गावातही भाजपचाच झेंडा!

    19-Jan-2021
Total Views |

BJP_1  H x W: 0
 
 
 
 
‘जितं मया, जितं मया’च्या कोणी कितीही आरोळ्या ठोकल्या, तरी मतदारराजाला कोणाला हसवायचे नि कोणाचे हसू करायचे, हे चांगलेच समजते. त्यातूनच त्याने मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची पात्रता दाखवून दिली नि तिला राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकून दिले, तर भारतीय जनता पक्षाला प्रथम क्रमांकावर विराजमान केले.
 
 
 
जनतेने मतदानाच्या माध्यमातून थोबाड फोडले तरी आपलीच लाल म्हणण्याचा उद्योग शिवसेनेने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर करून दाखविल्याचे दिसते. कारण, ग्रामपंचायतींचे संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच शिवसेनेने सोमवारी वेडाच्या भरात नाचायला सुरुवात केली. पण, मंगळवार उजाडला नि मतदारांनी असंगाशी संग करणाऱ्या शिवसेनेचीच मताधिकार वापरून माती केल्याचे स्पष्ट झाले. १३ हजार ८३५ पैकी १३ हजार ७६९ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले नि त्यात भारतीय जनता पक्षानेच सर्वाधिक ग्रामपंचायतीत आपला झेंडा फडकावल्याचे समोर आले. राज्यभरातील सुमारे तीन हजार २६३ ग्रामपंचायतींत भाजपने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार ९९९, शिवसेनेने दोन हजार ८०८, काँग्रेसने दोन हजार १५१ आणि स्थानिक आघाड्यांनी दोन हजार ५१० तर मनसेने ३८ ग्रामपंचायतींत यश मिळवले.
 
 
एकूणच ग्रामपंचायत निवडणूक निकालांची आकडेवारी पाहता, बालबुद्धीची व्यक्तीही राज्यातील ग्रामीण भागातदेखील भाजपचाच बोलबाला असल्याचे मान्य करेल. परंतु, शिवसेनेकडे तितकीही नाही आणि त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकांचा संपूर्ण निकाल समजण्याआधीच त्या पक्षाने ‘जितं मया, जितं मया’ म्हणत आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. तथापि, कोणी कितीही आरोळ्या ठोकल्या तरी मतदारराजाला कोणाला हसवायचे नि कोणाचे हसू करायचे, हे चांगलेच समजते. त्यातूनच त्याने मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची पात्रता दाखवून दिली नि तिला थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकून दिले. इतके होऊनही जनमत ‘ठाकरे सरकार’च्या बाजूने असल्याचे शिवसेनेला वाटत असेल तर आनंदीआनंदच! कारण, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या होत्या व निकालही स्वतंत्रच लागले. त्यामुळे शिवसेनेने तिन्ही नापासांच्या गुणांची बेरीज करत जनतेने आम्हालाच उत्तीर्ण केल्याचे घसा फाटेस्तोवर सांगितले, तरी त्याची किंमत शून्यच ठरते. तसेच आता लवकरच राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकादेखील होणार आहेत नि त्यावेळी पुन्हा एकदा जनमत कोणाच्या बाजूने आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी शिवसेनेला मिळेलच. तोपर्यंत गेल्या पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांत क्रमांक दोनवर असलेल्या आपल्या पक्षाची कौले उडविण्याचे काम मतदारांनी का केले, याचे आत्मपरीक्षण करता आले तर शिवसेनेने करून पाहावे.
 
