भारत बायोटेकला आता 'या' "मेड इन इंडिया" लसीच्या परवानगीची प्रतीक्षा
मुंबई: कोरोनाव्हायरस विरोधात लढ्यात भारताने आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. भारतीय बनावटीची आणखी एक स्वदेशी लस तयार झाली आहे आणि परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. आधी कोरोना प्रतिबंधक लस म्हणून इंजेक्शन आणि आता नाकावाटे दिली जाणारी लससुद्धा तयार करण्यात आली आहे. भारताला पहिली स्वदेशी लस देणाऱ्या कंपनीनेच ही लस तयार केली आहे.
भारतात तयार करण्यात आलेल्या 'नोझल वॅक्सिन'ची लवकरच ट्रायल सुरू होणार आहे. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायलला परवानगी देण्याचा सरकारचा विचार आहे. याबाबत सध्या चर्चा सुरू आहे आणि लवकरच हीसुद्धा मंजुरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आलेली आहे. सध्या देशात कोरोना लसीकरण सुरू आहे. शिवाय, कोवॅक्सिन ही लस यूकेत आढळलेल्या कोरोनाच्या 'न्यू स्ट्रेन' विरोधातही प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
दरम्यान याआधी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटनेही अमेरिकेच्या 'कोडाजेन्सिक्स' या कंपनीसोबत नाकावाटे दिल्या जाणारी कोरोना लसीबाबत करार केला होता. या कंपनीने तयार केलेली 'CDX-005' ही लस. या लसीच्या उत्पादनात पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी आहे. कोडाजेन्सिक्स कंपनीने याआधी दिलेल्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट या कोरोना लसीचं भारतात उत्पादन करणार आहे.