृद्ध दिसणार्‍या चीनमधील सर्वसामान्य कामगार, शेतकरी व निवडक प्रांत वगळता इतरत्र राहणार्‍या जनतेच्या विदारक स्थितीची माहिती आहे. जगातील बौद्धिक व तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत देशांतील बौद्धिक व तांत्रिक संपदेवर दरोडा टाकणारा, त्याची चोरी करणारा चीन व त्या आधारे आपला स्वार्थ साधणारा चीन याची माहिती आहे. ‘महाराक्षसाचे पंचप्राण-तिबेट’, या महत्त्वाच्या प्रकरणात चीनने तिबेट हस्तगत केल्यापासूनच्या घडामोडी व तिबेटमध्ये चीनचे प्राण लपलेले आहेत, हे सांगितले आहे. चीनने तिबेट गमावला तर त्याच्या महाअस्तित्वाला सुरुंग लागेल, असा विश्वासही या प्रकरणात व्यक्त केलेला आहे. नंतर पाकिस्तान-चीन साटेलोटे, भारतातील फुटीर गटांना चीनकडून घातले जाणारे खतपाणी, गिलगिट-बाल्टिस्तान-चीनपर्यंतचा सीपेक महामार्ग व तो प्रत्यक्षात अण्वस्त्र महामार्ग आहे, हे सांगण्यासाठी दिलेली माहिती, भारत-चीन संबंध आणि सरतेशेवटी कोरोना विषाणूचे संकट हे एक नवीन प्रकरण अशाप्रकारे विविध मुद्द्यांवर माहिती दिलेली आहे.

स्वाती तोरसेकर यांचे ‘अचपळ चीन’ पुस्तक म्हणजे चीनच्या सामर्थ्याविषयी आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या अनेक दंतकथा निष्प्रभ करणारे आहे, तसेच प्रत्येक भारतीयाच्या मनात भारताबद्दल, भारताच्या ताकदीबद्दल आत्मविश्वास जागवणारे व शत्रू कितीही मोठा असो, त्याला आपण परास्त करू शकतो, याची जागृती करणारे आहे. देशाचे नेतृत्व आता १९६२चा नव्हे, तर २०२०-२१ चा भारत आहे, असे म्हणते, आता आमच्यावर जोरजबरदस्ती, दडपशाही करणे जमणार नाही, असे ठणकावते, ते कशाच्या बळावर याची माहिती देणारे हे पुस्तक आहे. तसेच शक्तिशाली दिसणार्‍या चीनचा पाया भुसभुशीत असून वेळ येताच लगावलेल्या ठोशाने तो ढासळून पडूही शकतो, असे सांगणारे हे पुस्तक आहे. मराठीत चीनबद्दल इतक्या सोप्या भाषेत माहिती देणारे, चीनबद्दलचे गैरसमज दूर करणारे अन्य कुठले पुस्तक दुसरे कुठलेही नसेलच, म्हणूच ‘अचपळ चीन’ संग्रही असावे, असे वाटते.

दरम्यान, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तकाला डॉ. लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांची प्रस्तावना व ज्येष्ठ पत्रकार अरुण करमकर यांची विशेष प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकात चीनबद्दलची माहिती सोप्या भाषेत दिलेली आहे, तसेच आवश्यक तिथे रेखाचित्रे, नकाशांचाही वापर केलेला आहे. पुस्तकाची छपाई, मुखपृष्ठ, मलपृष्ठही उत्तम आहे. सोबतच पुस्तकातील प्रकरणांच्या शेवटी घटना, घडामोडी, प्रसंगांचे संदर्भ आणि पुस्तकाच्या शेवटी अनेकानेक संदर्भग्रंथ, वेबसाईट लिंक्स, लेखांची माहिती दिलेली आहे, यावरून लेखिकेने सदर पुस्तक किती अभ्यासाने लिहिलेले असेल, याची खात्री पटते. म्हणूनच ‘अचपळ चीन’ पुस्तक संग्राह्य ठरते.

पुस्तकाचे नाव: अचपळ चीन
लेखिका: स्वाती तोरसेकर
प्रकाशक: दीनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणे
पृष्ठे :१७०
मूल्य : २००/-
आवृत्ती : मार्च २०२०

@@AUTHORINFO_V1@@