जब प्रभू श्रीराम साथ हैं।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2021   
Total Views |

Rutambara_1  H
 
राम मंदिर उभारणीमध्ये ज्यांनी रणशिंग फुंकले आणि तमाम हिंदू जनतेची चेतना जागृती केली, त्या म्हणजे साध्वी ऋतंभरा दीदी माँ. सध्या ‘प्रभू श्रीराम मंदिर निधी समर्पण सोहळा’ सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने दीदी माँ मुंबईमध्ये मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्यासाठी उपस्थित होत्या. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...
 
राम मंदिर के लिये निधी क्यूं? “राम मंदिरासाठी ‘निधी समर्पण’ हे केवळ प्रतीक आहे बरं. खरे समर्पण आहे ते आपल्या हिंदू मनाच्या अस्मितेसाठी. हजारो वर्षांच्या चेतना जागृतीचे मूर्त स्वरूप आपले राम मंदिर आहे. यात निधी जमवणे गौण आहे. मुख्य स्वरूप आहे ते, रामनाम स्मरण करत आपण एकमेकांना भेटणार आहोत. ‘क्या राजा, क्या रंक’ सगळे रामनामाने एकरूप होणार आहेत. हे रामनाम भारताच्या कोटी कोटी जनतेला भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली वारशाशी जोडत आलेले आहे आणि जोडत राहणार आहे. श्रीरामांचे नाव घेतल्यावर कुणीही भारतीय व्यक्ती दरवाजा बंद करेल का? नाही करणार. आप के घरमेंभी रामभक्त आयेंगे, रामभक्त सब जगह जायेंगे। रामनाम का गुणगान गायेंगे! प्रभू राम तर सर्वत्र आहे.” साध्वी ऋतंभरा दीदी माँ अगदी उत्साहाने सांगत होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता.
 
मी विचारले, “दीदी माँ, खरे सांगा तुम्हाला वाटलेले का राम मंदिर कधी सत्यात उतरेल?” यावर क्षणभर थांबून त्या म्हणाल्या, “सच कहूं, प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर आपल्या पुण्यभू भारतात नाही उभे राहणार, तर कुठे? त्यामुळे मंदिर तर निर्माण होणारच, अशी मनापासून खात्री होती. पण ती कधी होईल, याबाबत निश्चिती नव्हती. पण असे जरी वाटले तरी मनात खात्री होती, ‘मंदिर वही बनायेंगे।’ ” दीदी माँच्या ओजस्वी वाणीला एक स्वप्नस्नेहाचा गोडवा जाणवत होता. आजपर्यंत दीदी माँची वाणी अतिशय धारदार ऐकलेली. पण ‘मंदिर बनायेंगे’चे आता मंदिर निर्माण होत आहे म्हणून त्यांच्या आवाजात आणि शब्दांतही कमालीचे मार्दव जाणवत होते. मी तसे म्हटल्यावर त्या म्हणाल्या की, “आयुष्यभर ज्या स्वप्नांचा ध्यास घेतला आणि ते स्वप्न तुमच्यासमोर अकल्पितपणे साकार झाले तर काय वाटेल? या भावस्थितीचे शब्दांत वर्णन होईल का? माझेही अगदी तसेच झाले आहे. ‘मंदिर वही बनायेंगे’चे मंदिर उभे राहत आहे. कोट्यवधी लोकांचे स्वप्न साकार होत आहे. अयोध्येत रामललांचे मंदिर व्हावे, प्रभू पुन्हा आपल्या जन्मस्थानी वैभवात विराजमान व्हावेत, हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न होते. ते स्वप्न आपल्या जीवंतपणी पूर्ण होत आहे. यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा आनंदाने नि:शब्द झाले आहे." आपल्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करत दीदी माँ अतिशय भावूक झाल्या.
त्यापैकी काही घटनांचा उल्लेख करावासा वाटतो. दीदी माँ म्हणाल्या, “प्रश्रू श्रीरामचंद्र हे भारतीय अस्मितेचे प्रमाण आहेत. आदर्श आहेत. देशावर परकीयांची आक्रमणे झाली. आपल्या भारतीयत्वावर घाला घालण्यासाठी परकीयांनी अर्थात इस्लाम शासनकर्त्यांनी आपल्या प्रतीकांचा अपमान केला. आपली श्रद्धास्थानं तोडली. पण, जनमनातला ‘राम’ ते खोडू शकले नाहीत. त्या प्रभू रामचंद्रांचा वनवास मात्र कायम होता. त्यांच्या जन्मस्थानावर कब्जा कायम होता.” हे म्हणताना त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. भरल्या आवाजाने दीदी माँ म्हणाल्या, “मी जेव्हा रामललांचे दर्शन पहिल्यांदा घेतले ना, त्यावेळी मी खूप अस्वस्थ झाले. जगाचे पालनकर्ते रामललांना कुठे ठेवले होते? प्रभू रामांच्या जन्मस्थानावरही प्रश्नचिन्ह? मला त्यावेळी वाटले की, हे प्रश्नचिन्ह रामललांच्या जन्मस्थानापेक्षाही हिंदू म्हणून माझ्या अस्मितेवर आहे. आमच्या धर्मचेतनेवर आहे. त्यामुळे रामललांच्या मंदिरासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा द्यायचा, हे मी माझ्या आयुष्याचे ध्येय ठरवले."
 
