मुंबईतील दहा शाळांमध्ये ‘सीबीएसई’ मंडळाच्या शाळा सुरू होणार
मुंबई: मुंबईतील महापालिका शाळांचा दर्जा राखण्यात महापालिका प्रशासन विविध प्रकारे खटाटोप करीत असतानाचा आता तब्बल दहा शाळांमध्ये ‘सीबीएसई’ मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय सोमवार, दि.१८ जानेवारी रोजी निर्णय घेण्यात आला. महापालिका शाळांची पटसंख्या राखण्यासाठी तब्बल २७ प्रकारच्या शालेय वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आला असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांचा कल लक्षात घेता, मुंबईतील दहा शाळांमध्ये ‘सीबीएसई’ मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
या शाळांमध्ये जुनिअर केजी, सिनिअर केजी पहिली ते सहावीपर्यंत प्रत्येक वर्गाची एक तुकडी असणार आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरू केले जाणार आहेत. मुंबई महापालिकेकडून इयत्ता दहावीपर्यंतच्या शाळा चालवल्या जातात. शाळांत राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांमुळे मुलांच्या गुणवत्तेत दर्जात्मक वाढ होत आहे, असं मत एकीकडे व्यक्त होत आहे.
असं असलं तरी, पालकांचा मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल असल्याने इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे, असंसुद्धा सांगितलं जात आहे. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांतील पालक ‘सीबीएसई’, ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळेत परवडत नसतानाही प्रवेश घेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने पालिका हद्दीत ‘सीबीएसई’ मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘के-पूर्व’ विभागात जोगेश्वरीतील पूनम नगर येथे प्रायोगिक तत्त्वावर शाळा सुरू करण्यात आली आहे. त्याला शिक्षण समितीची मान्यता मिळाली आहे. या शाळेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने पालिकेकडून इतर विभागातही अशा प्रकारच्या शाळा सुरू केल्यास दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
आता या शाळेमध्ये प्रवेश कसा मिळणार आहे ? तर या शाळांमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना ९०% प्रवेश हे लॉटरी पद्धतीने, पाच टक्के महापौरांच्या शिफारसीनुसार आणि उरलेले पाच टक्के प्रवेश महापालिका कर्मचार्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. तेव्हा आता मुंबई महानगरपालिकेचा आपल्या शाळांची पटसंख्या राखण्याचा खटाटोप यशस्वी होतोय की नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.