 
दरम्यान, एकेकाळी भाजपला शहरी तोंडवळ्याचा पक्ष म्हणून हिणवले जात असे, त्याच भाजपने आताच्या ग्रामपंचायत निवडणुकांत घवघवीत यश मिळवून ग्रामीण भागातही आपणच क्रमांक एकवर असल्याचे सिद्ध केले. त्यातून अर्थातच, ग्रामीण जनतेने भाजपच्या कार्य आणि कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याचे, तसेच ध्येय-धोरणांना स्वीकारल्याचे समजते, हे महत्त्वाचे. कारण, गावकीच्या राजकारणात भाजपला स्थान नाही, अशी टीका भाजपवर अनेकदा विरोधकांकडून करण्यात आली. पण, ग्रामीण भागातील जनताही भाजपच्या विविध विषयांवरील भूमिकेच्या पाठीशी आहे, यावर आताच्या निकालांनी शिक्कामोर्तब केले. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मतदारांनी नाकारल्याचेही समजते. म्हणजे मतदारांनीच तिन्ही पक्षांची बिघाडी करत त्यांची हवा काढली व भाजपला पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर विराजमान केले.
 
 
दरम्यान, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारला सत्तेवर येऊन वर्ष झाले आणि याच काळात कोरोनाचे संकटही कोसळले. कोरोनासारख्या भीषण आपत्तीत राज्याच्या कारभाऱ्यांनी खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे राहत धीर देणे गरजेचे होते. पण, ते काम सत्ताधाऱ्यांनी केले नाही, तर आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपने ते केले. कोकण किनारपट्टीला धडकलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ, विदर्भातील महापूर व अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती अशा वेगवेगळ्या संकटकाळातही मविआने नव्हे, तर भाजपनेच शेतकऱ्यांकडे, कामगारांकडे, सर्वसामान्य जनतेकडे मदतीचा हात पुढे केला. ठाकरे सरकारने तर कोरोना संकट असो वा अन्य, त्यावर मात करण्यासाठी कसलेही पॅकेज जाहीर केले नाही. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तर कित्येक महिने होऊन अजूनही मदत दिलेली नाही. बांधावर खते, बी-बियाणे योजनेचा तर पुरता बोऱ्या वाजलेला आहे. परिणामी, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारवर जनतेने विश्वास नव्हे तर रोष व्यक्त केला नि आताचे निकाल त्याचीच ग्वाही देतात.
 
 
जनता संकटाच्या खाईत रुतलेली असताना तिच्या साहाय्यासाठी पुढे येणे कोणत्याही राज्यकर्त्याचे काम. पण, महाराष्ट्राचा ‘निरो’ ठरू पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंनी तसे केले नाही व ते फक्त घरात बसून राहिले. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्राचे दौरे करत जनतेला धीर दिला. त्यातून सत्ता मिळावी म्हणून पावसात भिजून दाखविणाऱ्या पण सत्ता मिळताच जनतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पवारांनीच दत्तक घेतलेल्या एनकुळे गावात मतदारांनी पराभव करत नऊपैकी सहा जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. कोकणाला तर शिवसेना आपला ‘बालेकिल्ला’ वगैरे म्हणवत असते. पण, तिथेही भाजप नेते नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या माध्यमातून मतदारांनी शिवसेनेचा धुव्वा उडवला. अर्थात, ही फक्त सुरुवात आहे, यापुढेही शिवसेनेला कोकणात धक्क्यावर धक्के बसणारच आहेत नि त्यावेळी नेमकी किती आणि कुठे पडझड झाली, हे लिहायलाही तिला शब्द अपुरे पडतील.
 
 
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल तर लागलेच आणि लोकमत भाजपच्या बाजूने असल्याचे त्यावरून समोर आले. आता यापुढे औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि त्यानंतर मुंबई महापालिकेचीही निवडणूक आहेच. तेव्हा आज तथाकथित विजयाचा तोरा मिरविणाऱ्या शिवसेनेच्या व तिच्या साथीदारांचाही भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही. आता ग्रामपंचायतीच्या निकालातून ग्रामीण भागात भाजपचे वर्चस्व असल्याचे तर समजलेच; पण महापालिका निवडणुकांतही मतदारांवर भाजपचेच गारुड असल्याचे लवकरच समजेल आणि तेव्हा मात्र शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची बोलती बंद झाल्याशिवाय राहणार नाही.