दीदी माँ भूतकाळात रमल्या होत्या. क्षणभर थांबून त्या म्हणाल्या, “माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट आणि मी कधीही विसरू न शकणारा दिवस कोणता माहिती आहे का? मी राम मंदिर चेतना जागृती तसेच प्रवचन कार्य करते या कारणासाठी मला दिग्विजय सिंग यांनी तुरुंगात टाकले. तुरुंगात टाकले म्हणून दु:ख वाटले नाही. दु:ख याचे वाटले की, हिंदू धर्मात जन्मलेली व्यक्ती रामनामाला विरोध कसा करू शकते? राजकीय अजेंडे काहीही असतील, पण हिंदू म्हणून धर्म आणि नीती याबाबत काहीच सोयरसुतक नाही? रामानामाला परकीयांच्या सत्तेत विरोध झाला, तर समजू शकते. पण स्वतंत्र भारतात कोट्यवधी हिंदू या देशात असताना, हिंदूबहुल देशात रामनामाला विरोध करणारे आहेत? पण एक सांगू का? या घटनेने एक कळले की, रामनाम जनमनात आहे. त्या कोट्यवधी हिंदूंपर्यंत रामचेतना पोहोचली पाहिजे. आज रामललांच्या कृपेने या देशात प्रभूंच्या मंदिराला लोकमान्यताच नव्हे, तर राजमान्यता आणि कायद्याचीही मान्यता आहे."
 
हे सगळे बोलत असताना दीदी माँच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. त्यांना विचारले की, “तुमच्या आयुष्यातील अतिशय अविस्मरणीय क्षण कोणता?” त्यावर त्या म्हणाल्या, “जेव्हा सर्वोच्च न्यायालयातही रामललांच्या बाजूने निकाल लागला तो क्षण. हो! पण, एक अशी घटना आहे की, जी मला नेहमीच प्रेरणा देते. राम मंदिराचे आंदोलन जोरात सुरू होते. मी ठिकठिकाणी राम मंदिराच्या आंदोलनासंदर्भात प्रवचन करायचे. आधीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनात राम आहेच. फक्त त्याचे स्मरण करायचे. पण, त्यासाठी तत्कालीन प्रशासनाने मला गुन्हेगार ठरवले. मला पकडण्यासाठी पोलीस सर्वत्र शोध घेत होते. त्यावेळी मी हरिद्वारमधील आश्रमात होते. मनात केवळ आणि केवळ रामनाम होते. रामललांचे भव्य मंदिर अयोध्येत उभारावे यासाठी संघर्ष करण्याची जिद्द होती. मी नुकतीच पूजा आटपून बसले होते. मला कळले की, काही वेळातच पोलीस हरिद्वारच्या आश्रमात मला पकडण्यासाठी येणार आहेत. आश्रमाचा दरवाजा उघडा होता. मी तो बंद करणार, इतक्यात समोर पोलिसांची व्हॅन. मला पोलिसांची भीती नव्हती. पण, पकडले गेले तर आंदोलनापासून मी दूर राहणार होते. मला तर आंदोलनात सक्रिय सहभागी व्हायचे होते. मी पळत आश्रमाच्या गच्चीत गेले. तेथील भिंतीवरून उडी मारली. पाठीमागे दुसऱ्या आश्रमाच्या गच्चीजवळ मी पडले. स्वत:ला सावरत उठले. पाठीमागच्या आश्रमातले लोक मला पाहत होते. त्यांना सगळे माहिती होते. पण,त्यांच्यापैकी कुणीही मदतीला आले नाहीच, उलट मला बघून दूर झाले. त्यांना वाटले की, माझ्यामुळे पोलीस किंवा त्यावेळचे प्रशासन त्यांना शिक्षा करेल. इतकी भीती त्यांना वाटत होती. त्यावेळीही मला या भीतीबद्दल खूप वाईट वाटले. स्वतंत्र भारतात ही भीती? मी तशीच पळत रस्त्यावर आले. तिथे कोणतीतरी बस जात होती. मला माहिती नव्हते ती बस कुठे जाणार आहे. मी भगवे वस्त्र परिधान केले होते. त्यामुळे की काय, मला तिकिटाबद्दल कंडक्टरने विचारले नाही. बस शेवटी हिमाचल प्रदेशच्या दिशेने जाऊ लागली. मी तिथे एका स्टॉपवर उतरले. संध्याकाळ संपत आलेली होती. कुठे जायचे, काय करायचे, काही ठरले नव्हते. पण जिथे कुठे जाईन तिथे राम मंदिराबाबतच बोलायचे आणि जमेल ते कार्य करायचे, हे ठरवले होते. रामनाम मनात घेत मी रस्त्यावर मार्गक्रमण करत होते.
दूरपर्यंत चालल्यानंतर मला एक झोपडी दिसली. सकाळपासून पाण्याचा घोटही घेतला नव्हता. मी त्या झोपडीच्या दिशेने गेले, तर तिथे अतिशय तेजस्वी वृद्धा दिसली. मला पाहताच तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. अतिशय सुहास्यवदनाने ती झोपडीच्या बाहेर आली आणि म्हणाली, “ऋतंभरा, बेटी आयी तू. आ।” या आईने मला कसे ओळखले? मी त्यावेळी भारतभर प्रवचन करायचे. हिमाचलमध्येही खूप वेळा प्रवचन करायचे. राम मंदिर आंदोलनामुळे भारतभर ओळख निर्माण झाली होती. त्यामुळेच कदाचित या आईने मला ओळखले असेल. पाणी प्यायला दिल्यावर ती म्हणाली, “तुम्हारे राम तो सीधेसाधे हैं। वो हर स्थिती मैं समाधानी हैं। रामललाचे मंदिर तर नटखट श्यामच बांधणार. तोच प्रेरणा देणार.” मी त्या आईकडे पाहतच राहिले. तिने तिच्या देव्हाऱ्यातले ठाकूरजी माझ्या हातात दिले आणि म्हणाली, “जय श्रीकृष्णा, जय श्रीराम.” तिच्या थरथरणाऱ्या आवाजात एक प्रेरणा होती. आवेश होता. पण तिच्या बोलण्याचा अर्थ मला उमगला नाही. मला विचारमग्न बघून ती म्हणाली, “चिंता कशाला करतेस! मंदिर होणारच. मेरे ठाकूरजी मंदिर उभारण्याची प्रेरणा देतील.” त्याक्षणी हे ऐकून वाटले की, जर्जर झालेली ही ज्येष्ठ आई जर इतकी आशावादी आहे, तर आपण का घाबरायचे आणि निराश व्हायचे? बोलो, मंदिर वही बनायेंगे!”
 
या घटनेचा अर्थ काय असावा? माझ्या मनात आले, गुजरातला ‘जय श्रीकृष्ण’ म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी राम मंदिराचा निकाल दिला, त्यावेळी ‘जय श्रीरामां’सोबतच ‘जय श्रीकृष्ण’ म्हणणारे नरेंद्र मोदी हे सत्तेचे केंद्रबिंदू आहेत. त्या वृद्ध आईने म्हटले, त्याचा अर्थ हाच तर नाही ना! असो, दीदी माँना विचारले की, “तुम्ही तर साध्वी. मग तुम्ही राम आंदोलनात कशा?” यावर त्या म्हणाल्या, “माझे गुरुजी म्हणत, टोमॅटो तुम्ही कितीही सजवून ठेवा किंवा खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवा पण टोमॅटो खराब होणारच आहे. तसेच या देहाचे आहे. ते कितीही सुखात आणि काळजीत ठेवा. तो नष्टच होणार. पण कार्य आणि विचार मरत नाहीत. त्यामुळे जीवंत असेपर्यंत देव, देश, धर्मासाठी विचार करा आणि कार्य करा. त्यांचे विचार मला प्रेरणादायी आहेत. राम मंदिर आंदोलन हे देव, देश आणि धर्मासाठी होते. त्यामुळे हे आंदोलन माझे जगणे झाले.”
 
त्यांना म्हणाले, “दीदी माँ, ‘प्रभू राम मंदिर निधी समर्पण सोहळा’ सुरू आहे. पण मालाडमधील मालवणीसारख्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे पोस्टर फाडले गेले.” यावर साध्वी म्हणाल्या, “काय? हे भयंकर आहे. हिंदूंनी जागे व्हायला हवे. आपल्या अस्मितेशी चालणारा हा खेळ किती काळ सहन करणार? कायद्याने का होईना, पण या प्रकाराला आळा घालायला हवा. इथला हिंदू आज पूर्णपणे जागा झालेला नाही. पुन्हा गुलामगिरीच्या विळख्यात जाण्यास वेळ लागणार नाही. तेज, शौर्य, सत्य, न्याय जागवत हिंदूंनी जगायला हवे. श्रीराम आपल्या सोबत आहेत. डर कौनसा? जब प्रभू श्रीराम साथ हैं ।”
 
@@AUTHORINFO_V1@@